Wednesday, September 18, 2013

पाणीटंचाई मुक्तीचा ‘जालना पॅटर्न’

जालन्याचा पाणीप्रश्‍न सन 2013 च्या उन्हाळ्यात जगभरात गाजला. सार्‍या जगाच्या सहानुभूतीच्या नजरा या जिल्ह्याकडे वळल्या. कुचेष्टेच्या स्वरात बोलायचे तर हा ‘दुष्काळी पर्यटनाचा सोहळा’च झाला. पण कधी कधी मोठी आपत्ती इष्टापत्ती ठरते. जालन्याच्या बाबतीच असेच काहीसे घडते आहे. ‘गाव करील ते राव काय करील’ या उक्तीला साजेशी चळवळ जालन्यात उभी राहिली आणि जालन्याकडे सहानुभूतीने वळणार्‍या नजरा कौतुकाने वळविण्याचे बिजारोपण याच उन्हाळ्यातील चार महिन्यांत झाले. हे होत असतानाच विक्रमी कालावधीत, अत्यंत कमी खर्चात सार्वजनिक कामे कशी उभी राहू शकतात, याचा वस्तुपाठही या शहराने घालून दिला... ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’च्या पुढाकाराने हाती घेण्यात आलेले हे काम श्री. रमेशजी पटेल, श्री. सुनीलजी रायठठ्ठा आणि सौ. सपनाजी सुनील गोयल यांच्या नेतृत्वाखाली आकार घेते आहे.

जालन्याचा पाणीप्रश्‍न नेतृत्वाच्या अकर्मण्यतेचा परिपाक आहे, ही बाब असंख्य वेळा अधोरेखित झाली आहे. निजामाच्या काळात 1935 मध्ये खोदण्यात आलेल्या घाणेवाडीच्या तलावाने जालन्याची तहान सातत्याने भागविली. पण 78 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात या तलावात खूप मोठ्या प्रमाणात गाळ साचला आणि साहजिकच तलावाची साठवणक्षमता जेमतेम 25 टक्क्यांवर आली. कुंडलिका नदीवर निधोना गावाच्या उत्तरेकडे बांधण्यात आलेल्या या तलावाच्या बंधार्‍याची रुंदी 836 मीटर तर उंची 15 मीटर आहे. साचलेल्या गाळामुळे ही उंची जेमतेम पाच मीटरपर्यंत राहिली. उंची एक तृतियांश उरली तरी क्षमता त्याच्या अनेक पटीत कमी झाली, कारण पाण्याची खोली कमी झाल्याने बाष्पिभवनाचे प्रमाण वाढले. या तलावातील गाळ उपसला आणि पाण्याची साठवणक्षमता वाढविली, तर आजही हा तलाव जालनेकरांची वर्षभराची तहान भागवेल, हे स्पष्ट दिसत असताना प्रशासन ढिम्म होते आणि लोकप्रतिनिधी उदासीन.

