Saturday, September 17, 2011

एका ‘जिंदादिला’च्या ‘एक्झिट’चे एक वर्ष...

उदय दंताळे यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने औरंगाबादेत आजपासून तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करून त्यांना आगळी श्रद्धांजली वाहण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. काही माणसं आपल्या आठवणी चिरंतन काळासाठी सोडून अकालीच परलोकी जातात. दंताळे त्यापैकीच एक. त्यांचे मित्र दत्ता जोशी यांनी या निमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा...
....................................................
दैनिक सामनाच्या औरंगाबाद आवृत्तीमध्ये दि. १७ -९ - २०११ रोजी प्रकाशित झालेला लेख.
....................................................

‘त्या’ पहाटे मनोज टिकारिया यांचा आलेला ‘एसएमएस’ मन घायाळ करून गेला. अर्थ कळूनही तो मेसेज मी तीन वेळा वाचला. या आशेने, की आधी कळलेला अर्थ चुकीचा असेल...! पण ते होणार नव्हते. एक जिंदादिल माणूस या जगातून निघून गेला होता. मृत्यूही असा, की काळजाचा थरकाप व्हावा. अशा वेळी जगन्नियंत्याचा राग येतो. सर्वांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे असणारा हा माणूस एक्झिट घेताना सर्वांच्याच असंख्य पावले पुढे निघून गेला. खरे तर या गोष्टी आपल्या हातात नसतात, एक अदृष्य शक्ती हे सारे घडवत असते. आपण त्या शक्तीला निमूटपणे शरण जायचे असते, हेच खरे.

उदय दंताळे यांची आणि माझी पहिली भेट कुठे, केव्हा, कधी झाली हे खरेच मला आठवत नाही. बुद्धीला खूप ताण देऊन पाहतोय, मागच्या वर्षभरात असंख्य वेळा स्मृतीच्या नोंदी असंख्य वेळा चाळून झाल्या. पण पहिल्या भेटीचा क्षण काही हाती लागत नाही. कदाचित ती ओळख औपचारिकपणे झाली नसावी. तसे, उदय कधीच औपचारिक नव्हते. आपल्याच धुंदीत मग्न होऊन रस्त्याने चालत निघावे आणि जाता जाता समानशील सुहृदांची पावले परस्परांशी जुळावीत, हात हाती गुंफले जावेत आणि त्याला कोणत्याही पूर्वपरिचयाची अट नसावी, इतके हे सारे अकृत्रिम... निरागस! अशाच कुठल्यातरी वळणावर हात गुंफले गेले, इतकीच स्मृती. मग इतर आठवणी आहेत त्या विविध कार्यक्रमांतून असलेल्या त्यांच्या विद्युत्‌गती वावराच्या. चेहर्‍यावरील हास्य मावळू न देता सगळ्या अडचणी सहज सोडविणारे दंताळे मनात खोलवर उतरत गेले.

काही आठवणी मात्र मनात नक्कीच घर करून आहेत. त्यांच्याशी झालेली पहिली ‘व्यवस्थित’ भेट मात्र पक्की आठवते. तेव्हा मी नोकरी करीत असलेल्या वृत्तपत्रात ‘झेप’ नावाचा स्तंभ लिहीत असे. पहिल्या पिढीतील उद्योजकांचा, त्यांच्या वाटचालीचा आणि संघर्षाचा परिचय तरुणांना करून देणार्‍या या स्तंभातून त्यांचा परिचय करून देण्यासाठी 2003 मध्ये केव्हा तरी ही भेट झाली. त्यांच्या घरात पहिल्या मजल्यावरील स्टुडिओत झालेल्या या तीन-साडेतीन तासांच्या गप्पांमध्ये उदय दंताळे हे ‘रसायन’ मला व्यवस्थित समजून घेता आलं. 1982 मध्ये मुंबईत जाऊन टीव्ही रिपेअरिंगचा कोर्स करून आलेल्या उदय यांनी त्यानंतर 10 वर्षे हेच काम केले आणि 1994 दरम्यान ‘साईड बिझनेस’ म्हणून सुरू केलेल्या ‘साउंड सिस्टिम’च्या व्यवसायात ते असे गुरफटत गेले की आधीचा व्यवसाय त्यांना बंदच करावा लागला. साधारण सन 2000 मध्ये त्यांनी ‘स्टुडिओ’ सुरू केला. मराठवाड्यातील हा पहिला अद्ययावत स्टुडिओ. पुढे काळाप्रमाणे बदलत आपल्या व्यवसायात त्यांनी असंख्य बदल केले. नव्या तंत्रज्ञानाचा सहज स्वीकार केला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे असंख्य माणसे जोडली! 

माझ्या व्यवसायिक वाटचालीत त्यांच्याशी अनेकदा संपर्क येत असे. मी केलेल्या ‘आर्य चाणक्य विद्याधाम’ या विद्यालयाच्या ‘टीव्ही जाहिराती’च्या जिंगलचे रेकॉर्डिंग त्यांच्याच स्टुडिओत झाले. मी लिहिलेल्या शब्दांना मनोज टिकारिया यांनी सुरांमध्ये गुंफले आणि त्याच विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आवाजात ही जिंगल रेकॉर्ड झाली. 30 सेकंदांच्या जिंगलसाठी जवळजवळ अर्धा दिवस मेहनत झाली. शेवटच्या एका गद्य ‘पंचलाईन’साठी त्यांनी स्वतःचा आवाज दिला. इतर सर्व व्यवहार पूर्ण करून मी उदय यांना त्यांचे मानधन विचारले, तेव्हा त्यांच्या खास शैलीत मिश्किल हसत, हात हवेत फेकत ते उत्तरले, ‘‘सगळी आपलीच माणसं आहेत. शाळा आपलीच आहे. काम तुम्ही करताय. आपल्याच माणसांकडून काय घ्यायचे?’’ आणि खरेच, त्यांनी एकही पैसा घेतला नाही. मात्र त्यानंतर त्यांच्याकडे कामाचा प्रसंग पडला, तेव्हा आधी त्यांचे मानधन कबुल करून घेतले, ते नक्की स्वीकारणार याची खात्री करून घेतली आणि मगच काम सुरू केले...! अशा माणसाशी असेच वागायला पाहिजे, नाही का? 

माझ्या एका कार्यक्रमात ऐनवेळी काही समस्या उद्भवली आणि मी व्यक्तीशः इतर नियोजनात गुंतलो, तेव्हा पुण्याहून आलेल्या वाद्यवृंदाचा आणि राज्यातील विविध भागांतून आलेल्या गायकांचा समन्वय साधण्यासाठी उदय यांंनी या सर्वांना स्वतःच्या घरी नेले. सराव करून घेतला. सर्वाच्या नाश्तापाण्याची व्यवस्थाही केली आणि आपण काहीच विशेष केले नाही, अशा अविर्भावात सर्वांना कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊनही आले! 
आठवणी किती सांगायच्या? हा माणूस कधी दुर्मुखलेला दिसला नाही. इतरांना दूषणे देत स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या भानगडीत पडला नाही. एखादे आयोजन सोपवले की तिकडे पुन्हा पाहायची गरज नाही, असा विश्र्वास त्यांनी निर्माण केला होता. रुढ अर्थाने आम्ही ‘दोस्त’ नव्हतो. आम्ही कधी मिळून जेवायला गेल्याचे मला आठवत नाही की दोघांपैकी कोणीही दुसर्‍याला प्रचंड बिझनेस दिला, असेही झाले नाही. तरीही परस्परआदराचा स्नेहभाव आमच्या ठायी राहिला. 

