काल रात्री ‘शाळा’ पहिला. आवडला. खूप वर्षांपूर्वी बोकिलांची ‘शाळा’ वाचली होती. ती ही त्या वेळी आवडली होती. पौगंडवयात जवळ जवळ सर्वच जण ज्या मनस्थितीतून जातात, त्याचे संयत पण यथार्थ चित्रण बोकिलांच्या भाषेतून उतरले होते. कमी अधिक फरकाने ते वातावरण सगळ्याच गावांतून- शाळांतून दिसत होते. ते कादंबरीत चांगल्या प्रकारे उतरले. ही कादंबरी खूप काळ डोक्यात रेंगाळत राहिली होती. त्यामुळे, यावर चित्रपट निघतोय हे ऐकून उत्सुकता चाळवत होती. काल ती पूर्ण झाली.
पुस्तकावर आधारित चित्रपट म्हटले की नेहेमीच मी विचारात पडतो. कादंबरी वाचताना आपल्या मनात काही प्रतिमा उभ्या राहत असतात. बहुतेक वेळा त्या आपल्या भोवतीच्या स्थळ-काळाशी सुसंगत असतात. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असते. त्याचा विचार, त्याची उमज, त्याचे दृष्टीकोन त्यात नक्कीच उतरत असतात. ते आपल्या विचारांशी सुसंगत असावेत, असा विचार सुद्धा अयोग्य आहे. त्याने जे मांडले ते आपल्याला भावले की नाही, एवढाच प्रश्न उरतो. ‘शाळा’ने यां अपेक्षा बऱ्यापैकी पूर्ण केल्या.
लोकेशन आणि कास्टिंग या दोन गोष्टी यात खूप महत्वाच्या होत्या. त्यात सुजय डहाके यशस्वी ठरले. दिग्दर्शन आणि संकलन या दोन्ही गोष्टी त्यानीच सांभाळल्याने त्यांना हवा असलेला इफेक्ट बरोबर उतरला असावा. गाव, परीसर, गल्ली, शाळा, वर्ग, पोरं, घर, चाळ यां सगळ्या गोष्टी जमून आल्या. हा विषय १९७५-७६ च्या पार्श्वभूमीवर बेतलेला. त्यामुळे ते वातावरण पकडणे महत्वाचे होते. डहाके यांनी तो बरोबर पकडला.
अंशुमन जोशी आणि केतकी माटेगावकर यांनी आपापली कामे सुरेख निभावली आहेत. दोघांच्याही नजरेतील निरागसपणा, त्यांची परस्परांकडे पाहण्याची ‘नजर’, त्या अल्लड वयातील विभ्रम हे सारे बोकिलांनी शब्दांतून मांडणे एकवेळ सोपे, पण ते पडद्यावर उतरविणे अवघड...! ते काम या दोघांनी उत्तम प्रकारे केले. विशेषतः केतकी या आधी कॅमेरयाला सामोरी गेली होती ती एक बाल-गायिका म्हणून. या वेगळ्या रोल मध्ये तिने स्वःताला सिद्ध केले आहे. दिलीप प्रभावळकर, नंदू माधव, जितेंद्र जोशी... शाळेतील पोरं-पोरी... सगळं छान उतरलं आहे. त्यामूळे मला चित्रपट बऱ्यापैकी आवडला.
पण जाता जाता दोन-तीन चिमटे घेतल्याशिवाय मी ‘पत्रकार’ कसा ठरणार? दाखवायचेच म्हणून दोन-तीन गोष्टी मांडाव्यात म्हणतो...!
१) - हा काळ १९७५-७६ चा होता... चित्रपटात काही ठिकाणी वृत्तपत्रांचे वाचन चाललेले दाखविले आहे. त्यांची मांडणी-निर्मिती-आकार हे सारे आजचे दिसते. जुना पेपर दाखविला असता तर छान झाले असते. अर्थात हा फरक ९९ टक्के प्रेक्षकांना कळत नाही.
२) - क्रांतिकारक 'चे गव्हेरा'चे चित्र असलेला कप दोन-तीन वेळा दाखविलेला आहे. त्या काळात कपांचा हा आकार आणि छपाईचे हे तंत्र विकसित झाले होते का? बहुदा नव्हते...
३) - जितेंद्र जोशी आपल्या वाग्दत्त वधूचा फोटो दाखवितो. तो चक्क रंगीत आहे. तेव्हा रंगीत फोटोग्राफी भारतातील ग्रामीण भागात उपलब्ध होणे कसे शक्य होते? कारण तो काल कृष्ण-धवल होता...
असो, पण या कडे दुर्लक्ष्य करून चित्रपट पहा... शक्य झाले तर चित्रपटगृहात पाउल ठेवण्याआधी मनाने बालपणात जा... आपल्या वर्गात जाऊन बसा... मजा येईल!
No comments:
Post a Comment