Friday, March 9, 2012

नांदेडमध्ये प्रवेश करताना...

विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व आपापल्या क्षेत्रात काही उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या नांदेड शहर व जिल्ह्यातील व्यक्तींचा वेध घेणारे ‘नांदेड आयकॉन्स’ हे 288 पानी पुस्तक रविवार दि. 11 मार्च 2012 रोजी सकाळी 11 वाजता कुसुम नाट्यगृहात आयोजित विशेष कार्यक्रमात प्रकाशित होत आहे. या पुस्तकाची भूमिका मांडणारे आणि परिचय करून देणारे हे प्रास्ताविक ः
.....................................................

गुरु गोबिंदसिंघजी यांच्या वास्तव्याने आणि बलिदानाने पूनित झालेल्या नांदेडमध्ये या पुस्तकाच्या निमित्ताने मी प्रवेश केला आणि प्रत्यक्ष कामाला सुरवात 15 जुलै 2011 रोजी झाली. हा दिवस गुरुपौर्णिमेचा होता आणि योगायोगाने माझा जन्मदिनही! ज्या पवित्र मातीमध्ये ‘ग्रंथा’ला गुरुपदी विराजमान करण्याचा अलौकिक सोहळा पार पडला, त्याच सचखंड गुरुद्वारात जाऊन गुरुचे आशीर्वाद घेऊन मी या पुस्तकासाठीच्या कामाचा शुभारंभ केला. या पुस्तकात जे काही चांगले असेल ते वाहेगुरुजींच्या आशीर्वादाचे फळ आहे आणि ज्या त्रुटी असतील त्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे.

हे पुस्तक कोणासाठी आहे? प्रत्येक पिढी आपल्या पूर्वासुरींची परंपरा सांगते आणि आपला वारसा पुढील पिढीसाठी सोडून जाते. आजच्या पिढीने पुढील पिढीसाठी सोडलेला अनुकरणीय वारसा शोधण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. या पुस्तकातील प्रत्येक नाव ‘मेरिट’वर निवडण्यात आले आहे. या पुस्तकाची भाषा हा एक वेगळा विषय आहे. अनेक ठिकाणी रूढ व्यवहारात वापरले जाणारे शब्द आपण वाचाल. शुद्ध मराठीचा अतिरेकी आग्रह धरीत जडजंबाल मराठी शब्द वापरण्याऐवजी रूढ व्यवहारातील इतरभाषक शब्द या पुस्तकात वापरलेले आहेत. काळाबरोबर जाण्याचा हा प्रयत्न !

मराठवाड्यातील पहिल्या पिढीतील उद्योजकांवर आधारित ‘झेप’ हे पुस्तक मी 2 ऑक्टोबर 2006 रोजी प्रकाशित केले होते. त्याच धर्तीवर पण फक्त औद्योगिक विश्वापुरतेच मर्यादित न राहता सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींचा परिचय नव्या पिढीला करून देणारे ‘जालना आयकॉन्स’ हे पुस्तक ऑक्टोबर 2011 मध्ये प्रकाशित झाले. जालना येथील प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असलेले सुनील रायठठ्ठा यांच्या पुढाकारातून जालना जिल्ह्यातील वेगळ्या वाटा चोखाळणार्‍या 42 जणांचा परिचय करून देणारे हे पुस्तक सर्वांसमोर आले. हाच प्रयोग इतरत्र करण्याच्या दृष्टीने विचार सुरू झाला. जालन्याच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील लक्षणीय कामगिरी बजावणार्‍या व्यक्तींवरील पुस्तकाची कल्पना समोर आली. यामध्ये ‘पोलाद’ या ब्रँडनेमने बाजारपेठेत उपलब्ध सळईचे निर्माते; जालना येथील ‘भाग्यलक्ष्मी स्टील’चे संचालक सुनील गोयल यांनी पुढाकार घेतला. त्या दृष्टीने ‘आयकॉन्स’ची शोधमोहीम सुरू झाली. अशी माणसे शोधणे हे काम म्हटले तर सोपे आणि म्हटले तर कठिण असते. ही माणसे शोधण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागली.

‘आयकॉन्स’ ची व्याख्या काय? जिल्ह्यातील ही माणसे शोधताना निकष कोणते लावायचे? माणसे कशी निवडायची? इथे क्षेत्राचे बंधन नव्हते. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात   उत्तम रितीने कार्यरत असणारी व्यक्ती, हा आमचा पहिला निकष होता. त्या व्यक्तिचे चारित्र्य, व्यवहारातील सचोटी हा दुसरा निकष होता आणि त्याची समाजाभिमुखता हा तिसरा. आर्थिक उलाढालीला आमच्या लेखी महत्व नव्हते. कामातील ‘इनोव्हेशन’, त्यातील क्षमता हा भाग त्या दृष्टीने सर्वात महत्वाचा ठरणारा होता. समाज हा चांगल्या माणसांनी समृद्ध आहे. त्यातून काही निकष लावून निवड करायची, तरी ही यादी खूप मोठी होऊ शकते. नांदेड जिल्ह्याच्या शोधमोहिमेत अशी सुमारे 176 नावे हाती आली. यातील काही माणसं आधीपासून प्रकाशझोतात आलेली होती, तर काही जणांपर्यंत पहिल्यांदाच कोणी पोहोचत होते. त्यानंतर विविध क्षेत्रांतील निवडीचे निकष लावत ही यादी आणखी कमी करत आणली. मुलाखती आणि लेखनाचे काम पूर्णत्वाकडे जात असतानाच आणखीही काही नवी नावे समोर आली. अखेरीस 38 जणांच्या समावेशावर थांबण्याचा निर्णय झाला. या पुस्तकात आलीच पाहिजेत, अशी काही नावे समाविष्ट होऊ शकली नाहीत. यापैकी काही जणांनी स्वतःहून नकार दिला. प्रसिद्धीपराङ्‌मुख राहून कार्यरत राहण्याच्या त्यांच्या इच्छेला आम्हीही मान दिला. काही ठिकाणी वेळांचे - जागेचे गणित जमले नाही. 

नावे निवडताना ‘उद्योग’ हे क्षेत्र प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवले होते. त्याच बरोबर शेती, सामाजिक कार्ये, प्रशासन, व्यापार, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांचा धांडोळा घेऊन नावांची निवड करण्यात आली. ज्यांची नावे यामध्ये समाविष्ट झाली त्या पैकी माझा सर्वात पहिला परिचय झाला तो नांदेडचे भूतपूर्व जिल्हाधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याशी. हा परिचय या पुस्तकाच्या निमित्ताने नव्हता, तर सन 2008 मध्ये ‘गुर-ता-गद्दी’च्या काळात मी नांदेडमध्ये सुमारे दीड महिना वास्तव्यास होतो. या काळात श्री. मोपलवार यांचा; त्यांच्या कार्यपद्धतीचा आणि झपाट्याचा मी साक्षीदार राहिलो. प्रशासनाने मनावर घेतले तर काय काम उभे राहू शकते, याचे प्रत्यंतर या दीड महिन्यात मला आले. हे प्रशासन श्री. मोपलवार यांनी समर्थपणे हाताळले. ज्या जिल्ह्यात परिस्थितीवश श्री. मोपलवार यांनी व त्यांच्या आईनेही एकेकाळी रोजगार हमी योजनेवर काम केले होते, त्याच जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्या मनात दाटून येणार्‍या भावनांचा कल्लोळ मला समजून घेता आला. ज्या पदावर त्यांनी काम केले त्या प्रत्येक ठिकाणी आपला अमीट ठसा त्यांनी उमटविला. नांदेड जिल्ह्यातून प्रशासनात कार्यरत असलेले आणखी एक नाव म्हणजे ‘इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस’मध्ये पुण्यातील आयकर आयुक्तालयात कार्यरत असलेले उपायुक्त कैलास गायकवाड. त्यांनी परिस्थितीशी दिलेली झुंज प्रत्येक नवतरुणासाठी आदर्श ठरावी.

बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून किनवटमध्ये साने गुरुजी रुग्णालय चालविणारे ‘एमएस-सर्जरी’चे शिक्षण पूर्ण करणारे डॉ. अशोक बेलखोडे आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रेरणेतून धुळे जिल्ह्यातील बारीपाडा या वनवासी भागामध्ये आपल्या आयुष्यातील उमेदीची आठ-नऊ वर्षे घालवून आरोग्यसेवेसह सर्वांगीण विकासाचे मॉडेल उभे करणारे ‘एमडी-मेडिसीन’ झालेले डॉ. आनंद फाटक हे दोघेही याच जिल्ह्याचे! मुखेडसारख्या आडमार्गाच्या गावी जाऊन विशेषत्वाने सर्पदंशावर मौलिक काम करणारे डॉ. दिलीप पुंडे यांचा आदर्शही सर्वांनीच घ्यावा असा आहे. ‘रयत रुग्णालया’च्या छत्राखाली गरीबांना अत्यंत अल्पदरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणारे डॉ. सुरेश खुरसाळे आणि महिलांच्या प्रश्नावर समाज-जागरण करीत र. घों. कर्वे यांचा वारसा चालविणारे डॉ. किशोर अतनुरकर यांची वाटचालही प्रेरक म्हणावी लागेल.

बालाजी जाधव, चंद्रकांत गव्हाणे, गणपतराव मोरगे या तिघांचीही जीवनकथा वाळू-माती-सिमेंट-लोखंड यांच्याभोवती फिरणारी आहे. काही व्यावसायिक तडजोडी त्यांना कराव्याही लागल्या असतील, पण कसलेही ‘बॅकिंग’ नसताना अक्षरशः शून्यातून हे काम उभे करताना त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांची चिकाटी, दूरचा वेध घेण्याची त्यांची क्षमता यातून त्यांनी आपले स्वतःचे स्थान निर्माण केले.

जवळजवळ प्रत्येक नांदेडकराच्या मनाबरोबरच ‘पोटा’त स्थान मिळविणारे दडू पुरोहित आणि त्यांच्या भावंडांविषयी यांच्याबद्दल काय सांगणार? जिद्द, सचोटी आणि सांघिक भावनेतून एखादा उद्योग कसा फुलू शकतो, हे पाहायचे तर त्यांना भेटायला हवे. अशीच जिद्द आणि आपल्या मातीशी इमान राखण्याची इच्छाशक्ती दिसली ती कैलाश राठी यांच्यात. त्यांनी निर्मिलेला ‘पेन्ट’चा प्रकार भारतात सर्वात प्रथम निर्माण झालेला होता. केवळ जाहिरातींच्या भव्य बजेटअभावी ते प्रॉडक्ट मागे राहिले आणि तोवर एका बहुराष्ट्रीय कंपनीने तशा प्रकारचे उत्पादन वाजतगाजत बाजारात आणले. ही जबरदस्त बुद्धिमत्ता नांदेडमध्ये आहे. मराठवाड्यातील आजघडीचा सर्वात मोठा मॉल उभारणारे निलेश ठक्कर, पीव्हीसी पाईप्समध्ये चांगली कामगिरी बजावणारे रमेश पारसेवार, ‘लॉंन्ड्री’ सारख्या व्यवसायातही स्वतःची नवी ओळख निर्माण करणारे विनोद बाहेती यांच्या यशोगाथाही अतिशय प्रेरक ठरणार्‍या आहेत.

नांदेड जिल्ह्यातील महिलाही कुठेच मागे नाहीत, हे सिद्ध करतात न्या. स्वाती ठक्कर-चव्हाण, भार्गवी दीक्षित आणि प्रतिभा मांगुळकर. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या न्या. स्वाती यांच्यावर राज्य सरकारने पहिल्या ‘अनैतिक वाहतुक प्रतिबंधक न्यायालयाच्या पहिल्या न्यायमूर्ती’पदाची जबाबदारी मोठ्या विश्र्वासाने सोपविली आणि अमेरिकी प्रशासनानेही त्यांच्या कार्याचा विशेष पुरस्कार देत गौरव केला. भार्गवी दीक्षित यांनी देगलूरसारख्या गावात राहून महिलांच्या आरोग्यरक्षणाबरोबरच विविध व्यावसायिक कार्यात उभे केलेले काम थक्क करणारे आहे. प्रतिभा मांगुळकर नांदेडच्या औद्योगिक वसाहतीत पाण्याच्या टाक्या तयार करण्याचा उद्योग सांभाळतात. महिलांसाठी प्रेरक ठरणार्‍या या तिघींच्या कथा समाजासाठी नक्कीच उद्बोधक ठरतील.
ज्या विषयांना रूढ अर्थाने ‘उद्योगा’च्या व्याख्येत बसवता येत नाही अशा क्षेत्रात काम करणारे
‘भूगोलकोश’कार एल. के. कुलकर्णी, कवी दासू वैद्य आणि संगीत क्षेत्रातील उत्तम संकलन संग्रही असणारे प्र. तु. शास्त्री यांच्या कार्याचा परिचय अनवट वाटा चोखाळणार्‍यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. शेती हा विषय आज काहीसा दुर्लक्षित राहणारा. पण प्रसाद देव, रंगनाथ कदम, दिलीप देशमुख बारडकर यांनी या क्षेत्रामध्ये केलेले काम स्पृहणीय आहे. शेतीचे हे पैलू पारंपरिक प्रतिमेला छेद देणारे आणि ‘उत्तम शेती’चे दिवस पुन्हा एकदा आणणारे ठरतील, असा विश्र्वास वाटतो.

प्रौढशिक्षणाच्या क्षेत्रात ‘सेम लँग्वेज सबटायटल्स’च्या क्षेत्रात जागतिक पातळीवर आपले काम उभे करणारे ब्रिज कोठारी आणि विविध क्षेत्रांमध्ये आपापली वेगळी प्रतिमा निर्माण करणारे त्यांचे कुटुंबीय ही खूप आश्चर्यकारक बाब नांदेडमध्ये पाहावयास मिळाली. एकाच कुटुंबात किती नैपुण्य जन्मास यावे, याचे हे एक उत्तम उदाहरण. वेगळ्या पद्धतीने विचार केला, तर एकाच व्यक्तीमध्ये किती वैविध्य असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे हर्षद शहा. प्रचंड लोकसंपर्क असलेल्या या व्यक्तीबद्दलही आवर्जुन जाणून घ्यायलाच हवे. सामाजिक क्षेत्रात काम करणारी एस. पी. गायकवाड आणि प्रा. उपेंद्र कुलकर्णी ही नावे आपापल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून काम करणार्‍यांपैकी आहेत. 

शिक्षणाच्या आधाराने उद्योगात स्थिरस्थावर झाल्यानंतर अत्यंत उत्तम नियोजनाने आपल्या परिवारासह सर्वांचा उत्कर्ष साधणारे व विविध क्षेत्रांमध्ये प्रयोग करणारे डॉ. सूर्यकांत शिरपेवार, शून्यातून व्यवसाय उभा करणारे नागोराव दांडेगावकर, जात आणि व्यवसाय यांचा संबंध नसतो हे सिद्ध करणारे संजय देशपांडे, जिद्दीतही सातत्य दाखवीत फक्त उद्योजकतेचीच वाट चोखाळणारे दादाराव सोनकांबळे, वेगळ्या विचाराने एकातून दुसरा- दुसर्‍यातून तिसरा उद्योग उभारणारे गंगाराम चव्हाण, कलेच्या सामर्थ्यावर मुंबईत ओळख निर्माण करू शकणारे राम कस्तुरे, नवनवे व्यावसायिक प्रयोग करणारे अद्वैत उंबरकर आणि उमेश कोटलवार ही सारी या पुस्तकातील आगळीवेगळी व्यक्तिमत्वे.

याशिवाय पत्रकारितेच्या मार्गाने स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती जोपासणारे आणि आपल्या व्यक्तिमत्वातील पैलूंच्या स्पर्शाने आपल्या शासकीय नोकरीतही वेगळेपण आणणारे अजय अंबेकर यांची जीवनकहाणी मध्यममार्गी तरुणांसाठी प्रेरक ठरावी. या सर्व व्यक्तिमत्वांमध्ये उठून दिसणारे आगळे व्यक्तिमत्व आहे लेफ्टनंट कर्नल मुकुंद सरसर... नांदेडमध्येच जन्मलेले व वाढलेले ले. क. सरसर आज भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. काश्मीरमधील कामगिरीबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा ‘सेवा पदक’ देऊन गौरव करण्यात आला आहे. ‘करइर’चे असंख्य मार्ग उपलब्ध आहेत पण सैन्यदलातील ‘करइर’ इतर गोष्टींबरोबरच देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याचे समाधान देऊन जाते, हे सांगणारी मुकुंद सरसर यांची वाटचाल या पुस्तकाचा कळसाध्याय ठरावी. अशी एकंदर 38 व्यक्तिमत्वे आपणास या पुस्तकात वाचण्यास मिळतील. असा माझा हा नांदेड जिल्ह्याचा प्रवास! सुखद, प्रसन्न आणि अनुभवसंपन्न करणारा...!

या ‘आयकॉन्स’च्या भेटींसाठी मी त्यांच्या त्यांच्या गावी गेलो. नावे मिळविण्यापासून मुलाखती घेण्यापर्यंतचा सर्व मिळून प्रवास साधारण दोन-अडीच हजार किलोमीटर झाला असावा! नांदेडपासून मुंबईपर्यंत सगळीकडे गेलो. सर्वांना भेटलो.

आणखीही अनेक जणांची भेट झाली. वसंत मैय्या त्यापैकी एक. वसंतभाई म्हणजे नांदेडचा चालताबोलता सांस्कृतिक इतिहास. रूढ अर्थाने उडुपी उपाहारगृहाचे मालक अशी ओळख असलेल्या वसंतभाईंनी त्या व्यवसायापलिकडे जाऊन आपली ओळख निर्माण केली. त्यांचे हॉटेल (जे आता बंद आहे) हे नांदेडच्या सांस्कृतिक चळवळींचे केंद्र ठरले. साहित्य, अभिनय अशा विविध क्षेत्रांतील असंख्य मान्यवरांनी येथे पायधूळ झाडली आहे. कलेवरील प्रेमापोटी प्रसंगी पदराला खार लावून वसंतभाईंनी या चळवळीच्या जोपासनेत आपले योगदान दिले. त्यांचे वैयक्तिक ग्रंथालय हा एक आवर्जुन पाहण्याजोगा अनुभव. त्यांच्या संग्रहातील अनेक इंग्रजी-मराठी पुस्तके आपणास आश्चर्यचकित करतात. कितीतरी उत्तमोत्तम संदर्भग्रंथ त्यांच्या संग्रही आहेत. माझेच ‘झेप’ हे पूर्वी प्रकाशित झालेले पुस्तक त्यांनी आपल्या रॅकमधून काढून माझ्यासमोर ठेवले आणि ‘लेखक’ या नात्याने त्यावर माझी सही घेतली, तेव्हा मी रोमांचित झालो! त्यांच्याच बरोबरीने लक्ष्मण संगेवार, नंदन फाटक ही मंडळीही नांदेडच्या सांस्कृतिक इतिहासाचा महत्वाचा भाग आहेत.

सुरेश जोंधळे हे आणखी एक महत्वाचे नाव. या माणसाचे नेमके कोणत्या शब्दात वर्णन करावे हे ज्याला कळले, त्याला सुरेशभाईंचे आकलन झाले असे म्हणता येईल. पण अशी कोणी व्यक्ती मला भेटली नाही आणि मला काही त्यांचे पूर्ण आकलन झाले नाही. ‘वल्ली’ असा एक खास ठेवणीतला शब्द त्यांच्यासाठी वापरता येईल. होट्टलचे ऐतिहासिक हेमाडपंती मंदिर ‘इंन्टॅक’च्या माध्यमातून पुन्हा एकदा उभे राहिले पण त्या प्रयत्नांत सुरेश जोंधळे नसते, तर काय झाले असते, याचा अंदाज बांधता येणार नाही. इतिहासतज्ज्ञ श्री. प्रभाकर देव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेशभाईंनी या क्षेत्रात बजावलेली भूमिका अतिशय मोलाची आहे. नांदेड जिल्ह्यातील पुरातत्व ठेव्याची माहिती देणारे ‘नांदेड हेरिटेज’ सचित्र पुस्तक प्रकाशित करण्यातही सुरेशभाईंचाच पुढाकार होता. त्यातील सर्व छायाचित्रे त्यांनी स्वतः टिपलेली आहेत! ‘म्यूरल्स’ हा त्यांचा छंदाचा विषय. अशी अनेक म्यूरल्स त्यांनी तयार करून दिलेली आहेत. त्यांचे स्वतःचे वाचनही चांगले. म्हणजे इतके चांगले, की एखाद्या विषयावर बोलायला सुरवात करतील तर त्या क्षेत्रातील सखोल माहिती समोर येईल! नौकानयनात त्यांचा हातखंडा... तो इतका, की बॅकवॉटरमधील नेहेमीचा नावाडी त्यांच्यासोबत शर्यत हरलेला! पक्षी निरीक्षण हा त्यांचा आणखी एक छंद. हाडाचा कार्यकर्ता माणूस... ज्याला नेता होण्याचा रोग कधी लागला नाही. स्नेह्यांसाठी काहीही करण्याची या माणसाची तयारी. एल.के. कुलकर्णी यांनी गंगेवर अभ्यास करायचा, तर मुंबईच्या पुस्तकालयात दिसलेले नवेकोरे पुस्तक त्यांच्यासाठी आणणार, आणखी कुणासाठी काही करायचे तर स्वतःच्या खर्चाने धावत जाणार. हे सगळे करताना ‘मी काही विशेष करीत नाही...’ असा भाव ! प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांपासून सामान्य माणसापर्यंत प्रत्येक स्तरांत प्रचंड जनसंपर्क असलेली श्री. जोंधळे यांच्याारखी व्यक्ती विरळाच. अशी स्नेही मंडळी या निमित्ताने मला जोडता आली. 

एक बाब येथे आवर्जून स्पष्ट करावीशी वाटते, की या पुस्तकात मांडलेले 38 जण म्हणजे नांदेड जिल्ह्याचा परिपूर्ण परिचय नव्हे. ही नावे केवळ प्रातिनिधिक अशी आहेत. नरहर कुरुंदरकर यांचा वैचारिक वारसा जोपासणार्‍या आणि ग. ना. अंबेकर यांचा सांस्कृतिक वारसा सांगणार्‍या नांदेड जिल्ह्यातील अनेक नावे अत्यंत जड अंतःकरणाने आम्हाला बाजूला ठेवावी लागली. विविध सामाजिक कार्यात अग्रभागी असणारे ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोईफोडे, एमजीएम कॉलेज उभे करणार्‍या प्राचार्या डॉ. गीता लाठकर, श्री गुरुगोबिंदसिंघजी अभियांत्रिकीचे शिल्पकार (आणि हे पुस्तक छपाईसाठी जात असतानाच ज्यांच्या अकाली निधनाची दुःखद वार्ता कळाली असे) प्राचार्य डॉ. एस. आर. काजळे, दत्ता भगत, चित्रपटसृष्टीतील संदर्भांवर कसदार लेखन करणारे विजय पाडळकर, कवी लक्ष्मीकांत तांबोळी, वैचारिक लेखनातील अग्रगण्य नाव असणारे प्रा. शेषराव मोरे, बाबू बिरादार, तु. शं. कुलकर्णी, मधुकर धर्मापुरीकर, डॉ. बाळासाहेब साजणे, डॉ. सविता भालेराव, दिलीप शिंदे, पं. नाथराव नेरळकर, सीताभाभी, नाथा चितळे, ताराबाई परांजपे, कविता महाजन, प्रभाकर देव, डॉ. शिवाजी शिंदे, नंदू मेगदे, रमेश पारे, जगदीश महाराज... ही बरीच मोठी यादी होऊ शकेल. कदाचित, या पुस्तकाचा दुसरा भाग भविष्यात प्रकाशित करावयाचे ठरल्यास ही नावेही त्यात समाविष्ट करणे शक्य होईल.

या निर्मितीसाठी लाभलेल्या ‘पोलाद’च्या निरपेक्ष सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.

नांदेडच्या प्रेरणादायी विश्वात आपणा सर्वांचे स्वागत!

- दत्ता जोशी

No comments: