Sunday, April 8, 2012

उस्मानाबादेत प्रवेश करताना

माझे सहावे पुस्तक ‘उस्मानाबाद आयकॉन्स’ रविवार दि. 8 एप्रिल रोजी उस्मानाबाद येथे आयोजित सुंदर सोहळ्यात प्रकाशित झाले. मागील वर्षभराच्या मेहनतीतून ‘जालना आयकॉन्स’, ‘नांदेड आयकॉन्स’, ‘लातूर आयकॉन्स’ आणि ‘उस्मानाबाद आयकॉन्स’ ही प्रेरक पुस्तके आकारास आली. या निमित्ताने हजारो किलोमीटरचा प्रवास झाला आणि 148 जणांच्या मुलाखती घेऊन झाल्या. ही नावे मिळविण्यासाठी शेकडोंच्या भेटी झाल्या. जालना येथील ‘पोलाद’ ब्रँडच्या भक्कम पाठबळामुळेच हे सारे शक्य होऊन प्रत्यक्षात उतरते आहे, हे मी इथे आवर्जून नमूद करू इच्छितो. ‘उस्मानाबाद आयकॉन्स’मागील माझी भूमिका मांडणारे हे मनोगत...
...............................................................................................

‘उस्मानाबाद आयकॉन्स’ हे पुस्तक आपल्या हाती ठेवताना मला मनापासून आनंद होत आहे. राज्यातील पर्जन्यछायेच्या प्रदेशात ज्या भूभागाचा समावेश होतो, त्यापैकी हा एक भाग. पावसाच्या दृष्टीने दुष्काळी असला तरी सांस्कृतिक परंपरेच्या दृष्टीने हा परिसर प्राचीन काळपासून अतिशय संपन्न. ‘धाराशीव लेणी’ हा या संपन्नतेचा एक महत्वाचा भाग. एकेकाळी उस्मानाबाद हे गाव ‘धाराशीव’ याच नावाने प्रचलित होते. आजही अनेक जण या गावाला ‘धाराशीव’ नावाने संबोधतात. धाराशीव लेणी ही शैव आणि जैन या दोन्ही संप्रदायाच्या परंपरेतील महत्वाची लेणी मानली जातात. हा वास्तविक लेण्यांचा समूह आहे. शहरापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर काही लेणी आहेत तर ईशान्येला साधारण 18 किलोमीटर अंतरावर इतर. काळाच्या ओघात कडे कोसळून या लेण्यांचे बरेच नुकसान झाले असले तरी संपन्नतेचा वारसा ही लेणी अजूनही मिरवतात. ही लेणी इसवीसन पूर्व 650 ते 500 या काळात कोरली गेली असावीत, असे मानले जाते. ‘करकंडचरिउ’ या जैन ग्रंथात या लेणींचे वर्णन आहे. जैन परंपरेत ‘करकंड’ हा राजा पार्श्वनाथ यांचा समकालीन मानला जातो. त्यामुळे ही लेणी इसवीसनपूर्व नवव्या शतकातीलही असावीत असाही एक मतप्रवाह आहे. (संदर्भ ः भारतीय संस्कृती कोश, खंड ७ ) असा हा ‘धाराशीव’ नावाचा इतिहास...

या जिल्ह्यात अशा अनेक ‘युनिक’ गोष्टी सापडतात... परांडा तालुक्यातील डोमगाव येथे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य कल्याणस्वामी यांच्या हस्ताक्षरातील दासबोधाची मूळ प्रत अद्याप जतन करून ठेवण्यात आलेली आहे. कोट्यवधींची कुलस्वामिनी ‘तुळजाभवानी’ याच जिल्ह्यात आहे. मध्य प्रदेशातील उज्जैननंतर पवित्र समजले जाणारे काळभैरवाचे भैरवनाथ मंदिर परांडा तालुक्यातील सोनारी येथे आहे. दक्षिण भारतातील हे असे एकमेव मंदिर! कुंथलगिरी हे जैनपंथीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र. सन 1630-31 मध्ये बांधल्या गेलेल्या परांडा किल्ल्याशी छत्रपती शिवरायांचे पिताश्री शहाजीराजांच्या स्मृती निगडीत आहेत. नळदुर्गचा प्रसिद्ध किल्ला इतिहासापासून स्वातंत्र्यलढ्यापर्यंत महत्वाचे ठिकाण राहिलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1942 मध्ये कसबे तडवळ्याला भेट दिली होती. त्या वेळी त्यांची ज्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली होती, ती बैलगाडी तेथील ग्रामपंचायतीत आजही सुरक्षितपणे जतन करून ठेवण्यात आलेली आहे. तेरचे संग्रहालय हा तर जागतिक वारशाचाच भाग मानावा लागेल. प्राचीन भारतीय संस्कृतीची संपन्नता सिद्ध करणारे असंख्य पुराणवस्तुंचे हे संग्रहालय या जिल्ह्यातील फार मोठा ठेवा आहे. या ठेव्यांचे जतन करीत असतानाच नव्या पिढीसमोर हे सारे पद्धतशीरपणे मांडण्याची यंत्रणा उभी करणे महत्वाचे ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर हे पुस्तक प्रकाशित होत आहे. हे पुस्तक कोणासाठी आहे? प्रत्येक पिढी आपल्या पूर्वासुरींची परंपरा सांगते आणि आपला वारसा पुढील पिढीसाठी सोडून जाते. आजच्या पिढीने पुढील पिढीसाठी सोडलेला अनुकरणीय वारसा शोधण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. या पुस्तकातील प्रत्येक नाव ‘मेरिट’वर निवडण्यात आले आहे. ‘आयकॉन्स’ ची व्याख्या काय? जिल्ह्यातील ही माणसे शोधताना निकष कोणते लावायचे? माणसे कशी निवडायची? इथे क्षेत्राचे बंधन नव्हते की उलाढालींच्या डोंगरांच्या अपेक्षा नव्हत्या. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात उत्तम रितीने कार्यरत असणारी व्यक्ती, हा आमचा पहिला निकष होता. त्या व्यक्तिचे चारित्र्य, व्यवहारातील सचोटी हा दुसरा निकष होता आणि त्याची समाजाभिमुखता हा तिसरा. आर्थिक उलाढालीच्या आकड्यांना आमच्या लेखी महत्व नव्हते. कामातील ‘इनोव्हेशन’, त्यातील क्षमता हा भाग त्या दृष्टीने सर्वात महत्वाचा ठरणारा होता. समाज हा चांगल्या माणसांनी समृद्ध आहे. त्यातून काही निकष लावून निवड करायची, तरी ही यादी खूप मोठी होऊ शकते. उस्मानाबाद जिल्ह्याच्या शोधमोहिमेत अशी 80 हून अधिक नावे हाती आली. यातील काही माणसं आधीपासून प्रकाशझोतात आलेली होती, तर काही जणांपर्यंत पहिल्यांदाच कोणी पोहोचत होते. त्यानंतर विविध क्षेत्रांतील निवडीचे निकष लावत ही यादी 20 पर्यंत पोहोचली. या पुस्तकात आलीच पाहिजेत, अशी काही नावे समाविष्ट होऊ शकली नाहीत. यापैकी काही जणांनी स्वतःहून नकार दिला. प्रसिद्धीपराङ्‌मुख राहून कार्यरत राहण्याच्या त्यांच्या इच्छेला आम्हीही मान दिला. काही ठिकाणी परस्परांना उपलब्ध असलेल्या वेळांचे अथवा या पुस्तकात उपलब्ध जागेचे गणित जमले नाही. 
नावे निवडताना ‘उद्योग’ हे क्षेत्र प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवले होते. एक उद्योग उभा राहिला तर अनेक कुटुंबं उभी राहतात आणि त्यातूनच परिसराच्या विकासाला चालना मिळते. त्यामुळे या विषयाकडे अधिक प्राधान्याने लक्ष! त्याच बरोबर शेती, सामाजिक, प्रशासन, व्यापार, सांस्कृतिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सैन्यदले. अशा सर्वच क्षेत्रांचा धांडोळा घेऊन नावांची निवड करण्यात आली. या पुस्तकात समाविष्ट करावयासाठीची नावे शोधताना अनेकांशी भेटून चर्चा केली. यामध्ये पत्रकारिता, सामाजिक कार्य, उद्योग अशा विविध क्षेत्रांचा समावेश होता. जिल्हा उद्योग केंद्रासारख्या संस्थांतूनही अनेक उद्योजकांची नावे मिळाली. उद्योग केंद्रातील अधिकार्‍यांनी त्यात मोठी मदत केली. अशा विविध भेटींतून समोर आलेल्या नावांतून ही 20 नावे निवडण्यात आली. या पुस्तकाच्या दृष्टीने ‘आयकॉन्स’ची शोधमोहीम जुलै 2011 मध्येच सुरू झाली. अशी माणसे शोधणे हे काम म्हटले तर सोपे आणि म्हटले तर कठिण असते. ही माणसे शोधण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागली.

मराठवाड्यातील पहिल्या पिढीतील उद्योजकांवर आधारित ‘झेप’ हे पुस्तक मी 2 ऑक्टोबर 2006 रोजी प्रकाशित केले होते. त्याच धर्तीवर पण फक्त औद्योगिक विश्वापुरतेच मर्यादित न राहता सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींचा परिचय नव्या पिढीला करून देणारे ‘जालना आयकॉन्स’ हे पुस्तक ऑक्टोबर 2011 मध्ये प्रकाशित झाले. त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील लक्षणीय कामगिरी बजावणार्‍या व्यक्तींवरील पुस्तक 11 मार्च 2012 रोजी नांदेड येथे तर ‘लातूर आयकॉन्स’ हे पुस्तक 1 एप्रिल 2012 रोजी लातूर येथे प्रकाशित झाले. ‘पोलाद’ या ब्रँडनेमने बाजारपेठेत उपलब्ध सळईचे निर्माते; जालना येथील ‘भाग्यलक्ष्मी स्टील’चे संचालक सुनील गोयल यांनी या कामी पुढाकार घेतला. असाच प्रयोग आता उस्मानाबाद जिल्ह्यात होतो आहे. या पुस्तकाची भाषा हा एक वेगळा विषय आहे. अनेक ठिकाणी रूढ व्यवहारात वापरले जाणारे शब्द आपण वाचाल. शुद्ध मराठीचा अतिरेकी आग्रह धरीत जडजंबाल मराठी शब्द वापरण्याऐवजी रूढ व्यवहारातील इतरभाषक शब्द या पुस्तकात जसेच्या तसे वापरले आहेत. काळाबरोबर जाताना भाषेचा नवा प्रवाह स्वीकारण्याचा हा प्रयत्न !

उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यातील विविध गावांबरोबरच येथून दूरवर राहत असलेल्या त्यांच्या गावापर्यंत, पुण्यामुंबईपर्यंत सर्व शहरांमध्ये या निमित्ताने एकंदर साधारण एक ते दीड हजार किलोमीटर प्रवास केला. हे ‘आयकॉन्स’ कार्यरत असलेल्या भागाला प्रत्यक्ष भेटी दिल्या. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विविध भागांत फिरतानच पुणे - मुंबई - औरंगाबादेतील व्यक्तींनाही भेटून त्यांच्या प्रवासकथा ऐकल्या आणि त्यांनी गाठलेली यशाची शिखरे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. या सर्व कथा आपण या पुढील पानांतून वाचाल. 

संरक्षणदल, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, वैद्यक व्यवसाय, साहित्य, सामाजिक कार्य अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांतून निवडलेली ही माणसं आपापल्या ठिकाणी राहून आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत. यातील प्रत्येकाच्या मनात सामाजिक भावना रुजलेली आहे. आपण या समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून जेव्हा कोणी आपल्या व्यवसायात किंवा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात उतरतो, तेव्हा त्याच्या कार्यक्षमता व कार्यकुशलतेला एक आगळे परिमाण लाभते. या पुस्तकातील सर्व 20 जण अशाच प्रकारे आपापल्या क्षेत्रात उत्तम रितीने कार्यरत आहेत. वेगळ्या वाटा चोखाळत त्यांची वाटचाल सुरू आहे. या 20 जणांत सैन्यदलातील एका व्यक्तिमत्वांचा आम्ही आवर्जुन समावेश केला आहे. सैन्यदल हा ‘करइर’चा एक उत्तम मार्ग आहे. भ्रष्टाचाराने बजबजलेल्या या वातावरणात आजही या एका क्षेत्राबाबत सामान्य माणून आशावादी आहे. त्यांच्याकडे सर्व जण अजूनही आदराने पाहतात. मग या क्षेत्रात जाण्यासाठी प्रेरणा का मिळू नये? 

‘आयकॉन्स’वर लिहिल्या जाणार्‍या विविध जिल्ह्यांतील पुस्तकांत किमान एक तरी ‘आयकॉन’ सैन्यदलातील हवा, हा आमचा आग्रह आहे. त्या दृष्टीने जाणीवपूर्वक हे ‘वीर’ शोधले जातात. कोणा एका व्यक्तीऐवजी एका कार्यशील समूहालाच आपणासमोर मांडणारे यमगरवाडीतील प्रकल्पाचे कार्यही असेच वेगळेपण स्पष्ट करणारे आहे. समाजात आजवर उपेक्षित राहिलेल्या घटकांच्या पुढच्या पिढ्या सुसंस्कारित करणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे अतिशय महत्वाचे कार्य येथे होते आहे. कौतुक वाटते ते इथे शिकण्यासाठी आलेल्या मुलांचे. तशा अर्थाने कसलीही शैक्षणिक पार्श्वभूमीच काय पण साधी अक्षरओळखही नसलेल्या आई-बापाच्या पोटी जन्माला आलेली ही मुले ज्या सहजतेने संगणक हाताळतात, विज्ञानाच्या प्रयोगशाळेत वावरतात आणि पुस्तकी ज्ञानाला आपल्या प्रयोगशीलतेची जोड देतात, तेव्हा उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात असल्याचे मन भारून टाकणारे समाधान मिळते.

एक बाब येथे आवर्जून स्पष्ट करावीशी वाटते, की या पुस्तकात मांडलेले 20 जण म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्याचा परिपूर्ण परिचय नव्हे. ही नावे केवळ प्रातिनिधिक अशी आहेत. वास्तविक ही बरीच मोठी यादी होऊ शकेल. कदाचित, या पुस्तकाचा दुसरा भाग भविष्यात प्रकाशित करावयाचे ठरल्यास ही नावेही त्यात समाविष्ट करणे शक्य होईल.

या निर्मितीसाठी लाभलेल्या ‘पोलाद’च्या निरपेक्ष सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.

उस्मानाबादच्या प्रेरणादायी विश्वात आपणा सर्वांचे स्वागत!

- दत्ता जोशी

No comments: