Saturday, January 21, 2012

‘सृजन’क्षणांचा आरंभबिंदू

नगर येथील ‘ज्ञानसंपदा स्कूल’ या इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणार्‍या विद्यालयाने ‘सृजन’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे. ‘पॅरेंटिंग’ या विषयाला वाहिलेल्या या पुस्तकात मराठीतील अनेक नामवंतांचे लेखन समाविष्ट आहे. या पुस्तकाचे संपादन करण्याची संधी मला मिळाली. पुस्तकाची संकल्पना मांडण्यापासून नियोजन आणि निर्मितीपर्यंत सर्व जबाबदार्‍या सांभाळताना एका उत्तम पुस्तकाच्या निर्मितीचा आनंद मला मिळाला. नगर येथे 31 जानेवारी 2012 रोजी या पुस्तकाचे प्रकाशन आहे. या पुस्तकाला मी लिहिलेली प्रस्तावना...
......................................
नगर येथील ‘ज्ञानसंपदा स्कूल’च्या वतीने हे ‘सृजन’ आपल्या हाती देताना आम्हाला मनःपूर्वक आनंद होत आहे. ही स्मरणिका खर्‍या अर्थाने ‘स्मरणिका’ व्हावी, ती दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहावी, या दृष्टीने आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे. तो किती यशस्वी ठरला, हे काळच सांगेल. आपल्या संग्रहात हे पुस्तक आणखी 10-15 वर्षांनंतरही दिसले, तर हा हेतू पूर्ण झाला, असे म्हणता येईल.

खरे तर ही रूढ अर्थाने स्मरणिका नाही. स्मरणिका म्हटले की सर्वसाधारणपणे डोळ्यांसमोर येते ते पानभर जाहिरातींचा प्रचंड मारा असलेले आणि जुजबी लेख असलेले जाडसर पुस्तक. ही परंपरा तोडण्याचा आणि रचनात्मक काही करण्याचा धाडसी निर्णय ‘ज्ञानसंपदा’च्या संचालकांनी घेतला आणि नवी दृष्टी देण्याची क्षमता असलेल्या या आगळ्या स्मरणिकेच्या कल्पनेचा जन्म झाला. नियोजन आणि रचनेच्या पातळीवर घेतलेली सुमारे सहा महिन्यांची मेहनत, मान्यवर लेखकांचे सहकार्य आणि संचालकांनी दिलेले स्वातंत्र्य याचे फळ म्हणजे हे संग्राह्य पुस्तक. वास्तविक ‘ज्ञानसंपदा’ ही इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी शाळा आहे. मात्र शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असले तरी इथले संस्कार भारतीय आहेत आणि वातावरण मातीशी नाळ जोडणारे आहे. या विद्यालयाचा वैश्विक दृष्टिकोन यातून स्पष्ट व्हावा.

झपाट्याने बदलत चाललेल्या समाजव्यवस्थेत आता शाळेची भूमिका सर्वात महत्वाची ठरणार आहे. त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबात आई आणि वडील हे दोघेही नोकरी - व्यवसाय करणारे असतील, तर मूल सर्वाधिक वेळ असते ते त्यांच्या शाळेच्या आणि शिक्षकांच्या संपर्कात. त्यामुळे या मुलांच्या वाढीत शाळेची भूमिका महत्वाची असते. ‘ज्ञानसंपदा स्कूल’ या दृष्टिकोनातून अनेक रचनात्मक उपक्रम अमलात आणत असते. मुलांना शिक्षण देत असतानाच त्यांच्यावर अशा माध्यमातून होणारे संस्कार त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ठरतात. 
मात्र शाळेची भूमिका कितीही महत्वाची ठरली, तरी मुलांच्या विकसनात पालकांची भूमिका सर्वात महत्वाची आहे. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत ही भूमिका आजी-आजोबा, काका-मामा बजावत. या सार्‍या भूमिका आज फक्त आई-बाबांना बजावाव्या लागत आहेत. ‘आम्ही जे करतो ते मुलांसाठीच’ असे छातीठोकपणे सांगणारे हे आई-बाबा आपल्या मुलांसाठी किती ‘क्वालिटी टाईम’ देतात, त्यांच्या विकसनात कोणती भूमिका बजावतात, हा संशोधनाचा विषय आहे. 

इथे आर्य चाणक्य या द्रष्ट्या महापुरुषाचा एक श्लोक आठवतो -
अदाता वंशदोषेण कर्मदोषाम्‌ दरिद्रता ।
उन्मादो मातृदोषेण पितृदोषात्‌ अपंडितः ।।
पहिल्या ओळीचा अर्थ - ‘दानधर्म न करण्याच्या वृत्तीचा दोष वंशाकडे जातो, तर सदोष कर्मांमुळे दारिद्य्र येते’ असा आहे. दुसरी ओळ येथे महत्वाची आहे. उन्मादपूर्ण वर्तणूक म्हणजे मनमानी, असंस्कृत वागणे, आपल्या वागण्याचा इतरांवर काय परिणाम होतो आहे, याचा विचार न करणे अशा वृत्तीचा दोष मातेने केलेल्या संस्कारांकडे जातो, तर मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष, त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद न करणे याचा दोष पित्याकडे जातो. आर्य चाणक्य यांनी सुमारे 2500 वर्षांपूर्वी सांगून ठेवलेल्या ‘चाणक्यनीती’ची सूत्रे आजही अशी लक्षणीय आहेत आणि ती मूल्येही शाश्वत आहेत. आपल्या मुलांच्या वाटचालीकडे, त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाकडे पाहताना आर्य चाणक्यांनी सांगून ठेवलेल्या या सूत्रात आपण बसतो का, याचा विचार तटस्थपणे झाला पाहिजे. हे पुस्तक यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो. 

या पुस्तकाच्या निमित्ताने थोडेसे आत्मचिंतन झाले पाहिजे. सध्या प्रत्येक घरात एक जिवंत भूत आहे. त्याला ‘दूरचित्रवाणी संच’ म्हणतात. हे भूत अलाउद्दीनच्या दिव्याप्रमाणे इच्छापूर्ती करणारे आहे. रिमोटच्या माध्यमातून या पडद्यावरून जे काही पाहता येऊ शकते त्याचे नियंत्रण केवळ मनच करू शकते. हे मन किती सुदृढ आहे, त्यावर त्या घराचे आणि मुलांचे भवितव्य अवलंबून असते. वाट्टेल ते दाखविणे हा वाहिन्यांचा व्यावसायिक धर्म असला, तरी हवे तेवढेच पाहणे हे पालकांचे कर्तव्य ठरते; कारण मुलं (कोवळ्या वयात तरी) फक्त पालकांनाच आपले आदर्श मानतात. स्वैराचार, विवाहबाह्य संबंध, अनैतिक संबंध (हे लोण आता हिंदीतून मराठी मालिकांमध्येही आले आहे), सामाजिक प्रतिष्ठेच्या चुकीच्या कल्पना, मद्यपान, धूम्रपान, पैशाची उधळपट्टी या सार्‍यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारीच जणूू या वाहिन्यांनी घेतली आहे. त्यामुळे अशा मालिकांपासून किंवा दृश्यांपासून स्वतःला दूर ठेवत असतानाच आपल्या वर्तनातून मुलांसमोर आदर्श निर्माण करणे ही खरी गरज आहे. ‘बेस्ट वे टू टीच चिल्ड्रन इज टू डेमॉन्स्ट्रेट’ अर्थात आपल्या मुलांना शिकविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. चांगले वागण्याचे प्रात्यक्षिक, वडीलधार्‍यांना - गुरुजनांना आदर देण्याचे प्रात्यक्षिक, भावंडांशी - मित्रांशी शेअर करण्याचे प्रात्यक्षिक... ही यादी बरीच मोठी होऊ शकते. ऑफिसमधील बॉसबाबत एकेरी बोलणे, ऑफिसातील वस्तू घरी आणणे यातून मुलं योग्य तो अर्थ घेतात. ती गुरुजनांबद्दल एकेरी बोलू लागली, मित्रांच्या बॅगमधील वस्तू घरी येऊ लागल्या तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असण्याची शक्यता जास्त असते. 

मुलांना शिकविण्याची जबाबदारी पालकांची असते. त्याचप्रमाणे मुलेही पालकांना खूप काही शिकवून जातात. आपलं मन फक्त तेवढं संवेदनशील आणि शिकण्यासाठी खुलं असावं लागतं. माझ्याच मुलाचे उदाहरण मला आठवते. वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतूक नियंत्रक आपले काम करीत असतात. लाल दिवा लागला की थांबायचे आणि हिरवा दिवा लागला की पुढे निघायचे, असा प्रघात. एके दिवशी माझ्या मुलाने एका सिग्नलवर थांबलेलो असताना दिव्यांचा अर्थ सांगितला - ‘रेड सिग्नल ः स्टॉप, ग्रीन सिग्नल ः गो, ऑरेंज सिग्नल ः गो फास्ट’. माझे डोळे खाड्‌कन उघडले. हिरवा दिवा बंद होऊन तांबडा दिवा लागला की तो लाल होण्याच्या आत सिग्नल ओलांडण्याच्या मोहापायी मी अनेकदा गाडीचा वेग वाढवीत असे. वाहनाचा वेग कमी करून पादचारी मार्गाच्या अलीकडे आपले वाहन थांबविण्याचा संदेश देणार्‍या तांबड्या दिव्याच्या हेतूचा मी कृतीतून करीत असलेला विपर्यास माझ्या मुलाने निरागसपणे माझ्यासमोर मांडला. त्या दिवसापासून ‘ऑरेंज सिग्नल ः गो फास्ट’ऐवजी ‘कीप स्लो अँड स्टॉप’ ही सुधारणा मी माझ्या वर्तनात केली आणि मग मुलालाही ती समजावून सांगितली. आता त्याला आयुष्यभर हा विषय शिकविण्याची गरज नाही!

शिस्त म्हणजे हाती छडी घेणे नव्हे. रात्री वेळेत झोपणे, सकाळी लवकर उठणे, प्रातर्विधी, मुखमार्जन, स्नान, न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, योगाभ्यास - व्यायाम या गोष्टी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिल्या तर मुलांना सहज उमगतात. संतुलित आहाराची सवय लावत असतानाच ताटात घेतलेले अन्न टाकू नये, हा संस्कार पालकांनी मुलांवर आपल्या कृतीतून केला पाहिजे. मोहाचे क्षण आधी आपल्याला ओळखता आले पाहिजेत आणि ते टाळता आले पाहिजेत म्हणजे मुले ते संस्कार आचरणात आणू शकतात. 

मध्यंतरी एका संस्कार कार्यशाळेत उपस्थित राहण्याचा योग आला. कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तरांच्या फैरी सुरू झाल्या. पालक - पाल्य या नात्याचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखविणार्‍या या प्रश्नांमधील एक प्रश्न माझ्या मनात कायमचा कोरून राहिला. ‘‘आम्ही लहान होतो तेव्हा आमचे आई-बाबा म्हणायचे ः तुला काही कळत नाही. आता आम्ही मोठे झालो. आम्हाला मुलं झाली. त्यांना आम्ही वाढवतो आहोत. आता तुम्ही सांगताय ः मुलांना कसं वाढवायचं हे तुम्हाला कळत नाही. दोन्हीकडून आम्हालाच थापडा खाव्या लागतात, असे का?’’ या रोकड्या सवालाचा जबाब देणं मोठं अवघड आहे. हा कदाचित पिढीचा फरक आहे. आपली पिढी या संक्रमणाची साक्षीदार आहे. संक्रमणात हा त्रास सहन करावाच लागतो. आपल्या आधीची पिढी आपल्या तुलनेत कमी मुक्त विचारांची होती. आपल्या पुढच्या पिढीची क्षितिजं आपल्या आकलनाच्या किती तरी पुढची आहेत. ही पिढी घडवताना वरील प्रश्नाचं उत्तर आपल्याचाच शोधावं लागणार आहे. हे उत्तर शोधत आपली पुढची पिढी घडविण्यासाठी हे पुस्तक नक्कीच महत्वाचा आधार ठरणार आहे.

विषयप्रवेश करण्याआधी एक खुलासा करणे मला आवश्यक वाटते - हे मुलं घडविण्याचं गाईड नाही, ही मार्गदर्शिका नाही. हा एक सुसंवाद आहे. यातील अनेक विषय याआधीही आपल्या मनात येऊन गेले असतील. अनेक शंकांची उत्तरं पुढील पानांतून तुम्हाला मिळतील. त्यापासून प्रेरणा घेणं महत्वाचं. हा पालकांशी साधलेला सुसंवाद आहे. विविध तज्ज्ञांनी आपल्या अनुभवातून आणि अभ्यासातून मांडलेली भूमिका आपल्याला आपली मुलं घडवताना आधार म्हणून वापरता येईल. त्यापुढची वाट मात्र आपली आपणच चालायची आहे.
संस्कारांचे महत्व आपण जाणतोच पण हे संस्कार करताना संवेदनशीलता जपणे आवश्यक आहे. या संस्कारांचे महत्व आणि बालमनाच्या जडणघडणीचा ऊहापोह विख्यात लेखिका, बालसाहित्यिक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी केला आहे. पालकांनी आपले शाळा - कॉलेज सोडल्यानंतर त्यांचा अभ्यास बंद पडलेला असतो. मुलांचे मानसशास्त्र समजावून घेण्यासाठी तो पुन्हा एकदा सुरू करणे आवश्यक बनते. मुलांकडून अपेक्षांची जंत्री करण्याआधी स्वतः आरशात पाहण्याची गरज असते. या दृष्टिकोनातून प्रसिद्ध लेखक आणि वक्ते डॉ. राजीव तांबे यांचे विचार आपल्याला प्रेरक ठरतील. पुण्याच्या ‘गरवारे बालभवन’च्या माध्यमातून विविध संस्कारक्षम उपक्रम राबविणार्‍या आणि हे उपक्रम आपल्या सिद्धहस्त लेखणीतून वाचकांपर्यंत पोचविणार्‍या शोभा भागवत यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून खेळ आणि खेळण्यांचा मांडलेला विषय सर्वांना उद्बोधक ठरणारा आहे. मुलांची चौथीपर्यंतची ज्ञानग्रहण क्षमता सर्वात जास्त असते. याच काळात ते नवनवीन भाषा उत्तम प्रकारे शिकू शकतात. मातृभाषा, राष्ट्रभाषा व इंग्रजी यांच्याबरोबरच आणि किमान दोन भाषा याच वयात शिकणे सहज शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत असते. अष्टपैलू व्यक्तिमत्व बनविण्यासाठी करावयाच्या प्रयोगांविषयी या विषयावरील अभ्यासक आणि अंबाजोगाईत ‘ज्ञानप्रबोधिनी’ची स्थापना करणारे प्रसाद चिक्षे यांचा लेख खरोखरच मार्गदर्शक ठरणारा आहे. बालवयात केलेले संस्कार आणि आरोग्याला दिलेले वळण आयुष्यभर उपयोगाचे असते. आहाराबरोबरच योगाभ्यास आणि आरोग्य संवर्धन या संकल्पनेतून डॉ. वर्षा जोशी आणि  वैद्य संतोष नेवपूरकर यांनी मांडलेले विचार मुलांबरोबरच पालकांसाठीही मार्गदर्शक ठरणारे आहेत. प्रत्येक मूल बुद्धिमानच असतं. त्याच्या बुद्धीला पैलू पाडणे महत्वाचे असते. केवळ घोकंपट्टीपेक्षा स्वयंअध्ययन आणि छंदांच्या जोपासनेतून मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास शक्य असतो. 

