Tuesday, May 12, 2015

माझी भूमिका संप्रेरकाची... Catalyst ची...!

आधी `आयकॉन्स` आणि आता `पोलादी माणसे` या पुस्तक मालिकेतून काय साध्य करायचे आहे, याचा उल्लेख मे फेसबुकवर अनेकदा केला आहे. पुस्तकात तर विस्ताराने भूमिका मांडली आहे. समाजातील कार्यशील, सकारात्मक, उद्यमी व्यक्तींचा समुच्चय आम्ही या पुस्तकातून मांडत आहोत. जिल्ह्या-जिल्ह्यातील ही `पोलादी माणसे` एकत्र यावीत, त्यातून समाजात काही नवे घडावे, नव्या पिढीला मार्गदर्शन मिळावे, हेच यातून अपेक्षित आहे.



या पोलादी माणसांनी पुढाकार घेवून काही उपक्रम हाती घ्यावेत, असेही यातून अपेक्षित आहे. मागील चार वर्षांत १५ जिल्ह्यांतून हा प्रवास पार पडला... १५ पुस्तके प्रकाशित झाली. या टप्प्यावर रविवारी, १० मे २०१५ रोजी औरंगाबादेत एक आशादायी आयोजन करण्यात आले.

औरंगाबादच्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात मागील अनेक दशकांपासून कार्यरत असलेल्या `एमआयटी` या शिक्षण संस्थेचे अध्वर्यू श्री. यज्ञवीर कवडे यांनी पुढाकार घेत मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यातील `पोलादी माणसा`ना साद घातली. विशेषतः सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असलेल्या उद्योजक-शेती उद्योजकांना त्यांनी हे आवाहन केले होते. अशा व्यक्तींचा परस्पर संवाद रविवारी दिवसभर रंगला. अशा एकत्रीकरणाचे हे पहिले पाउल ठरले.

श्री. कवडे सर एमआयटीचे संस्थापक. मराठवाड्यातील एका उत्तम संस्थेची उभारणी केल्यानंतर दैनंदिन व्यापाची सूत्रे प्रो, मुनीश शर्मा यांच्या हाती देऊन त्यांनी स्वतःला शेती आणि सामाजिक कार्यात गुंतविले आहे. कवडे सरांची संघर्षमय वाटचाल मी `उस्मानाबाद आयकॉन्स` या पुस्तकात मांडली आहे. त्यांनीच या उपक्रमाचे यजमानपद स्वीकारल्यामुळे मला आनंद झाला. एमआयटीचे महासंचालक प्रो. मुनीश शर्मा हे सध्या सी. एम. आय. ए. या उद्योजक संघटनेचे अध्यक्षही आहेत. त्यांचाही या आयोजनात पुढाकार होता.
एकेकाळी जालना येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रकल्पात सालदार असलेल्या आणि आता फळ प्रक्रिया उद्योगात अमीट छाप पडणाऱ्या उद्योजिका सीताबाई मोहिते, हिंगोली येथे संगणक प्रशिक्षण संस्था आणि मुक्त विद्यापीठाचे केंद्र चालविणारे विजयकुमार कांबळे, तेथीलच दाल मिल व्यावसायिक रमेश पंडित, किनवट येथे साने गुरुजी आरोग्य केंद्र चालविणारे नामांकित सर्जन डॉ. अशोक बेलखोडे, इंटरनेट च्या अभिनव उपयोगातून कोट्यवधींची उलाढाल करणारे `क्लियर कार रेंटल`चे सचिन काटे, जालना येथील प्रयोगशाळा सहायक आणि विज्ञान वस्तू निर्मिती उद्योग करणारे संजय टीकारिया, नांदेडच्या रयत रुग्णालयाचे डॉ. सुरेश खुरसाळे, परभणीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे डॉ. नितीन मार्कंडेय, समुद्र्वाणीसारख्या आडवळणी गावात उत्तम प्रतीच्या शेतीसाहीत्याची निर्मिती करणारे कुमार स्वामी, उमरगा येथील डॉ. दामोदर पतंगे, साऱ्या मराठवाड्याच्या जिभेला चव देणारे `रवी मसाले`चे फुलचंसेठ जैन, लातूरच्या चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयाचे संस्थापक प्रा. संजीव सोनवणे, परभणी जिल्ह्यातील खंडेगावचे सरपंच आणि गावाच्या विकासाचे शिल्पकार सुरेश शृंगारपुतळे, यमगरवाडीच्या भटके विमुक्त केंद्राचे प्रमुख कार्यकर्ते उमाकांत मिटकर... अशी आपापल्या क्षेत्रात उत्तम योगदान देणारी मंडळी एकत्र आली. त्यांनी आपापल्या कामांच्या माहितीची देवाण घेवाण केली... हा या आयोजनाचा पूर्वार्ध होता...

खरी महत्वाची चर्चा होती ती विकासाच्या वाटांची. आपापल्या ठिकाणी राहून समाजासाठी आणखी काय करता येईल, यावर चर्चा झाली. अडचणी कशा सोडवता येतील यावर विचार झाला. सर्वात महत्वाचा ठरला तो क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा. एका प्रकारच्या १० उद्योजकांना एकत्र आणून त्यांना केंद्राच्या योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल, हे याचे सूत्र होते आणि याच दृष्टीने कवडे सरांनी चक्क त्या क्षेत्रातील दोन सल्लागारांना या बैठकीस निमंत्रित केले होते...! शिरीष लोया आणि विवेकानंद कोरांगलेकर यांची उपस्थिती इथे खूप महत्वाची ठरली. त्याच प्रमाणे महत्वाचे होते ते सी. एम. आय. ए.चे दोन माजी अध्यक्ष सुनिलभाई रायठठ्ठा आणि मुकुंद कुलकर्णी. `

पोलादी माणसांच्या` अनुभव कथानानंतर या दोघांनी त्या विषयाचे विश्लेषण केले आणि क्लस्टर डेव्हलपमेंट अथवा इतर कोणत्या मार्गाने ही वाटचाल अधिक समृद्ध करता येईल यावर प्रकाश टाकला...! क्लस्टर डेव्हलपमेंट शेतीतही करता येते, ती केवळ उद्योगापुरती बाब नाही... गटशेती हे सुद्धा एक प्रकारे क्लस्टर डेव्हलपमेंटच!

एका वेगळ्या दिशेचा शोध घेण्याचा हा प्रयत्न... स्वतःपलीकडचे जग पाहणारी ही माणसे... यांच्या सहकार्याने पर्यावरण, पाणी, शिक्षण या क्षेत्रात सुद्धा पुढील काळात काही पावले उचलायचे ठरत आहे. ४ जुलै रोजी पुन्हा एकदा भेटायचे ठरवून रविवारची बैठक विसर्जित झाली. अनेक जण इच्छा असूनही काही अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. पुढच्या वेळी असे अनेक जण उपस्थित राहतील अशी आशा आहे.

कवडे पती-पत्नी एखाद्या घरगुती समारंभाच्या अविर्भावात सर्वांचे आदरातिथ्य करीत होते. या बैठकीचे खऱ्या अर्थाने यजमानपद भूषविताना त्यांनी सर्वांना केलेले विकासाचे आवाहन भावणारे ठरले. अशाच पद्धतीने एक एक टप्पा गाठत भविष्यात राज्यभरातील `पोलादी माणसां`ची बैठक आयोजण्यात पुढाकार घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

एमआयटीचा कर्मचारीवृंदसुद्धा अत्यंत आपुलकीने यात सहभागी झाला. एका चांगल्या उपक्रमाची पायाभरणी या निमित्ताने झाली.

या सर्वांना जोडणारा धागा एवढेच माझे अस्तित्व...! माझ्या संस्थेला मी `the Catalyst` असे नाव दिलेले आहे. माझी भूमिका संप्रेरकाची...! ठिणगी टाकणे, दोन घटकांना एकत्र आणून त्यांना संयोगाची प्रेरणा देणे हे माझे काम... हे करण्यात मला आनंद आहे. `पोलाद`च्या सहकार्याने चालू असलेली वाटचाल अशा प्रकारे फुलत राहील, हीच अपेक्षा...!

- दत्ता जोशी, औरंगाबाद