घाणेवाडी तलावातील गाळ
या पार्श्‍वभूमीवर ‘घाणेवाडी जलसंरक्षण मंचा’ची स्थापना ‘विक्रम चहा’चे श्री. रमेशजी पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांना श्री. सुनीलजी रायठठ्ठा यांची साथ मिळाली. जालन्याच्या नागरिकांतून काही प्रमाणात निधी उभा राहण्यास प्रारंभ झाला आणि सन 2010 च्या उन्हाळ्यात घाणेवाडी तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ करण्यात आला. तेव्हापासून सलग चार वर्षे, दर वर्षी नित्यनेमाने हे काम सुरू आहे. दर वर्षी तलाव कोरडा पडल्यानंतर साधारणपणे तीन ते चार महिने मर्यादित साधनांद्वारे हे काम केले जाते. साधारणपणे 45 हजार ट्रॅक्टर गाळ दरवर्षी बाहेर काढला जातो. जालन्यातून दरवर्षी साधारण 20 लाख रुपये उभे राहतात आणि त्या द्वारे यंत्रणा वापरात आणून हे काम करण्यात येते. तलावात साचलेल्या गाळाच्या उंचीचा अंदाज या वर्षीच्या उन्हाळ्यात प्रशासनाने पाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांतून घेता येतो. ‘घाणेवाडी जलसंरक्षण मंचा’ने खोदलेल्या साधारण 10 फुट खोल पातळीच्याही खाली साधारण 10 फुटांचा खड्डा प्रशासनाने घेतला. त्यातही गाळाची पातळी साधारणपणे 2 फुटांची दिसते. याचाच अर्थ, तलावातील सर्वसाधारणपणे गाळाची पातळी 12 फुटांची आहे. मागील चार वर्षांत झालेले काम जेमतेम एक ते दोन टक्क्यांचेच आहे. 670 एकरांच्या तलावातील साधारणपणे 20 ते 25 एकरांच्या क्षेत्रातील सरासरी 8 फुटांचा गाळ काढण्यात आजवर यश आले आहे. याच गतीने हे काम चालू राहिले, तर हे काम साधारण 100 ते 125 वर्षे पुरेल ! प्रशासनाने या कामात पुढाकार घेत किमान 50 ‘पोकलेन’ व ‘जेसीबी’ची यंत्रणा उपलब्ध करून दिली आणि त्याला 250 हून अधिक टिप्परची जोड दिली, तर कदाचित हे काम साधारणपणे पाच उन्हाळ्यांत मिळून पूर्ण हेऊ शकेल आणि जालनेकरांची तहान पूर्णपणे भागवता येईल.

कुंडलिका नदीवरील बंधारे
घाणेवाडी तलावापासून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर निधोना गाव आहे. कुंडलिका नदी या गावाला वळसा घालून पुढे वाहते. साधारण 8 किलोमीटरचा प्रवास करीत ही नदी जालना येथे पोहोचते. धरणातील गाळाप्रमाणेच या नदीचीही स्थिती झालेली असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘घाणेवाडी जलसंरक्षण मंचा’ने या नदीवर शिरपूर पद्धतीचे बंधारे बांधण्याचे ठरविले.

राज्यभरात गाजलेल्या ‘शिरपूर पॅटर्न’चे प्रणेते श्री. सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जालन्यात हे काम सुरू करण्याचे ठरविण्यात आले. मात्र, या कामाचे सार्वत्रिक स्वागत होऊन मदतीचे हात पुढे येण्या ऐवजी अनेकांनी त्यात चक्क अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यातून खचून न जाता मंचाने ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’च्या पुढाकारातून हे काम प्रत्यक्षात उतरविण्याचा निर्धार केला. याचा शुभारंभ झाला 21 एप्रिल 2013 रोजी. 
निधोना गावानजिक या नदीत ‘शिरपूर पॅटर्न’द्वारे सुमारे 500 मीटर पात्र खोल करून त्यावर बांध घालण्याचे ठरवून  ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ने प्रत्यक्ष कामास प्रारंभ केला. ‘शिरपूर पॅटर्न’चे प्रणेते श्री. सुरेश खानापूरकर यांच्या शुभहस्तेच हा उपक्रमाचा नारळ वाढविण्यात आला. प्रारंभी वाटले तेवढे हे काम सोपे नाही, याची जाणीव हे नदीपात्र खोदताना सर्वांना झाली.




साधारणपणे दोन-तीन फूट खोल गेल्यानंतरच कठिण खडकास सुरवात झाली आणि कामाचा वेग मंदावला. साधारणपणे 30 दिवसांत हे काम पूर्ण व्हावे असे अपेक्षित होते, पण त्याला जास्त वेळ लागणार हे स्पष्ट होऊ लागले. ही सारी कामे पोकलेन आणि जेसीबीद्वारेच चालू होती, हे विशेष.