सध्या प्रत्येक ठिकाणचा शिक्षणाचा खर्च वाढत चाललेला आहे. मुलांचा कल आणि स्वतःची शैक्षणिक व आर्थिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन मुलांच्या भविष्यातील वाटचालीसाठी आतापासूनच योग्य योजनांद्वारे बचतीची आवश्यकता निर्माण झालेली आहे. बचतीच्या या मोहिमेत मुलांनाही सहभागी करून घेतल्यास त्यांच्या व्यवहाराचा पायाही पक्का होऊ शकतो. हा हिशेबशीर विषय या विषयावरील अभ्यासक शशिकांत एकलारे यांनी मांडला आहे. सुमारे 20 वर्षे पत्रकारिता आणि 25 वर्षे बालमानसिकतेच्या क्षेत्रात काम करणारे श्रीकांत काशीकर या विषयातील ‘अधिकारी’ व्यक्ती आहेत. ‘मंगलमूर्ती संस्कार केंद्र’, ‘स्व-विकास व्याख्यानमाला’ आदींच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम मोलाचे आहे. मुलांचा कल ओळखून त्याच्या बौद्धिक विकसनाचे टप्पे आखले पाहिजेत आणि मुलांशी संवाद साधत त्यांच्या भविष्याची पायाभरणी केली पाहिजे, असे मत मांडणारे त्यांचे अनुभवकथन प्रेरक ठरणारे आहे.

मुलं वयात येतानाचा काळ अधिक नाजूक असतो. पौगंडावस्थेतील मुला-मुलींना समजावून घेणे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी अतिशय महत्वाचे ठरते. मुलांच्या जडणघडणीतील हा खर्‍या अर्थाने ‘टर्निंग पॉइंट’ असतो. या विषयावर ज्येष्ठ पत्रकार व ललित लेखक मल्हार अरणकल्ले, पुण्यात ज्ञानप्रबोधिनी संस्थेत विविध प्रयोग करणार्‍या अनघा लवळेकर आणि सोलापूर येथे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ऍड. अपर्णा रामतीर्थकर यांचे लेखन या पुस्तकात वाचायला मिळेल. करइरची जडणघडण करताना ठोकळेबद्ध पद्धतीने विचार करता येत नाही, त्यासाठी मुलांचा कल आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता असावी, असा विषय मांडणारे डॉ. श्रीराम गीत यांचे लेखन मार्गदर्शक ठरणारे आहे. अपंगांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका नसीमा हुरजुक यांनी अशा मुला-मुलींच्या पालकांशी केलेले हितगुज सर्वांचेच डोळे उघडणारे ठरेल, असा विश्वास वाटतो. 

‘ज्ञानसंपदा’ चार भिंतीत कोंडली जाऊ नये, ती सर्वव्यापी व्हावी, या उदात्त हेतूने ‘ज्ञानसंपदा स्कूल’च्या संचालक मंडळाने या आगळ्यावेगळ्या स्मरणिकेची निर्मिती केली. सर्व लेखकांच्या सहकार्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरला. आपल्या हाती असलेल्या या पुस्तकातील जे जे उत्तम आहे त्याचे श्रेय या लेखक मंडळींचे आणि संचालक आणि संपादक मंडळाचे. काही न्यून राहिले असल्यास त्याची जबाबदारी या प्रकल्पाचा संपादक या नात्याने माझी.

चला, सृजनक्षणांचे साक्षीदार होऊ या...!

- दत्ता जोशी

(रु. १५०/- मूल्याचे हे पुस्तक हवे असल्यास १ फेब्रु. २०१२ नंतर ज्ञानसंपदा स्कूल (इंग्रजी माध्यम), तपोवन रोड, सावेडी, अहमदनगर. (दूरध्वनी ः 0241-2411134, ई मेल : sampadaschool1@gmail.com) येथे संपर्क साधता येईल.

No comments: