Sunday, February 12, 2012

शाहू पाटोळे, बाबा आमटे आणि उसवलेले नाते...

शाहू पाटोळे लिखित ‘भारत जोडो- उसवलेले दिवस’ या पुस्तकाबाबतची माझी टिप्पणी करण्याआधी मला माझी भूमिका स्पष्ट करावीशी वाटते. मी बाबा आमटे यांचा भक्त नाही. बाबांना एकेकाळी ‘आडवा बाबा’ म्हणणार्‍यांपैकी मी एक. पण कालांतराने हेटाळणीची भूमिका बदलत गेली आणि कामाबद्दल सहानुभूती वाटू लागली. पण, ‘लोक बिरादरी’, ‘छात्र भारती’, ‘युक्रांद’, ‘सेवादल’, ‘आंतरभारती’ अशा चळवळींविषयी मला कधी ममत्व वाटले नाही. ‘सुशिक्षित मुली गटविण्याचा एक राजमार्ग’ असे माझे या संघटनांविषयी मत होते. शिकलेल्या मुली गटवायच्या, प्रेमविवाह करायचा, त्यांना नोकरीला लावायचे आणि स्वतः कमाई करण्याऐवजी बायकोच्या पगारावर उंडारत फिरायचे असा या मंडळींचा एकंदर प्रयत्न असे. हा समज पक्का व्हावा अशी असंख्य उदाहरणे डोळ्यासमोर होतीच. (काही अपवादही नक्कीच होते!) शिस्त आणि संयमित वर्तनाबद्दल तर बोलायलाच नको. त्या मानाने बाबा आढाव यांच्या ‘एक गाव एक पाणवठा’सारख्या उपक्रमांबद्दल मात्र मला अभिमान वाटे. दोन्ही ‘भारत जोडो’बद्दल ऐकत होतो तेव्हाही हा प्रकार मला खूपच मजेशीर वाटत होता. पुढे, बाबा आमटे यांनी केलेल्या कार्यविस्ताराबद्दल आणि त्याच्यासाठी केलेल्या ‘इतरही’ काही प्रकारांबद्दल कानावर येत होते. पण मोठ्या कामापुढे अशा काही गोष्टी झाकल्या जातात. उभे राहिलेले काम मोठे आणि महत्वाचे वाटल्याने त्याकडे दुर्लक्षच करणे योग्य समजलो. पण तरीही मनाच्या कप्प्यात खोलवर कुठेतरी या विषयीची अप्रिती होतीच. व्यक्तीशः बाबा आमटे या व्यक्तीबद्दल आणि त्यांनी केलेल्या मनवतावादी सेवेबद्दल मनात नक्कीच आदर आहे. तरीही काही छोट्या छोट्या गोष्टी खटकतातच. शाहू यांचे पुस्तक वाचताना बाबा आमटे यांच्या तीन महिन्यांतील एकंदर दिनक्रमाबद्दल, त्यांच्या ‘कथनी-करनी’बद्दल अनेक गोष्टी उलगडत गेल्या. मग या पुस्तकाबद्दल लिहावेच, असे वाटू लागले कारण शाहू यांनी शेंदूर खरवडण्याचे धाडसाचे आणि महत्वाचे काम केले आहे.

शाहू पाटोळे प्रकाशनाच्या दिवशीच पन्नाशीचे झाले. ‘भारत जोडो’च्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनी हे पुस्तक प्रकाशित झाले.  ही त्यांची ‘भारत जोडो’च्या काळातील दैनंदिनी. ती जशीच्या तशी प्रकाशित झाली. शाहू यांनी केलेले हे लेखन त्यांच्या पंचेविशीतील आहे. बाबा आमटे या नावाच्या प्रेमात पडलेल्या तरुणाची जेमतेम 90 दिवसांत झालेली निराशा हा या पुस्तकाचा गाभा. मात्र ही निराशा केवळ भावनिक उद्रेकापोटी आलेली नाही. निराशेमागील प्रत्येक कारणाचे मोजमाप त्यांनी केलेले आहे आणि हे मोजमाप करताना त्यांनी वापरलेली फुटपट्टी बाबांनीच दिलेली आहे!
....

