Saturday, March 19, 2016

मी कुबेर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो...



लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर सर्वांच्या दुगाण्या झाडून झाल्या असतील तर आता मी काही मुद्दे मांडू इच्छितो.
सर्वप्रथम, गुरुवार दिनांक १७ मार्च २०१६ रोजी प्रकाशित झालेल्या `असंतांचे संत` या अग्रलेखाबद्दल आणि त्याच बरोबर त्याच्या दुसऱ्या दिवशी लोकसत्ताच्या पहिल्या पानावर माफी मागून हा अग्रलेख परत घेण्याच्या भूमिकेबद्दल मी श्री. कुबेर यांचे अभिनंदन करतो. त्याच वेळी, लेखन स्वातंत्र्यासारख्या भंपक विषयाच्या आहारी जात राजीनामा वगैरे फालतू प्रकार टाळल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
मी हे ही स्पष्ट करतो की कुबेर यांच्यातील लेखक-पत्रकाराचा मी आदर करतो. तेल या विषयावर गुंफलेली सर्व ४ पुस्तके आणि `टाटायन` ही सर्व माझ्या वैयक्तिक संग्रही आहेत. लोकसत्ताचे अग्रलेख सातत्याने वेगळी भूमिका मांडत असतात. माझ्या मनातील वैचारिक धरणांना छेद देणारी मांडणी अनेकदा असते, त्यात मतभेद असतात तरीही मला त्यांची मांडणी आवडते.
या अग्रलेखात त्यांनी जो विषय हाताळला त्यासाठी (भारतात) मोठे धैर्य लागते. ते त्यांनी दाखविले. हे वेडे धैर्य नव्हते तर त्याला मुद्द्यांचा आधार सुद्धा होता. प्रवासात असल्याने गुरुवारी हा अग्रलेख माझ्यासमोर आला नव्हता, पण शुक्रवारी संध्याकाळी `लोकसत्ता`तील चौकटीने लक्ष वेधून घेतले 

आणि मी आदल्या दिवशीचा अंक शोधून काढून अग्रलेख वाचून काढला. राज्यात माझ्यासारखे शोधून काढून वाचणारे असे हजारो वाचक निश्चितच निघतील. या सर्वांच्या नजरेला हा विषय आणल्याबद्दल मी `लोकसत्ता`चे आभार मानतो. हा अग्रलेख दुसऱ्यांदा जसाच्या तसा छापूनही जे साध्य आले नसते, ते या माफीने साधले.
मला या लेखात ३ मुद्दे मांडायचे आहेत.
१)      चर्चची दंडेलशाही
२)      देशातील असहिष्णुता
३)      माध्यमांची वैचारिक दिवाळखोरी
चर्चची दंडेलशाही
---------------------
अग्रलेखात मांडलेला हा विषय मदर तेरेसा या वादग्रस्त समाज सेविकेच्या कथित समाजसेवेची चिरफाड करणारा आहे. `चर्च`ची या विषयाची भूमिका जागतिक स्तरावर अगदी स्पष्ट आहे. बुरसटलेल्या प्रतिगामी विचारांचे आजही साठलेले डबके म्हणजे चर्च. पृथ्वी गोल आहे याला चर्चची बहुधा आजही `मान्यता` नाही! धर्मप्रसार हे यांचे मुख्य उद्दिष्ट. त्याला जेथे जसा हवा तेथे तसा मुखवटा चढविण्याची यांची हातोटी वादातीत आहे. धर्मवेडाच्या बाबतीत आणि त्यातिक क्रौर्यात हे महमद तुघलकाचे बाप ठरावेत. या धर्मवेडापायी कान्सोर्शियममध्ये झालेला परधर्मीय आणि स्वधर्मीयांचाही छळ आजही अंगावर काटा उभा करणारा आहे. याचे अधिकृत दाखले अनेक ठिकाणी आढळतात. हाती शस्त्र घेवून वाढलेला हा क्रूर धर्म शांततेचा पाईक म्हणवतो ही सर्वात मोठी भोंदुगिरी.
मदर तेरेसा यांच्या बाबतीत आणि मिशनरीज ऑफ चारीटीजबद्दल काय बोलावे? धर्मांतराला तयार असलेल्यांना इथे प्राधान्याने उपचार मिळाले, हे यातील सत्य. पण हिंदू समाजातील भंपक मानवतावादाला गोंडस आवाहन करून त्यांना हा डोलारा उभा करता आला. अर्थात, चर्चचा मजबूत पाया इंग्रजांच्या काळातच तयार झालेला होता.
पुर्वांचलात हिंदुकरणाचा आरोप काही मंडळी संघावर करतात. तेथील वनवासींच्या जीवन पद्धतीत दखल देऊ नये, त्यांना हिंदू कसे म्हणता येईल, ते निसर्ग पूजक आहेत असा दावा केला जातो. असे असेल तर ख्रिस्त्यांनी सुद्धा त्यापासून दूर राहायला हवे. या निसर्ग पुजकाना जसे हिंदू करण्यापासून दूर ठेवायला हवे तसेच ख्रिस्ती करण्यापासूनही... पण तसे झाले नाही. तेथील ८० % हून अधिक समाज ख्रिस्ती आहे. केवळ या हेतुना साध्य करण्यासाठीच इंग्रजांनी इतर भारतीयांना त्या प्रदेशात जाण्यासाठी परवाना पद्धत सुरु केली. पण `मानवसेवा` करणाऱ्या मिशनर्यांना त्यातून सूट होती आणि आहे...!
पुढचा भाग संतपणासाठी चमत्काराचा. मदर तेरेसा यांनी २ चमत्कार केले... त्या मानवतावादी. पुरोगामी. मग साईबाबा, अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज, अन्य संत यांना आपण कुठल्या तोंडाने प्रतिगामी किंवा भोंदू-बुरसटलेले ठरवतो? कुबेर यांनी हे ढोंग उघडे पाडले. त्यांचे अभिनंदन.
पण चर्चची ताकद पाशवी आहे. युपीए सरकारच्या पहिल्या कार्यकाळात पोपची भारत भेट गाजली होती. ते `स्टेट गेस्ट` होते. त्यामुळे त्यांची तपासणी झाली नाही. सोनिया गांधी यांच्या आदेशावरून असे घडल्याचे सांगण्यात आले. तेवढ्यापुरते ते मान्यही करता येईल. पण त्यांचा स्टाफ, त्यांनी सोबत आणलेले भरगच्च सामान, पेटारे यांचीही तपासणी झाली नव्हती. त्याचे काय? त्यात काय होते? या विषयी अनेक वदंता आहेत. त्यातून खूप मोठ्या प्रमाणात पैसा भारतात आणला गेला अशी मोठी चर्चा आहे.
भारतात मंदिरातील पैशावर अनेकांचा डोळा आणे आक्षेप असतो. तेथील अर्थकारण पुरोगाम्यांना धोकादायक वाटते. पण भारतातील चर्चकडे असेलेला अप्रत्यक्ष पैसा किती असावा? चर्चच्या ताब्यात किती लाख हेक्टर जमीन असावी, याचा काही अंदाज? आमच्या औरंगाबादेत अगदी मध्यवस्तीत सेंट फ्रान्सिस शाळा आहे. त्या शेजारी `मिशनरीज`चे कार्यालय आहे. हा मध्य वस्तीतील परिसर किमान ५०-६० एकरांचा असावा. आजच्या भावाने त्याची किंमत किती? भारतभर विविध शहरात अशा हजारो जागा चर्चच्या ताब्यात आहेत. अगदी इंग्रजांच्या काळापासून त्यांनी ही आखणी केलेली आहे. ही धर्मप्रसाराची दूरदृष्टी...! चर्च, शाळा, रुग्णालये अशा विविध नावाने या जमिनी त्यांच्या ताब्यात आहेत. या जमिनीचे काही तुकडे विकून दुष्काळ निवारणासाठी काही उपाय योजावेत असे कुणी सुचविल्याचे ऐकिवात नाही...!
देशातील असहिष्णुता
...........................
कुबेर यांनी आजवर हिंदू समाज, संघ, भाजप, हिंदुत्ववादी विचारधारेतील चुका यावर अनेकदा कोरडे ओढले. पण त्यावर चर्चा होण्यापलीकडे कधी काही घडले नाही. भावना हिंदुन्च्याही दुखावल्या. पण माफी मागण्याची गरज लोकसत्ताला वाटली नाही. पण या बाबतीत असे घडले. असे का व्हावे? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे भोक्ते आता कुठल्या रजेवर गेले? एरव्ही हागल्या-मुतल्याला (शब्द असंसदीय आहे पण मला चपखल प्रतिशब्द आठवत नाहीय) हिंदुना आणि हिंदुत्वाद्याना झोडणारे आता गप्प का? मागे लोकमत मध्ये पिग्मी बँकेच्या चिन्हावर कुराणातील ओळी छापल्या गेल्या, हा निव्वळ कलाविष्कार होता. पण तेव्हा लोकमतच्या कार्यालयावर हल्ले झाले. धमक्या दिल्या गेल्या. त्यांनी तातडीने माफी मागितली. तेव्हाही हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे भोक्ते मोनात गेले होते.
ख्रिस्त्यांनी असा कसलाही गोंधळ घातला नाही. ते गोंधळ घालत नसतात. ते फक्त योग्य ठिकाणची कळ दाबत असतात. मग त्यांना हवे तसे घडत असते किंवा घडवले जाते. लोकसत्ताच्या बाबतीत हा अदृश्य हात कार्यरत होता, हे नक्की. कुबेर किंवा लोकसत्ता व्यवस्थापन काहीही बोलत नसले तरी यात खूप काही घडलेले आहे. अन्यथा `धैर्यशील पत्रकारिता` करणाऱ्या संस्थेला असे शेपूट घालावे लागते ना.
अशा स्थितीत कुबेर यांनी ज्या पद्धतीने माफी मागितली आणि त्या द्वारे वाचकांचे लक्ष वेधले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. `असंतांचे संत या कालच्या अग्रलेखाबद्दल आम्ही दिलगीर आहोत` असे वाक्य असते तर कदाचित मी सुद्धा आदल्या दिवशीचा अंक शोधून वाचण्याची तसदी घेतली नसती...! त्याच वेळी, उगाच भावनेच्या भरात, वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांनी राजीनामा दिला नाही, हे सुद्धा चांगले झाले. यंत्रणेबाहेर पडून लढण्यापेक्षा यंत्रणेत असणेच योग्य. काही पत्रपंडितांनी त्यांना या विषयावर उचकविण्याचा प्रयत्नही केला होता...!
isis चा मुद्दा असो की मदरचा. दोन्ही ठिकाणी माध्यमांवर दबाव आणला गेला. त्याची चर्चा झाली नाही. ज्याला असहिष्णुता असहिष्णुता म्हणून भुई धोपटणे चालू होते ते सारे पोरकटपणा वाटावे असे हे दोन प्रसंग आहेत. अशाच असंख्य गोष्टी भारतात घडत आहेत. मात्र त्याकडे मान्यवर विचारवंतांचे लक्ष जात नाही. त्यांच्या निषेधार्ह पुरस्कार वापसी होत नाही, परिसंवाद झडत नाहीत की टीव्हीवर वाचाळ विचारवंत आपल्या मौलिक विचारांचा आविष्कार घडवत नाहीत. असे का व्हावे याचे उत्तर उघड आहे...
माध्यमांची वैचारिक दिवाळखोरी
स्वयंघोषित विचारवंतांची स्थिती अशा वेळी नाजूक बनते. वाचादोष, श्रवणदोष आणि दृष्टीदोष एकदमच उपटतो. मिडिया सुद्धा असाच संधिसाधूपणा करतो. समजा, रझा अकादमीच्या वेळी जशी एका टीव्ही वाहिनीची ओबी वाहन फोडण्यात आले तसे एखाद्या हिंदुत्ववादी संस्थेच्या कार्यक्रमात घडले असते तर? अशाच प्रकारची ही ताजी दोन उदाहरणे. लोकमत आणि लोकसत्ता. इतर माध्यमे मुग गिळून गप्प आहेत. असे का व्हावे? हा दुटप्पीपणा नाही का?
खरे तर माध्यमांनी आपली वैचारिक दिवाळखोरी समाजासमोर जाहीर केली पाहिजे. आपण कोणत्या मुद्द्यावर लोकशाही, विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी इत्यादीचे रक्षण करू ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे. म्हणजे त्यांच्या भंपकभक्तांना मार्गदर्शक सूत्रे सापडतील.
असो,
गिरीश कुबेर यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतानाच `जर्नालिझम ऑफ करेज`ची पोकळ भूमिका घेणाऱ्या आणि आपल्याच संपादकाला वाऱ्यावर सोडणाऱ्या एक्स्प्रेस व्यवस्थापनाचा मी जाहीर निषेध करतो.

`हे परमेश्वरा, ते काय करीत आहेत हे त्यांनाच ठावूक नाही. त्यांना सद्बुद्धि दे...` 

2 comments:

Sangram patil said...

Nice article sir. Hats of to girish kuber sir. But shame on loksatta.

Anonymous said...

NICE ARTICLE.
Dr. Asmita Phadke, Pune.