`गोवा ट्रेक`ची उद्घोषणा
युथ होस्टेलच्या वेबसाईटवर झाली आणि लातूर येथील मित्रवर्य शिवदास मिटकरी यांनी
पुढाकार घेत १० जणांचा ग्रुप तयार केला. गोव्यात `ट्रेक` करावा असे ठिकाण तरी कुठे
असेल, असा विचार करीत आणि किनाऱ्यावरील भटकंतीचे इमले रचत आम्ही ४०+ क्लब (!) चे
१० जण तयार झालो. नाव गोव्याचे असले तरी प्रत्यक्षात हा ट्रेक गोवा आणि
कर्नाटकच्या जंगलांतून गेला. `ते` ९ दिवस मंतरलेले ठरले. आम्ही सर्व व्यावसायिक
लोक आपापले व्यवहार बाजूला ठेवून ट्रेकला गेलो आणि ताजेतवाने होऊन परतलो. त्याची
गोष्ट...
शिवदास २०१४ च्या जुलै
महिन्यात औरंगाबादेत माझ्या घरी आला तेव्हा त्याने त्या आधी केलेल्या डलहौसी
ट्रेकची चर्चा निघाली. शिवदास आणि लातुरातील आमच्या काही मित्रांनी गतवर्षी
डालहौसीचा ट्रेक युथ होस्टेल च्या माध्यमातून केलेला होता. त्याचे फोटो त्याने
त्याच वेळी फेसबुक वर अपलोड केलेले होते. मी त्याला म्हणालो - `मलाही विचारले
असते, तर मी सुद्धा आलो असतो.` त्यावर त्याने लगेचच गोवा ट्रेकची माहिती दिली. युथ
होस्टेल ने नुकतीच त्यांच्या वेबसाईट वर त्याची उद्घोषणा केलेली होती. मी तयारी
दाखविली. त्याने लगेचच युथ होस्टेलच्या वेबसाईट वर माझी मेंबरशिप रजिस्टर केली. लातुरातून
८ तर उस्मानाबादेतून १ असे ९ जण तयार होते. मी १० वा औरंगाबादेतून लातूर येथे जाऊन
त्यांच्यात सहभागी होणार होतो. माझे आई-वडील लातुरात वास्तव्यास असल्याने मला ही
गोष्ट सोपी होती...
२१ डिसेंबरची `वेळा-अमावस्या`
लातुरातच साजरी करून करून २२ च्या batch मध्ये सहभागी होण्याचे आम्ही ठरविले. २२
ला पहाटे ५ ला निघण्याचे निश्चित केले आणि प्रत्यक्षात ६.४५ ला निघालो... निघण्याआधी
आम्ही आपापले व्यावहारिक जगातील मुखवटे घरात काढून ठेवले... माझा आयुष्यातील पहिला
ट्रेक सुरु झाला.
सर्वसाधारणपणे ट्रेकची
मस्ती वीस-पंचविशीत ठीक...! माझ्या इतर मित्रांनी ४०+च्या वयात गतवर्षी डलहौसी
सारखा अवघड ट्रेक केलेला होता. मी वयाच्या ४३-४४ व्या वर्षी प्रथमच या भानगडीत पडत
होतो...! माझ्यासारखेच आणखी ३ `पाहिलटकर` आमच्यासोबत होते. शिवदास मिटकरी हे आमचे `नेते`.
त्यांची प्लंबिंग मटेरियलची डीलरशिप आहे. त्यांच्या समवेत विश्व travel चे सुनील
देशपांडे, एलआयसी चे सुनील पाटील, मातोश्री वृद्धाश्रमाचे संचालक धनाजी तोडकर, उस्मानाबादेतील
ज्वेलरी व्यावसायिक प्रमोद खंडेलवाल, बांधकाम व्यावसायिक राजेश सुगरे हे डलहौसी
ट्रेकचा अनुभव असलेले मित्र आणि मी दत्ता जोशी, एलआयसीचे विकास अधिकारी वाय डी
कुलकर्णी, छायाचित्रकार शिरीष कुलकर्णी आणि औषधी व्यावसायिक वामन भूमकर असे चार
पाहिलटकर. २२ ला सकाळी ६.३० ला २ कारमधून सुरु झालेला आमचा प्रवास सोलापूर, मिरज,
चिकोडी, हातकणंगले, सावंतवाडी मार्गे रात्री १० वाजता पणजीत पोहचलो. कांपाल
भागातील स्पोर्ट ऑथोरिटी ग्राउंडवर युथ होस्टेलचा बेस कॅम्प होता. तेथे नाव
नोंदवून त्यांनी दिलेल्या तंबूत आम्ही विसावलो.
दुपारचे जेवण मिरजेलगतच्या
एका शेतात झालेले. मोठ्या भाकरी, हिरव्या मिरच्यांचा ठेचा, दही, शेंगांची चटणी असा
ऐवज मित्रांनी बांधून आणलेला. हिरव्या मिरचीच्या ठेच्याची `करामत` पहाटे २ वाजता
मला जाणवू लागली आणि उलट्या-जुलाबानी मी हैराण झालो. शरीरातील पाणी कमी झाले,
अशक्तपणा जाणवू लागला. मित्रमंडळी चिंतीत झाली. त्यांनी औषधे दिली. थोडे बरे
वाटले.
२३ ला सकाळी ८ च्या सुमारास
तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी रॉक क्लायंबिंग आणि मीरामार ते डोना पावला बीच
असे ६ किलोमीटर चालणे असा कार्यक्रम ठरलेला होता. यात सहभागी झालो नाही तर कदाचित
पुढे जाण्याची हिम्मत येणार नाही, असे लक्षात आले आणि तसाच उठलो. चहा-नाश्ता
घेण्याचीही भीती वाटत होती... उलटून पडण्याची शक्यता... उपाशी पोटीच निघालो.
या साधारण ६ किमीच्या
चालण्यात मी सर्वात मागे होतो. पण नेटाने हे अंतर पूर्ण केले.
डोना पावला बीचवर
मित्रांनी सरबत आणून दिले. जीवात जीव आला. तेथून बेसकॅम्पला बसने परतायचे होते. उभे
राहण्याचेही त्राण राहिले नव्हते. शिवदासने खंडेलवाल यांना जागेवरून उठायला
लावले... मला जागा रिकामी करून दिली...! त्या संध्याकाळी सर्व जण पणजीत गेले, मी
झोपून होतो. रात्री ते परतले तेव्हा मी झोपलेला. `दत्ताला सोबत घेवून जाता येईल
का?` यावर त्यांच्यात चर्चा झाली! अर्थात माझ्या माघारी.
२४ ची सकाळ मात्र छान
उगवली. भरपूर विश्रांती आणि औषधांमुळे मला ताजेतवाने वाटत होते. `काहीही झाले तरी
मी हा ट्रेक पूर्ण करणार` अशी घोषणा मी केली आणि सर्वानीच त्याला दाद दिली...
आपापल्या पाठपिशव्या (sacks) घेवून आम्ही बाहेर पडलो. कॅम्प लीडर आणि इतरांनी युथ होस्टेल
पद्धतीने दोन ओळींत उभे राहून टाळ्या वाजवीत आम्हाला निरोप आणि शुभेच्छा दिल्या.
एका
बसने आम्हाला गोव्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या मोबोर बीचवर सोडण्यात येणार होते.
तेथून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेनालीयम बीचपर्यंत आम्हाला चालत यावयाचे
होते. सकाळी भरून दिलेला pack lunch चा डबा पाठीवर होता.
या बीचवर वर्दळ होती ती
प्रामुख्याने परदेशी पर्यटकांची. आमची एकूण ४६ जणांची batch तेथे दाखल झाली. तेथून
रमत गमत चालणे सुरु झाले. दुपारी एका सावलीत डबे खाऊन झाले. सारे पुढे निघालो. या
४६ जणांत महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान आणि दिल्लीचे ट्रेकर
होते. सर्वांचे आपापले ग्रुप...
सर्वांमध्ये अंतर. ते दिवसभर कायम राहिले. ३ च्या
सुमारास बेनालीयम बीचवरील कॅम्प वर एक एक करून पोहचण्यास सुरवात झाली. कॅम्प
लीडरने थोड्या वेळाने समुद्र्स्नानाची परवानगी दिली आणि अख्खा ग्रुप बीच वर
पोहचला...! चालण्यातील थोडा थकवा पण समुद्रस्नानाचा आनंद अशा दुहेरी मनःस्थितीत साऱ्यांनी
आनंद लुटला.
सध्या मोबाईलशिवाय कुणाचे
पान हालत नाही. दिवसभर फोटो काढून, फोनवर बोलून, गाणी ऐकून सर्वांच्याच battery
डाऊन झाल्या होत्या. चार्जिंग point कमी. त्यातही आमच्या मंडळीनी डोके लावले होते.
शिवदासने लातूरहूनच extention box आणलेला होता. तंबूतील बल्बच्या वायरला छेद देऊन
शिरीष कुलकर्णी यांनी त्यात वीज प्रवाह
आणला आणि १० जणांचे मोबाईल एकाच ठिकाणी चार्ज होऊ लागले... कुणी तरी म्हणाले – `हा
extention box वर सामुहिक अत्याचार आहे...!`
ही रात्र अधिक देखणी ठरली
ती भोजनोत्तर झालेल्या समुद्र-दर्शनाने. कॅम्प लीडरची खास परवानगी काढून आम्ही
रात्रीच्या अंधारात बीचवर पोहचलो. समोरच्या अथांग सागराच्या काळोखात मावळतीला
निघालेली चंद्रकोर, लाटांची गाज आणि किनाऱ्यावर पसरणाऱ्या फेसाळत्या लाटा... जणू
कुणी चांदीच्या दागिन्यांची पखरणच करतोय...
किनाऱ्यावरील हॉटेलांच्या गजबजाटापासून
दूर जात आम्ही सर्व जण निःशब्द शांतता अनुभवत होतो. एक लाट आली... तिच्या पाठोपाठ
दुसरी... ती विरण्याच्या आत तिसरी मोठी लाट पहिल्या दोघींना कवेत घेवून विखुरली...
लाटांचे हे मंत्रमुग्ध करणारे विभ्रम आणि ते अनिमिषपणे पाहणारे, अंधारात बुडालेले
२० डोळे... ते काही तास अविस्मरणीय ठरले...
बेनालीम बीच ते वेल्साव बीच
हे १० किमी चे अंतर चालणे हा २५ डिसेंबरचा कार्यक्रम होता. आधीच्या दिवसाचा अनुभव
असल्याने सकाळपासूनच अनेकांनी अनेक ठिकाणी समुद्र स्नानाचा कार्यक्रम सुरु केला.
इथे काही युवक काही युवतींच्या भोवती रुंजी घालताना दिसू लागले... आधीच्या
दिवसापेक्षा अंतर कमी असले तरी संध्याकाळी वेल्सावला पोहोचेपर्यंत सारेच जण थकलेले
होते.
या वाटचालीतील एक भेट मात्र
संस्मरणीय ठरली.
इथे सचिन हंगे नावाचा एक हॉटेल मालक आम्हाला भेटला. हा बीड जवळील
हंगेवाडीचा. सातवी नापास झाल्यावर त्याने घर सोडले आणि तो थेट गोव्यात आलं.
हॉटेलात नोकरी करीत त्याने व्यवहार शिकून घेतला. हळू हळू स्वतःचे हॉटेल सुरु केले.
आता तो हॉटेल चालवितो आणि भाड्यानेही देतो. लाखोने कमावतो. अस्खलित रशियन भाषा
बोलतो...! महिनाभर आधी भेट झाली असती तर त्याची स्टोरी मला बीडच्या `पोलादी
माणसे`मध्ये घेता आली असती!
वेल्सावचा मुक्काम हा मात्र
अविस्मरणीय अनुभव ठरला. आम्ही त्या जागेला `भूत बंगला` असे नाव दिले होते. हा
मोडका-पडका बंगला एकेकाळी या परिसराची शान असावा.
पण सध्या धुळीने माखलेला.
चोहोबाजूने रान माजलेले. इथे एक रात्र काढावयाची होती. आजच्या रात्री कुणी बीचवर
जाण्याचे नाव काढले नाही. पण काही मुली आणि (साहजिकच त्यांच्या पाठी असलेली मुले)
खूप उशिरा कॅम्पवर पोहचली. तोवर लीडर, को-लीडर अस्वस्थ. काही जण त्यांना
शोधण्यासाठी बीचवर पोहचले, तर ही बाळे तिथे मस्त बागडत होती...! मंझील से राह हसीन..!
इथेच दिल्लीतील २ महिलांनी ट्रेक थांबविण्याचे ठरविले. त्यांना हा दिनक्रम झेपणारा
नव्हता. त्यांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. बीचवरील दोन्ही दिवस त्यांनी कोस्ट-गार्ड
च्या जीप मधून प्रवास पूर्ण केला होता...! त्या परतल्या हे त्यांच्यासाठी बरे
झाले. पुढे कुठूनही परतणे अधिक अवघड झाले असते...
२६ च्या पहाटे आम्हाला लवकर
उठविण्यात आले. कॅम्पमधून सकाळी ६ ला निघून सातची रेल्वे पकडायची होती. वेल्सावजवळ
असलेले कान्सोलीयम हे जवळचे रेल्वे स्टेशन होते. वेल्साव ते कोलेम हे साधारण २ तासाचे अंतर पार करून सकाळी ९.३० च्या
सुमारास आम्ही दुधसागर कॅम्पकडे जाणाऱ्या वाटेच्या तोंडाशी पोहचलो. गोव्यात असलेले
दमट, खारवलेले वातावरण इथे अजिबात नव्हते. समुद्र सपाटीपासून सुमारे ७० मीटर
उंचीवरील हे ठिकाण जंगलाच्या तोंडाशी होते. हवा थंड आणि आल्हाददायक... इथून पुढे
ट्रेकची खरी सुरुवात होती. कोलेम ते दुधसागर कॅम्प हे अंतर ८ किमी. पर्यटकांसाठी
या वाटेवर जीपची सोय होती. आम्हाला ती वाट चालत पूर्ण करायची होती.
काही पावले चालून गेलो आणि
नदीचे पात्र आडवे आले.
पायातील बूट हातात... शेवाळलेल्या गोट्यावरून तोल सावरत
पाण्यातून पात्र पार केले... गाडीवाटेने सुरु झालेली वाटचाल एका वळणावर जंगलात
शिरली. पायाखाली चिरडल्या जाणाऱ्या वाळक्या पानांचा चुर्र असा आवाज, भोवताली
उडणाऱ्या पक्ष्यांच्या अधून मधून कानावर येणाऱ्या लकेरी, कोळ्यांनी विणलेले जाळे,
अनेक ठिकाणी दिसणारी वारुळे... मधूनच आडवे येणारे पाण्याचे प्रवाह... पुन्हा
पुन्हा बूट हाती घेवून तोल सावरत पाणी पार करण्याची कसरत... हळू हळू ट्रेकला रंग
चढू लागला होता.
वाटेत एके ठिकाणी थोडे खोल,
मोठे पात्र लागले आणि सर्वांचाच अंघोळीचा विचार प्रत्यक्षात आला. बहुतेक सगळे जण
कपडे उतरवून थंड गार पाण्यात उतरले. उशिराने उतरणाऱ्याना अंगावर पाणी उडवून चिंब
करण्याचा वात्रट प्रकारही काही जणांनी सुरु केला. भुका लागलेल्याच होत्या. आपापले
डबे काढून जेवणे पार पडली. त्याच नदीचे पाणी पिवून झाले... पुढे निघताना काही जण
पाण्यात घसरले... विशेषतः ज्यांना ऐटीत जाण्याचे वेध लागलेले होते, ते तर आधी आडवे
झाले....!
आणखी २ वेळा बूट उतरवून
आम्ही कॅम्पच्या जवळ पोहचलो. काय ते सुरम्य ठिकाण... आधीच्या ३ दिवसांचा शिणवटा
क्षणार्धात दूर झाला... तीन बाजूनी उंचच उंच डोंगर... दाट झाडीची छाया असलेले
छोटेखानी पटांगण, तेथे ठोकलेले तंबू... शेजारी असलेले गावकरी नावाच्या शेतकऱ्याचे
बैठे घर... स्वच्छ सरावलेले प्रशस्त अंगण... उतारावर फुललेली बागायत आणि त्याच्या
टोकाला ओढ्याचा खळाळ... इतके सुरम्य ठिकाण आधी कधी कुणी क्वचितच अनुभवले असेल.
आपापले सामान टाकून सारेच
ओढ्याकाठी धावले... आम्हीही एका कडेला गेलो... बोलता बोलता सर्वांची तंद्री
लागली... बेनेलीमच्या समुद्र किनाऱ्यावर अनुभवेलेले निःशब्द क्षण पुन्हा एकदा
जिवंत झाले. तेथील गाजेची जागा इथे ओढ्याच्या खळाळाने घेतली होती... काही काळ
सारेच मंत्रमुग्ध होते...
या कॅम्पवर लाईट नव्हते.
इथे वीजच पोहोचलेली नाही. त्यामुळे सारे व्यवहार एक तर सौर दिव्यांच्या सौम्य
प्रकाशात किंवा आमच्या जवळच्या torch वर. रात्री ८ वाजताच सारे काही सामसूम झाले.
तरुण मंडळी `कॅम्प फायर` साठी बाहेर पडलेली होती. धनाजी तोडकर यांनी त्या तरुण
रक्तात स्वतःची जागा तयार केली होती. इतकी, की ते नसतील तर मुले बोलवायला येत...!
अशा वातावरणात चांदण्या रात्रीचा अनुभव अलौकिकच... तंबूबाहेर येऊन आकाशाकडे नजर
टाकली की निरभ्र आकाशात असंख्य तारकापुंज लकाकताना दिसत... चन्द्रकोरही डोक्यावर
होती... अनेक दशकांत अशी सुंदर रात्र अनुभवलेली नव्हती...
हे सारे रमणीय असले, तरी
प्रत्यक्ष स्थिती चिंतेचीच होती. हा त्या जंगलाचा मध्यभाग. परिसरात अनेक हिंस्र
श्वापदे... प्राणी... साप... त्यामुळे रात्री कुणीही एकटे तंबूबाहेर यायचे नाही,
अशा स्पष्ट सूचना कॅम्प लीडरने दिलेल्या...
सकाळच्या शांत वातावरणात
सर्वांना जाग आली. मला खळाळणाऱ्या पाण्याने मोहिनी घातली होती. एकटाच पात्रात
गेलो. मोबाईलवर VDO मोड सुरु केला, एका खडकावर मोबाईल स्थिर ठेवला आणि काही मिनिटांचे
ते रेकॉर्डिंग करून घेतले...
चहा-नाश्ता-pack lunch नंतर
सकाळी ८ च्या सुमारास पुढील ट्रेक सुरु झाला. तासाभरातच आम्ही दुधसागर धबधब्याच्या
पायाशी पोहचलो होतो. लहानपणी कादंबरीत वाचलेला (आणि मध्यंतरी चेन्नई एक्सप्रेस
मध्ये पाहिलेला) दुधसागर प्रत्यक्ष डोळ्यासमोर साकारला... डोंगरमाथ्यावरून
कोसळणाऱ्या सहस्र धारा जणू दुधाप्रमाणे शुभ्र दिसत होत्या... म्हणून हा `दूध
सागर`.
डोंगराच्या मध्यावरच कोकण रेल्वेचा मार्ग गेलेला. योगायोगाने त्याच वेळी एक
गाडी तेथून पुढे जात होती... सृष्टीचे हे अलौकिक रूप डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवीत
आम्ही पुढे जात होतो. (काहींच्या कॅमेऱ्यात `आणखीही` काही रूपे चित्रित झाली, ही
गोष्ट वेगळी...!)
दुधसागर पर्यंत सारे काही
ठीक होते. जमीन साधारणपणे समतल होती. फारशी दमणूक नव्हती. इथून पुढे कसा रस्ता
आहे, याची चुणूक पहिल्या २००-३०० फुटांच्या चढण्यातच लागली आणि मी सर्वात आधी `नी-कॅप`
गुडघ्यावर चढविली... आधी सर्व जण धबधब्याच्या मध्ये असलेल्या लोह्मर्गापर्यंत आलो.
तेथून ३ बोगदे ओलांडून वरच्या डोंगराच्या पायथ्याशी आलो. तेथून सुरु झालेली चढण
आधीची सारी `गमजा` उतरविणारी ठरली. ही चढण संपतच नव्हती...! पुढच्या वळणावर संपतेय
असे वाटले की तेथून नवा चढ सुरु...! कुणी थांबतोय... कुणी पाणी पितोय... कुणी
गोळ्या चघळतोय... कुणी धापा टाकतोय... कुणी परत जाण्याची धमकी देतोय... सारेच
थकलेले... चढण काही संपत नव्हती...
मधेच एका वळणावर दोन
ग्रामस्थ फळांच्या फोडी विकायला बसलेले दिसले आणि साऱ्यांचा मोर्चा तिकडे वळला.
कलिंगडाची एक फोड १० रुपयांत...! पण तेथे किंमत फळांना नव्हती... ती तिथवर
आणण्याच्या मेहनतीची ती किंमत होती! त्यांच्या कष्टाला दाद देत आम्ही खिसा रिकामा
केला. पुढच्या टप्प्यावर ओढ्याकाठी डबे उघडले. काहींनी तेथे अंघोळीची हौस भागवून
घेतली. त्या फळवाल्याच्या सांगण्यानुसार पुढचा रस्ता थोडासाच होता आणि तो सोपाही
होता... तसेच झाले.. पुढच्या पाउण तासाच्या पायपिटीनंतर कॅम्प आला. आजची एकूण
पायपीट १० किलोमीटरची झाली होती. आम्ही पोहचलो तो होता कर्नाटकातील कुवेशी
गावाजवळचा नांद्राणचा भाग... उतारावर टप्प्याटप्प्याने केलेल्या भातशेतीच्या
कोरड्या झालेल्या रानात तंबू ठोकलेले होते. इथेही लाईट नव्हते... काही खुश झाले,
काही नाराज...
पुढच्या अर्ध्या तासात जवळ
जवळ सर्व जण पोहचले पण ग्रुप लीडर शिरीष कुलकर्णी यांच्याकडे एक कार्ड कमी आलेले
होते. कॅम्पवर पोहचल्यावर प्रत्येक ट्रेकर ने आपले कार्ड ग्रुप लीडरकडे द्यायचे
आणि त्याने कॅम्प लीडरकडे तो गठ्ठा सहीसाठी पोचवायचा, हा युथ होस्टेलचा नियम... एक
कार्ड कमी म्हणजे एक जण पोचलेला नाही... शोध घेतला तर दिल्लीचा दाउद खान गायब
होता. खरे तर तो आम्हाला मागे टाकून पुढे आलेला होता. कुठे गेला, काही कळेना.
कुठल्याच मोबाईलवर रेंज नाही... संध्याकाळचे ४ वाजलेले... ५ - ५ जणांची २ पथके
तयार झाली आणि दाऊदला शोधण्यासाठी बाहेर पडली. तास-दीड तासाने सारे परतले पण
त्याचा थांग लागेना... साऱ्यांच्याच मनात चिंता दाटून आली... कॅम्प लीडर अस्वस्थ
झाले...
अंधारून येण्याच्या जेमतेम
काही मिनिटे आधी एका मोटारसायकल वरून दाउद ची स्वारी उतरली आणि सर्वांना हायसे
वाटले. हे गृहस्थ सर्वात पुढे होते आणि मार्किंगकडे दुर्लक्ष केल्याने थेट पुढच्या
गावी पोहचले होते. तेथे चौकशी करून त्याने कॅम्प वर सोडण्याची विनंती एका
गावकऱ्याला केली आणि तो परत आला. एक धडा सर्वांना मिळाला – जंगलात एकट्याने
फिरायचे नसते. रस्ता चुकला तर शोधणे अशक्य असते आणि जंगलात काहीही घडू शकते...
लाईट नसल्याने अंधार लवकर
जाणवू लागला आणि मोबाईल बंद असल्याने हाताला चाळा नव्हता. साडेसातला जेवणे झाली
आणि ८ ला सारे जण तंबूत परतले. इथे गारठा जास्त होता. मग तंबूतील गप्पांना ऊत आला.
झोपण्यापूर्वी एकमेकांची खेचायची सवय बेस कॅम्प पासूनच सर्वांना लागलेली होती.
काहीही कारण काढायचे आणि खी-खी हसत सुटायचे... सारे जुने दिवस जागे झालेले
होते...! इथे मात्र थोडा अतिरेक झाला आणि शिवदासला जास्तच टार्गेट करण्यात आले. मग
मात्र त्याने जो रुद्रावतार धारण केला, त्यातून सारा तंबू चिडीचूप....! काही
मिनिटांनी त्याची समजूत काढायला सुरवात झाली. आधी त्याची खेचण्याची चढाओढ लागलेली,
आता खुश करण्याची... त्यानेही (नेहेमीप्रमाणे) समजूतदारपणा दाखविला आणि पुन्हा
गप्पा रंगल्या...! बराच वेळ रंगल्या. उशीर झाला होता. कुणी तरी `गुड नाईट`
म्हणाले... आमचे प्रमोद खंडेलवाल हे वेगळेच रसायन... ते म्हणाले `जय श्री
कृष्ण`... मग `गुड नाईट` की `जय श्री कृष्ण` यावर वाद सुरु झाला... `आमच्याकडे
असेच म्हणतात`, चे दाखले सुरु झाले... सर्वावर कडी केली वाय डी कुलकर्णीनी – ते
म्हणाले `आमच्याकडे `इकडे सरक` म्हणतात...! क्षणभर कुणाला काही कळले नाही.. जेव्हा
कळले, तेव्हा तंबूत हास्याचा स्फोट झाला...!
२८ ला थोडे जास्त चालायचे
होते. नांद्रण हून निघून एक डोंगर चढून उतरायचे... मग कॅसलरॉक येणार... पुन्हा एक
डोंगर चढून उतरायचे, मग अनमोड येणार... हा आमचा कॅम्प. हे अंतर १४ किलो मीटरचे...
सकाळी ८ वाजताच चालायला सुरवात झाली. कालचे अनुभव गाठीशी असल्याने आणि कॅम्प
लीडरने वहीत प्रतिकूल शेरे नोंदविल्याने आज सारे भानावर आले होते. सगळेच एका गटात
व्यवस्थित चालत होते. ट्रेकमध्ये प्रथमच शिस्त पाळली जात होती. हे जंगल आधीपेक्षा
अधिक घनदाट होते, हे त्या मागचे आणखी एक कारण...! ग्रुप लिडरच्या पुढे कुणी जायचे
नाही आणि को-लिडरच्या मागे कुणी राहायचे नाही हा नियम तंतोतंत पाळला गेला. आज
खऱ्या अर्थाने ट्रेक चालू झाला होता. कुणी घाई करत नव्हते. वाटेल तिथे बसत नव्हते.
रमत-गमत पण विशिष्ट वेगाने चाल चालू होती. वाटेतील वनस्पती, मोकळी राने,
ज्वालामुखीच्या लाव्ह्यातून तयार झालेले पठार आणि तेथील खडकाची विशिष्ट रचना...
ओल्या लाकडावर आलेली वेगळ्या वेगळ्या रंग-आकारांची बुरशी... सगळे आज नजरेखालून जात
होते. अगदी प्रारंभीपासून एक गोष्ट मात्र सर्वांनी पाळली होती – कुणीही निसर्गाला
हात लावलेला नव्हता, त्याचे विद्रुपीकरण केलेले नव्हते. chocklate खावून त्याची
वेष्टने प्रत्येक जण आपापल्या खिशात टाकत होता...
जंगल घनदाट होते. रस्त्यात
पाणवठा नव्हता. भर दुपारी जंगलात संध्याकाळ झाल्याचे वातावरण होते... थोड्या
पायपिटीनंतर जंगलाचा पहिला टप्पा संपला... कॅसलरॉक आले. गावातून जाताना एका मराठी
शाळेचा फलक दिसला. गेटला कुलूप होते. ते गांजलेले होते. मैदानात गवत वाढलेले...
सहज चौकशी केली, तेव्हा कळले, इथे शिकविणारे मराठी शिक्षक काही वर्षांआधी एक एक
करून निवृत्त झाले. कर्नाटक सरकारने नंतर मराठी शिक्षकांची भरतीच केली नाही. आता
तेथे मराठी शिकविले जात नाही. हे गाव कारवार जिल्ह्यात येते. ७० टक्के लोकवस्ती
मराठी बोलते आणि त्या गावात मराठी शाळा बंद...! ही विचित्र कानडी मानसिकता... त्या
उलट महाराष्ट्रात सीमावर्ती भागात त्या त्या भाषेच्या शाळा उत्तम प्रकारे चालू
असतात... असो.
कॅसलरॉकच्या स्टेशनबाहेर
झाडाखाली डबे उघडले. जेवण होण्याआधीच पुढील कॅम्पमधून एक व्यक्ती आम्हाला
घेण्यासाठी आलेली होती. हे प्रथमच होत होते. आम्ही याचा एकाच अर्थ घेतला – `पुढची
वाट आणखी खडतर आहे... आणि ते खरेच होते. घनदाट जंगल, भर दुपारी सुद्धा जमिनीपर्यंत
पोहचू न शकणारे सूर्यकिरण... एक डोंगर चढायचा आणि एक उतरायचा... या चढ उतारात
सारेच जण दमले... आजचे अंतर १४ किलोमीटर चे होते. ते पार करेपर्यंत संध्याकाळचे ५
वाजले. कॅम्प चिंतीत होता. इतका उशीर कुठल्याच गटाला तोवर झालेला नव्हता...
अनमोडचा हा कॅम्पही प्रसन्न
होता. तंबूच्या मागून झुळूझुळू वाहणारा पाण्याचा पाट... आजूबाजूला असलेली प्रसन्न
वनराई आणि महत्वाचे म्हणजे इथे लाईटची सोय होती... सर्वांनी आपापली आयुधे चार्जिंग
साठी बाहेर काढली. आधीची पुनरावृत्ती झाली...! जंगलातील कॅम्पमधील ही शेवटची
रात्र. आज आम्ही सर्वानीच कॅम्प फायर मध्ये सहभागी होण्याचे ठरविले. तरुणांची
नाच-गाणी झाली, काहींची मनोगते झाली. मी सुद्धा थोडेसे बोललो. भान ठेवून बेभान
होण्याचे जे आवाहन आम्ही ऐकत आलो, तेच या पुढच्या पिढीपर्यंत पोचविले. त्यानंतर मग
तंबूतील गप्पांना रंग चढला...! थकवा होताच पण उद्याचा शेवटचा दिवस असल्याची
रुखरुखही होती.
२९ डिसेंबरची सकाळ
उजाडली... ट्रेक संपण्याचा आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावना सर्वांच्या मनात
होत्या. आज १५ किलोमीटर चालायचे होते. चढण कमी होती पण उतार खूप अंतराचा आणि तीव्र
होता, असे आम्हाला सांगण्यात आले होते. अनमोड गाव संपेपर्यंत कॅम्प लीडर आम्हाला
सोडण्यास आले आणि एक सहायक कर्नाटकाची सीमा संपेपर्यंत सोबत करण्यास आला. थोड्याच
वेळात आम्ही ४-५ किलोमीटर चालून आलो. गोव्याची हद्द सुरु झाली, तसा तो सहायक
परतला. घनदाट जंगल सुरु झाले. मार्किंग काळजीपूर्वक पाहत आम्ही पुढे निघालो. मागील
३ दिवसांत गाठलेली उंची आज एका दिवसात उतरायची होती! हळू हळू उतार तीव्र होऊ
लागला...
डोंगर चढण्यापेक्षा उतरणे किती त्रासदायक असते याची अनुभूती सर्वांना होऊ
लागली. पण थांबण्याची सोय नव्हती. पायवाट एका माणसाला जाण्याएवढीच होती. सारे एका रांगेत
होते... एकत्र बसून जेवावे अशी जागा कुठे सापडत नव्हती. हळू हळू दुपार चढू लागली.
दुपारी २ पर्यंत सर्वांनी तांबडी सुरला येथे पोहचायचे होते. तेथून बसने ७५
किलोमीटरचा पणजीचा प्रवास होता. त्या वेळेत पोहचण्याची सर्वांची धड्प्पद होती.
त्यामुळे जेवणाचा विषय थोडा मागे पडला. एक एक गट थकून थांबत होता, मागचा गट आला की
त्याला जागा करून देऊन पुढे सरकत होता... तीन-चार दिवसांआधी डोंगर चढताना जसे
वाटायचे, तसेच आजही वाटत होते. पुढच्या वळणावर डोंगर उतार संपेल असे वाटत असतानाच
नवा उतार सुरु... दुपारी साधारण १२.३० – १ च्या सुमारास थोडी सपाटी जाणवू लागली.
ग्रुप लीडर शिरीष कुलकर्णी म्हणाले... `रस्त्याला लागल्यानंतर ३ किलोमीटर चालायचे
आहे. त्या ऐवजी जंगल संपताच बस मिळाली तर...?` आणि त्या स्वप्न रंजनात आम्ही पुढे
निघालो. साधारण अर्धा तास चालून झाले...
झाडे विरळ झाली... खूप पुढे डांबरी रस्ता
दिसू लागला आणि रस्त्यावर येताच चक्क आमची बस दिसली...! भुकेल्याला अन्न आणि
तहानलेल्याला पाणी दिसताच जी प्रतिक्रिया व्यक्त होऊ शकते ( या उदाहरणात प्रत्येक
जण आपापल्या कल्पनाशक्तीप्रमाणे भर घालण्यास मोकळा आहे! ) ती आमची प्रतिक्रिया
झाली... ट्रेक संपला होता...!
एव्हाना पोटात कावळे कोकलत
होते. आम्ही जेथे रस्त्याला लागलो तेथेच डावीकडे एक ओढा वाहत होता आणि त्या पलीकडे
तांबडीसुरलाचे पुरातन महादेव मंदिर उभे होते... भूक बाजूला ठेवून आम्ही आधी ओढ्यात
उतरलो. दोन दिवस अंघोळ नव्हती. अंग घासून-पुसून ओढ्यात अंघोळी केल्या... कोरे कपडे
चढविले आणि मंदिरात दर्शनाला गेलो....
सुंदर मंदिर. कदाचित शेकडो
वर्षांपूर्वीचे... पुरातत्व खात्याच्या आखत्यारीत असलेल्या या मंदिराची शिल्पकला
रमणीय होती. गाभाऱ्यातील महादेवाची पिंडी तर खूपच प्रसन्न... इतकी सुंदर, प्रसन्न
आणि महत्वाचे म्हणजे स्वच्छ मंदिरे फारशी पाहायला मिळत नाहीत... सारा शिणवटा
क्षणार्धात दूर झाला... प्रसन्न मनाने बाहेर आलो... झाडाखाली बसून जेवणे झाली...
बसमध्ये बसून पणजीकडे निघालो...
दुपारी ४ च्या सुमाराला बेस
कॅम्प ला पोहचलो. कॅम्प लीडर आणि त्यांच्या सहकारी – इतर ट्रेकर यांनी मिळून दोन
रांगा करून टाळ्या वाजवीत आमचे स्वागत केले...
आमचा ट्रेक आता अधिकृत रित्या पूर्ण
झाला होता... त्या नंतर तासाभरातच सामान आवरून आमच्या गाड्या तेथून बाहेर
पडल्या...
२२ ते २९ डिसेंबर हा काळ
आमच्या आयुष्यात वेगळेच क्षण घेवून आलेला होता. साधारण २० -२५ वर्षांपूर्वी
विद्यार्थी जीवनात आम्ही जे आयुष्य जगलो, ते पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले.
व्यवहाराच्या जगात २०-२५ वर्षे गेली... शरीर – मनावर बरीच पुटे चढली, सभ्यतेच्या,
अहंकाराच्या बऱ्याच खोट्या कल्पना शरीराला चिकटल्या... `मला असे हवे, मला असेच
लागते, मला ते चालत नाही...` असे अनेक पाढे सर्वांना पाठ झाले होते. ते या दिवसांत
विसरले गेले... बाटलीबंद पाण्याची सवय लागलेली, पण इथे मिळेल ते पाणी पोटात गेले.
कधी नळाचे, कधी नदीचे, कधी ओढ्याचे...! `माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा
नाही`, हा आग्रह अखेर `माझी अंडरवेअर सोडून काहीही वापर रे बाबा...` पर्यंत
पोहचली. आपला डबा / ताट धुवायला लागू नये म्हणून दोस्ताला त्याच्या ताटात थोडी
जास्ती भाजी घ्यायला लावायची आणि आपण हातातच पोळ्या घेवून जेवण करायचे... जेवण
झाले की हात धुवून आपण मोकळे... ही जुनी क्लुप्ती पुन्हा एकदा अमलात आली... अर्थात
सगळेच एका वरचढ एक... हे ताट सुद्धा पुढे आळीपाळीने धुवावे लागले! पण २ ताटांत १०
जण गुण्यागोविंदाने जेवण करताहेत... हे दृश्य विसरता न येणारे...
आम्ही सर्व जण तरुण
मुला-मुलींचे `अंकल` होतो...! हा वयाचा
मान की स्वतःपासून आम्हाला दूर ठेवण्याची त्यांची आयडिया?... आमची सगळीच डोकी
पांढऱ्या केसांची आणि चेहऱ्यांवर सुरकुत्या दिसू लागलेल्या... त्यामुळे, त्यांची ही
treetment आमच्या वयाचा मान म्हणून स्वीकारली!
माझ्यासोबतच्या ९ पैकी ३ जण
माझ्यासाठी पूर्वपरिचित होते. एक जण नावाने ओळखीचा आणि ५ जणांना मी आयुष्यात
प्रथमच भेटत होतो. पण बालपणी भेट झाली असती तर जशी घट्ट दोस्ती जमली असती तशी या
वयातही जुळली... मजा आली...
या प्रवासात तंबूत कुणी
कितीही `मोकळा` असला तरी बाहेर रस्त्यावर मात्र आम्ही तरुण रक्तालाच बागडण्याची
संधी दिली... आमची भूमिका सांभाळण्याची होती... पण नसती बंधने आम्हीही पाळली
नाहीत... टी शर्ट मळले, बर्म्युडा घाण झाल्या... काही फरक पडला नाही. मी तर या
काळात दाढीही केली नाही...! कुणाचे पांघरून कुणाच्या अंगावर, कुणाची torch कुणाच्या
हाती... सारे काही सुखेनैव चालू होते...
२९ ला संध्याकाळी पणजीत
आलो... फ्रेश होऊन कपडे बदलले... दोन्ही गाड्या काढल्या... आपापले सामान डिकीत
टाकले... रातोरात प्रवास करत पहाटे प्रमोद खंडेलवाल यांना उस्मानाबादेत सोडून
आम्ही ३० च्या सकाळी लातूर गाठले... विश्रांती घेतली... अंघोळी केल्या आणि कपड्यांबरोबरच
२२ तारखेला काढून ठेवलेले व्यवहारी जगाचे मुखवटे पुन्हा एकदा चेहेऱ्यावर चढवून आम्ही
जगरहाटीला सुरुवात केली...!
- - दत्ता जोशी
औरंगाबाद
९४२२ २५ २५ ५०