1980 च्या दशकात भारतात वाढलेल्या फुटीरतावादी चळवळींच्या आव्हानाला आपल्या परीने सामोरे जात देशभरातून ‘भारत जोडो’चा संदेश देत सायकल यात्रा काढण्याची कल्पना बाबा आमटे यांनी मांडली आणि या ‘नोबल कॉज’मध्ये सहभागी होण्याची उर्मी शाहू पाटोळे यांच्या मनात दाटून आली. देशातील अनेक ध्येयवेड्या तरुणांप्रमाणेच शाहू यांनी या आंदोलनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपले नावही नोंदविले. बाबा आमटे यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्वापुढे नतमस्तक होत त्यांनी दिलेली ही मानवंदना होती. ‘जोडो’त निवड झाल्यानंतर प्राथमिक तयारीसाठी ते आनंदवनात पोहोचले तेव्हा बाबा स्वतःच सामोरे आले. तेव्हाची मनःस्थिती त्यांनी लिहून ठेवली आहे, ‘‘... दुपारचं ऊन डोक्यावर घेऊन बाबांच्या बंगल्यासमोर उभा राहिलो. प्रत्यक्ष बाबांची मूर्ती अचानक पुढे येऊन उभी ठाकली आणि त्या महामानवाने मला विचारलं, ‘कुठून आलात?’ मी भांबावून गेलो. मला बोलताच येईना. कसं तरी ‘उस्माना...’ एवढंच म्हणालो...’’ तिथल्या वातावरणानेही ते प्रभावित झाले होते. अशा भारलेल्या स्थितीत ‘जोडो’ची आचारसंहिता ठरविणार्‍या बैठकीत ते सहभागी झाले. ही आचारसंहिता त्यांनी मुद्देसूद मांडली आहे. हीच आचारसंहिता पुढे त्यांच्या ‘मोजमापा’ची फुटपट्टी बनणार होती. शाहू यांनी दिलेली ही आचारसंहिता जशीच्या तशी ः
- भारत जोडोचा संदेश कथाकथन, चित्रपट, नाटक यातून देण्याचा प्रयत्न करणे.
- पथनाट्य व गाणी प्रत्येक भाषेत सादर करणे.
- हॉटेलात कुणीही काहीही खाणार नाही.
- सगळे सायकलस्वार 21 वर्षांच्या पुढचे असतील.
- सरकारची कसलीही साथ घेतली जाणार नाही (बाबांनी स्वतः मांडलेला मुद्दा)
- ही यात्रा स्वदेशी यात्रा असेल. कुणीही कसल्याही प्रकारची परदेशी वस्तू वापरणार नाही.
- प्रेसला कोणीही भेटणार नाही. कसल्याही प्रकारची मुलाखत किंवा लेख पाठविणार नाही.
- बाहेर कुणीही फिरणार नाही.
- सर्वांचे कपडे सारखेच असावेत.
- सर्वांचे जेवण एकत्र असेल. पाहुण्यांच्या घरी जेवायला किंवा कशासाटीही कुणीच जाणार नाही.
- सर्वांची ओळख एकच असेल - भारतीय.
- सर्वांनी डायरी लिहायला हवी.
- हार कुणीही स्वीकारणार नाही. फक्त एखादं फूल स्वीकारलं जाईल. (बाबांनी स्वतः मांडलेला आणि एकमतानं स्वीकारलेला मुद्दा.)
- बाबांनी ‘भारत जोडो’ची भूमिका एका वाक्यात सांगितली - ‘हम जब आग्रा जायेंगे तब हम ताजमहाल नहीं देखेंगे.हम वहॉं रिक्षावालोंकी बस्ती देखेंगे. यही भारत जोडो की भूमिका है। (या एका वाक्याच्या भूमिकेवर मी भारत जोडोत जाण्याचा पक्का निर्णय घेतला.)
- कुणीही कसल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. व्यसन असेल, तर अभियान सोडावं लागेल.
- कुणाचाही कसल्याही प्रसंगाचा फोटो काढला जाणार नाही.
- वाटेत कुणाला अपघात झाला तरी त्याच्यासाठी अभियान थांबणार नाही. बाबा आमटे वाटेत मेले तरी अभियान पुढे चालू राहील.
-कुठल्याही कंपन्यांचं किंवा कारखानदारांचं कसल्याही प्रकारचं सहकार्य घेतलं जाणार नाही. (बाबा म्हणाले - असं अनेक कंपन्यांनी मदत देण्याचं कबूल केलं, परंतु आपण नकार दिला आहे.)
....

आनंदवनातील त्यांचे हे काही दिवस अतिशय भारलेल्या स्थितीत गेले. तेथील कामांमुळे ते अतिशय प्रभावित झाले. पण तेथेच त्यांना बाबांच्या वागण्यातील काही वैगुण्ये दिसली. पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. पुढे ‘जोडो’दरम्यान आचारसंहितेची हीच कलमे पुढे ‘भारत जोडो’ दरम्यान बाबा आणि त्यांच्या अनुयायांकडून सातत्याने तोडली जाताना पाहून आणि विशेष म्हणजे बाबांकडूनच अनेक वेळा या कलमांना फासला जाणारा हरताळ पाहून शाहू व्यथित होत गेले.

पुस्तकाच्या आरंभी त्यांनी लिहिलेल्या टिपणात (हे टिपण मात्र ताजे दिसते. ते पुस्तकाच्या निमित्ताने लिहिले गेलेले आहे) त्यांनी काही निरीक्षणे मांडली आहेत... ‘‘... त्यागी माणसाने एका विशिष्ट मोहाच्या क्षणी सर्व पाश तोडल्याने त्याच्यासमोर परत फिरण्याचा मार्ग नसतो. म्हणून हयातभर नवनवीन योजनाबद्ध त्यागमार्ग शोधण्याचे कार्य सतत चालू असते. त्यागी माणसाने हे करायचं नाही तर कोणी? हा प्रश्न समाज म्हणून जे काही रसायन असतं त्यास पडत असतो. म्हणून त्या त्यागी माणसाचे पाय मातीचे दिसले तरी ते झाकण्याचे काम वर निर्देशिलेले दोघेही करत असतात. त्यागी हे याच समाजातून गेलेले असले तरी त्यांच्या त्यागाचं मूल्यमापन करणं हे त्यांचं अवमूल्यन समजलं जातं. त्यागी माणसाला एकदा का प्रेषितत्वाच्या चौकटीत चिणलं की त्याच्या कुठल्याही कृतीचं समर्थन ओघानंच येतं...’’ ‘‘...मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये असे भारतीय संस्कृती सांगते. माणसांबद्दल बोलणं पाप असेल पण त्याच्या कामाची चिकित्सा केली तर हे पाप कसे होईल?...’’ ही वाक्यंच या पुस्तकाचा (किंवा डायरीचा) मूळ आधार आहे.
....

कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या मार्गक्रमणातील असंख्य निरीक्षणे शाहू यांनी या डायरीत नोंदविलेली आहेत. ही निरीक्षणे जशी ‘भारत जोडो’बद्दल आहेत तशीच त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, नैतिक स्थितींचीही आहेत.

‘भारत जोडो’त सहभागी झालेल्या यात्रींशी बाबा, यदुनाथ थत्ते किंवा यात्रा समन्वयकांकडून मिळत असलेली वागणूक शाहूंना वारंवार खटकलेली दिसते. विशेषतः सर्वांकडून व्यक्त होणार्‍या अपेक्षा आणि त्या उलट त्यांच्याकडूनच होत असलेले उल्लंघन हे त्यांच्या बेचैनीचे महत्वाचे कारण दिसते. यात्रेतील व्यसनींचा सहभाग, सोबतच्या महिला सहकार्‍यांशी अधिकारी वर्गाचे असलेले अकारण अधिक जिव्हाळ्याचे संबंध, उघडपणे दिसत असलेला स्वैराचार, यात्रेचे पूर्णपणे कोसळलेले नियोजन, अनेकदा होत असलेली उपासमार, जे जे टाळायचे ठरले होते त्यातील अनेक गोष्टी प्रत्यक्षात घडताना पाहणे, बाबांचे असंबद्ध वाटावे असे बोलणे, आपली यात्रा अखिल भारताचे प्रतिनिधीत्व करते; हे दाखविण्यासाठी महाराष्ट्रातच राहणार्‍या पण वेगळ्या राज्यातील आडनावे वाटणार्‍या कार्यकर्त्यांची ओळख उत्तप्रदेश, राजस्थान अशा राज्यांतील कार्यकर्ते अशी करून देणे, अपंग कार्यकर्त्याला सतत समोर ठेवून सहानुभूती मिळविणे इतकेच नव्हे तर त्या अपंगाला ‘जयपूर फुट’ मिळवून देण्याची तयारी दाखविल्यानंतर तो प्रस्तावही फेटाळणे... या आणि अशा असंख्य उदाहरणांतून शाहूंनी बाबांचे ‘मातीचे पाय’ दाखविले आहेत. हे करतानाच यदुनाथ थत्ते यांच्यासारख्या व्यक्तींकडूनही होत असलेले अन्याय ते आवर्जून मांडतात. ठरविलेल्या आचारसंहितेची झालेली  चिरफाड त्यांना देखवत नाही. ते स्वतः आपल्या परीने ही आचारसंहिता पाळण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आपल्या या निरीक्षणांचा अर्क मांडताना ते काही शेलकी वाक्यं नोंदवून जातात... ‘‘महाराष्ट्रात समाजवादी चळवळीला जी अवकळा आली त्याला कारणीभूत समाजवादी म्हातारेच आहेत. अवघ्या तीन महिन्यांत जाणवलं की वैचारिक अधिष्ठानाच्या नावे हे काळ्याऐवजी पांढरी टोपी घालणारेच आहेत की काय?’’ बाबांच्या असंबद्ध वाटणार्‍या भाषणांचे वर्णन वाचताना अण्णा हजारेंची आठवण वारंवार येते. या दोन्ही व्यक्ती खूप उंच झाल्या पण बोलण्यातील असंबद्धता एकसारखीच वाटली!
....

शाहू पाटोळे यांच्यातील सामाजिक भान असलेला कार्यकर्ता या पुस्तकात जागोजागी डोकावत असतो. या कार्यकर्त्याला जशी सौंदर्यदृष्टी आहे तशीच पत्रकाराची काकदृष्टीही आहे. ‘‘तमिळनाडूतून केरळमध्ये प्रवेश केला आणि मी केरळच्या प्रेमातच पडलो. केरळशी माझं कुठंतरी नातं असावं, असं मला उगीचच वाटलं. लालचुटुक मातीचे रस्ते, नारळ, सुपारी, फणस, काजू यांची झाडेच झाडे. पाणथळ जागा. सकाळी केरळातील नारळ-सुपारीची लहान मोठी झाडे मद्यमवर्गीयांसारखी न्हाऊन-धुवून दुरूनच एखादा प्रसंग पाहात असावीत तशी भासली. शिंदीचं झाड डोक्यात उवा झालेल्या गरीब पोरीसारखं केस पिंजारून उभं होतं...’’ ही वाक्ये असोत की, ‘‘...दारिद्‌—यानं सारी वस्ती घेरलेली होती, समोर सागर हसत होता. त्यात विवेकानंद स्मारक खुलून दिसत होतं...’’... यातून वस्तुस्थितीबरोबरच थोडासा कडवडपणाही डोकावतो. पण असे असले, तरी या संपूर्ण लेखनात कुठेही आक्रस्ताळेपणा जाणवत नाही. एखाद्या ठिकाणी जाताजाता त्यांनी एकेकाळी केलेल्या बांधकामावरील मजुरीचा संदर्भ येऊन जातो, तेव्हा त्यांनी शिक्षणासाठी घेतलेली मेहनत कळते आणि कुठेतरी मंदिर प्रवेशाचा विषय येतो तेव्हा ते दलित समाजातील असल्याचा संदर्भ लागतो, एवढेच.
....

यात्रेतील सर्वाधिक तणावाचा भाग होता तो पंजाबमधील मार्गक्रमणादरम्यानचा. तेव्हा इंदिरा गांधी यांनी हत्या झाल्याला एखादेच वर्ष झालेले होते. शिख समाजातील रोष कायम होता. खलिस्तानी चळवळ जोरात होती. दंगेधोपे चालू होते. या काळात ही यात्रा सुवर्णमंदिरातही जाऊन आली. या तणावाच्या आठवणींबरोबरच तेथील शिख नागरिकांशी त्यांनी साधलेला सुसंवादही डोळ्यात अंजन घालणारा आहे. राजकारण्यांनी या देशात कसा विचका करून ठेवला आहे, याचे प्रत्यंतर पंजाब किंवा काश्मिरात येते. ज्या आनंदपूर साहिब ठरावाचा आग्रह शिख समाजाने धरला होता त्यात राष्ट्रविघातक असे काहीच नव्हते. आपल्या राज्याला पाणी मिळावे आणि न्याय्य हक्क मिळावेत अशी मागणी करणार्‍या या ठरावावरून राजकीय नेत्यांनी दंगे घडविले आणि त्यावर आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजून घेतल्या. शाहूंमधील पत्रकार इथे त्याची भूमिका चोखपणे बजावताना दिसतो.
....

कोणाचीही निंदानालस्ती न करता, अकारण हेत्वारोप न करता संयमितपणे आपली निरीक्षणे नोंदवीत शाहू वाचकांसमोर बाबांचे आणि या यात्रेचे चित्र स्पष्टपणे रेखाटतात. हे स्वच्छपणे ‘ब्लॅक अँड व्हाईट’ चित्र आहे. यात कुठेही हाफटोन नाही. त्यामुळे गर्भितार्थाची शक्यता नाही. लेखनाला लाभलेला हा प्रांजळपणाचा स्पर्श नग्नसत्य मांडून जातो ते या शब्दांत ः ‘‘भारत जोडो सायकल यात्रेच्या कन्याकुमारी ते जम्मू या अंतरात तीन महिन्यांच्या काळात एक जाणीव पक्की झाली - ती ही की, एखादी व्यक्ती एखादं कार्य यशस्वीपणे करील, पण सगळीच कार्यं जमतील असे नाही. त्या पेक्षा ‘स्पेशलायझेशन’ मानून तेवढंच निगुतीनं करणं बरं. निव्वळ यात्रा काढल्याने व तिचं नाव ‘भारत जोडो’ ठेवल्याने काहीही साध्य झाले नाही.

असे असूनही त्यांनी दुसर्‍या ‘भारत जोडो’साठी नाव पाठविलं होतं. पण आपल्याला आनंदवनातून त्या पत्राची साधी पोचही मिळाली नाही, हे सत्यही ते आपल्या प्रस्तावनेतच मांडून जातात, तेव्हा त्यांनी खरवडलेल्या शेंदरामागील दगड दिसू लागतो.
....

हे सारे लिहीत, वाचत असतानाच एक प्रश्न मनाच्या कोपऱ्यात कायम जागा असतो. शाहू यांनी पाहिलेले हे चित्र  मला सुद्धा वेगळे वाटते. मग काही लोक आणि संस्था बाबांचा आदर्श घेयून उभ्या कशा ठाकल्या? डॉ. शशिकांत अहंकारी, डॉ. अशोक बेलखोडे यांच्यासारखी मंडळी बाबांचा कोणता आदर्श घेयून उभी आहेत? विचारांचे ट्रान्समीटर आणि रिसीव्हर हे दोन्ही भाग सारखेच महत्वाचे असतात. इथे दोन्ही बाजूनी काही न्यून राहिले का? हा विचार जो तोच करू जाणे...
....

औरंगाबाद येथील जनशक्ती वाचक चळवळीने हे पुस्तक योग्य वेळी बाजारात आणले. अशी वादग्रस्त ठरू शकणारी पुस्तके बाजारात आणणे धाडसाचे काम असते. ते त्यांनी केले. पुस्तकाचे मुखपृष्ठ अर्थवाही झाले आहे. ‘भारत जोडो’चा मूळ लोगो वापरताना पार्श्वभूमीवर त्याच अक्षरलेखनाची केलेली कलाकुसर आणि रंगसंगती उत्तम जमली आहे. कोपर्‍यात चितारलेले सायकलपासून वेगळे झालेले चाक खूप काही सांगून जाते ! मात्र या पुस्तकात यात्रेचा मार्ग दर्शविणारा नकाशा एखाद्या पानावर छापता आला असता, तर वाचकांसमोर हा सारा पट अधिक चांगल्या प्रकारे उलगडता आला असता. शेवटच्या पानावर तशी जागाही शिल्लक होती !

---------------
अनेक मित्रांनी हे पुस्तक हवे असल्याचे सांगितले आहे. त्या सर्वांसाठी प्रकाशकाचा तपशील खालीलप्रमाणे :

जनशक्ती वाचक चळवळ
२४४, समर्थ नगर, औरंगाबाद - १

संपर्क : ०२४०-२३४१००४