मृत्यू हे अटळ सत्य आहे, हे उमगल्यानंतर मन सुख-दुःखाच्या पलिकडे जाते. मागील अनेक वर्षे अनेकांना अखेरचा निरोप दिला पण डोळ्यात पाणी तरळावे असा प्रसंग अलिकडच्या काळात फक्त मागच्याच वर्षी आला. ही आंतरिक ओढ होती का? मी अंधश्रद्ध नाही, पण एप्रिलमध्ये रामनवमीला मी आयोजलेल्या ‘गीत रामायण’ या कार्यक्रमाच्या आधीच्या रात्री उदय यांनी स्वप्नात येऊन या कार्यक्रमाच्या तयारीची आस्थेवाईकपणे चौकशी केली, हे आठवून मी आजही थरारतो. हे कोणते नाते म्हणायचे? या नात्याला मी नाव देऊ शकत नाही. 

सरतेशेवटी एक इच्छा मात्र मनात आहे. मृत्यूनंतरचे जग अस्तित्वात असेल तर उदय तेथे नक्की असतील. मी जेव्हा कधी तेथे पोहोचेन, तेव्हा त्यांची भेट नक्की व्हावी एवढीच इच्छा...! तिथेही ते एक ‘ठेवणीतला’ ज्योक सांगतील आणि मिश्किल हसत टाळीसाठी हात पुढे करतील...!

- दत्ता जोशी 9225 30 90 10


Friday, September 16, 2011

गणपतीबाप्पा, पुढच्या वर्षी थोडा उशीरा ये रे बाबा...

हे गणनायका, दुःखहारका, तू दरवर्षीप्रमाणे या वर्षी ठरल्या वेळी आलास आणि ठरल्याप्रमाणे दीड दिवस, सात दिवस, नऊ दिवस, अकरा दिवस असा वेळ घेत परत गेलासही. पण आता तू येताना आमच्या काळजाचा ठोका चुकू लागतो. तू विघ्नविनाशक, पण तुझ्या येण्याने जेवढी विघ्ने येतात ती पाहता आता हळूहळू तू जरासा उशीरानेच येण्याचे पाहा... कालांतराने येणे बंद केलेस तरी चालेल...
.............................................................................
 पाक्षिक `शेतकरी संघटक`च्या २२ सप्टेंबर २०११ च्या अंकात प्रकाशित झालेला लेख
.............................................................................. 


आदरणीय गणेशदेवा,
आपणास साष्टांग प्रणिपात. आपण ठरल्याप्रमाणे चतुर्थीला आलात आणि चतुर्दशीला मार्गस्थ झालात. तुमचं रुपलावण्य किती नेत्रसुखद. आम्हाला जेव्हापासून कळायला लागलं, त्या वयापासून आम्ही सारे तुमच्या प्रेमात पडलेलो आहोत. खरं सांगायचं, तर देवा हे तुमचं भाग्य! तुम्ही सर्वज्ञ ना? मग तुम्हीच सांगा किती जणांनी आपल्या बालपणी मातीचे - शाडूचे गणपती बनविले? किती मुलांनी आपल्या चित्रकलेच्या तयारीत कागदावर आपली छबी चितारण्याचा प्रयत्न केला. एवढे प्रमाण ब्रह्मा-विष्णुपासून पार अलिकडे संतोषीमातेपर्यंत कोणत्या देवतामध्ये आढळते?

आम्हाला आठवते, ‘गणपती येत आहेत’ याची चाहूल आम्हाला लागायची ती श्रावणातील शिडकाव्यानंतर घराशेजारच्या उंचवट्यावर आघाडा-दुर्वा उगवू लागल्यावर...! मग नदीकाठच्या ओल्या चिकणमातीचे छोटेछोटे गोळे आमच्या घरासमोरील अंगणात आणत असू. कधी मिळालाच तर शाडूही आणता येई आणि मग गणराया, तुला  साकारण्यासाछी आमची इवली बोटे झटू लागत. तुझं रुपडं साकारताना आमचं रुपडं मात्र पार काळवंडून जात असे. मग आमची झटापट सुरू होई रंग आणि ब्रशशी. अशा प्रकारे दोन-तीन दिवसांच्या मेहनतीनंतर तुझी मूर्ती साकारत असे. मूर्ती विकत आणावी लागणार नाही, या आनंदात घरातील मोठ्या माणसांचा आमच्या मूर्तीला पाठिंबा मिळे. विसर्जनापर्यंत दररोज सकाळ संध्याकाळची आरती मात्र अनेकदा आम्ही विसरत असू. मग घरात कोणाला तरी आठवण येई आणि आरती म्हटली जाई.

विसर्जनाच्या वेळी मूर्ती पाटावर ठेवून हा पाट डोक्यावर घेऊन तोल सांभाळत नदीपर्यंत जाऊन नदीत तुझे विसर्जन करताना आपल्या आयुष्यातील एक महान कलाकृती आपल्याकडून हिरावली जात असल्याचे दुःख मात्र अंतःकरणात सलत असे. या विसर्जनानंतर गावातील मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत आम्ही सहभागी होत असू. तुझ्यापुढे नाचताना वय, जात, धर्म विसरला जात असे. बैलगाडीच्या कठड्यांवर फळ्या आडव्या टाकून तयार केलेल्या प्लॅटफॉर्मवर तुझी विशालकाय मूर्ती ठेवलेली असे. नारळाच्या झावळ्या किंवा केळीचे खुंट यांच्या हिरव्यागार कमानींमध्ये तुझी गोजिरी मूर्ती शोभत असे. समोर गावातील ब्रॉसबँड वाजत असे. क्वचित एखाद्या मंडळाला कर्णे लावून गाणी वाजविण्याचा मोह आवरत नसे. पण सारे वातावरण चैतन्याने मुसमुसलेले... प्रसन्नतेचा अर्थ तेव्हा आकळत असे...

मधली काही वर्षे अशीच गेली. आमच्या वडिलांची जागा आम्ही घेतली आणि आमची जागा आमच्या मुलाने... पण त्याने कधी मातीत हात मळविलेले आम्ही पाहिले नाही. शिस्तशीरपणे बाजारातून तुझी मूर्ती मखरासह घरात येई. या वर्षी पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाडूची मूर्ती आणायचे मुलाने ठरविले तेव्हा मला आनंद वाटला. माझं वर्तुळ थोडे तुटकपणे का होईना जुळत होतं... पण शाडूची मध्यम आकाराची मूर्ती आणण्यासाठी त्याने तब्बल पाचशे रुपये खर्ची घातल्याचे कळले, तेव्हा, देवा खरं सांगतो, वाईट वाटलं...

असे वाईट वाटण्याचे दिवस आजकाल बरेच येत आहेत. बाप्पा, तुम्ही विघ्नहर्ता ना? मग हे असं का होतं? की आमच्या प्रार्थनेतील आर्तता कमी झालीय... की तुमचा प्रभाव कमी होतोय? लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य आंदोलनातील जनजागरणाचे साधन म्हणून आपल्याला विराट स्वरुपात सादर केले. आम्ही लोकमान्यांना पाहिले नाही आणि स्वातंत्र्यलढाही अनुभवला नाही. आम्ही एका वेगळ्याच लढ्यात अडकलो आहोत. हा लढा आमच्याच अस्तित्वाचा आहे. नाक्यानाक्यांवरील ‘लोकमान्य’ खंडणीला वर्गणी समजतात. रस्ते अडवणे, कर्णकर्कश्श संगीत वाजविणे हा त्यांचा हक्क आणि समाजाची अडवणूक हे कर्तव्य! आम्ही या चक्रव्यूहात अडकलो आहोत.

