ते १९९८ चे वर्ष. मी तेव्हा
पुण्यात `सकाळ`मध्ये नोकरी करीत असे. `त्या` दिवशी रात्र-पाळी नसल्याने संध्याकाळी
लवकर घरी परतलो होतो. जेवण झाल्यावर साहजिक टीव्ही लावला. २२ एप्रिलची ती रात्र...
शारजातील तिरंगी स्पर्धेतील भारत – ऑस्ट्रेलिया सामना चालू होता. ऑस्ट्रेलिया आधीच
फायनलमध्ये पोहचला होता. भारत आणि न्यूझीलंड या पैकी ज्याचा रन-रेट जास्त, तो
फायनलला जाणार... दिवसा ऑस्ट्रेलियाची फलंदाजी झाली होती आणि फ्लडलाईट मध्ये भारत
खेळणार होता...
ऑस्ट्रेलियाने २८४ धावा
ठोकल्या होत्या. भारताला जिंकण्यासाठी २८५, तर फायनलला जाण्यासाठी किमान २५४ धावा
हव्या होत्या. वादळानंतर हे लक्ष्य बदलले. ४ षटके कमी झाली आणि विजयासाठी २७४
धावांचे आव्हान उरले. त्याच वेळी, २३७ धावा केल्या तर भारत फायनलला जाऊ शकत होता. आता
हे लक्ष्य अवघड दिसत होते. मी पलंगावर आडवा होऊन सामना पाहू लागलो. पाच-दहा मिनिटे
पाहून झोपी जाण्याचा माझा विचार होता. कारणही तसेच होते. गांगुली १७, अझहर १४, नयन
मोंगिया ३५ आणि अजय जडेजा १ धावा काढून परतले होते. शेन वार्न फॉर्मात होता.
वादळाच्या काळातही सचिनने आपले हेल्मेट उतरविलेले नव्हते... मैदानावर उतरण्यआधी त्याने नवे लक्ष्य समजावून घेतले आणि लक्ष्मणला जोडीला घेवून सचिनने नव्या धावांचे आव्हान स्वीकारले... एक अलौकिक निर्धार त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता... त्याने एक-दोन चेंडू सीमापार तडकावले आणि मी झोपलेला उठून बसलो. एक वादळ शमले होते, दुसरे साऱ्या स्टेडियमभर घोंघावत होते... त्या दिवशी मी सचिनचा रुद्रावतार पहिला... ९ चौकार आणि ५ षटकारांसह १३१ चेंडूत १४३ धावा काढून आणि भारताचा फायनलचा प्रवेश निश्चित करून तो बाद झाला... बादही झाला तो दुर्दैवी पद्धतीने... ती वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. याच सामन्यानंतर शेन वार्नला स्वप्नातही तेंडूलकर दिसू लागला होता...!
२४ तारीख उजाडली...
शारजाच्या पद्धतीप्रमाणे शुक्रवारी फायनल... फायनलचा toss सुद्धा ऑस्ट्रेलियानेच
जिंकला. स्टीव्ह वा च्या संघाने भारतासमोर २७२ धावांचे आव्हान ठेवले होते. सचिन
फलंदाजीला आला, तो जणू सेमीफायनलचा डाव पुढे चालू ठेवतच...! ४४ चेंडूंतच त्याने ५०
चा टप्पा ओलांडला. १२ चौकार आणि ३ षटकारांसह त्याने १३१ चेंडूत १३४ धावा
फटकावल्या. तो बाद झाला, तोवर भारताच्या २४८ धावा फलकावर झळकलेल्या होत्या... अखेर
भारताने ४९ व्या शतकातच सामना जिंकला आणि कोका-कोला कपही जिंकला...
त्या दिवसापर्यंत टीव्हीवर
सामना पाहताना मी अनेकदा पलंगावर आडवा होत असे. मस्त लोळत सामना पाहण्याचे सुख
काही औरच असे. पण, सचिनच्या या दोन्ही खेळी पाहताना मात्र मी उठून बसलो...!
या गोष्टीला आता १७ वर्षे
उलटून गेली. सचिनच्या त्या दोन खेळी माझ्या हृदयावर कोरून राहिलेल्या आहेत...
त्यानंतर त्याने असंख्य विक्रम नोंदविले... माझ्या मनाला खूप आनंद दिला... तो
भारतासाठी खेळत होता की स्वतःसाठी...? असे अनेक कद्रू प्रश्न अनेकांना पडले. ते
सगळे मी दूर सारतो. मी म्हणतो, `सचिन माझ्यासाठी खेळत होता. जगभरातील माझ्यासारख्या
असंख्य क्रिकेटप्रेमींसाठी खेळत होता. त्याने आम्हाला निखळ आनंद दिला.`
त्याच्या या उपकारातून
मुक्त होणे अवघड. त्याच्याबद्दलचा स्नेहार्द आदरभाव मनात कायम होता... राहील.
म्हणूनच शारजातील `त्या` अविस्मरणीय खेळीनंतर मी कधीही सचिनची खेळी झोपून पाहिली
नाही. तो फलंदाजीला आला, की मी झोपलेला असलो तरी उठून बसत असे... आजारी असलो तरी...!
हीच माझी त्याला मानवंदना...!
१९९२ – ९३ मध्ये सचिन
औरंगाबादला आला होता. औरंगाबादच्या `वेदांत` या नव्याने सुरु झालेल्या तारांकित
हॉटेलच्या `हेल्थ क्लब`चे उद्घाटन करण्यासाठी तो आलेला. तेव्हा त्याचा आंतरराष्ट्रीय
क्षितिजावर नुकताच उदय झालेला पण आपले पाणी त्याने जगाला दाखवून दिलेले. या
कार्यक्रमाची प्रवेशिका `गरुड`च्या गोविंद देशपांडे अर्थात काकांनी मला दिलेली. मी
कार्यक्रमाला जाऊन बसलो. मुद्दाम, सचिन ज्या मार्गिकेतून जाणार त्या मार्गीकेलगतच्या
खुर्चीत. तो आला. पुढे निघाला. मी दुरून त्याचा चेहरा पहिला आणि जवळ आल्यावर माझे
लक्ष त्याच्या रुंद – मजबूत – कणखर मनगटावर लागलेले...! पु.ल. म्हणाले तसे लताच्या
सुस्वर गळ्याला हात लावून पाहावा, सुनीलचे मनगट चाचपून पाहावे, तसे मी सचिनचे मनगट
पाहत होतो...! याच मनगटातील ताकदीने त्याने पुढे सारे क्रिकेटविश्व जिंकले...!
तो आता निवृत्त होतोय. १४
ते १८ नोव्हेंबर २०१३ दरम्यानचा सामना मी काही काळ तरी पाहीन पण सचिनची फलंदाजी
मात्र नक्कीच पाहीन. पूर्ण वेळ... बिछान्यावर आडवा न होता...! आणि त्याने या सामन्यात
दोन्ही डावांत शतके ठोकावीत, असे मला मनापासून वाटते...! पण असे वाटणे म्हणजे परत अपेक्षा...! या अखेरच्या सामन्यातही अपेक्षांचे ओझे? पण काय करणार? सचिनला जशी क्रिकेटची सवय तशी आम्हाला त्याच्याकडून अपेक्षांची...!
त्यासाठी माझ्या आणि साऱ्या
सचिनप्रेमींच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
No comments:
Post a Comment