घाणेवाडी तलावाजवळ असलेल्या या बंधार्‍याला ‘बंधारा क्र. 1’ असे नाव देण्यात आले. या बंधार्‍यानंतर प्रत्येक किलोमीटरवर सुमारे 500 मीटर लांबीचा एक अशा प्रकारे आठ साखळी बंधारे घालण्याची संकल्पना  ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’तर्फे मांडण्यात आली. त्यामुळे या संपूर्ण परिसरात प्रत्येक किलोमीटरवर पाणी साठून ते जमिनीत झिरपेल आणि परिसरातील भूजलपातळी उंचावेल, असे अपेक्षित आहे. पण इथे प्रश्‍न आला आर्थिक क्षमतेचा. त्यामुळे दोन ते सात क्रमांकाचे बंधारे घालण्याचे काम तात्पुरते पुढे ढकलून मंडळाने थेट आठव्या बंधार्‍याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबादहून जालना शहरात जाताना कुंडलिका नदी ओलांडावी लागते. या नदीवरून जाताना डाव्या हाताला ‘रामतीर्थ बंधार्‍या’चे नाव नदीपात्रात स्पष्टपणे दिसू लागते. हाच तो आठवा बंधारा. या बंधार्‍याने अनेक विक्रम केले. बंधार्‍याचे भूमीपूजन 11 मे2013 रोजी झाले आणि 11 जून 2013 रोजी हा बंधारा संपूर्ण काम संपवून कार्यान्वित झाला होता! नदीपात्रात 500 मीटर लांबपर्यंत साधारणपणे 6 मीटर खोल खोदकाम करून पात्रातील गाळ, माती, वाळू आणि खडक बाहेर काढण्यात आला आणि तो पात्राच्या कडेने सुरक्षित अंतरावर टाकण्यात आला. नदीपात्र तब्बल 50 मीटरपर्यंत रुंद करण्यात आले. आठव्या क्रमांकाच्या या बंधार्‍याची लांबी 50 मीटर आहे. बंधार्‍यालगत नदीची खोली तब्बल 15 फूट आहे. सिमेंट कॉंक्रिटमध्ये बांधण्यात आलेल्या या बंधार्‍यात ‘ओव्हरफ्लो’ होणारे पाणी सांडव्यावरूनच वाहून जाण्याची सोय करण्यात आली आहे. पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे बंधार्‍याच्या मुख्या भिंतीला धक्का पोहोचू नये, म्हणून दगडाचे ‘पिचिंग’ करण्यात आले. 

बंधार्‍याच्या कामातील ‘विक्रमांचा विक्रम’
या बंधार्‍याने अशा प्रकारच्या कामांमध्ये विक्रमांवर विक्रम नोंदविले. वर उल्लेख केल्याप्रमाणे मोठे आकारमान असलेला हा बंधारा ‘सरकारी’ पद्धतीने तयार करायचा, तर नेमका किती काळ लागला असता, याचे उत्तर देणे फारसे अवघड नाही. या साठी किती निधी लागू शकला असता, यावर वेगवेगळी उत्तरे येऊ शकतात, पण कंत्राटदारांच्या खाजगीतील अंदाजानुसार हे काम पूर्ण होण्यासाठी साधारण 6 कोटी रुपयांचे बजेट नक्की लागले असते. हेच काम  ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ने केवळ 1 कोटी 25 लाखांत पूर्ण केले! भ्रष्टाचार होणार नाही, याची काळजी घेतली आणि कामावर निष्ठा ठेवली, तर काय घडू शकते, याचे उदाहरण म्हणून ‘रामतीर्थ बंधार्‍या’चे नाव सांगता येईल. 4 पोकलेन, 1 जेसीबी आणि 12 टिप्पर यांच्या सहाय्याने मोजून एका महिन्यात 500 मीटर लांब आणि 50 मीटर रुंदीचे नदीपात्र खोदून हा बंधारा पूर्ण करण्यात आला. या साठी 1000 ट्रक रेडीमिक्स कॉंक्रिट वापरण्यात आले. या बंधार्‍यात या वर्षी 16 कोटी लिटर पाणी थांबेल आणि जमिनीत पाझरेल.

संपूर्ण लोकसहभागातून, एका रुपयाचीही सरकारी मदत नसताना हे काम विक्रमी वेळात आणि अत्यंत उच्च गुणवत्ता राखत पूर्ण करण्यात आले. हे काम वेळेत पूर्ण व्हावे, या साठी प्रारंभिक काळात जालना शहरातील काही समाजाभिमुख उद्योजकांनी पुढाकार घेऊन हा खर्च भागविला.

काम पूर्ण झाल्यानंतर आता  ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ने 1000/-, 500/- आणि 100/- रुपयांच्या पावत्या छापून त्या द्वारे जालना शहरवासीयांकडून निधीसंकलन करण्याते ठरविले आहे. या बंधार्‍यासाठी लागलेले सव्वा कोटी रुपये, निधोना गावाजवळील एक कोटी रुपये आणि घाणेवाडीसाठी दरवर्षी लागणारा सुमारे 25 लाखाचा खर्च लोकसहभागातून उभा राहावा, अशी  ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ची अपेक्षा आहे. ही अपेक्षा रास्तच म्हणावी लागेल, कारण जालनावासी दरवर्षी पाण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करतात.

किती होतो जालनावासियांचा खर्च?
जालना शहराची लोकवस्ती चार लाखांची आहे. येथील नळाला वर्षातील साधारण सहा महिन्यांच्या काळात महिन्यातून एकदा पाणी येते. काही ठिकाणी बोअर आणि विहिरी आहेत, पण तेथील स्थितीही समाधानकारक नाही, कारण भूजलपातळी खूप खोल गेली आहे. जालन्यात 1 हजार लिटर पाण्याचा टँकर या उन्हाळ्यात साधारणपणे 350 रुपयांप्रमाणे विकला गेला. या हिशेबाने विचार केला, तर प्रत्येकाला पुरेसे ठरेल एवढे पाणी दररोज हवे असेल, तर त्याचा सरासरी खर्च 20 रुपये होतो. म्हणजे एका व्यक्तीमागे दरमहा साधारण 500 रुपयांचा खर्च केवळ पाण्याच्या खरेदीचा असतो. 4 लाख लोकांनी दरमहा प्रत्येकी 500 रुपयांचे पाणी विकत घेणे म्हणजे 20 कोटी रुपये एवढा मोठा, अविश्वसनीय आकडा समोर येतो! चार महिने हा खर्च केला, तर तो आकडा 80 कोटींपर्यंत पोहोचतो! या वर्षीप्रमाणे उन्हाळा लांबला, तर पाच महिने केलेला खर्च 100 कोटींपर्यंत पोहोचतो! ‘टँकर लॉबी’ किती प्रभावी आहे, याचा अंदाज यावरून येतो...!

या हिशेबाने बंधार्‍यांचा खर्च काढला, तर तो सरासरी 2 ते 2.5 कोटींपर्यंत जातो. ‘रामतीर्थ बंधार्‍या’ला लागलेला 1.25 कोटीचा खर्च हा ना नफा ना तोटा तत्वावर केलेल्या कामामुळे कमी राखता आला. त्या साठी लागणारे लोखंड ‘पोलाद’ने मोफत उपलब्ध करून दिले, पिचिंगला लागणारा शेकडो ट्रक दगड विविध शेतकर्‍यांनी मोफत दिला, नदीपात्रातील वाळू-गाळाचा उपसा करताना कमी कष्ट लागले, कमी यंत्रणा लागली, त्यामुळे हा खर्च कमी झाला. प्रत्येक ठिकाणी परिस्थितीनुसार खर्च कमी-अधिक होऊ शकतो. त्यामुळे सरासरी 2 ते 3 कोटी रुपयांचा खर्च गृहित धरला, तरी 24 कोटी रुपयांत हे सर्व 8 बंधारे पूर्ण होऊ शकतात. त्याद्वारे 650 कोटी लिटर पाणि जमिनीत मुरू शकेल. या साठी जालनावासियांनी पुढे येऊन आर्थि मदत उभी करण्याचा निर्धार करणे आवश्यक आहे. शासकीय स्तरावर या विषयात आजवर कोणीही कोणताच पुढाकार घेतलेला नसल्याने, आता शहरवासीयांनीच पाण्याची लढाई पुढे येऊन लढायची आहे, हेच खरे.

अशीच लढाई घाणेवाणी तलावासाठी आहे. सुमारे 650 एकर क्षेत्रातील सरासरी 10 फूटांपर्यंतचा गाळ काढण्याचे काम ‘घाणेवाडी जलसंरक्षण मंचा’च्या वतीने मागील चार वर्षांपासून सुरू आहे. तलाव पूर्णपणे वाळल्यानंतरच गाळ काढण्याचे काम सुरू करावे लागते, त्यामुळे सध्या वर्षातील साधारण आठ ते नऊ महिने हे काम चालते. मागील चार वर्षांपासून 3 पोकलेन, एक जेसीबी आणि 16 टिप्परच्या साह्याने गाळ काढण्याचे काम चालू आहे. दरवर्षी सरासरी 40 हजार टिप्पर गाळ काढला जातो. या कामासाठी जालन्यात वर्षभरात मिळून साधारणपणे 20 ते 25 लाख रुपये उभे करण्यात येतात आणि त्याद्वारे जेमतेम 4 महिने हे काम चालू शकते, या कामाचा खर्च भागविण्यासाठी अधिक रक्कम उभी राहात नाही.
ही लढाई जनतेची, जनतेसाठी
अनेक आर्थिक अडचणी असल्या तरी ही लढाई जनतेचीच आहे आणि ती जनतेनेच लढावयाची आहे, हे निश्‍चित आहे. कोरड्या आश्‍वासनांतून हाती काहीच लागत नाही, हे सर्वांनाच उमगले आहे आणि स्वतःहून उभ्या करीत असलेल्या कामांचे परिणाम जनतेला दिसू लागले आहेत. 2013 च्या भीषण दुष्काळाच्या झळा प्रत्येक व्यक्तीलाच बसल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्‍न आपल्याच पुढाकाराने सुटू शकेल, याची खात्री समाजाला झाली आहे. आता गरज आहे, ती भरभरून योगदान देत अत्यल्प काळात हे सारे प्रकल्प मार्गी लावण्याची. 

जलतज्ज्ञ श्री. सुरेश खानापूरकर यांच्या मते पाण्याच्या स्थितीवरून समृद्धीचे आडाखे बांधायचे, तर ‘‘दररोज नळाला पाणी येते अशी स्थिती असेल, तर बँकेत आपले ‘फिक्स डिपॉझिट’ आहे, असे गृहित धरावे. बोअरचे पाणी काढावे लागत असेल, तर बँकेचे कर्ज काढावे लागल्याचे लक्षात घ्यावे आणि टँकरने पाणी आणावे लागले, तर तुमची दिवाळखोरी जाहिर झाली आहे, असे गृहित धरावे...’’ या दृष्टीने विचार केला, तर जालन्याने आपली दिवाळखोरी कधीच जाहिर केली आहे. यातून उभा राहायचे असेल, तर लोकसहभागाला पर्याय उरलेला नाही.

जलसंधारणाचे परिणाम...
या पार्श्‍वभूमीवर, जालना जिल्ह्यात झालेल्या या पथदर्शी उपक्रमांचे परिणाम काय झाले? या वर्षी, सन 2013 मध्ये जून महिन्यात अगदी वेळेवर आलेल्या पावसामुळे हे दोन्ही बंधारे पहिल्या पावसात भरले आणि त्या नंतरच्या पावसात भरतच राहिले. पहिल्या बंधार्‍यातून वाहून गेलेले पाणी दुसर्‍या बंधार्‍यात अडकले आणि पाणी जमिनीत मुरण्यास प्रारंभ झाला. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी परिसरातील बोअरला पाणी येण्यास लवकर प्रारंभ झाला आणि विहिरींतील पाण्याची पातळीही अल्पावधीतच वाढलेली दिसली...! नदीपात्रातील बंधारे आणि विस्तारलेले पात्र या मुळे झालेली क्रांती जनतेने प्रत्यक्षात अनुभवली. हे उदाहरण लोकसहभागातूनच आकारास आले!

हा लोकसहभाग कसा मिळतो आहे? एक उदाहरण सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारे ठरावे. रामतीर्थ बंधार्‍याशेजारी एक दानपेटी ठेवण्यात आलेली आहे. त्यात समाजाने आपले योगदान द्यावे, असे अपेक्षित आहे. हे काम सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी एक भिकारी तेथे आला. त्याने तिथले काम पाहिले आणि स्वतःकडे असलेले 21 रुपये त्याने दानपेटीत टाकले...! एका सामान्य भिकारी या भावनेने भारलेला असेल, तर समृद्ध समाजाकडून अपेक्षा ठेवण्यात गैर ते काय?

-दत्ता जोशी
औरंगाबाद

1 comment:

Organic Farmer said...

This is something related to water harvesting & storage. Any chance of getting an English Translation.

REGARDS

Giri