हा भाग तर खूपच छोटा. आता तू खराखुरा ‘व्हीआयपी’ झाला आहेस. तुझ्या रक्षणासाठी पोलिसांच्या फौजा तैनात असतात! तू खरा विघ्नहर्ता, पण आम्ही तुझी क्षमताही निष्प्रभ बनविली! परवाचीच गोष्ट... दिल्लीत साक्षात हायकोर्टासमोर स्फोट झाला. अजूनही त्याचे धागेदोरे शोधले जात आहेत. पंतप्रधानांनी हा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. गृहमंत्री नेहेमीप्रमाणेच या स्फोटात कोणकोणत्या स्फोटकांचा वापर झाला असावा, या विषयी अंदाज वर्तवित आहेत. या हल्ल्याची पूर्वसूचना गुप्तचर खात्याने दिली होती, असा दावाही त्यांनी केला. दरवेळी परदेशातील अतिरेक्यांनाच अशा हल्ल्यांना जबाबदार धरून चालणार नाही, या हल्ल्यामागे देशातच प्रशिक्षित झालेले दहशतवादी असू शकतात, असेही त्यांनी सुचविले आहे. त्यांचे ‘बिटवीन द लाईन्स’ कळण्याएवढे आता लोक जागृत झाले असावेत. जखमींना भेटायला गेलेल्या राहूल गांधींची हुर्‍यो उडवीत लोकांनी त्यांना रुग्णालयापासून परत पाठविले. प्रणव मुखर्जी, कपिल सिब्बल आणि --- यांनी या वेळी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ही बुद्धी त्यांना आपणच दिली बाप्पा?

या हल्ल्यापाठोपाठ देशात इतरत्र हल्ले चढवण्याचे ई मेल आले आणि संसदेवरील हल्ल्याचा गुन्हेगार अफजल गुरूला सोडण्याची मागणीही अतिरेकी गटांनी केली. आता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हायकोर्टासमोर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. गजानना, तू बुद्धीची देवता ना? मग राज्यकर्त्यांना तू बुद्धी का देत नाहीस? निर्बुद्धपणाचे सारे विक्रम तोडण्याच्या जिद्दीने यांचा राज्यकारभार सध्या चालू आहे. यांचा गृहमंत्री स्फोट घडून गेल्यानंतर त्यात कोणती स्फोटके वापरली असावीत, याचे विश्र्लेषण करतो. यांचा परराष्ट्रमंत्री युनोत जाऊन भलत्याच देशाच्या मंत्र्याचे भाषण वाचू लागतो आणि चूक लक्षात आल्यानंतर त्याचे निर्लज्ज समर्थनही करतो. यांचा भावी पंतप्रधान दहशतवाद आटोक्यात आणणे अशक्य असल्याचे जाहीर विधान करतो. अशा स्थितीत गणराया आम्हाला तुझ्याशिवाय कोण बरे आधार आहे?

बाप्पा तू युद्धकलेतही पारंगत. सार्‍या गुणांचा तुझ्यात समुच्चय. तू राज्यकर्त्यांना बुद्धी देऊ शकत नसशील तर किमान युद्धकला तरी शिकव. पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे, हे सत्य त्यांना उमगू दे. पाकिस्तानच नव्हे तर चीन हा भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे, याचे भान त्यांना येऊ दे. हे भान सरकारपेक्षाही कम्युनिस्ट पक्षाला लवकर येऊ दे. वाजपेयी सरकारच्या काळात तत्कालीन परराष्ट्रमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी चीन हा भारतासाठी सर्वात धोकादायक शेजारी असल्याचे विधान केले होते तेव्हा हेच पक्ष त्यांच्यावर चवताळून उठले होते. आता चीनने काश्मीरचे डोके गिळंकृत केले आहे. तिबेट बळकावला आहे. अरुणाचलात तो आत शिरला आहे. तो ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखतो आहे. सीमेवर शस्त्रास्त्रांची जमवाजमव करतो आहे. भारताच्या हद्दीत घुसतो आहे. तरीही येथील कम्युनिस्टांना तो भारताचा मित्रच वाटतो आहे. देवा, काय करशील?

गणराया, 11 सप्टेंबर 2001 नंतर अमेरिकेवर एकही हल्ला झाला नाही. त्यांनी आपली सुरक्षाव्यवस्था सीमेवरच आवळली. ‘पंछी भी पर नही मार सकता’ हे एकेकाळी मुलायमसिंह यादव यांनी कॉपीराईट करून ठेवलेले विधान आता अमेरिकेने पळविले आहे. व्हायरसेस शरीरात शिरण्याआधीच रोखले तर अँटीबायोटीक्सचे दुष्परिणाम होण्याची शक्यताच मावळते, हे सांगायला कोणाची गरज पडावी? इथे समुद्र किनार्‍यावर महिनाभरात दोन महाकाय जहाजे वाहत येतात आणि कोणत्याही यंत्रणेला त्याचा थांगपत्ता नसतो. उलट, ही जबाबदारी आपली नसल्याचे खुलासे या यंत्रणा करतात. या विषयावर संसदेत चर्चाही होत नाही. गुजरातेत लोकपाल नेमल्याच्या मुद्‌द्यावरून विरोधी पक्ष संसदेचे कामकाज रोखतात पण जहाजांशी कोणाचे देणेघेणे नसते. देशावरील अलिकडचा सर्वात मोठा हल्ला याच मार्गाने घुसखोरी करून झाला, हा इतिहास ताजा असताना सुद्धा हा निष्काळजीपणा हा देश करू शकतो. इतिहासातील चुकांपासून धडा घेत नाही त्या देशाला भविष्यकाळ नसतो, असे एक विधान आम्ही वाचले होते. या देशापुरते तरी हे विधान खोटे ठरो, अशी विनंती आम्ही आपल्याजवळ करतो.

पण देवा, हे सारे काय चालले आहे? नागरिक असुरक्षित आणि अतिरेकी मुक्त आहेत. रामदेवबाबांवर दिल्लीत प्रवेशाची बंदी लादली जाते आणि अतिरेकी बिनधास्त येऊन स्फोट घडवून जातात. अण्णा हजारे यांना गोळ्या घालण्याची खास सरकारी भाषेतील धमकी दिली जाते. ज्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत असे समाजकंटक सरकारच्या नजरेत येत नाहीत. असे का होते देवा? केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच आपल्या संपत्तीचा तपशील जाहिर केला. देवा, खूप आश्चर्य वाटले. दरमहा 50 हजार - एक लाखाचे वेतन आणि भत्ते घेणार्‍या नेत्यांच्या मालमत्ता कोट्यवधींच्या आहेत, तरीही अनेकांच्या नावावर घर नाही, वाहन नाही... काय हा लोकशाहीचा चमत्कार! तिकडे आंध्रात जगनमोहन रेड्डींची मालमत्ता वर्षभरात दुप्पट होते. ते गोडीत होते तोपर्यंत सारे काही आलबेल होते. ते विरोधात जाताच त्यांची संपत्ती आक्षेपार्ह ठरली. तिकडे कर्नाटकात दुसरे रेड्डी डबल रोलमध्ये कार्यरत होते. इकडे भाजपाला मदत आणि तिकडे राजशेखर रेड्डी आणि जगनमोहन रेड्डी यांच्या रुपाने कॉंग्रेसला मदत. ही रसद चालू होती तोवर सारे आलबेल पण रसद तोडताच ते खलनायक? हे काय चालले आहे गणपतीबाप्पा?

इकडे अण्णा भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकतात आणि तिकडे या तापलेल्या तव्यावर शेकण्यासाठी भाजपा आपल्या भाकरी थापून तयार राहते? निष्कलंक वैयक्तिच चारित्र्याच्या विषयावर अडवाणींबद्दल नक्कीच आदर वाटतो पण भ्रष्टाचाराने बरबटलेल्या त्यांच्या पक्षातील इतर काही नेत्यांचे काय? अण्णा हजारे यांनी ‘त्यांच्या राज्यांत आधी लोकपाल नेमून दाखवावेत’ या आव्हानाला या पक्षाने अद्यापपर्यंत कोणतेही उत्तर दिलेले नाही. पुढचे सरकार बनविण्याची मनस्वी इच्छा असलेल्या या पक्षाला अद्यापही ही सद्बुद्धी आपण का देत नाही देवा?
देवा, प्रत्येक युगाच्या अंति महाप्रलय येत असतो म्हणतात. सार्‍या व्यवस्था सडल्या, कुजल्या, निकामी झाल्या की देश एका मोठ्या अराजकाकडे वेगाने वाटचाल करू लागतो. आजची या देशाची अवस्था पाहून आम्ही सारे जण एका खूप मोठ्या अराजकाकडे निघालो आहोत, असे तुम्हाला वाटते का? हीच महाप्रलयाची सुरवात आहे का देवा?

खरे तर तुझ्या येण्याने एकेकाळी मोठा आनंद होत असे. मातीत हात घालण्याआधी तेव्हा घरची परवानगी लागत नसे. तुझी सुबक मूर्ती घडविण्याचा विचार फक्त विचारच राहायचा. प्रत्यक्षात बनलेल्या तुझ्या मूर्तीकडे तू स्वतः पाहिले असतेस, तर फक्त सोंड आहे म्हणून ती तुझीच मूर्ती आहे, एवढीच ओळखीची खूण पटली असती. तरीही तू प्रसन्न वाटायचास. आता सर्वोत्तम दर्जाच्या मूर्तीकारांनी तयार केलेली मूर्तीही मनाला प्रसन्न करत नाही. आता तुझ्या येण्याने मनावर दडपण येते. तू येणार म्हटले की आता तुझ्या आधी वर्गणीवाले गुंड येतात. मग कर्कश्श ‘डीजे’वाले गोंधळकर्ते येतात. त्या पाठोपाठ बंदोबस्ताच्या नावाखाली पोलिस येतात. मग आम्ही अतिरेकी येण्याची वाट पाहतो. ते आले नाहीत तर हुश्श म्हणतो आणि बिचार्‍या पोलिसांना सारे श्रेय देऊन मोकळे होतो.

पण आता ही सहनशक्ती कुठपर्यंत टिकवणार देवा? आणि तू ही आजकाल निष्क्रीय होतो आहेस. योग्यता नसलेले लोक राज्यकर्ते आहेत. रक्षण करणार्‍यांच्या हाती दंडुके आहेत आणि भक्षकांच्या हाती अद्ययावत शस्त्रे...! राज्यकर्ते बदलावेत, तर चांगला पर्याय कुठे आहे? असा स्थितीत आता तुझी सरबराई करणे आम्हाला जड जाते आहे बाप्पा... आपण सर्वज्ञ, आपणालाच हे कळायला हवे. आम्ही पुढच्या वर्षी लवकर येण्याच्या घोषणा तर दिल्या, पण तू जरा उशिरानेच आलास आणि लवकर गेलास तर आमची तेवढीच लवकर मुक्तता...! हळू हळू तुझे आगमन लांबवत जा आणि मुक्काम कमी करत जा. खात्रीने सांगतो, काही वर्षातच आम्ही तुला विसरून जाऊ... हे नको असेल तर मग नाही तर एकच कर, सर्वांना सद्सद्विवेकबुद्धी दे. देशाचे हित सर्वोच्च असल्याची जाणीव सर्वांच्या मनात पुन्हा एकदा जागृत कर... ही जबाबदारी आता तुझीच!

दत्ता जोशी
मो. 9225309010

Friday, September 2, 2011

सिंगापूरचे तिसरे अ. भा. 'अदखलपात्र' विश्व मराठी साहित्य संमेलन!


`दैनिक लोकमत` च्या `हेलो औरंगाबाद` मध्ये दर शुक्रवारी प्रकाशित होत असलेल्या 'संस्कृती, साहित्य वगैरे' या स्तंभात 2-9-2011 रोजी प्रकाशित झालेला हा लेख. 
...................................................................................
एका सिंगापूर डॉलरची किंमत साधारण 25 भारतीय रुपये आहे. अर्थात अमेरिकी डॉलरच्या साधारण निम्मी! अशा अर्थाने अमेरिकेच्या निम्म्या वारीचे पुण्य पदरी बांधून मराठी सारस्वतातील काही-शे फुकट फौजदार मागील आठवड्यात केव्हातरी आपापल्या घरी परतले. त्यांच्या घरच्या मंडळींना वगळता इतर कोणालाही त्याची गंधवार्ता नव्हती. स्वारीवर जाताना ‘कुंकुमतीलक’ आणि (झेंडे गाडून) येताना ‘हारतुरे - औक्षण’ ही खरी भारतीय संस्कृती. पण तमाम मराठी साहित्यरसिकांना याचा बहुदा विसर पडला आणि सिंगापुरी ‘झेंडे गाडून’ परतलेल्या साहित्यमार्तंडांना पुसण्यास (दोन्ही अर्थांनी) कोणीही गेले नाही. (आजकाल लोकांना साहित्याची काही तळमळच राहिली नाही, हे खरे!)

सध्या असेच चालू आहे. साहित्यिकांकडे कुणाचे फारसे लक्षच राहिले नाही हो ऽऽऽ! सिंगापुरी भरलेल्या साहित्यमेळ्यात जागतिक दर्जाच्या तब्बल साडेचारशे रसिकांची उपस्थिती होती म्हणे. या विराट उपस्थितीत भरलेल्या ‘विश्र्व’ मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. महेश एलकुंचवार यांनी समारोपप्रसंगी ‘काही रंजक आणि काही वैचारिक ऐवज घेऊन मी परत जातोय’ असे उद्गार काढल्याचे कळले. यावरून हे साहित्य संमेलन ‘काहीसे रंजक’ झाले असावे अशी दाट शक्यता माझ्या मनात येत आहे. एरव्ही रटाळ होणारे संमेलन रंजक होण्यामागे कोणत्या शक्तीचा हात आहे, हे तपासून पाहायला हवे. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा मा. कौतिकराव ठालेपाटील यांचा संपन्न वारसा समर्थपणे चालविणार्‍या विद्यमान अध्यक्षा मा. उषा तांबे यांनी ‘रसिकाश्रय आहे तोपर्यंत विश्र्व साहित्य संमेलन घेण्यात येईल’ असे जाहिर केले म्हणे. साहित्याच्या प्रांगणात हे विधानही सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे आहे. (पण ‘रसिकाश्रय’चा अर्थ काय असावा बरे?) तिसर्‍याच संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी मूळ आयोजकांनी झटकल्यानंतर ऐनवेळी सिंगापूरकरांच्या गळी पडून आयोजित करून घेतले गेलेले हे संमेलन तशा अर्थाने निव्वळ उपचारच ठरले की काय अशी शंका मनात येत असतानाच हे विधान कानावर आल्यामुळे पुढील संमेलनासाठी बहुदा अद्याप कोणी ‘स्पॉन्सरर’ मिळाला नसावा, अशी शक्यता मनात येते आहे. ‘अ.भा.’ साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी झटकण्यासाठी संभाव्य आयोजकांना साठ वर्षे लागली, ‘विश्र्व’ संमेलनाची झटकाझटकी तीनच वर्षात सुरू झाली हे चित्र मोठे प्रासादिक दिसते आहे. 

सर्व अर्थांनी विश्र्व साहित्य संमेलन अदखलपात्र ठरताना दिसते आहे. आयोजकांच्या खर्चाने (मलेशियाच्या साईट सिईंगचा खर्च चक्क ज्याचा त्याचा स्वतःचा! आठवते, की पहिल्या संमेलनाच्या वेळी सर्व आदरणीय साहित्यिकांचा लाखोंचा सर्व खर्च करूनही - ‘त्यांनी व्हिसाचे साडेपाच हजार घेतले हो’ - असा दरिद्री गळा अनेकांनी काढला होता!) साहित्य संमेलनाची ऐश पदरात पाडून घेऊन परतल्यानंतर एकाही साहित्यिकाला तेथे काय घडले हे सांगण्याची गरज वाटली नाही, यातच सारे आले. थोडक्यात, मराठी साहित्याच्या कर्मदारिदऱ्याला आता वैश्विक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, इतकेच! मात्र, पुढच्या वर्षी कोण, हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. बहुदा स्वतःच्या खर्चाने साहित्यिकांची इच्छा पूर्ण करण्याचा परदेशी मर्‍हाटमोळ्या मंडळींना कंटाळा आला असावा. ‘दुरून साहित्यिक साजरे’चे प्रत्यंतर त्यांना आल्यामुळेच ही टोलवाटोलवी सुरू झाली असावी, असे दिसते आहे. एक गोष्ट मात्र ठळकपणे जाणवते, की तेथून परतलेल्या एकाही साहित्यिकाने तक्रारीचा सूर लावलेला नाही, याचा अर्थ स्वच्छतागृहांची व्यवस्था सिंगापूरकरांनी चोख ठेवलेली असावी! 

संमेलन 13 आणि 14 ऑगस्टला झाले. त्यानंतर दोन तीन दिवसांच्या हवापालटीच्या सहलीनंतर सारस्वतांचे आगमन मुंबईच्या विमानतळावर झाले. (आगमनाचे फोटो मात्र कुठे दिसले नाहीत. पण ते विमानानेच आले असावेत असा माझा ठाम समज आहे. कारण तिकिटे सिंगापूरकरांनी काढलेली होती) आज 2 सप्टेंबर आहे. आजपर्यंत टीव्ही, रेडिओ, पेपर, वेबसाईट, चर्चासत्रे, कार्यक्रम, उपक्रम अशा कुठल्याही माध्यमातून हे संमेलन कसे झाले याची फारशी चर्चा झाली नाही. याचा अर्थ माध्यमांनी, रसिकांनी आणि अखेर साहित्यिकांनीही हे संमेलन ‘अदखलपात्र’ ठरविले की काय अशी शंका माझ्या मनात बर्‍याच दिवसांपासून येते आहे. (एरव्हीही संमेलनाच्या चर्चेपेक्षा त्या निमित्ताने इतरच चर्चा अधिक होतात, ही बाब अलहिदा. )

ता. क. ः आता अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची चर्चा सुरू झाली आहे. उंडणगावचा पत्ता काटण्यात संबंधितांना आधीच यश आले आहे. आता चंद्रपूर किंवा सासवड परिसरात संमेलन घेण्याचे ठरत आहे. स्थाननिश्चितीच्या आधी मराठवाडा साहित्य परिषदेतील वरिष्ठाची एकसदस्यीय समिती गठित करून संबंधित ठिकाणचा दौरा (संभाव्य आयोजकांच्या खर्चाने) आखण्यात यावा आणि तेथे पुरेशी स्वच्छतागृहे - पुरुषांसाठी आणि महिलांसाठी - आहेत की नाही, याची खातरजमा या समितीतर्फे करून त्या नंतरच साहित्य महामंडळाने यजमानपद देण्याचा निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती. 

- दत्ता जोशी
9225309010



Tuesday, August 30, 2011

अण्णांच्या आंदोलनाला आता सरकारी ‘प्रतिआंदोलना’चा धोका!

क्रांतीला धोका प्रतिक्रांतीचा असतो, तसाच आंदोलनाला प्रतिआंदोलनाचा धोका असतो. अण्णा हजारे यांचे आंदोलन सरकारी यंत्रणेच्याच विरोधात होते. त्यामुळे प्रतिआंदोलनाचा हा धोका अधिक मोठा असू शकतो. संसदेचे सार्वभौमत्व ही आपली वैयक्तिक जहागीर आहे या भावनेतून संसदेच्या चर्चेदरम्यान अण्णांच्या आंदोलनावर तुटून पडलेल्या दोन्ही सभागृहांतील बहुतेक सर्व खासदारांच्या भाषणांतून त्यांना आलेले भयाण नैराश्य पदोपदी जाणवत होते. यात विरोधी पक्षही सहभागी होते. सरकारला तर कधीही आव्हान सहन होत नसते. या स्थितीत अण्णांच्या जनआंदोलनाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने होईल. लालूप्रसाद यादव यांचे अण्णांच्या उपोषणावर शंका घेणारे वक्तव्य त्याचाच एक भाग म्हणावे लागेल. अण्णांच्या आंदोलनाच्या यशापयशाची चर्चा करताना राजकारण्यांच्या ‘नियती’वर लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे. याच संदर्भातील काही निरीक्षणे...
....................................................................................................................
 पाक्षिक `शेतकरी संघटक`च्या ६ सप्टेंबर २०११ च्या अंकात प्रकाशित झालेला लेख
.................................................................................................................... 
अण्णा हजारे यांचे उपोषण संपले आणि सरकारचा जीव भांड्यात पडला. देशाने या आधी स्वातंत्र्यासाठीची जनचळवळ अनुभवलेली होती. त्यानंतरची सर्वात परिणामकारक आणि सर्वसमावेशक जनचळवळ देशाने 16 ऑगस्टपासून 13 दिवस अनुभवली. ही चळवळ सर्वार्थाने विराट होती. अनेक कागदी विचारवंतांनी या आंदोलनावर आपापल्या परीने टीका केली. या टीकेमागची कारणेही त्यांच्या लेखनातून आणि वक्तव्यांमागून डोकावत होती. त्यांच्याही मुद्‌द्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करायचे ठरविले तरीही या आंदोलनाने देश हलविला आणि संसदेला ‘जनसंसदे’चे महत्व ठणकावून सांगितले, हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. देशभरात मिळून अनेक लाख लोक रस्त्यांवर उतरतात आणि कोठेही एकही दगड भिरकावला जात नाही, जाळपोळ होत नाही, ही घटनाही देशाच्या इतिहासात ठळकपणाने नोंदवावी लागेल. याचाच दुसरा अर्थ असाही घेता येईल, की रस्त्यावर उतरलेला समान्य माणूस दगडफेक - जाळपोळीसाठी कधीही तयार नसतो. तसे करण्यास त्याला बाध्य करण्यात येते. त्याला तसे करण्यास भाग पाडणारे नेतृत्व मात्र नेहेमीच नामानिराळे राहते! चिथावणीशिवाय तणाव निर्माण होत नाही, हे सत्य यामुळे अधोरेखित झाले.
***

या आंदोलनाचा ‘टेम्पो’ सुरवातीपासूनच चांगला ठेवण्यात आयोजकांना यश आले. 15 ऑगस्टपासून माध्यमांवर अण्णांचीच छाया होती. लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी केलेले भाषण राष्ट्राला उद्देशून होते की अण्णांना हेही कळू नये, इतकी सरमिसळ त्यात केलेली होती. त्यातून देशभरात अण्णांच्या आंदोलनाचा ‘मेसेज’ जात असतानाच अण्णांनी अचानक राजघाटावर मोर्चा वळविला आणि अल्पावधीतच तिथे हजारोंचा जमाव जमला. जो ‘जे पी पार्क’ सरकारतर्फे उपोषणासाठी सुचविला जात होता तो ही राजघाटासारखाच दिल्लीच्या एका कोपर्‍यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ला, राजघाट या सर्व परिसरात कडेकोट बंदोबस्त असतो. वाहतुकीची साधने अडविण्यात आलेली असतात. अशा स्थितीत राजघाटासारख्या आडनिड्या ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना न देता अल्पावधीत जमलेला जमाव पाहून बहुदा सरकार चकित झाले असावे. जेपी पार्कातही अशीच गर्दी जमू शकेल असा कयास बांधून आणि त्यामुळे अण्णांचे महात्म्य वाढेल या भावनेतूनच उपोषणाआधीच अण्णांना अटक करण्याची आतताई कृती सरकारने केली आणि ती त्यांना पूर्णतः भोवली. ‘तिहार’मध्ये अडकलेले अनेक ‘मान्यवर’ तेथून बाहेर पडण्याचे असंख्य मार्ग अवलंबत असताना अण्णा मात्र सुटकेच्या आदेशानंतरही तिहार सोडण्यास तयार नव्हते. ‘तिहार’मध्ये डांबणे आणि ‘तिहार’मधून सुटका या दोन्ही गोष्टींमुळे समाजापर्यंत सर्व संदेश अगदी स्पष्टपणे गेले आणि त्याचा परिणाम अण्णांना पाठिंबा वाढण्यातच झाला.
***
भ्रष्टाचाराच्या मुद्‌द्यावर देश किती संतप्त आहे, हे या निमित्ताने सर्वांना कळले. या पार्श्वभूमीवर संसदेत झालेली चर्चा मला बाष्फळ आणि दिखावू वाटली. ‘संसदच सर्वोच्च’ हा धोशा केंद्र सरकारने आधीपासूनच लावला होता. सर्वपक्षीय बैठकीतही हाच मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात बहुदा सरकारला ‘यश’ आले. तंत्रांच्या जंजाळात जे विधेयक मागील 40 वर्षे अडकवून ठेवलेले आहे त्याची पुन्हा एकदा वासलात लावण्यासाठी सारी संसद एकजूट आहे, असेच हे चित्र होते. लोकसभेने एकदा पारित केलेले लोकपाल विधेयक त्या वेळी राज्यसभेने नाकारले होते. अण्णांच्या मागील आंदोलनानंतर नेमली गेलेली समिती आणि या समितीने कपिल सिब्बल यांच्या ‘मार्गदर्शना’खाली केलेला पोरखेळ सार्‍या देशाने पाहिलेला होता. हे ‘सरकारी’ लोकपाल दात आणि नखेच काय पण डोळेही काढलेल्या सिंहासारखे होते. सरकारी लोकपाल असा होता तर अण्णांचा लोकपाल रक्ताला चटावलेल्या नरभक्षकासारखा वाटत होता. यातून सुवर्णमध्य काढण्यासाठी जे करणे आवश्यक होते त्यात सरकार आणि अण्णा यांच्या बाजूने प्रत्येकी दोन जण अडथळे आणत होते. हे अडथळे दूर झाले आणि ‘किमान समान कार्यक्रमा’चे मुद्दे समोर आले. या पार्श्वभूमीवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत झालेली चर्चा मला बेगडी वाटली. प्रणब मुकर्जी यांचे दोन्ही सभागृहांतील बीजभाषण असो, की जेटली - स्वराज यांची विरोधी पक्षनेतेपदांची भूमिका असो त्याच प्रमाणे विविध सदस्यांच्या भूमिका असो या प्रत्येक ठिकाणी अण्णांना आणि त्यांच्या आंदोलनाला नमन हा उपचार होता. संसदेचे सार्वभौमत्व पटवून देण्यासाठी त्यांनी दिलेली उदाहरणे अत्यंत कृत्रिम वाटली. दोन्ही सभागृहांतील मिळून किती सदस्य आपण स्वच्छ असल्याचा दावा प्रामाणिकपणे करतील? ही संख्या कदाचित एकाच हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी असू शकेल. ‘उघड झाले ते चोर आणि बाकी सारे साव’ असेच हे चित्र होते.
***
अण्णांच्या समर्थनार्थ चालू असलेल्या आंदोलनांकडे अनेक नेते कशा प्रकारे पाहत होते? शरद यादव यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेही अण्णांच्या पाठीराख्यांची संभावना करताना - रस्त्यात काहीही घडले तरी गर्दी जमा होते... प्रत्येक गावात अशी पाचपन्नास माणसे असतात जी कोणत्याही आंदोलनाची पर्मनंट ऍक्टिव्हिस्ट असतात - अशी विधाने केली. लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या नेत्यांकडून तर परिपक्वतेची अपेक्षाच करणे अवघड असते. अण्णांच्या उपोषणाच्या सामर्थ्यावर टीका करताना या उपोषणावर संशोधन केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. अण्णा हजारे यांनी त्यावर शेलके भाष्य करताना ‘ही ब्रह्मचर्याची ताकद आहे. 12 मुलांना जन्म देणार्‍यांना ती कशी कळणार’ अशी खिल्ली उडविली. यावर लालू काही बोलल्याचे ऐकिवात नाही!
***
सरकारपक्ष प्रत्येक पायरीवर निष्फळ आणि पराभूत ठरला. कारण त्यांनी घेतलेली भूमिकाच कुचकामी होती. कपिल सिब्बल, पी. चिदंबरम आणि अंबिका सोनी या तीन ‘अतइहंकारी’ नेत्यांनी सुरवातीपासूनच अण्णांबद्दल घेतलेली भूमिका मध्यममार्गी विचार करणार्‍यांना खटकणारी होती. मनीष तिवारी यांनी तर अण्णांना ‘अपादमस्तक भ्रष्टाचारात बुडालेला’ असे संबोधून आगीचा लोळ स्वतःवर आणि सरकारवर ओढवून घेतला. या सार्‍या घटनाक्रमात दिग्विजयसिंह मात्र का कोण जाणे गप्प होते. ते ही बोलले असते, तर कदाचित सरकारला आणखीनच नामुष्कीला सामोरे जावे लागले असते. आपण खूप श्रेष्ठ दर्जाचे वकील आहोत आणि आपण कोणताही मुद्दा कशाही प्रकारे वाकवू शकतो हा गंड कपिल सिब्बल यांच्या डोक्यातून जात नाही. ‘लोकपाल’बद्दल त्यांनी उधळलेली मुक्ताफळे ‘यू ट्यूब’वर उपलब्ध आहेत. ‘लोकपाल’ला टोकाचा विरोध करणारी व्यक्ती या विधेयकाच्या रचना समितीवर नेमून सरकारने आपल्या संवेदनहीनतेचा परिचय आधीच दिला होता. अण्णांच्या अटकेनंतर चिदंबरम आणि अंबिका सोनी यांनी ज्या भाषेत देशाशी संवाद साधला, ती भाषा नक्कीच सौजन्याची नव्हती. चिदंबरम यांच्या आडमुठ्या वृत्तीचा सर्वाधिक अनुभव कम्युनिस्ट नेत्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे चिदंबरम यांच्यावर कम्युनिस्ट पक्षांचे खासदार नेहेमीच हल्ले चढविताना दिसतात. या आंदोलनातही चिदंबरम यांनी जाहिरपणे घेतलेली भूमिका सामोपचारासाठी योग्य नव्हती. त्यामुळेच अखेरच्या टप्प्यात देशाचे गृहमंत्री देशांतर्गत पेचप्रसंगावर मात करण्याच्या कामातून बाजूला सारले गेलेले आपण पाहिले. त्या ऐवजी त्यांचा मूळ विषय असलेल्या अर्थखात्याचे मंत्री ही पेच हाताळताना देशाला दिसले. या सरकारात हे काय चालले आहे? ज्यांचे जे काम, त्यांना ते करता येत नाही! 
***
आंदोलने चिरडण्याचा सरकारचा अनुभव मोठा असतो. कारण नेत्यांच्या भावनेला नोकरशाहीच्या अनुभवाची जोड मिळत असते. रामदेवबाबांचे आंदोलन ज्या सहजतेने चिरडण्यात सरकारला यश आले तेवढ्याच सहजपणे अण्णांचे आंदोलन चिरडता येईल अशा तयारीत सरकार होते. आंदोलनाला परवानगी देण्याचे आणि त्यासाठी अटी घालण्याचे नाटक सरकारने दिल्ली पोलिसांना पुढे करून खेळले. पण अण्णांना अटक केल्यानंतर उसळू शकणार्‍या लोकक्षोभाची कल्पना करण्यात सरकारची चूक झाली आणि काही तासांतच परिस्थिती सरकारच्या आवाक्याबाहेर आणि अण्णांच्या पूर्णतः ताब्यात गेली. ज्या कायद्याचा आधार घेत सरकार अण्णांना वाकवू पाहत होते, तीच शस्त्रे अण्णांनी सरकारवर उलटविली. काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते पूर्वांचल असा सारा देश मेणबत्त्या पेटवून रस्त्यांवर उतरला. ‘मेणबत्ती संप्रदाया’चे हे सामर्थ्य सरकारने लक्षात घेतले नव्हतेच पण माध्यमांतीलही अनेकांच्या ते लक्षात आले नव्हते. या वेळी पहिल्यांदाच देशभरात पुकारलेल्या एकाद्या आंदोलनात पूर्वांचलातील राज्यांनी साथ दिल्याचे चित्र देशासमोर आले. आसाम- अरुणाचल प्रदेशातही अण्णांच्या समर्थनार्थ आंदोलने झाली. कोणत्याही आंदोलकांना हेवा वाटावा अशी ही स्थिती होती. रामलीला मैदानावर उसळलेली गर्दी, त्याच वेळी इंडियागेटवर झालेली निदर्शने, जवळजवळ सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये आणि गावोगाव रस्त्यावर उतरलेले लोक हे चित्र अभूतपूर्व होते. भ्रष्टाचाराचा मुद्दा सामान्य माणसासाठई सहानुभूतीचा होता. जन्मदाखल्यापासून मृत्यूचे प्रमाणपत्र मिळविण्यापर्यंत प्रत्येक पावलावर द्याव्या लागणार्‍या चिरीमिरीमुळे देशातील प्रत्येक जण त्रस्त आहे. या प्रत्येकाने अण्णा हजारे यांच्यात गांधी पाहिला. हा देश गांधींवर आजही एवढा विश्वास टाकतो, त्यांना मानतो हे चित्र खरोखरच विचारमग्न करणारे आहे.
***
अण्णांच्या आंदोलनाला हिणविण्याचा प्रयत्न अनेक पातळ्यांवरून झाला. एक कायदा केल्याने भ्रष्टाचार संपेल का? असा प्रश्न कॉंग्रेसचे युवराज राहूल गांधी यांनी संसदेत शून्य प्रहरात विचारत एक लंबेचौडे प्रवचनच झोडले. खरे तर शून्य प्रहराचा असा वापर करणे हाच मोठा भ्रष्ट-आचार आहे. पुढे दुसर्‍याच दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत हा विषय चर्चिला जाताना मात्र हे युवराज गायब होते! त्यांची ही ‘चमकोगिरी’ नाक्यावरील एखाद्या टपोरीसारखीच वाटली. ज्या माणसाकडे देश भावी पंतप्रधान म्हणून पाहतो आहे (आणि कॉंग्रेसजन ज्यांच्याकडे हा अधिकार देण्यासाठी अत्यंत आतुर आहेत) अशा व्यक्तीकडून किमान परिपक्वतेची अपेक्षा होती. कायद्याने प्रश्न सुटत नसतातच. त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीच असावी लागते. त्यांच्या पक्षाने या विषयात सातत्याने अनिच्छाच दाखविली आणि जेव्हा अपरिहार्यता दिसली तेव्हा अत्यंत नाईलाजाने त्यांनी या विषयाला मान्यता दिली. हे करतानाही त्यांनी सतत संभ्रमाचे वातावरण कायम ठेवले. मतदान होणार की नाही इथपासून सुरू असलेली ही अनिश्चितता आता हा कायदा तरी होणार की नाही, इथपर्यंत पोहोचली आहे. जनमताचा रेटा कायम राहिला नाही, तर हा कायदा सहजपणे बासनात बांधून ठेवणे सरकारला शक्य आहे. पण इथे फक्त सरकारच्याच इच्छाशक्तीचा प्रश्न नाही. विरोधी पक्षांचीही या विषयी प्रत्यक्षात काय भूमिका  आहे, हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. भाजपानेही या विधेयकाला पाठिंबा देताना आधी सशर्त आणि मग बिनशर्त पाठिंबा दिला. हे कसेकाय झाले? उद्या सत्तेत येऊ इच्छिणार्‍या कोणत्याही पक्षाला लोकपालाचा डोस सहजासहजी पचनी पडणारा नाही, हेच खरे.
***
या सार्‍या घटनाक्रमाकडे पाहताना मला चिंता वाटते ती ‘गावगन्ना आण्णां’ची. गावोगाव ‘मैं हूँ अण्णा’च्या टोप्या घालून अनेक जण फिरले. यात तरुणांचे प्रमाण सर्वाधिक होते ही बाब आनंदाची. पण अनेक ठिकाणी अण्णांच्या या आंदोलनात सहभागी होऊन निवेदने देण्यासाठी जाणार्‍यांची नावे आणि चेहरे पाहिले तेव्हा या आंदोलनाबद्दल मनात चिंता निर्माण झाली. मला रस्त्यात दारू पिवून मोटारसायकली चालवीत झेंडे फडकविणार्‍यांची, तिरंगा घेऊन ‘ट्रिपल सीट’ जात घोषणा देणार्‍यांची, पोलिसांना धमकावणार्‍यांची चिंता वाटत नाही. हा प्रकार ते नेहेमीच करू शकत नाहीत. आंदोलनाची झिंग उतरली की हे सारे जमिनीवर येतील. पण ‘गावगन्ना अण्णां’चे काय? अण्णांचे पाठीराखे म्हणत रत्स्यावर उतरलेल्या नागरिकांचे नेतृत्व करण्यासाठी समोर आलेले अनेक ‘मान्यवर’ कुख्यात म्हणावेत असे होते. अनेक कामगार नेते, राजकीय नेते, कथित विचारवंत यांचा समावेश या लोकांमध्ये होता. ही मंडळी अण्णांची वारसदार ठरतील? गावोगाव भ्रष्टाचार निर्मुलन समित्या स्थापन करून खंडणी वसूलीची नवनवी दुकाने थाटणार्‍या गावगुंडांच्या टोळ्यांसारखेच हे चित्र मला दिसले. अण्णांनी, आंदोलकांनी आणि सामान्यजनांनी त्यांच्यापासून सावध राहायला हवे.
तोंडाला रंग फासून रुपेरी पडद्यावर नाचणार्‍या वर्गातील अनेक जण अण्णांच्या मंचावर येऊन हजेरी लावून गेले. त्यांची खरोखरच ही लायकी होती का? अण्णांच्या आंदोलनातील खासदारांना घेरावो घालण्याच्या प्रयोगाची संकल्पना आपलीच असल्याचे आमीर खान या अभिनेत्याने सांगितले. आमीरला अशा आंदोलनात स्टेजवर येण्याचा नैतिक अधिकार आहे? ज्याने आपल्या धर्मातील तरतुदीचा आधार घेत एक बायको आणि दोन मुले असतानाही दुसरे लग्न केले त्याला त्याच्या धर्माने आणि भारतीय कायद्यानेही अभय दिले असले, तरी त्याच्या पहिल्या पत्नीवर झालेला अन्याय कसा दुर्लक्षिता येईल? यावर माध्यमेही गप्प आहेत आणि महिला संघटनासुद्धा. बरे, हे महोदय आपल्या चित्रपटांचे मानधन आणि इतर सर्व व्यवहार धनादेशाद्वारे करतात का? ते ही नाही. आमीर खान हे एक उदाहरण झाले, पण बॉलीवुडमधील एक तरी कलाकार या स्तरावर पोहोचण्याच्या योग्यतेचा आहे का? गोळा झालेल्या गर्दीला खिळवून ठेवण्यासाठी अण्णांच्या आंदोलनावर अजून तरी अशा लोकांना गोळा करण्याची वेळ आलेली आहे, असे मला वाटत नाही.
***
बाबा रामदेव यांचे आंदोलन अण्णांच्या आंदोलनासाठी खूपच मार्गदर्शक ठरले, असे वाटते. एखादे आंदोलन चिरडण्यासाठी सरकार काय काय करू शकते, याचा वस्तुपाठ या आंदोलनाने घालून दिला होता. त्यामुळे सरकारपासून सावध राहण्याची पूर्ण तयारी अण्णांच्या बाजूने करण्यात आली. ‘तिहार’मधून बाहेर पडण्याआधी त्यांनी धरलेला लेखी परवानगीचा हेका त्याचेच प्रतीक होता. सरकारमधील कोणाशी चर्चा करायची आणि कोणाशी नाही, कोण किती विश्र्वासार्ह आहे, हे ही अण्णापक्षाच्या लक्षात आले होते त्यामुळे एकट्याची एकट्याशी चर्चा त्यांनी कटाक्षाने टाळली. बाबा रामदेव यांची प्रकृती चौथ्या दिवशीच ढासळली होती. त्या तुलनेत अण्णांना उपोषणाचा प्रदीर्घ अनुभव नक्कीच आहे. त्या बळावर त्यांनी देशाला वेळोवेळी स्पष्ट संदेश देत आंदोलन पुढे चालविले. या सर्व घटनाक्रमात त्यांनी सातत्याने अहिंसात्मक मार्गाचाच आग्रह धरल्याने सरकारला कुठेही बळजोरी करता आली नाही. वृत्तवाहिन्यांचा ‘फोकस’ सातत्याने रामलीला मैदानावरच असल्याने देशासमोरही दुसरा विषय राहिला नाही. याचा पुरेसा दबाव सरकारवर कायम राहिला आणि एक आंदोलन सकारात्मक वळणावर थबकले.
***
चर्चेच्या फेर्‍या शेवटच्या टप्प्यावर असताना मुद्दा फिसकटतो की काय, अशी एक शक्यता निर्माण झाली होती. या स्थितीत 30 ऑगस्टला 1 कोटी लोकांचा संसदेला घेराओ आयोजणार असल्याचा अण्णांचा इशारा सरकारसाठी बहुधा पुरेसा ठरला. भलेही अण्णांभोवतीच्या गर्दीला कोणी कितीही नावे ठेवत असोत, देशभरात असंख्य ठिकाणी उत्स्फुर्त निदर्शने, आंदोलने करणारे लोक, त्यातही तरुणांचा प्रचंड मोठा सहभाग नक्कीच प्रभावशाली ठरला. कोणाही पक्षाला जे संख्याबळ सिद्ध करणे अशक्य आहे, ते अण्णांच्या एका शब्दावर स्वखर्चाने एकत्र आले, हा प्रभाव नक्कीच महत्वाचा ठरला. त्यापुढे संसदेला झुकावे लागले. उपोषण मागे घेतल्यानंतर केवळ एका हाकेसरशी संध्याकाळी 6 वाजता इंडिया गेटवर काही लाख लोकांचा जो जमाव एकत्र आला, त्याचे वर्णनही करणे अशक्य आहे. कोणीही नेता नसताना, कसलीही भाषणे होणार नसताना हे लाखो लोक एकत्र आले, त्यातून या विषयाबद्दलची त्यांची भावना संबंधितांनी लक्षात घ्यावी, एवढेच.
***
आंदोलनाच्या या मर्यादित यशानंतर अण्णा आणि त्यांच्या आंदोलनाला निष्प्रभ ठरविण्याचा प्रयत्न सरकार आणि विरोधक या दोघांकडूनही होणार हे निश्चित आहे. कारण, अण्णा आणू इच्छिताहेत त्या लोकपालामुळे सर्वच राजकीय पक्षांची दुकानदारी बंद होणार आहे. कॉंग्रेसच काय पण भाजपसह कोणत्याही पक्षाला ‘पक्ष’ म्हणून हे परवडणारे नाही. शिवाय राजकीय नेत्यांच्या ‘स्वतःभोवतीच गर्दी असावी’ या धारणेला या आंदोलनाने छेद दिला आणि एका सामान्य माणसाभोवती गर्दी जमली. हे ही त्यांना पचणारे नाही. त्यामुळे अण्णांच्या एवढ्या प्रदीर्घ उपोषणामागील रहस्य, त्यांच्याभोवतीच्या केजरीवाल-बेदींच्याबद्दल वदंता पसरविणे, या कायद्याने भ्रष्टाचार कसा रोखला जाणार नाही याचीच चर्चा करत राहणे, या आंदोलनाशी जोडल्या गेलेल्यांवर दुसर्‍याच कुठल्यातरी कारणांवरून कारवायांचा सपाटा लावणे हे आणि असे अनेक प्रकार पुढच्या काळात सरकारकडून होऊ शकतात. सध्या दाखल झालेल्या प्रस्तावावर महिनाभरात निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलनाचा इशारा अण्णांनी दिला आहेच, पण उपोषणाच्या जाचातून सुटलेले सरकार आता या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न नक्की करेल, असे वाटते. अशा स्थितीत सर्वांनी मनोधैर्य राखणे महत्वाचे आहे.
***
सरकारचे एकमेव यश...!
या संपूर्ण आंदोलनात प्रत्येक पावलावर सरकारला माघार घ्यावी लागली. पण एका बाबतीत मात्र सरकार अत्यंत ‘ठाम’ आणि ‘कठोर’ राहिले. काहीही झाले तरी सरकारने अण्णांना ‘जंतर मंतर’वर उपोषण करू दिले नाही म्हणजे नाहीच! पण याला सरकारचे यश म्हणायचे का?

दत्ता जोशी
मो. 9225309010