Tuesday, July 1, 2014

सव्यसाचि प्राचार्य - रामदास डांगे

प्राचार्य रामदास डांगे हे परभणीच्या शैक्षणिक आणि आध्यात्मिक इतिहासातील अपरिहार्य नाव. शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळणे असो की साहित्य संस्कृती मंडळाचे मराठी शब्दकोश प्रकल्पाचे प्रमुखपद असो... प्रत्येक जबाबदारी त्यांनी निष्ठेने सांभाळली. श्री ज्ञानेश्वरी मूलपाठ दीपिकेचे त्यांनी केलेले काम सुद्धा अलौकिक म्हणावे लागेल. प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडणार्‍या प्राचार्य डांगे यांच्या सव्यसाचित्त्वाबद्दलच्या या आठवणी... आज १ जुलै रोजी पहाटे ते कालवश झाले...
 -------------------------------------------------------
तेया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्म कुसुमांची वीरा ।
पूजा केली होये अपारा । तोषालागि॥
‘‘तुम्ही करत असलेले काम हे ईश्वराचे काम आहे, भगवंताचे काम आहे... त्याची पूजा करायची तर ती स्वकर्माने करा... भगवंताला इतर कोणत्याही अवडंबराची गरज नाही...’’, ज्ञानेश्वरीचा दाखला देत डांगे सर सांगत असत.
समोर येईल ते प्रामाणिकपणे, सातत्याने, निष्ठापूर्वक करत जावे...’ , असे सांगताना ते आपले स्वतःचे आयुष्यच त्याच्या उदाहरणादाखल सादर करत..! प्राचार्य रामदास खुशालराव डांगे हे नाव म्हणजे परभणीच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक इतिहासातील एक अविभाज्य घटक. एक व्यक्ती किती प्रकारे, किती क्षेत्रांत आपले योगदान देऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे डांगे सर.
डांगे सर सन २००७ पासून पुणे मुक्कामी असत. मराठी शब्दकोश निर्मितीचे अनेक वर्षांपासून रेंगाळलेले काम त्यांनी सन 2007 ते २०१४ या काळात पूर्ण केले.  निवृत्तीनंतर केवळ उपजीविकेपुरते मानधन घेऊन पूर्ण समर्पित भावनेने या कामासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. सन 1970 मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले काम रेंगाळले. मागची 20 वर्षे हे काम सांभाळण्यासाठी कोणीही तयार नव्हते. मधु मंगेश कर्णिक यांनी पाठपुरावा केला आणि सन 2007 मध्ये डांगे सरांनी हे काम हाती घेतले. मराठी सारस्वताच्या प्रांगणातील एक महत्त्वाचे योगदान या निमित्ताने डांगे सरांनी दिले. त्यांच्या आजवरच्या वाटचालीत अशा अनेक नोंदी आहेत. त्यामुळेच त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात अपार आदरभाव आहे.
डांगे सर ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. ऋषीचं कूळ विचारू नये, असे म्हणतात. पण सरांसारख्या ऋषीचं कूळ-मूळ ठाऊक असण्याने त्यांच्या तपश्‍चर्येचे महत्त्व अधोरेखित होते. सरांचे सारे आयुष्य परभणीत गेलेले असले, तरी ते मूळचे परभणीचे नाहीत. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील भालसी हे त्यांचे जन्मगाव. 12 जून 1936 हा त्यांचा कागदोपत्री जन्मदिनांक. खुशालराव आणि बिंदूबाई यांच्या परिवारातील 10 अपत्यांपैकी सर सर्वात धाकटे. त्यांचे वडील वारकरी. त्यामुळे घरात आध्यात्मिक परंपरा जुनीच. घरची परिस्थिती शिक्षणासाठी अतिशय प्रतिकूल. अशा परिस्थितीत त्यांच्यातील हुशारी जोखून मॅट्रिकपर्यंत नेणारे अमरावतीचे लेले मास्तर त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती ठरले. लेले मास्तरांनी सरांना शिकविले, अन्न-वस्त्राची सोय केली आणि फी सुद्धा भरली...! डांगे सर सांगतात, ‘लेले मास्तरांमुळे माझ्या आयुष्याचे सोने झाले.
सर्व प्रतिकूलतेतून मार्ग काढत ते इंटरपर्यंत पोहोचले. तेव्हा त्यांचा अभ्यासविषय गणित होता. त्यानंतर त्यांनी विषय बदलला. अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातून ते 1958 मध्ये बी.ए. आणि 1960 मध्ये एम.ए. झाले. मराठी घेऊन पूर्ण केलेल्या या दोन्ही अभ्यासक्रमांत त्यांनी विद्यापीठात प्रथम येत सुवर्णपदके पटकावली. त्या वेळच्या रुढींप्रमाणे बी.ए. करतानाच 1957 मध्ये ते विजयाबाईंशी विवाहबद्ध झाले. त्यांचे लग्न जलीलभाई नावाच्या एका मुस्लिम गृहस्थाने जुळविले. विजयाबाई मूळच्या अकोल्याजवळील टाकळीच्या.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उपजीविकेसाठी नोकरीची गरज होती. अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात त्यांना शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी प्राध्यापकाची नोकरी दिली. 1960 ते 1961 या शैक्षणिक वर्षांदरम्यान ते या महाविद्यालयात कार्यरत होते. जून 1961 मध्ये त्यांच्यासमोर वेगळा पर्याय आला. शिशुपालवधया विषयावरील पहिले जुने हस्तलिखित मिळवून त्यावर डॉ. मा. गो. देशमुख अमरावतीत काम करीत होते. त्यांची बदली औरंगाबादला झाली. त्यांच्या भेटीसाठी डांगे सर औरंगाबादेत आले. ज्येष्ठ साहित्यिक ग.त्र्यं. माडखोलकर यांचे चिरंजीव तेव्हा औरंगाबादेत नोकरीत असल्याने ते सुद्धा तेथे आलेले होते. तेव्हा देवगिरी महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्षपद विनायकराव पाटील यांच्याकडे होते. ते माडखोलकरांचे स्नेही. त्यातून डांगे सरांसमोर औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू होण्याचा प्रस्ताव आला. तो त्यांनी स्वीकारला आणि 15 जून 61 रोजी ते देवगिरीत रुजू झाले. दोन वर्षे देवगिरी महाविद्यालयात काम केल्यानंतर 15 जून 1963 रोजी त्यांना प्रोफेसरपदी बढतीही मिळाली. पण 15 दिवसांतच त्यांच्यासमोर परभणीत शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून रुजू होण्याची ऑफर ठेवण्यात आली. त्या काळातही औरंगाबाद सोडून परभणीत येण्याचा विचार धाडसीच होता. पण ते धाडस डांगे सरांनी केले आणि ते 1 जुलै 1963 रोजी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून परभणीत दाखल झाले. तेथे ते 12 वर्षे प्राचार्य होते. जनाबाई महाविद्यालयाचे 11 वर्षे आणि महिला महाविद्यालयाचे 10 वर्षे अशी तब्बल 33 वर्षे त्यांनी प्राचार्यपदांची जबाबदारी सांभाळली...! या काळात अनेक पिढ्या त्यांच्या हाताखाली घडल्या.
प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळताना सुद्धा त्यांच्यातील सामाजिक भान असणारा माणूस गप्प बसलेला नव्हता. प्राचार्यपदावर असतानाच सामाजिक कारणांसाठी ते तीन वेळा तुरुंगात गेले. पहिला प्रसंग 1972 मध्ये परभणीत कृषिविद्यापीठ स्थापन होण्याच्या मागणीचा. त्या साठी तेव्हा पुकारलेल्या आंदोलनात त्यांना अटक करण्यात आलेली होती. त्यानंतर, 1975 च्या दरम्यान आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांनी पुकारलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. बराच काळ ते भूमिगत होते. 1992 मध्ये देशभर पेटलेल्या राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात सुद्धा ते सहभागी झाले होते. त्या काळातही त्यांना काही काळ तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यांची वैयक्तिक मते त्यांनी प्रत्येक वेळी स्पष्टपणे मांडली असली, तरी परभणीतील अनेक मोठ्या मोठ्या लोकांच्या व्याख्यानांच्या - कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान भूषविण्याची विनंती विविध विचारधारांच्या संयोजकांनी डांगे सरांनाच केलेली होती. वैयक्तिक मते आणि सामाजिक आचरण यांचा समतोल त्यांनी नेहेमीच साधला. 
जून 1996 मध्ये सर निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर बहुतेक जण सुखाचे आयुष्य जगण्यासाठी घर बांधतात, एखाद्या ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य होतात आणि शिळोप्याच्या गप्पा मारण्यात वेळ घालवतात, हे सार्वत्रिक चित्र. पण डांगे सरांच्या बाबतीत नेमके उलट घडले. नोकरीच्या काळात वेळेअभावी, त्या त्या कामांना पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे जी कामे शक्य झाली नाहीत, ती त्यांनी सेवानिवृत्तीच्या नंतर हाती घेतली...! त्यातील पहिले काम होते ज्ञानेश्वरीच्या मूळपाठांचे संशोधन.
संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ती त्यांच्या सच्चिदानंदबाबा या शिष्याने लिहून काढली. त्यानंतरच्या शेकडो वर्षांच्या प्रवासात या ज्ञानेश्वरीच्या असंख्य प्रती लिहिल्या गेल्या. त्यातून लिहिणार्‍याच्या योग्यतेप्रमाणे त्यात असंख्य पाठभेद निर्माण झाले. त्यावर संशोधन करून मूळ ज्ञानेश्वरी सिद्ध करण्याचे आव्हान उचलण्याचे डांगे सरांनी निवृत्तीनंतर ठरविले आणि 1996 ते 2007 या काळात एकट्याने मेहनत करून श्री ज्ञानदेवी मूलपाठ दीपिकालिहून काढली...! हे काम सोपे नव्हते.
वास्तविक हे काम 1962 मध्येच अनौपचारिकरित्या त्यांनी सुरू केले होते. मामासाहेब दांडेकर औरंगाबादेत आले होते तेव्हा त्यांच्याशी झालेल्या चर्चेत या विषयाचे सूतोवाच झालेले होते. तेव्हापासूनच हा विषय सरांच्या मनात घोळत होता. खरे तर त्या आधीही डांगे सरांनी या विषयावर लिहिले होते. 1958 मध्ये बी.ए. करत असतानाच त्यांनी ज्ञानेश्वरीच्या तिसर्‍या अध्यायावर एक टिपण प्रसिद्ध केले. त्यावर प्रा. भाऊ मांडवकर यांनी तेव्हा यवतमाळहून प्रकाशित होणार्‍या लोकमतमध्ये परीक्षण लिहिले होते. ज्ञानेश्वरीतील पाठभेदावरील विचार तेव्हापासून मनात कायम होता. त्यातही, वारकरी संप्रदायाची घरातील परंपरा त्यांना या विषयाकडे पुनःपुन्हा ओढून नेत होती.
ते सांगतात, ‘‘नक्कल उतरवताना लेखक चुका करतो. राम-रमा-रमी... साधारण एकसारखे वाटणारे शब्द... लेखक अशा चुका करू शकतात. त्यातून पाठभेद निर्माण होतात. हे दूर करण्यासाठी काय करायचे? सर्व भागांत प्रवास करून मी 40 प्रती निवडल्या. त्यांचा अभ्यास सुरू केला.’’
प्रती मिळविण्याचे हे काम खूप महत्त्वाचे होते, तसेच जबाबदारीचेही. अभ्यासासाठी नेमकी कोणती प्रत मिळवायची, याचे आडाखे महत्त्वाचे होते. त्या दृष्टीने विचार करून तशी पार्श्‍वभूमी असलेली हस्तलिखिते त्यांनी मिळविली. त्यांचा अभ्यास सुरू केला. 1996 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी या विषयात पूर्णांशाने लक्ष घातले. ते सांगतात, ‘‘ज्ञानेश्वरी हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. तो शुद्ध असलाच पाहिजे. या आधीही यामध्ये शुद्धीचे प्रयोग झाले, पण मूळ प्रतीच निवडताना त्या सदोष निवडल्या गेल्या. त्यामुळे प्रमाण प्रत समोर आली नाही. 1907 मध्ये मुंबईत माडगावकरांनी प्रसिद्ध केलेली प्रत महत्त्वाची होती. प्रा. हर्षे, प्रा. बनहट्टी यांनी केलेले काम अपूर्ण राहिले. पण ते चांगले काम होते. मीही काही हस्तलिखिते मिळविली. या पोथ्यांसाठी मी दोन वर्षे भारतभर प्रवास केला. एक प्रत तर मला अंदमानातून मिळाली!’’
हे काम सुरू केले, त्या आधी त्यांची पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याशी भेट झाली. पांडुरंगशास्त्री म्हणाले, ‘‘या कामासाठी कुणाचे अनुदान घेऊ नकोस. ही माउलींची सेवा आहे.’’ आणि ते खरेच होते. डांगे सरांच्या मनातही हाच भाव होता. कारण, या कामी सरकारी अनुदानासाठी प्रयत्न केला असता, तर कदाचित 8-10 लाखाचे अनुदान पदरात पडले असते. एखादा सहाय्यकही मिळाला असता. पण डांगे सर त्या मोहात पडले नाहीत. चार माणसांचे हे काम त्यांनी एकट्यांनीच पुढे रेटले. कसे असते हे नेमके काम? चार जणांनी एकत्र बसून आपापल्याकडील मूळ प्रतींचे वाचन करायचे. त्यातील शब्दांची रचना शोधायची. त्यातून योग्य पाठ निवडायचा...! ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अक्षर अशा पद्धतीने वाचायचे...!
डांगे सरांनी हे काम एकट्याने केले. ज्ञानेश्वरीत 9 हजार ओव्या आहेत. प्रत्येक ओवीत 10 शब्द. असे 90 हजार शब्द, त्यांची अक्षरे... अशी साडेतीन लाख अक्षरे... ती सुद्धा 40 पोथ्यांतून तुलना करून घ्यायची... हे काम खूप मोठे आणि कठीण होते. या कृतीला टेक्सच्युअल क्रिटिसिझमम्हणतात. मराठीत त्याला पाठचिकित्साम्हणता येते. पाठचिकित्सेमध्ये संहितानिश्‍चितीकिंवा संहितेचे मूलस्थापनअभिप्रेत असते. उपलब्ध प्रतींच्या आधाराने ग्रंथाच्या मूलरूपाचा शोध घेणे, संहितेची यथामूल पुनःस्थापना करणे हे अशा अभ्यासाचे उद्दिष्ट होय.’ 
प्रतिशुद्ध प्रतीचा इतिहास संत एकनाथांपासून सुरू होतो, असे सांगताना डांगे सर नाथांच्याच काही ओळी समोर ठेवतात -
श्रीशके पंधाराशे साहोत्तरी। तारण नाम संहोत्सरी। 
एका जनार्दनें अत्यादरी। गीताज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली॥
ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध। परि पाठांतरि शुद्धाबद्ध।
तो शोधुनियां एवंविध। प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी॥
या परंपरेत अनेक मान्यवरांनी हे काम केलेले आहे. डांगे सरांनी अलिकडच्या काळात केलेले हे काम त्यामुळेच महत्त्वाचे ठरते. आपली इतर सर्व कामे बंद ठेवून सरांनी 1996 ते 2003 या काळात हे काम पूर्ण केले. या द्विखंडात्मक ग्रंथाचा पहिला खंड पुण्याच्या श्री वामनराज प्रकाशनाने 23 मार्च 2003 रोजी प्रकाशित केला. दुसरा खंड प्रकाशित होण्यास मात्र बराच वेळ गेला. त्याचा अभ्यास 2007 मध्येच पूर्ण झाला, पण अशा ग्रंथांना आर्थिक दृष्टीने मांडलेली गणिते सोडविणे जमत नसते... अखेर डायमंड पब्लिकेशन्स यांनी 16 मार्च 2010 रोजी दुसरा खंड प्रकाशित केला. या दोन खंडांतून डांगे सरांनी आपल्या अभ्यासकौशल्याला पणाला लावून केलेले एकहाती काम अभ्यासकांसमोर आले.
या कामाबद्दलची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतात. डॉ. तुकाराम गरूड, डॉ. अरुण प्रभुणे सांगतात,  ‘‘सरांनी समीक्षित संहितापद्धतीची रूढ चाकोरी सोडून स्वतःची अशी एक व्यवहार्य रीत शोधली व वापरली. पाठभेदाचे अथवा संहिता चिकित्सेचे कार्य पारंपरिक पद्धतीत कागदावर रकाने पाडून व त्या प्रत्येक रकान्यामध्ये चरणातील एक एक अक्षर नोंदवून; ते प्रत्येक अक्षर तपासत जाणे, हे काम आजवर चालत आले आहे. डांगे सरांनी ही पद्धत स्वीकारली नाही. आधारप्रत पाहिजे, असा आग्रह न धरता त्यांनी एका मुद्रित प्रतीत पाठभेद नोंदविण्याचे काम केले. हस्तलिखितांचे दोन गट करून त्यातही पाठभेद त्या प्रतींत नोंदविले. मुद्रित प्रतींचा एक आणि हस्तलिखित प्रतींचे दोन असे तीन संच करून तर्कशुद्ध पाठसंहितभागी लिहून त्या खाली इतर प्रतीतील पाठांची नोंद केली. सरांचा हा नवा प्रयोग व्याप व पसारा कमी करणारा ठरलाच, शिवाय पूर्वीच्या पाठचिकित्सेत होणार्‍या चुका या पद्धतीत संपुष्टात आल्या. पाठचिकित्सा करण्यामागे सरांची भूमिका स्वच्छ दिसते. उगाच गरळ ओकण्यापेक्षा व कोणाची निंदानालस्ती करून संशोधनात कसा गोंधळ चालला आहे हे दाखविण्यापेक्षा विद्वानांच्या अभ्यासपूर्ण मतांचा परामर्श घेणे हा त्यांचा स्वच्छ हेतू दिसतो.’’ 
ही कामगिरी पूर्ण होत असतानाच त्यांच्यासमोर दुसरे आव्हान ठेवण्यात आले.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रेरणेतून सन 1970 च्या सुमारास सुरू झालेले मराठी शब्दकोशाचे काम डांगे सरांकडे सोपविण्याचा निर्णय शासनाने घेतला. हे काम खूप मोठे आहे. साधारणपणे तीन हजार डबलडेमी पृष्ठांचे (म्हणजे या पुस्तकाच्या पृष्ठाच्या दुप्पट आकाराचे पृष्ठ), एक लाख 25 हजार शब्दांचा समावेश असलेले सहा खंडांतील हे काम खूप आधी पूर्ण होणे गरजेचे होते. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने हे काम होत असल्यामुळे त्याचा दर्जा, गुणवत्ता सर्वश्रेष्ठच असणे अपेक्षित होते. हे काम सुमारे 20 वर्षे ठप्प होते. ज्ञानेश्वरीच्या कामाच्या पूर्ततेनंतर मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या पाठपुराव्यातून शासनाने हे काम डांगे सरांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आणि सन 2007 मध्ये सर पुण्यात डेरेदाखल झाले.
काही लाखांच्या कमाईची चांगली संधी असतानाही पतीपत्नीच्या उपजीविकेपुरते पैसेघेत डांगे सरांनी या कामाला प्रारंभ केला. दोन दशके बंद असलेले काम करताना ते पुन्हा पहिल्यापासूनच सुरू करावे लागते. काळानुरूप भाषा बदललेली असते, नव्या भाषेतील शब्द आपल्या भाषेत आलेले असतात. या सर्वांचा धांडोळा घेत हे काम पूर्ण करावे लागते. या कामासाठी सरांनी कंबर कसली. डोंगराएवढे हे काम सन 2007 ते 2014 या काळात सरांच्या नेतृत्त्वाखाली नेटाने पूर्ण करण्यात आले. ते मार्च 2014 मध्ये 6 खंडांत प्रकाशित झाले. पुरवणीचे कामही सन 2014-15 मध्ये पूर्ण होईल.
हे काम संपते न संपते तोच त्यांच्याकडे व्युत्पत्ती कोशाचे काम सोपविण्यात आले होते. मराठीतील विविध शब्दांची व्युत्पत्ती कशी झाली, याचा शोध यामध्ये घ्यावयाचा आहे. हे काम डिसेंबर 2014 मध्ये संपणे अपेक्षित होते. मराठीतील अनेक मूळ शब्द वेगवेगळ्या भाषांतून आले आणि मराठीत रूढ झाले. तमिळ, कानडी, तेलुगू, पोर्तुगिज, इंग्रजी, संस्कृत, हिंदी, उर्दू, फारसी, अरबी अशा विविध भाषांतून आलेले हे शब्द शोधून त्यांचे मूळरूप शोधून काढायचे.  अलीकडेच तिसरे एक काम प्राचार्य डांगे यांच्याकडे आले आहे. संतकवी दासोपंत विरचित गीतार्णवाच्या शब्दकोशाचे काम राज्य मराठी विकास संस्थेने त्यांच्याकडे सोपविले आहे. गीतार्णवहा मराठी भाषेतील पहिला आणि शेवटचा बृहद्ग्रंथ मानला जातो. या ग्रंथाची ओवीसंख्या आहे सव्वा लाख! संपूर्ण ग्रंथही प्रकाशित नाही. त्यामुळे हस्तलिखिताच्या आधारे हे काम करावे लागणार आहे. हस्तलिखित वाचण्याचा दांडगा अनुभव असल्याने हे काम 2-3 वर्षांत पूर्ण होईल व हे काम प्राचार्य डांगेच करू शकतील, असा संस्थेचा विश्वास होता.
 आपण सिद्ध केलेल्या प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरीचा सांप्रदायिकांत प्रसार व्हावा म्हणून सौ. डॉ. मीराबाई आणि डॉ. तुकाराम गरूड या दाम्पत्याच्या सहकार्याने प्रस्तुत ज्ञानेश्वरीची पारायण प्रतडांगे सरांनी कोल्हापूरच्या अजब प्रकाशनाच्या मदतीने अवघ्या 50 रुपयांत उपलब्ध करून दिली आहे.
ज्ञानेश्वरीचा सर्वसंग्राहक शब्दकोशहा त्यांचा आणखी एक संकल्प-प्रकल्प. ज्ञानेश्वरीच्या सर्वच कोशांचे एकत्रीकरण तर केलेच आहे. शिवाय ज्ञानेश्वरीचे काही जुने हस्तलिखितकोशही डांगे सरांना उपलब्ध झाले आहेत. तंजावर कोश आणि आरे मराठीचा कोश या मुळे काही नवीन अर्थ समोर येतात. निरंजन रघुनाथांचा कोशही अपूर्ण असाच आहे. त्याचाही उपयोग या कोशात केलेला आहे. ओम् नमोजी आद्याम्हणजे श्री विठ्ठलह्या नव्या अर्थाचे दर्शन मनोहर आहे... ही मोलाची कामे डांगे सरांच्या हातून होत होती !
प्राचार्य रामदास डांगे यांचा हा सारा प्रवास पाहताना हे व्यक्तिमत्त्व अतिशय गंभीर असल्याचे दिसते, पण त्याला हजरजबाबीपणा आणि विनोदाची झालरही असते. असे अनेक प्रसंग त्यांच्या मित्रमंडळीत चर्चेत असतात. प्राचार्य रा. रं. बोराडे सांगतात, ‘‘अमरावती विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती झाल्याबद्दल आम्ही डांगे सरांचे अभिनंदन केले व त्यांना पेढे मागितले. त्यावर ते उत्तरले एक तारखेला देतो.’ ‘पेढे एक तारखेलाच का?’ असा प्रश्‍न विचारताच ते उत्तरले एक तारखेला पे-डेअसतो...!’’
असाच एक अनोखा प्रसंग थेट विनोबा भावे यांच्यासमोरचा...! डांगे सर विनोबांना आपला आदर्श मानतात. त्यांची ज्ञानार्जन करण्याची वृत्ती आणि साधेपणा आपल्याला भावतो, असे ते आवर्जुन सांगतात. एकदा डांगे सर आचार्य कुलाच्या बैठकीसाठी नागपूर येथे गेले असताना परतीच्या प्रवासात ते पवनार येथे विनोबांना भेटण्यासाठी गेले. डांगे सरांच्या सोबत गोविंदराव देशपांडे होते. विनोबांना तेव्हा खूप कमी ऐकू येत असल्याने गोविंदरावांनी डांगे सरांचा परिचय करून देताना पाटीवर प्राचार्य रामदास डांगेअसे लिहून दाखविले. त्यावर विनोबा मिश्किलपणे हसले आणि ते म्हणाले, ‘शंकर, रामानुज, मध्व, निंबार्क (...आणि या परंपरेतील आणखी 13-14 नावे त्यांनी घेतली) हे सारे आचार्य आणि तुम्ही प्राचार्य... तुम्हाला नमस्कार’’.
साक्षात विनोबांनीच ही फिरकी घेतल्याने डांगे सर गोंधळले, पण लगेचच सावरले. त्यांनी पाटीवर लिहिले, ‘‘प्रशासनाय आचार्यः प्राचार्यः इति मे मतिः’’ अर्थात, ‘प्रशासन सांभाळणारा आचार्य तो प्राचार्य, असे माझे मत.त्यांचा हा खुलासा विनोबांना खूप आवडला. विनोबांना अशी एखादी गोष्ट आवडणे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या बुद्धीची कसोटीच असे... त्या कसोटीला त्या काळात डांगे सर उतरले...!
वैयक्तिक मते कोणतीही असली, तरी सामाजिक भान राखत सर्वांशी मिळून मिसळून राहणारी, निगर्वी, ‘अजातशत्रूअसलेली त्यांची प्रतिमा त्यांच्या निवृत्तीनंतरही त्यांचा सन्मान करणारी ठरली. म्हणूनच, पदावरून निवृत्ती पत्करल्यानंतर सुमारे 15 वर्षांनी; परभणीतील या माजी प्राचार्याचा भव्य नागरी सत्कार 12 जून 2010 रोजी करण्यात आला. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्थितप्रज्ञहा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला. सरांच्या जीवनकार्याचा उत्तम परिचय करून देणार्‍या अनेक लेखांनी हा अंक सजला आहे. एखाद्या प्राचार्याच्या आयुष्यात असा प्रसंग महाराष्ट्रात खूप कमी वेळा येतो...!
सर सांगतात, ‘‘जे समोर येईल ते प्रामाणिकपणे, सातत्याने आणि निष्ठापूर्वक करत गेलो. एकदा एखाद्या कामाला होकार दिला, की मी ते काम करतो. मी कामालाच पूजा मानतो आणि ती मनोभावे करतो.’’ सारे आयुष्य अध्यापनात घालविलेल्या डांगे सर नव्या पिढीसाठी मात्र काहीही सांगण्याचे नाकारत. ते म्हणत, ‘‘प्रत्येक पिढीचे आकाश निराळे असते. स्वधर्मे निधनं श्रेयः, परधर्मो भयावहःएवढेच मी सांगेन आणि धर्मचा अर्थ इथे कर्मअसाच घ्यावा, असे आवर्जून सुचवेन...’’

-    दत्ता जोशी 

Tuesday, February 4, 2014

महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाने वाचावे असे...

दिव्य मराठी या दैनिकात आज दि. 5 फेब्रुवारी रोजी प्रकाशित झालेला हा लेख-
------------------------------------------
मराठी माणसांच्या नव्या पिढीत उद्योजकता आणि शेती-शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी जिल्ह्यजिल्ह्यांतून उद्योजक व शेतकरी शोधून ते पुस्तकरूपाने मांडण्याचा उपक्रम मुक्त पत्रकार दत्ता जोशी अणि पोलाद या उद्योगाने मिळून हाती घेतलाय. या मालिकेत आतापर्यंत सातारा आयकॉन्स, सांगली, लातूर, उस्मानाबाद, जालना, नांदेड, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नगर आयकॉन्स ही 10 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. भविष्यात राज्यभरात हा उपक्रम नेण्याचा त्यांचा मानस आहे. ही पुस्तक मालिका आणि त्यामागील प्रेरणांबद्दल... 
-------------------------------------------
सांस्कृतिक पर्यावरणातील साहित्य संमेलने, काव्यवाचन, एकांकिका महोत्सव आदी देखावे काही तरुणांची मने आकर्षित करतात. पण त्यांच्या एकंदर संख्येच्या मानाने सहभाग असणार्‍यांची संख्या नगण्य आहे. बहुसंख्य तरुणांना समाजाने घेतलेली गती भोवळ आणणारी वाटते. समाधानाच्या जागा दुर्मिळ होत चालल्या आहेत. प्रेरणास्रोत आटून जाताहेत. असे वाटत असतानाच समाजजीवनात सकारात्मक, दिलासा देणारे, प्रेरक असे काही घडतच असते. फक्त निराश न होता त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहिले पाहिजे. असा एक प्रकल्प मराठवाड्यातील औरंगाबाद-जालनासारख्या शहरातून आकार घेतो आहे.

दत्ता जोशी यांनी हा लक्षणीय प्रकल्प हाती घेतला आहे. 'आयकॉन्स' हे त्यांच्या प्रकल्पाचं नाव. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या श्रमसातत्यातून, उपक्रमशीलतेतून, चिकाटी आणि कल्पकतेतून आपल्या कार्यावर व्यक्तित्व कोरले आहे. अशा व्यक्ती ग्रंथरूपात येणारी ही मालिका जिल्हानिहाय आहे. आयकॉन्सच्या निवडीसाठीचे काही निकष यासाठी आहेत. ते निकष परिपूर्ण आहेत वा निवड केलेल्या आयकॉन्सची यादी परिपूर्ण आहे, असा कोणताच दत्ता जोशी या लेखक-संपादकाचा नाही. कारण आयकॉन्सचा शोध आणि निवड हा ते शोध प्रक्रियेचा भाग मानत असावेत, असे त्यांच्या लेखनातून जाणवते. त्यांच्या या लेखनाच्या केंद्रवर्ती महाराष्ट्रातील आजची तरुण पिढी आहे. आयकॉन्सच्या या लेखकाने घेतलेल्या मुलाखती विलक्षण प्रत्यय देणार्‍या आहेत. त्या विलक्षण यासाठी वाटतात की, त्याच्या निवडीमागे त्यांची वस्तुनिष्ठ निकषांवर आधारलेली दृष्टी काम करताना दिसते.

पन्नाशीच्या आतील ती व्यक्ती चारित्र्यसंपन्न असावी, व्यावसायिक सचोटी आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा मिलाफ त्या व्यक्तिमत्त्वात झालेला असावा, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत वर्धमान होण्यावर त्यांचा विश्वास असावा. र्शमसाधनेतून निर्माण झालेल्या उत्पादनाकडे समूहभावाने पाहण्याची दृष्टी असावी. या निकषासह उत्पादनक्षमता आणि निर्मितीक्षमता वा उपक्रमशीलता यांच्यामध्ये असलेले अंगभूत नाते लक्षात घेऊन. या निकषांचे सतत भान ठेवत दत्ता जोशी आयकॉन्सच्या शोधात असतात. पुस्तकात त्यांनी अनेक आयकॉन्सनी केलेल्या कार्याचे र्मम, त्याच्या र्शमाच्या प्रक्रियेत झालेला त्याच्या विचाराचा विकास, इतरांसोबत काम करण्यातून निर्माण झालेली समूहनिष्ठ जाणीव याचा एक आलेख वाचकासमोर ठेवला आहे. यातला प्रत्येक आयकॉन प्रेरणेची गंगोत्री होण्यासारखा आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रातल्या या आयकॉनविषयी वाचत असताना त्या प्रत्येकाचे र्शम, त्याच्या आई-वडिलानं खाल्लेल्या खस्ता वाचकांसमोर तरळत राहतात. नवा विचार-योजना-शोधाची दिशा-क्षितिज या गोष्टी दिसू लागतात आणि त्या नव्या साहसाला, नव्या आव्हानाला बळ पुरवत असतात. अशाच आयकॉन्सची निवड जोशी यांनी केली आहे.

ही निवड करताना वर म्हटल्याप्रमाणे त्यांनी जीवनाची विविध क्षेत्रे लक्षात घेतली आहेत. अगेन्स्ट ऑल ऑड्स, त्या त्या क्षेत्रामध्ये स्वत:ला रोवून, उद्यमशील राहून त्यांनी त्या क्षेत्राला विकसित केले. काही आयकॉनचे अनुभव सामाजिक जाणिवेच्या थेट गाभ्यापर्यंत नेणारे आहेत. काही उद्योजकीय कल्पकतेला हात घालणारे आहेत, काही कचरा डोपो ते आयआयटी पवईपर्यंतचा प्रवास करून र्शमाला प्रतिष्ठित करणारे, काही व्यवस्थेच्याअजगरी विळख्याचं वास्तव समोर ठेवणारे आहेत. या ग्रंथांमधला प्रत्येक आयकॉन जीवनावरचा विश्वास वाढवणारा आहे.

वानगीदाखल म्हणून लातूर आयकॉन्स या पुस्तकातील मिलिंद कांबळे यांचे कर्तृत्व नजरेखालून घालता येईल. (त्यांना 2013 मध्ये पद्र्मशी हा नागरी सन्मानही जाहीर झाला आहे.) आंबेडकरी आर्थिक विचारातील र्ममदृष्टी स्वीकारून तिला दृश्यरूपात विकसित करणारे ते एक अफलातून उद्योजक आहेत. त्यांनी 2005 मध्ये दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉर्मस अँड इंडस्ट्रीज (डिक्की) ची स्थापना केली. 2011 मध्ये त्यांनी दलित उद्योजकांची राष्र्ट्रीय परिषद आयोजिली. तीत दरवर्षी एक कोटीहून अधिक कर भरणार्‍या टॉप टेन दलित उद्योजकांचा सत्कार घडवून आणला. या संमेलनात 150 उद्योजकांचे स्टॉल्स होते. वयाच्या 17 व्या वर्षी चप्पल घालायला मिळालेला अशोक खाडे नावाचा उद्योजक आपल्या कंपन्यांमधून आज 4500 कर्मचार्‍यांना सामावून घेतो आहे. अशा सगळ्या उद्योजकांसाठी पुढाकार घेऊन मिलिंद कांबळे यांनी राष्ट्रीय स्वरूपाचं व्यासपीठ निर्माण केलं. त्यांच्या या राजकारण निरपेक्ष गुणवत्तेची प्रतिमा, हा लौकिक रतन टाटा यांच्यापर्यंत पोहोचल्याने ते स्वत: परिषदेस उपस्थित होते. त्यांनी जे आश्वासन दिले ते चैतन्य निर्माण करणारे होते. कारण टाटा उद्योगसमूहाला लागणार्‍या वस्तूंची दहा टक्के खरेदी दलित उद्योजकांकडून करण्याचे ते आश्वासन होते. दलित राजकीय नेतृत्वाने अस्मितेचा जागर सुरू ठेवला. तो आवश्यक होता, पण तो अर्थयुक्त नव्हता. मिलिंद कांबळे यांनी दलित इंडस्ट्री सुरू करून तो अर्थयुक्त ठेवला. आंबेडकरी आर्थिक विचाराचा हा गाभा आहे. एक इंडस्ट्री म्हणजे एक संबंधाचे जाळे. या सहसंबंधांना नव्या आर्थिक व्यवस्थेच्या दिशेने त्यांना वळवायचं आहे आणि त्याद्वारेच आजच्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल
घडवता येतो ही त्यांची धारणा आहे.

एवढी मोठी पुस्तक मालिका सिद्ध करण्यासाठी मोठय़ा अर्थसाहाय्याची गरज असते. आर्थिक कणा आवश्यक असतो. जालन्याच्या पोलाद या लोखंडी सळई उत्पादक कंपनीचे संचालक सुनील गोयल आणि त्यांचे सहकारी यांनी ती केली. त्यांची ही भूमिका, प्रेरणा आणि पुढाकार महत्त्वाचा आहे. त्यांनी दत्ता जोशी यांना आर्थिक पाठबळ दिले आणि व्यवसायाला सामाजिक आणि सांस्कृतिक परिमाण असते हे त्या मदतीतून सूचित केले. या आयकॉन्सच्या चरित्रकार्यातून दोन टक्के युवापिढी विद्यार्थ्यांनी फायदा उचलण्याचे ठरवले तर सामाजिक संवेदन असणारी उद्योजकीय वृत्ती महाराष्ट्राचे चित्र पालटून टाकेल.

पुस्तकातील हे आयकॉन्स उद्योजकीय क्षेत्रातील संख्येने अधिक दिसतात. त्यात एक जाणीवपूर्वकता दिसते. कारण महाराष्ट्रातील मराठी भाषिकांनी उद्योग व्यवसायात जी एक रिस्क असते तिला सामोरे जाण्याचे धाडस कधी दाखवलेच नाही. काही तुरळक अपवाद आहेत. उद्योजकता मराठी भाषिकांच्या हाती नसल्यामुळे मराठी भाषेच्या विकासाचा एक महत्त्वाचा स्रोत निसटलेला दिसतो आणि म्हणून उद्यमशील आयकॉन्स या मालिकेत ते जास्त दिसतात. या सर्व जिल्हानिहाय आयकॉन्सची एक त्रैमासिक बैठक बोलावली पाहिजे, अनुभवाचे शेअरिंग व्हायला हवे, त्यात आवर्जून तरुणांना निमंत्रित करण्यात यावे. या आयकॉन्सच्या विचारांच्या देवाण-घेवाणीतून, उद्योजकीय अनुभवातून काही नवे परिप्रेक्ष्य (पस्र्पेक्टिव्ह) आकार घेण्याची शक्यता असते आणि महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातील निवडक आयकॉन्सचे वार्षिक मेळावे राष्ट्रस्तरावर झाले तर महाराष्ट्राचा उद्योजकीय इथॉस दृष्टिपथात येईल.
-------------------
प्रकाशित लेखाची लिंक -
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/05022014/0/1/

Wednesday, November 13, 2013

सचिनचे मनगट... आणि शारजाची अविस्मरणीय खेळी !

ते १९९८ चे वर्ष. मी तेव्हा पुण्यात `सकाळ`मध्ये नोकरी करीत असे. `त्या` दिवशी रात्र-पाळी नसल्याने संध्याकाळी लवकर घरी परतलो होतो. जेवण झाल्यावर साहजिक टीव्ही लावला. २२ एप्रिलची ती रात्र... शारजातील तिरंगी स्पर्धेतील भारत – ऑस्ट्रेलिया सामना चालू होता. ऑस्ट्रेलिया आधीच फायनलमध्ये पोहचला होता. भारत आणि न्यूझीलंड या पैकी ज्याचा रन-रेट जास्त, तो फायनलला जाणार... दिवसा ऑस्ट्रेलियाची फलंदाजी झाली होती आणि फ्लडलाईट मध्ये भारत खेळणार होता...

भारताची अवस्था वाईट होती. सामना तर हातातून गेल्यात जमा होता, पण फायनलला जाण्या इतकी सरासरी सुद्धा गाठणे अवघड दिसत होते. त्यातच शारजात कुप्रसिद्ध असलेले `डेझर्ट स्टोर्म` स्टेडीयमवर झेपावले. जवळ जवळ अर्धा तास वाया गेला... नव्याने रनरेट ठरविला गेला आणि फायनलमधील पात्रतेची शक्यता आणखीच दूर गेली...
ऑस्ट्रेलियाने २८४ धावा ठोकल्या होत्या. भारताला जिंकण्यासाठी २८५, तर फायनलला जाण्यासाठी किमान २५४ धावा हव्या होत्या. वादळानंतर हे लक्ष्य बदलले. ४ षटके कमी झाली आणि विजयासाठी २७४ धावांचे आव्हान उरले. त्याच वेळी, २३७ धावा केल्या तर भारत फायनलला जाऊ शकत होता. आता हे लक्ष्य अवघड दिसत होते. मी पलंगावर आडवा होऊन सामना पाहू लागलो. पाच-दहा मिनिटे पाहून झोपी जाण्याचा माझा विचार होता. कारणही तसेच होते. गांगुली १७, अझहर १४, नयन मोंगिया ३५ आणि अजय जडेजा १ धावा काढून परतले होते. शेन वार्न फॉर्मात होता.

वादळाच्या काळातही सचिनने आपले हेल्मेट उतरविलेले नव्हते... मैदानावर उतरण्यआधी त्याने नवे लक्ष्य समजावून घेतले आणि लक्ष्मणला जोडीला घेवून सचिनने नव्या धावांचे आव्हान स्वीकारले... एक अलौकिक निर्धार त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता... त्याने एक-दोन चेंडू सीमापार तडकावले आणि मी झोपलेला उठून बसलो. एक वादळ शमले होते, दुसरे साऱ्या स्टेडियमभर घोंघावत होते... त्या दिवशी मी सचिनचा रुद्रावतार पहिला... ९ चौकार आणि ५ षटकारांसह १३१ चेंडूत १४३ धावा काढून आणि भारताचा फायनलचा प्रवेश निश्चित करून तो बाद झाला... बादही झाला तो दुर्दैवी पद्धतीने... ती वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. याच सामन्यानंतर शेन वार्नला स्वप्नातही तेंडूलकर दिसू लागला होता...!


२४ तारीख उजाडली... शारजाच्या पद्धतीप्रमाणे शुक्रवारी फायनल... फायनलचा toss सुद्धा ऑस्ट्रेलियानेच जिंकला. स्टीव्ह वा च्या संघाने भारतासमोर २७२ धावांचे आव्हान ठेवले होते. सचिन फलंदाजीला आला, तो जणू सेमीफायनलचा डाव पुढे चालू ठेवतच...! ४४ चेंडूंतच त्याने ५० चा टप्पा ओलांडला. १२ चौकार आणि ३ षटकारांसह त्याने १३१ चेंडूत १३४ धावा फटकावल्या. तो बाद झाला, तोवर भारताच्या २४८ धावा फलकावर झळकलेल्या होत्या... अखेर भारताने ४९ व्या शतकातच सामना जिंकला आणि कोका-कोला कपही जिंकला...

त्या दिवसापर्यंत टीव्हीवर सामना पाहताना मी अनेकदा पलंगावर आडवा होत असे. मस्त लोळत सामना पाहण्याचे सुख काही औरच असे. पण, सचिनच्या या दोन्ही खेळी पाहताना मात्र मी उठून बसलो...!

या गोष्टीला आता १७ वर्षे उलटून गेली. सचिनच्या त्या दोन खेळी माझ्या हृदयावर कोरून राहिलेल्या आहेत... त्यानंतर त्याने असंख्य विक्रम नोंदविले... माझ्या मनाला खूप आनंद दिला... तो भारतासाठी खेळत होता की स्वतःसाठी...? असे अनेक कद्रू प्रश्न अनेकांना पडले. ते सगळे मी दूर सारतो. मी म्हणतो, `सचिन माझ्यासाठी खेळत होता. जगभरातील माझ्यासारख्या असंख्य क्रिकेटप्रेमींसाठी खेळत होता. त्याने आम्हाला निखळ आनंद दिला.`
त्याच्या या उपकारातून मुक्त होणे अवघड. त्याच्याबद्दलचा स्नेहार्द आदरभाव मनात कायम होता... राहील. 

म्हणूनच शारजातील `त्या` अविस्मरणीय खेळीनंतर मी कधीही सचिनची खेळी झोपून पाहिली नाही. तो फलंदाजीला आला, की मी झोपलेला असलो तरी उठून बसत असे... आजारी असलो तरी...! हीच माझी त्याला मानवंदना...!

१९९२ – ९३ मध्ये सचिन औरंगाबादला आला होता. औरंगाबादच्या `वेदांत` या नव्याने सुरु झालेल्या तारांकित हॉटेलच्या `हेल्थ क्लब`चे उद्घाटन करण्यासाठी तो आलेला. तेव्हा त्याचा आंतरराष्ट्रीय क्षितिजावर नुकताच उदय झालेला पण आपले पाणी त्याने जगाला दाखवून दिलेले. या कार्यक्रमाची प्रवेशिका `गरुड`च्या गोविंद देशपांडे अर्थात काकांनी मला दिलेली. मी कार्यक्रमाला जाऊन बसलो. मुद्दाम, सचिन ज्या मार्गिकेतून जाणार त्या मार्गीकेलगतच्या खुर्चीत. तो आला. पुढे निघाला. मी दुरून त्याचा चेहरा पहिला आणि जवळ आल्यावर माझे लक्ष त्याच्या रुंद – मजबूत – कणखर मनगटावर लागलेले...! पु.ल. म्हणाले तसे लताच्या सुस्वर गळ्याला हात लावून पाहावा, सुनीलचे मनगट चाचपून पाहावे, तसे मी सचिनचे मनगट पाहत होतो...! याच मनगटातील ताकदीने त्याने पुढे सारे क्रिकेटविश्व जिंकले...!

तो आता निवृत्त होतोय. १४ ते १८ नोव्हेंबर २०१३ दरम्यानचा सामना मी काही काळ तरी पाहीन पण सचिनची फलंदाजी मात्र नक्कीच पाहीन. पूर्ण वेळ... बिछान्यावर आडवा न होता...! आणि त्याने या सामन्यात दोन्ही डावांत शतके ठोकावीत, असे मला मनापासून वाटते...! पण असे वाटणे म्हणजे परत अपेक्षा...! या अखेरच्या सामन्यातही अपेक्षांचे ओझे? पण काय करणार? सचिनला जशी क्रिकेटची सवय तशी आम्हाला त्याच्याकडून अपेक्षांची...!



त्यासाठी माझ्या आणि साऱ्या सचिनप्रेमींच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!

Saturday, November 9, 2013

नवी पिढी : नवे निर्माण : नवा भारत...

नवी पिढी कर्तबगार आहे. नव्या काळाची आव्हाने पेलण्याची ताकद त्यांच्या पंखात निश्‍चितपणे आहे. आजच्या ‘दिशाहीन’ नव्या पिढीबद्दल सगळीकडूनच ओरडा चालू असतो. दुढ्ढाचार्यांकडून शेलकी विशेषणे वापरली जातात. नवी पिढी अकर्मण्यतेमध्ये अडकल्याचे सांगितले जाते. पण ही वस्तुस्थिती आहे का? 

असे असते, तर देश कधीच रसातळाला गेला असता. देश ज्यातून उभा राहतो, त्या शेती आणि उद्योगात ही नवी पिढी पाय रोवून उभी आहे... नवे बदल करते आहे... 100 टक्के सेंद्रीय शेतीद्वारे प्रगतीच्या नव्या वाटा शोधता येतात, हे सिद्ध करते आहे. शेतीउत्पादनांवरील प्रक्रियेकडे वळते आहे. स्वतःच्या विकासासोबत परिसराचा विकास करणे, शेतीमालाच्या उत्पादनाबरोबरच प्रक्रिया उद्योगावर भर देणे, तसे उद्योग प्रत्यक्षात उतरवून शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारणे, या गोष्टी तेथे घडत आहेत.

***
रासायनिक खत आणि कीटकनाशकांचे घातक आणि प्रदीर्घ काळचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर मागील शेकडोे वर्षे ज्या पद्धतीची शेती पिकत होती आणि त्या सेंद्रीय पद्धतीच्या आधारावरच भारत जगात अग्रेसर होता, तो प्रवाह परत एकदा शेतीमध्ये दिसतो आहे. फक्त खतेच नव्हे, तर कीटकनाशकांमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन, आंतरपिकांच्या माध्यमातून कीडींचे व्यवस्थापन, या गोष्टींकडे तो लक्ष देतो आहे.

उद्योग उभारणे ही नव्या व्यवस्थेत सोपी गोष्ट ठरली आहे, पण तो यशस्वीपणे चालविणे ही बाब महाकठीण बनते आहे. सरकारची धोरणे आणि सरकारी अधिकार्‍यांची लाचखोरी या मुळे सारे उद्योग क्षेत्रच अडचणीत आलेले आहे. तरीही हे उद्योगक समन्वयाने मार्ग काढत परिस्थितीवर मात करीत आहेत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून फिरताना मला हे आशादायक चित्र दिसले. माझ्या पुस्तकांतून ते मी रंगविले आहेच, पण इथेही ते संक्षेपाने दिले पाहिजे असे मला वाटते...

**
मुक्काम बारीपाडा, जि. धुळे ः नाव - चैतराम पवार, व्यवसाय ः शेती, पर्यावरण रक्षण आणि ग्रामविकास
मुक्काम जामनेर ः नाव - पद्माकर चिंचोले, व्यवसाय ः शंभर टक्के सेंद्रीय शेती
मुक्काम नंदुरबार ः नाव - अनिल पाटील, व्यवसाय ः शेतकर्‍यांना लागणार्‍या सर्व फळपिकांची नर्सरी 
मुक्काम जवळे, ता. पारनेर ः नाव - रामदास घावटे, व्यवसाय - टिश्यूकल्चर केळीची रोपे विकसित करणे
मुक्काम जळगाव ः नाव - उमेश सोनार, व्यवसाय ः इन्डोस्कोपीची ‘इंपोर्ट सबस्टिट्यूट’ यंत्रे तयार करणे. 
मुक्काम सांगली ः नाव - मकरंद काळे, व्यवसाय ः आयुर्वेदिक पद्धतीने बुलेटप्रुफ जाकिटांची निर्मिती करणे.
मुक्काम कवठे महांकाळ ः नाव - देवानंद लोंढे, व्यवसाय ः ‘इंडस्ट्रियल हँडग्लोव्हज’ जपानला निर्यात करणे.
मुक्काम जालना ः नाव - नितीन काबरा, व्यवसाय ः अद्ययावत लोखंड निर्मिती कारखाना उभा करणे 
मुक्काम नगर ः नाव - दिनेश निसंग, व्यवसाय ः वैज्ञानिक पिढीच्या निर्मितीसाठी ‘संडे सायन्स स्कूल’
मुक्काम देगलूर ः नाव - भार्गवी दीक्षित, व्यवसाय ः महिलांसाठी व्यायामशाळा उभी करणे
मुक्काम सातारा ः नाव - सायली मुतालिक, व्यवसाय ः सिक्युरिटी एजन्सी व जॉब कन्सल्टन्सी

**
ही यादी शेकडो नावांची भर पडत वाढू शकते. राज्यात गावोगाव, प्रत्येक जिल्ह्यात उत्तम पद्धतीने काम करणारी माणसे आहेत. वर उल्लेख केलेल्या व्यक्तींचा वयोगट साधारणपणे 35 ते 48 आहे. तशा अर्थाने ही नवी पिढी. उद्योग आणि शेती या व्यवसायांत उल्लेखनीय काम करणार्‍या या सर्वांना मी भेटलो, बोललो; तेव्हा माझ्या असे लक्षात आले, की अभिनव संकल्पनांनी रसरसलेली ही मंडळी आपल्या परिसरात नवे प्रवाह जन्माला घालत आहेत. शून्यातून विश्व निर्माण करण्याची धमक त्यांच्यात आहे. आपल्यातील कौशल्याचा शंभर टक्के वापर करून त्यांनी स्वतःला घडविले. या आणि अशा काही निवडक व्यक्तींशी मला तुमची भेट घालून द्यायची आहे.

**
साधारण 1970 च्या दशकात भारतात ‘हरितक्रांती’ची बिजे पेरली गेली. एकेकाळी अमेरिकेतून सडका मिलो गहू मागविणारा भारत त्यानंतर या आघाडीवर स्वयंपूर्ण ठरला. संकरित बियाण्यांनी जशी ही क्रांती घडवून आणली, तशीच त्यामागे रासायनिक खतांची भूमिकाही अतिशय महत्वाची होती. पारंपरिक शेणखत, कंपोस्टच्या तुलनेत ही खते आणणे, वापरणे आणि भरघोस उत्पन्न मिळविणे शेतकर्‍यांना सोपे वाटले. पण काही दशकांतच हे चित्र पालटले. कृत्रिम उत्तेजके घेऊन आपले स्नायू बलदंड करणार्‍या पहेलवानाप्रमाणे शेतीची स्थिती झाली. धाडसी विधान करायचे झाले, तर रासायनिक खतांनी शेतकर्‍यांना आळशी बनविले आणि त्याच वेगाने शेतीला नापिक. प्रारंभीच्या काळात भरघोस उत्पादने देणारी जमीन कालांतराने अति प्रमाणात खते आणि कीटकनाशके मागू लागली. ती खारपड होत गेली. नापिकीची वेळ आली. जमिनीतील घटकद्रव्ये लयाला गेली. ही सारी निरीक्षणे विविध शास्त्रीय चाचण्यांतून मांडली गेली आणि त्यानंतर शेतीच्या पुनर्मांडणीची सुरवात झाली. जी शेती भारतात गेली अनेक शतके निर्विवादपणे टिकली, ज्या शेतीप्रधान अर्थव्यवस्थेने भारताला वैभवाच्या परमोच्च शिखरापर्यंत पोहोचविले होते, ती शेती कालबाह्य कशी ठरू शकते? या दृष्टीतून विचारमंथनास सुरवात झाली. कृतीला प्रारंभ झाला आणि सेंद्रीय शेतीचा सोनेरी काळ परत अवतरण्याची सुचिन्हे निर्माण झाली.

**
उद्योजकतेची स्थिती सुद्धा अशीच आहे. भारत कधीही एक देश नव्हता, अशी वैचारिक मांडणी करणार्‍यांच्या निष्कर्षांमध्ये राजकीय दृष्टीतून पाहिले तर तथ्य दिसू शकते, पण या देशाची भावनात्मक एकात्मता, राष्ट्रीय दैवतांना सन्मान देण्याची वृत्ती, ग्रामीण व्यवस्थेवर आधारित स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था याकडे लक्ष देणार की नाही? जातीव्यवस्थेच्या उतरंडीकडे वेगळ्या नजरेने पाहणार की नाही?

एकेकाळी रुजलेली बारा बलुतेदारीची पद्धती ही बारा प्रकारचे उद्योग होते आणि हा उद्योगाधिष्ठित समाज हेच भारताचे बलस्थान होते, या कडे आपण का लक्ष देत नाही? गांधीजींनी ग्रामस्वराज्याची, स्वयंपूर्ण खेड्यांची संकल्पना मांडली, ‘खेड्याकडे चला’चा मंत्र दिला. त्यातून त्यांना स्वयंपूर्ण भारत अपेक्षित होता. पण चुकीच्या विकास संकल्पनांनी देश खोट्या स्वप्नांच्या मागे धावला. बरे, या धावपळीत तो स्वत्व विसरला...!

नेतृत्वाच्या कणाहीन आणि दूरदृष्टीचा अभाव असलेल्या वृत्तीमुळे त्यांनी संचालित केलेल्या यंत्रणेत भ्रष्टाचाराचा भस्मासूर वेगाने कार्यरत झाला. सारा देश गिळण्याची क्षमता असलेल्या या भस्मासुराने देशालाच वेठीला धरले. राष्ट्रीय वृत्तीचा अभाव असलेल्या नोकरशाहीने देशाच्या हितापेक्षा स्वहिताला प्राधान्य दिले. यातून त्यांचे बंगले उभे राहिले, संपन्नता आली... पर्यायाने राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीतही अनैसर्गिकपणे वाढ झाली. पण या संपन्नतेचे समाजाला काहीही वाटेनासे झाले! ‘तुला जे घ्यायचे ते घे, पण माझे काम करून दे’, एवढी वस्तुस्थिती समाजाने स्वीकारली. त्याचेच प्रतिबिंब उद्योग क्षेत्रातही उमटले.

भारतात 1991 नंतर मुक्त अर्थव्यवस्था आल्याचे ढोल जोरजोराने पिटले गेले. नव्या व्यवस्थेत उद्योग सुरू करणे सोपे झाले. जुन्या परवानापद्धती, कोटा पद्धती बंद झाल्या. ‘बजाज’ने किती स्कूटर तयार करून विकायच्या हे सरकारच्या नव्हे, तर कंपनी आणि ग्राहकांच्या क्षमतेवर ठरू लागले. हा बदल स्वागतार्ह होता. पण प्रगतीत खोडा घालण्याच्या, वैयक्तिक स्वार्थापुढे देशहित क्षुल्लक समजणार्‍या व्यवस्थेने येथेही हस्तक्षेप केला.

भारतात आजघडीला सर्वसाधारण उद्योग सुरू करणे सोपे आहे, पण ते चालविणे अतिशय अवघड. उद्योगाचे स्वरुप पाहून साधारणपणे 17 ते 22 खात्यांच्या अधिकार्‍यांना हे उद्योजक तोंड देतात. त्या खात्यातील सर्वोच्च अधिकार्‍यापासून चपराशापर्यंत (वास्तविक येथे ‘सेवकवर्ग’ असा शब्द वापरता आला असता, पण वृत्तीनुसार शब्दयोजना म्हणून ‘चपराशी’!)सर्वांना पाकिटे देऊन खुश ठेवल्याशिवाय हे उद्योग व्यवस्थित चालू शकत नाहीत.

अनेक उद्योजकांनी तर मोठा पगार देऊन काही अधिकारी पदरी बाळगले आहेत, ते फक्त या खात्यांच्या तुष्टीकरणासाठी. त्यांना ‘लायझनिंग ऑफिसर’ असे गोंडस नाव आहे! संदिग्ध कायदे करणे, त्या कायद्याचा कीस पाडून उद्योजकांना हैराण करणे आणि त्यातून पळवाटा काढण्यासाठी त्यांची लूट करत स्वतःच्या तुंबड्या भरणे हे रॅकेट वरपासून खालपर्यंत पसरले आहे. ‘एमआयडीसी’त मोठा प्लॉट हवा असेल, तर संबंधित मंत्र्याच्या खजिन्यात काही कोटींची भर घालावी लागते. हे चित्र विषण्ण करणारे आहे.

अशा परिस्थितीत उद्योजक आपापले व्यवसाय करीत आहेत. आपल्यापुरती साधनशुचिता वापरून ते प्रगतीच्या वाटा चोखाळत आहेत.

**
मी मागील दोन-अडिच वर्षे विविध जिल्ह्यांत फिरतो आहे. तिथल्या सर्व स्तरांत संपर्क साधतो आहे. 
वेगळेपणाने काम करणार्‍या उद्योजक-शेतकर्‍यांना शोधून त्यांच्या कामांचा घेतलेला वेध माझ्या विविध जिल्ह्यांच्या ‘आयकॉन्स’ या मालिकेतील पुस्तकांतून मांडतो आहे. ही माणसे, हे खरे धन आहे. ते सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. या लेखामागे हाच हेतू आहे.

**

धुळे जिल्ह्याच्या अगदी पश्‍चिमेच्या कोपर्‍यात गुजरातच्या सीमेलगत साक्री तालुक्यात बारीपाडा नावाचे सातआठशे लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे. गाव कसले, तो एक ‘पाडा’च. या पाड्याने आज राष्ट्रीय पातळीवर कीर्ती प्रस्थापित केली आहे. शेती, पर्यावरण रक्षण, ग्राम स्वावलंबन हे सरकार दरबारी भोंगळपणे वापरले जाणारे शब्द प्रत्यक्षात किती परिणामकारकपणे अंमलात येऊ शकतात, ते या पाड्याने दाखवून दिले आहे. 
सर्व प्रयोगांमागे आहे चैतराम पवार हा त्याच गावातील तरुण. बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण घेतलेला हा तरुण शहरातील स्पर्धेत न अडकता आपल्या गावी परतला. आपल्या गावात सुरू असलेल्या विकास कामांत त्याने सहभागी होण्यास सुरवात केली आणि पाहता पाहता या सार्‍या कामांचे नेतृत्वच त्याच्या हाती एकवटले. दीड हजार हेक्टरचे घनदाट जंगल या गावाने राखले आहे.

एकेकाळी टँकरने पाच किलोमीटरवरून पाणी आणावे लागत असलेल्या या गावात पाणी अडविण्यावर इतक्या प्रामाणिकपणे काम झाले, की आज हे गाव परिसरातील चार गावांची तहान बाराही महिने भागविते. मागील 10 वर्षांत या गावाने टँकर पाहिलेला नाही! भातशेतीमध्ये ‘चार सुत्री’ पद्धतीचा अवलंब करून स्थानिक ‘इंद्रायणी’ या वाणाचे भरघोस उत्पादन हे गाव घेते. 
सरकारी योजना म्हणजे ‘अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही.’ मात्र या वृत्तीला या गावाने पूर्णतः फाटा दिला. प्रत्येक योजना त्यातील अपेक्षित हेतूशी प्रामाणिक राहून अंमलात आणली. कुर्‍हाडबंदी असो की शिक्षणसुविधा... प्रत्येक पैलूवर बारकाईने लक्ष दिले गेले. त्यातून या गावातील स्थलांतर शंभर टक्के थांबले. कामे शोधण्यासाठी गावाबाहेर जाणारी नवी पिढी आपल्या गावी परतली.

**
जळगाव जिल्ह्याच्या जामनेर या तालुक्याच्या ठिकाणी पद्माकर चिंचोले नावाचे गृहस्थ राहतात. यांचा मुख्य व्यवसाय शेती. शंभर टक्के सेंद्रीय शेती, हे त्यांचे वैशिष्ट्य. एकेकाळी हे गृहस्थ सुद्धा रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या प्रवाहात सहभागी झालेले. पण साधारण 1995 च्या मुमारास ते भानावर आले.

समाधानकारक उत्पादन मिळून सुद्धा आपली शेती तोट्यात का जाते आहे, हे त्यांना कळत नव्हते. हिशेब 
घालून पाहण्यास सुरवात केली, तसे कोडे उलगडले. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांची भूक दरवर्षी चढत्या क्रमाने वाढत होती. जमिनीला द्याव्या लागणार्‍या खतांची मात्रा आधीच्या तुलनेत तिपटीपेक्षा जास्त झाली होती. जमिनीतील घटकद्रव्ये आणि पोषणमूल्यांनी न्यूनतम पातळी गाठलेली होती. माती कडक झालेली होती. तिची जलधारणक्षमता क्षीण झाली होती. कीटकनाशकेही अधिक क्षमतेची लागत होती. जुन्या कीटकनाशकांनी कीड मरेनाशी झाली होती.

डोळे उघडले आणि त्यांना भविष्याचे भयंकर चित्र दिसू लागले. पद्माकर चिंचोले यांनी राज्यभर प्रवास केला. सेंद्रीय शेतीची उदाहरणे पाहिली. त्या विषयावरील वाचन केले आणि त्यांच्या असे लक्षात आले, की हरितक्रांतीच्या निमित्ताने भारतात घुसलेला हा ‘ट्रोजन हॉर्स’ आहे. रासायनिक खतांच्या माध्यमातून देशाला खिळखिळे करणारे, अनुत्पादकतेकडे नेणारे धोरण अंमलात येते आहे. एक सामान्य शेतकरी म्हणून ते फक्त स्वतःच्या शेतात उत्तम प्रयोग करून सर्वांसमोर ठेवू शकत होते.

घरच्या जनावरांच्या आधाराने त्यांनी शेणखत, गांडुळखताची सुरवात केली. शेताची रासायनिक खते पूर्णपणे बंद केली. आजकाल ‘शेततळी’ हा सरकारी तिजोरीवर राजरोस डाका धालून पैसा कमावण्याचा राजमार्ग बनला आहे. कधी तळी खणून तर कधी न खणताच पैसा लाटला जातो. बरे, या शेततळ्यांचा मुख्य हेतू जमिनीतून वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीच्या कुशीत मुरविणे आणि भूजलपातळी वाढवून परिसर संपन्न करणे हा आहे. प्रत्यक्षात घडते असे आहे, की जमिनीचा उतार लक्षात घेऊन सर्वात वरच्या टोकाला शेततळे खणले जाते. जमिनीतील पाणी उपसून ते शेततळ्यात भरले जाते. तेथून ते पाईपद्वारे वीजपंपाशिवाय शेतभर फिरविले जाते. यातून जमिनीतील पाणीपातळी तर खाली जाते आहेच, पण वाया जाणारे पाणी अडवून जिरविण्याच्य मुख्य हेतूलाच तडा जातो आहे. आर्थिक लाभासाठी अधिकारी कानाडोळा करतो आणि चुकीच्या धारणांनी शेतकरी स्वार्थ साधतो.

पद्माकर चिंचोले यांच्या शेतात मात्र शेततळ्याचा आदर्श पाहावयास मिळतो. डोंगरउतारावरून वाहणारे पावसाचे पाणी आपोआप या तळ्यात साचते आणि जमिनीत मुरते. आपल्या खडकाळ माळरान असलेल्या जमिनीत त्यांनी शेजारच्या तळ्यातील गाळ टाकून आपली शेती जिवंत केली आहे. पाट-पाण्याचा विषय तर सोडाच, त्यांनी ठिबकवरही शेती केलेली नाही. त्यांच्याकडे स्प्रिंकलरचा उत्तम उपयोग करून शेती केली जाते. साधारण 10 वर्षांच्या मेहनतीत त्यांनी 100 टक्के सेंद्रीय शेती यशस्वी करण्यात यश मिळविले आहे.

**
नांदेड जिल्ह्याचा मुदखेड तालुका आता राज्याच्या ‘फ्लोरीकल्चर’च्या नकाशावर ठळकपणे पुढे येतो आहे. एकेकाळी सरकारी नोकरी करणारे प्रसाद देव आता या व्यवसायात रममाण झाले आहेत, इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्यासह परिसरातील शेतकर्‍यांचेही हित जोपासण्यासाठी शेतकरी गट बनविले, सरकारी योजनांचा लाभ घेतला आणि शेडनेट, पॉलिहाऊस यांच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशा शोधण्याचा प्रयत्न केला. कोकोपीटचा वापर करून फुले फुलविण्यातही त्यांनी चांगलेच यश मिळविले.

साधारण चार पाच वर्षांच्या मेहनतीतून त्यांच्याकडे जरबेरा या परदेशी फुलाबरोबरच आता अनेक देशी फुलेही फुलतात. या फुलांचे मार्केट त्यांनी देशभर शोधले आहे. मार्केमधून ऍडव्हान्स पैसा घेऊन त्यांना फुले पुरविताना आता त्यांना कसलाच त्रास होत नाही. कारखान्यावर ऊस घालून सरकारच्या दयेवर जगणे आणि हप्त्याहप्त्याने पैसे घेणे, या त्रासातून या शेतकर्‍यांची मुक्तता झाली आहे.

**
नंदुरबार येथे एका तरुणाने एक नर्सरी चालविली आहे. ‘नर्सरी’ म्हटल्यानंतर सर्वसाधारणपणे आपल्या डोळ्यासमोर शोभेची फुले, लॉन, बोन्साय केलेली झाडे, असे प्रकार येतात. अनिल पाटील यांच्या नर्सरीची गोष्ट वेगळी आहे. इथे ढोबळी मिरची, वांगी, टोमटो, मिरची... अशा प्रकारच्या विविध फळझाडांची रोपे मिळतात! शेतीला दिलेली ही पूरक उद्योगाची जोड...!

आपल्या परिसरातील शेतकर्‍यांना उत्तम उत्पादन घेण्यात मदत व्हावी, या हेतूने या तरुणाने अशा प्रकारच्या नर्सरीला प्रारंभ केला. एखाद्या छोट्या शेतकर्‍याला चांगल्या दर्जाच्या बियाण्याचे अख्खे पाकीट गरजेचे नसते आणि परवडणारेही नसते. त्याच्यासाठी रोपेच तयार करून दिली, तर त्याचा फायदा होईल आणि आपल्यालाही चार पैसे मिळतील, या प्रेरणेतून या तरुणाने नर्सरीला प्रारंभ केला. तयार रोपे नेल्याने शेतकर्‍यांना जवळजवळ 100 टक्के उगवणक्षमता मिळते आणि उत्तम दर्जाची रोपे माफक किमतीत मिळाल्याने त्यांचे प्रारंभिक भांडवल वाचते. शिवाय, शेतीत पहिला महिनाभर घ्यावयाची रोपांची काळजीही मिटते. शेतातील रोपे थेट पहिल्या महिन्यानंतरच्या टप्प्यावरच उमलू लागतात. उत्तम फळधारणा होत असल्याने मालाला चांगला भाव मिळतो...!

स्वतःपलिकडे जाऊन समाजाचा व्यापक विचार करण्याच्या वृत्तीतून अशा प्रकारचा व्यवसाय जन्मतो आणि त्यातून सर्वांचेच भले होऊ शकते.

**
नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील जवळा या छोट्याशा गावात रामदास घावटे या तरुणाने टिश्यूकल्चर तंत्राने केळीची रोपे तयार करण्याचा उद्योग सुरू केला आहे. स्वतः एम.एस्सी.पर्यंत शिकलेल्या या तरुणाने आपल्या परिसरातील शेतीची अडचण आणि मर्यादा ओळखून हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. भारतात ‘जैन ग्रुप’ने टिश्यूकल्चर केळीचा प्रारंभ केला. ती परंपरा आता हळू हळू सर्वत्र पसरते आहे.
शेतकर्‍यांना चांगले उत्पादन मिळवून देणारी टिश्यूकल्चरची केळीची जात रामदास यांच्या अद्ययावत प्रयोगशाळेत तयार होते. ग्रामीण भागात एखादा कृषिसेवा आधारित उद्योग सुरू करताना एखाद्या तरुणाला जो त्रास होतो, तोच रामदास यांनाही झाला. जागेपासून विजेपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी झगडावे लागले. पण तीन-चार वर्षे नेटाने प्रयोग लावून धरले आणि त्यांनी त्यात यश मिळविले.

**
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मोलगी या अतिशय छोट्याशा गावात रामसिंग व रुषा वळवी राहतात. खेड्यातील आपल्या शेतात जे पिकेल, ते शहरात आणून विकायचे आणि त्यातून मिळणार्‍या चार पैशांतून आपली वर्षभराची दरिद्री उपजीविका चालवायची, हा या परिसरातील वनवासी बांधवांचा आयुष्यक्रम. त्यात हे दाम्पत्य वेगळा विचार घेऊन उतरले.

आपल्या परिसरातील समाजबांधवांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याशिवाय त्यांच्या जीवनमानात 
सुधारणा शक्य नाही, असे लक्षात घेऊन त्यांनी प्रारंभी स्वखर्चाने शेतीमालावर प्रक्रियेचे काही प्रयोग करून पाहिली. त्यांच्यातील उत्कर्षाची धडपड लक्षात आल्यानंतर नंदुरबारच्या कृषिविज्ञान केंद्राने त्यांना सहकार्य करण्याचे ठरविले.

एक एक करून यंत्रांची खरेदी करीत त्यांनी आपला कुटिरोद्योग सुरू केला. हा खरोखरीचाच ‘कुटिरोद्योग’ आहे! एका झोपडीत हा उद्योग चालतो. परिसरातील शेतकर्‍यांची डाळ, तांदुळ यावर येथे प्रक्रिया होते. त्यातून त्या शेतकर्‍यांना बाजारपेठेत चांगला भाव मिळतो. या दाम्पत्यालाही चार पैसे मिळतात.

परिसरातील शेतकर्‍यांना एकत्र करून त्यांनी विविध उत्पादनांचे सरबत करून विकण्याचाही व्यवसाय सुरू केला आहे. ही सरबते घेऊन ते राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनांतही सहभागी होतात..! ग्रामीण भागात उद्योजकता रुजवून तेथील समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा यशस्वी प्रयत्न नंदूरबार येथे कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून प्रभावीपणे होतो आहे.

**
याच जिल्ह्यात हिरालाल ओंकार पाटील हे नाव प्रसिद्ध आहे. धर्मेंद्र हा त्यांचा मुलगा. हे पिता-पुत्र सतखेडा, ता. शहादा येथे शेती करतात. सेंद्रीय शेतीवर त्यांचा भर आहेच, पण ग्रामीण पर्यटन हा त्यांच्या आवडीचा विषय. आवडीतून उत्पन्नाचे चांगले साधन कसे विकसित होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे या परिवाराचे जय श्रीकृष्ण कृषिपर्यटन केंद्र.

आडवाटेवरी एका छोट्या खेड्यात कृषिपयर्यटन केंद्र विकसित करणे हीच मुळी आश्‍चर्याची बाब. पण या परिवाराने ते प्रत्यक्षात उतरविले. पण हे पारंपरिक पद्धतीचे कृषिपर्यटन केंद्र नाही. इथे शेतीशी निगडित असंख्य प्रात्यक्षिके पाहावयास मिळतात. औषधी वनस्पतींचे असंख्य प्रकार, औधषी उपयोग असलेली झाडे, केक्टसचे 200 हून अधिक प्रकार, गुलाबाचे असंख्य प्रकार... इथल्या विविधतेबद्दल किती सांगावे?
एखाद्या हाडाच्या शेतकर्‍याने विकसित केलेले हे केंद्र शेतीशी संबंध नसलेल्या माणसाच्या माहितीत भर घालणारे आणि शेतीत कष्टणार्‍यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.

**
सांगली जिल्ह्याती विटा येथे अभय भंडारी यांची भेट झाली. हे गृहस्थ व्यवसायाने बांधकाम व्यवसायिक. पण विविध चळवळींत त्यांचा सहभाग इतका, की लोक त्यांना बांधकाम व्यावसायिकापेक्षा कार्यकर्ता म्हणूनच जास्त ओळखतात. असेच कार्यकर्तेपण जगताना ते लिंबाच्या झाडांविषयी जागृती करीत. लिंबाचे असंख्य गुणधर्म आहेत. ते समजावून सांगताना एका ठिकाणी त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला - ‘सांगणे सोपे आहे, करणे अवघड. तुम्ही करून दाखवा आणि मग शिकवा.’ 
त्यातून प्रयोगशीलतेला बळ मिळाले आणि त्यांनी चक्क ओसाड माळरानावर साडेतीन एकरांत नंदनवन फुलविले. हे माळरान म्हणजे एक टेकडीच आहे. गाव ज्या पातळीवर वसले आहे, त्यापेक्षा साधारण 150 फूट उंचीवर या टेकडीचा माथा आहे. तेथे त्यांनी साधारण 4500 हजार झाडे लावली आहेत. त्यात सुमारे 300 प्रकारची झाडे आहेत. विशेष म्हणजे, या परिसरात त्यांनी पाणी अडवून जिरविण्याचा यशस्वी प्रयोगही केला आहे. म्हणून उन्हाळ्यात गावातील लोक पाण्यासाठी वणवण हिंडतात, तेथील बोअर कोरडे पडतात, पण तेथून 150 फुट उंचीवर असलेल्या भंडारी यांच्या बोअरला चांगले पाणी असते...! विशेष म्हणजे, आजकाल सगळीकडे बोअरला खारे पाणी येत असताना या बोअरचे पाणी मात्र गोड आहे!

**
जिद्दीतून एखादा शेतीआधारित व्यवसाय कसा उभा राहू शकतो, हे पाहायचे असेल तर नंदूरबार जिल्ह्याच्या तळोदा येथील भिकाभाऊ चौधरी यांना भेटले पाहिजे. या माणसाने ‘टाकावूतून टिकावू’ तत्वावर उत्तम व्यवसाय उभा केला आहे. एकेकाळी सायकलवर फिरणे कठिण असलेला हा माणूस आज कारमध्ये फिरतो. कारमधून फिरण्याचे कौतुक नाही, पण ज्या स्थितीतून ही व्यक्ती पुढे आली, त्याची दखल घेणे आवश्यक वाटते.

वनखात्यातील नोकरी सांभाळून भिकाभाऊंनी प्रारंभी गांडुळखताचा प्रकल्प उभारला. पुढे त्याला शेणखत व कंपोस्टच्या मिश्रणाची जोड दिली. लिंबोळी पावडर, पेंडेचे खत यांचे उत्पादनही त्यांनी सुरू केले. एवढेच नव्हे, तर तळोदा पालिकेचे कचरा उचलण्याचे टेंडर मिळवून त्या कचर्‍यावर प्रक्रिया करीत त्याचा व्यावसायिक उपयोगही त्यांनी केला. गावात मरून पडलेले जनावर सुद्धा जैविक खतासाठीचे खूप महत्वाचे साधन आहे, हा डोळस विचार करून भिकाभाऊंचा व्यवसाय उभा राहातो आहे. कचरा ही टाकावू बाब आहे, त्याची विल्हेवाट लावणे अवघड असते, हे समज एका सामान्य माणसाने आपल्या कृतीतून दूर केले! एक अर्धशिक्षित सामान्य माणूस ग्रामीण भागातही अभिनव संकल्पनांच्या साह्याने स्वतःची व परिसराची प्रगती करू शकतो, हे सिद्ध करणारे त्यांचे 
उदाहरण!

**
जालना शहर ओलांडून परभणीच्या दिशेने निघालात, तर जेमतेम 7-8 किलोमीटर अंतरावर सिंधी काळेगाव नावाचे गाव आहे. त्या गावाच्या आधीच डाव्या हाताला सीताबाई मोहिते यांचे फळप्रक्रिया युनिट लागते. एकेकाळी शेतमजुरी करणार्‍या या बाईंनी आज स्वतःचे युनिट उभारले आहेच, पण ज्या कृषिविज्ञान केंद्रात त्या सालदार म्हणून काम करीत होत्या, त्याच केंद्राच्या आज त्या एक संचालिका आहेत! स्वकर्तृत्वावर राज्य शासनाचे विविध पुरस्कार जिंकत असतानाच त्यांनी त्याच बळावर परदेश दौराही केला असून, ‘मी थँक्यू आणि सॉरी या दोनच शब्दांवर सारे जग फिरून आले’, असे त्या सांगतात!

सीतमबाई आणि त्यांचे पती रामराव मोहिते यांनी स्वकष्टातून थोडीशी शेती घेतली आणि तेथे आवळा, आंबा, लिंबू आदी फळांची लागवड केली. केवळ त्यांच्या विक्रीवर समाधान न मानता त्यांना त्या फळांवर प्रक्रिया करण्याची तयारी केली. त्या साठी स्वतःची बुद्धी वापरून सीताबाईंनी इचलकरंजीहून खास यंत्रे तयार करून घेतली. उदाहरण म्हणून सांगायचे झाले, तर आवळा प्रक्रियेसाठी वापरले जाणारे त्यांचे यंत्र काही जुजबी फेरफार केले की लिंबासाठी वापरता येते!

प्रारंभी जालना शहरातील एखाद्या कॉलनीपासून सुरू झालेली त्यांच्या विक्रीची वाटचाल आज जिल्हाभर पोहोचली आहेच, पण परगावच्या प्रदर्शनांतूनही त्या आपला स्टॉल लावतात आणि आवळा, लिंबू, चिंच, पेरू, चिकू आदी फळांवर प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ विकतात...

** 
शेती आणि शेतीआधारित उद्योग उभारणार्‍या या व्यक्तींची तोंडओळख करून घेतल्यानंतर मी आपणास घेऊन जाऊ इच्छितो काही उद्योजकांकडे आणि उद्योजक वृत्तीच्या व्यक्तींकडे. यांनी आपली वैयक्तिक कौशल्ये उद्योगात परावर्तित केली. त्यातून नवे काम उभे राहिले. स्वतः घडताना इतरांना घडविणे आणि परिसराचा विकास करणे, हे सूत्र यात एकसमान आहे. ही सगळी माणसे शून्यातून उभी राहिलेली आहेत. त्यांच्या परिवारात कुठेही कोणी उद्योजक नव्हते. त्यांना कसल्याची प्रकारचे ‘बॅकिंग’नव्हते. तरीही ही माणसे उभी राहिली, ती स्वतकर्तृत्वावर...!

परंपरागत शेतीमध्ये मूल्यवर्धनाचे हे प्रयोग निश्‍चितच मार्गदर्शक ठरणारे आहेत. कष्टाला कल्पकतेची दिलेली जोड कशा प्रकारे प्रगतीच्या वाटा खुल्या करते, हेच या उदाहरणांतून दिसते. या कल्पकतेला आर्थिक सामथ्याची सुद्धा फार मोठी जोड लागत नाही. अशा प्रकारच्या कामांसाठी साह्य करणार्‍या सरकारच्या विविध योजनांचा लाभही यासाठी घेता येतो. कृषि विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, डीआरडीए, कृषि विद्यापीठ आदींच्या सहकार्यातून प्रगतीच्या या वाटा खुल्या होऊ शकतात. गरज आहे ती स्वतःहून पुढाकार घेऊन नवे काही उभे करण्याच्या इच्छाशक्तीची.

** ** 

अशीच काही उदाहरणे उद्योगाच्या संदर्भातील... उद्योग उभा करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे उद्योजकाचा ठाम निर्धार आणि विश्वास. मी व्यवसाय उभा करणार आहे आणि मी यशस्वी होणारच आहे, या ठाम विश्वासातून उद्योग उभा राहू शकतो. अनेक उद्योजकांच्या अनुभवाचा परिपाक हा, की भांडवल, बाजारपेठ, विपणन या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण त्यावाचून उद्योगाची उभारणी अडत नाही. ठाम विश्वास आणि निर्धार असेल, तर भांडवल उभे राहते आणि निश्‍चित दिशा ठरली तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या मार्गी लागू शकते.

** **
कवठे महांकाळजवळील हिंगणगाव या तीन-चार हजार लोकवस्तीच्या गावात तयार झालेले हँडग्लोव्हज जपानला निर्यात होतात, ते ही दरमहा एक-दोन कंटेनरच्या हिशेबात असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल? दलित समाजात जन्माला आलेल्या देवानंद लोंढे या तरुणाने ही किमया साधली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ स्वयंसेवी संस्थेत काम करणार्‍या देवानंद यांना त्याच कामांसाठी परदेशातही जाण्याची संधी मिळाली.

अशी कामे करताना आपल्य गावातील गरीब आणि महिलांसाठी काही केले पाहिजे, या भावनेतून त्यांनी या उद्योगाचा पाया रचला. त्यांना अनेकांनी हा उद्योग विकसित करण्यासाठी मदतही केली. पण स्वतःचा उद्योग उभा करणे आणि जपानच्या निकषात बसून त्यांना हवे ते उत्पादन त्या पद्धतीने तयार करून देणे, हे विशेष कौशल्याचे काम होते. ते त्यांनी साध्य केले. परिसरातील 200 हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देतानाच त्यांनी देशाला परकीय चलनही मिळवून दिले.

या उद्योगात जम बसल्यानंतर आता ते त्या परिसरात अमाप पिकणार्‍या चिंचेवर प्रक्रिया करून ती उत्पादने बाजारपेठेत आणण्याच्या तयारीला लागले आहेत.

**
औरंगाबादच्या एका खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअर झालेल्या नितीन काबरा यांची गोष्ट अशीच. प्रारंभी नोकरी करणार्‍या नितीन यांनी पुढे वडिलांना मदत करण्यासाठी त्यांच्या लोखंडी सळया निर्मितीच्या कारखान्यात मदत करण्यास प्रारंभ केला. या उद्योगात काम करताना त्यांनी या उद्योगातील कौशल्ये अशा प्रकारे आत्मसात केली, की ते लोखंड निर्मिती उद्योगातील तज्ज्ञ बनले.

लोखंडी सळया निर्मितीच्या व्यवसायात जगभरात नवे प्रवाह कोणते आहेत, नवी तंत्रज्ञाने कशी विकसित होत आहेत यांचे अद्ययावत ज्ञान असलेल्या नितीन काबरा यांनी आपल्या कौशल्यातून नाशिक येथे एक स्टील प्लांट उभा करून दिला आणि तो व्यवस्थितपणे चालवूनही दाखविला. जालन्यातूनच अशा प्रकारच्या कारखान्याच्या उभारणीसाठी प्रयत्न करणार्‍या तीन युवकांच्या लक्षात त्यांची ही खासियत आली आणि त्या तिघांनी नितीन यांना आपल्या सोबत येण्याचा आग्रह केला.

नितीन यांच्याकडे उद्योग उभारणीत देण्यासाठी भांडवल नव्हते, पण ती जबाबदारी इतर तिघांनी उचलली आणि नितीन यांच्या केवळ बौद्धिक क्षमतेवर त्यांची समसमान भागीदारी आकाराला आली. जालना येथील लोखंड निर्मिती विश्वात ‘भाग्यलक्ष्मी स्टील्स’ हा उद्योग आज आपली वेगळी ओळख घेऊन उभा आहे. उत्तम दर्जाचे सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाने तयार झालेले लोखंड विकत असतानाच सामाजिक बांधिलकी जपणार्‍या या उद्योगाने प्रदूषण नियंत्रणाची यंत्रणा अत्यंत प्रभावीपणे येथे अंमलात आणलेली आहे. आर्थिक क्षमता, बौद्धिक कौशल्य, विपणनातील कौशल्य हे गुण असलेली वेगवेगळी चार माणसे एकत्र येऊन कशा प्रकारे एखादा उद्योग उभा करून शकतात, याचे हे उदाहरण.

**
उत्तम शिक्षण घेतलेल्या चार जणांनी एकत्र येऊन उभारलेले हे उदाहरण पाहात असतानाच एकट्या 
माणसाने कसलीही तांत्र-शैक्षणिक पार्श्‍वभूमी नसताना ‘एन्डोस्कोपी’सारख्या अतिशय संवेदनशील क्षेत्रातील उपकरणे तयार करून आयात-पर्यायी बाजारपेठेत जम बसवावा, हे आगळेच उदाहरण. जळगावच्या उमेश सोनार यांनी ही किमया केली आहे. एन्डोस्कोपी सर्जरीसाठी लागणार्‍या सुमारे 20 प्रकारच्या उपकरणांची साधारण 250 प्रकारची वेगवेगळ्या आकार-कौशल्यांतील ‘व्हरायटी’ ते निर्माण करतात. विशेष म्हणजे हा उद्योग उभा करणारे उमेश हे पदवीधरही नाहीत!

बी.कॉम. शिक्षण घेत असतानाच कॉलेज सोडावे लागलेल्या उमेश यांनी वास्तविक प्रारंभी चक्क गॅरेज थाटले होते. पण यंत्रांशी खेळण्याची बालपणापासूनची सवय आयुष्यात कामाला आली आणि शहरातील एन्डोस्कोपिक सर्जन डॉ. रवींद्र महाजन यांना मदत करण्याच्या हेतूने उमेश यांनी प्रारंभी स्टेनलेस स्टीलचा ऑपरेशन टेबल दुरुस्त करून दिला. त्यातील हायड्रोलिक सिस्टीम बिघडलेली होती आणि उच्चशिक्षित तंत्रज्ञांनी तो टेबल बाद करून नवा विकत घेण्याचे डॉक्टरांना सूचित केले होते...! येथून सुरू झालेली उमेश यांनी ही सुरवात डॉक्टरांकडे असलेल्या एन्डोस्कोपी यंत्रांच्या मायक्रोवेल्डिंगपर्यंत पोहोचली आणि तेथूनच त्यांना स्वतंत्र उपकरणांच्या निर्मितीची प्रेरणा मिळाली.

या क्षेत्रात प्रामुख्याने जर्मन बनावटीची उपकरणे आदर्श मानली जातात. त्या उपकरणांना समकक्ष असलेली उपकरणे उमेश यांनी तयार केलेली आहेत. ती सध्या देशभरात पोहोचतात. परकीय बनावटीच्या उपकरणांच्या तुलनेत ती अधिक टिकाऊ आहेत, हे विशेष!

**
आयुर्वेद केवळ शरीरस्वास्थ्य टिकविण्यात काम करत नाही. आयुर्वेदाच्या आधाराने ‘बुलेटप्रुफ जाकीट’ तयार करता येते...! हे संशोधन आहे सांगलीच्या मकरंद काळे यांचे! हे गृहस्थही या क्षेत्रात शिकलेले नाहीत! हे सुद्धा वाणिज्य पदवीधर. मार्शल आर्टमध्ये उच्चशिक्षित. पण आयुर्वेदाच्या अभ्यासातून त्यांनी काही कॉम्बिनेशन्स अशी बनविली, की त्याची तयार प्लेट ‘बुलेटप्रुफ जाकीटा’चे काम करते!

डाळी, कडधान्ये, पिष्टमय पदार्थ यांच्या प्रक्रियेतून मकरंद काळे काही विशिष्ट प्रकारचा लगदा तयार करतात. त्यातून तयार झालेल्या पदार्थावर प्रक्रिया केल्यानंतर वेगवेगळ्या क्षमतांच्या प्लेटस् तयार होतात. परदेशी बनावटीच्या जाकिटांत जशी वेगवेगळ्या क्षमतेची क्रमवारी आहे, तशीच येथेही आहे. पण सर्वात महत्वाचा फरक हा, की ठरवून दिलेल्या विशिष्ट मुदतीनंतर परदेशी बनावटीची जाकिटे निकामी होतात आणि मुंबईतील हल्ल्यात जसे वरिष्ठ पोलिस अधिकारी मारले गेले, तशी अवस्था होते. मकरंद यांनी तयार केलेली जाकिटे निकामी होत नाहीत!

पण भारतात अशा प्रकारच्या ‘इनोव्हेशन्स’ला राजमान्यता मिळणे अवघड जाते. तशीच त्यांची अवस्था झाली आहे. परदेशातील अशा खरेदीतून होणारे आर्थिक (गैर)व्यवहार आपल्या कानावर येतात...! त्यामुळे अशा ‘स्वदेशी’ उपकणांना चटकन मार्केट मिळत नाही...!

**
छंदाचे रुपांतर व्यवसायात करता येते का? ते तसे झाले तर काय काय घडू शकते? त्यासाठी नगर येथील दिनेश निसंग यांना भेटायला हवे. एक सामान्य विद्यार्थी असलेल्या दिनेश यांनी शिकताशिकताच एका क्लासमध्ये व्यवस्थापनातील नोकरी पत्करली आणि तेथून त्यांना उदरनिर्वाहासाठी पुरेसे उत्पन्नही मिळू लागले. पण त्याच वेळी त्यांच्या असे लक्षात आले, की आजच्या प्रचलित शिक्षण पद्धतीत तयार होणार्‍या विद्यार्थ्यांच्या शास्त्रविषयातील मूलभूत संकल्पनाही स्पष्ट नाहीत.

त्यांना आकाशदर्शन, विज्ञानातील प्रयोग यांचा छंद होता. त्यातूनच त्यांच्या मनात विद्यार्थ्यांच्या मनात प्रयोगांतून विज्ञानाच्या संकल्पना रुजविण्याचा विचार आला. त्यातून शास्त्रविषयात सुसंस्कारित होणारी पिढी पाहून हळूूहळू याच छंदाचे रुपांतर त्यांनी व्यवसायात केले.

ते पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील विज्ञान विषयाची कक्षा लक्षात घेऊन, विज्ञानातील संकल्पना स्पष्ट करणारी काही खेळणी बनवितात. त्या साठी त्यांनी काही अभ्यासक्रमच तयार केले आहेत. हे पॅकेज ते विद्यार्थ्यांना देतात. हे विद्यार्थी वर्षभर उपक्रमाच्या संपर्कात राहतात. दर रविवारी त्यांचा ‘क्लास’ होतो. त्यातूनच ‘संडे सायन्स स्कूल’ची संकल्पना जन्मास आली. आजमितीला ते पुण्यातून हा व्याप सांभाळतात. महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांत ते पोहोचले असून महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू येथेही त्यांच्या उपक्रमाची रुजुवात झाली आहे.
हे व्यावसायिक मोड्यूल तयार करताना ते त्यातून आर्थिक उत्पन्नापेक्षाही नव्या पिढीला घडविण्याकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे, ही संकल्पना उत्तम असल्याचे पाहून त्यात ‘गुंतवणूक’ करू इच्छिणार्‍या काही मोठ्या ‘गुंतवणूकदारां’ना त्यांनी या पासून दूर ठेवले आहे!

**
भार्गवी दीक्षित यांची कथा आणखी वेगळी. नांदेड जिल्ह्यातील देगलूरसारख्या ग्रामीण भागात काम करताना कोणता व्यवसाय केला पाहिजे? त्यांना महिलांचे आरोग्य हा विषय महत्वाचा वाटला. त्यातून त्यांनी प्रारंभी महिलांसाठी योगासनाचे वर्ग सुरू केले आणि त्याला अधिक चांगल्या उपक्रमाची जोड देताना चक्क महिलांसाठीच्या व्यायामशाळेची, ‘जिम’ची जोड दिली.

ग्रामीण भागात जिथे महिलांनी घराबाहेर पडणेच अवघड, तेथे महिलांच्या ‘जिम’ला कसा प्रतिसाद मिळेल, या बद्दल अनेकजण साशंक होते. अगदी, त्यांना मदत करणारे जिल्हा उद्योग केंद्र सुद्धा. पण भार्गवी यांनी जिद्दीनेे हे काम उभे केले. ‘जिम’चे काम पुढे नेत असतानाच महिलांना स्वावलंबी करण्याची गरज त्यांना महत्वाची वाटू लागली. त्यातून त्यांनी महिला बचतगटाची स्थापना केली. त्यांना अवगत असलेली कौशल्ये त्यांनी परिसरातील गरजू महिलांना शिकविली. स्वतःच्या नावावर कामे मिळविण्यास सुरवात केली आणि त्यातून बचतगटाची चळवळ उभी राहिली. ज्या महिला जे कम करतात, त्याचे पूर्ण उत्पन्न त्यांनाच मिळते, हे इथले वैशिष्ट्य.

**
देगलूरमधील भार्गवी दीक्षित यांची वेगळ्या वाटेवरील ही वाटचाल अनुभवताना सातारा येथील सायली मुतालिक यांचेही नाव आठवते. प्रामुख्याने पुरुषांची ‘मक्तेदारी’ असलेल्या ‘सिक्युरिटी एजन्सी’चे काम त्यांनी सातारा येथे उभे केले. मूळच्या पुण्यातील असलेल्या सायली विवाहानंतर सातार्‍यात गेल्या. मुले शाळेत जाऊ लागली, तसे उरलेल्या वेळेत काय करायचे, या विचारातून त्यांनी आधी ‘पार्टनरशिप’मध्ये हे काम सुरू केले. पुढे हाच व्यवसाय त्यांनी स्वतंत्रपणे सुरू केला.

‘एका महिलेला हे काम कसे द्यायचे?’ या विचारापासून ‘एक महिलाच हे काम अधिक सक्षमपणे करू शकते, त्यामुळे एका महिलेलाच हे काम द्यायचे’, इथपर्यंतचा क्लायंटच्या विचारांचा प्रवास त्यांनी सुमारे चार-पाच वर्षांच्या वाटचालीतून कमावला. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्था, उद्योग यांना त्या आपल्या सेवा देतात. त्यांच्या माध्यमातून सध्या साधारण 1000 जणांना रोजगार मिळतो आहे.

या सेवा देतानाच त्यांच्यासमोर ‘कॉम्प्यूटर ऑपरेटर’ सारख्या गरजा मांडल्या जाऊ लागल्या आणि त्यातून त्यांनी या क्षेत्रातील मनुष्यबळ पुरविण्यासही प्रारंभ केला. सध्या विविध ठिकाणी कामांचे खासगीकरण सुरू आहे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने तांत्रिक मनुष्यबळाची मोठी गरज लागते. ती गरज त्या पुरवितात. सातार्‍यात राहून त्या सध्या जवळजवळ संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात आपल्या सेवा देतात. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या अशा प्रकारच्या कामाचे कंत्राटही त्यांनी पारंपरिक कंत्राटदारांच्या स्पर्धेत उतरून मिळविले होते, हे त्यांचे वैशिष्ट्य!

**
सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे, ही चर्चा आपण नेहेमीच ऐकतो. पण या क्षेत्रात भरीव काम उभे करण्याची मोठी गरज आहे. ही गरज ओळखून धुळे येथील प्रा. डॉ. अजय चांडक यांनी सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील संशोधनास प्रारंभ केला. सौर ऊर्जा देशात मुबलक उपलब्ध आहे. पण त्याचा योग्य विनियोग होत नाही, ही ओरड आपण नेहेमीच ऐकतो. या उपयोगातील मोठा अडथळा म्हणजे त्यासाठीच्या साधनांची किंमत. अद्यापही ही साधने खूप कमी प्रमाणात वापरली जात असल्यामुळे या साधनांच्या निर्मितीचा खर्च जास्त आहे.

हा खर्च कमी करणे, सौरऊर्जेला चालना देण्यासाठी त्याची सोपी मॉडेल्स विकसित करणे, या साठी प्रा. चांडक यांनी पुढाकार घेतला. ‘सोलार पॅनल’च्या आकारात त्यांनी अनेक बदल केले. चौकोनी आकाराचे पॅनल्स, घडी करण्याजोगी यंत्रे यांची वेगवेगळी मॉडेल्स त्यांनी तयार केली. त्यांचे एक विद्यार्थी राहूल कुलकर्णी यांच्या वर्कशॉपमध्ये त्यांनी हे तांत्रिक प्रयोग केले आणि त्यांच्याच सहकार्यातून नवे ‘बिझनेस मोड्यूल’ त्यांनी विकसित केले आहे.

स्वतः शास्त्रीय अभ्यासात झोकून देणे, नवे प्रयोग करणे यासाठी डॉ. चांडक आपला वेळ वापरतात आणि राहूल कुलकर्णी आपल्या वर्कशॉपमध्ये ही साधने विकसित करून त्यांचे मार्केटिंग करतात...! संशोधन, विकास आणि व्यवसाय यांची सांगड अशा प्रकारे घालता येऊ शकते, या साठीचे हे उत्तम उदाहरण...!

**
शास्त्रीय क्षेत्रात असे काम उभे करणार्‍या डॉ. चांडक आणि श्री. कुलकर्णी यांच्या तुलनेत हॉटेल चालविणार्‍या हरिभाऊ कुलकर्णी यांचे कुणाला फारसे कौतुक वाटणार नाही. पण हरिभाऊंची आर्थिक पार्श्‍वभूमी ऐकली, तर त्यांच्या या कामाबद्दल अभिमानच वाटेल. हरिभाऊ आणि त्यांचे धाकटे भाऊ यांची वये अनुक्रमे साडेतीन वर्षे आणि सहा महिने असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. ते मजुरी करत. एका मजुराची कमाई काय असणार? एक भाड्याची खोली, दोन-चार अंथरुणे-पांघरुणे आणि दोनचार भांडीकुंडी, हा त्यांचा संसार. हे कुटुंब सांगलीत वास्तव्यास होते.

त्यांच्या निधनानंतर घरमालकाने सहा महिने वाट पाहिली आणि त्यानंतर या विधवेला तिच्या मुलांसह त्याने घराबाहेर काढले. तिने गयावया करून अंथरुण-पांघरुण तेवढे मिळविले. सांगलीतील कृष्णेच्या घाटावर या स्त्रीने आपल्या कच्च्याबच्च्यांसह झाडाखाली आठ वर्षे काढली. त्यानंतर समज आलेल्या मुलांनी हातपाय हलविण्यास सुरवात केली. हरिभाऊने मजुरूपासून चहाच्या गाड्यापर्यंत सगळी कामेे केली. अखेर, एक कॅन्टीन चालविताना एका कॉलेजच्या मेसचे काम त्यांना मिळाले आणि तेथून सारे चित्र पालटले.

फिरत्या गाड्यावर खाद्यपदार्थ विकण्यापासून प्रारंभ केलेल्या साधारण दोन दशकांच्या वाटचालीत या अशिक्षित माणसाने दोन हजार मुलांची मेस आणि दोन हॉटेल असा व्याप उभा केला आहे. या पुढचे त्यांचे लक्ष्य आहे एका चांगल्या मंगल कार्यालयाचे, साधारण तीन एकरांच्या जागेत उत्तम सोयीसुविधा असलेले मंगल कार्यालय पुढील काळात उभारण्याचा त्यांचा मानस आहे...

**
शेती आणि उद्योग ही दोनच क्षेत्रे देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतात. दुर्दैवाने स्वतंत्र भारतात या दोन क्षेत्रांपैकी उद्योगाला प्राधान्याचे स्थान मिळाले. स्वातंत्र्योत्तर वाटचालीत ते स्थानही डळमळीत झाले आणि ‘व्हाईट कॉलर जॉब’च्या प्रेरणा अधिक जोमाने विकसित झाल्या. नोकर्‍या करून देश घडणार नाही. नोकर्‍या देणारे निर्माण झाले, त्यातून निर्यातीला चालना मिळाली, तरच देश उभा राहील.

एकेकाळी जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा 35 टक्क्यांहून अधिक होता, वस्त्र आणि मसाले ही भारतीय उत्पादनांची जागतिक बाजारपेठेतील मक्तेदारी होती. ब्रिटिशांच्या काळात ही घडी विस्कटली आणि ब्रिटिश प्रशासनासाठी कुशल प्रशासक तयार व्हावेत अशी शिक्षणपद्धती भारतात आणण्यात आली. त्यातून मातीशी नाते तुटण्यास प्रारंभ झाला.

स्वातंत्र्याच्या 60 वर्षांनंतर आज नवयुवक शेतीत हात घालण्यास धजावत नाही. इतर सारी क्षेत्रे आर्थिक दृष्ट्या संपन्न होत गेली, पण शेतकरी नागवाच राहिला, हे सत्य त्यांना अस्वस्थ करते. पण मागील दशकभरात या क्षेत्रानेही कात टाकली आहे. नव्या पिढीच्या नव्या संकल्पना समोर येत आहेत. शेतीमालावर प्रक्रिया करून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचल्याने चांगले उत्पन्न मिळविता येते, ते त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. बाजार समित्यांच्या माध्यमातून लुटीला सामोरे जाण्याऐवजी थेट बाजारपेठ मिळवून दलालांच्या घशात जाणारा नफा आपण स्वतःच कमवू शकतो, हे नव्या पिढीच्या लक्षात येऊ लागले आहे. यातून नव्या युगाची रुजुवात होते आहे.

उद्योग सुरू करताना त्याची उलाढाल किती, हा प्रश्‍न काहीसा गैरलागू असतो. उलाढालींच्या आकड्यापेक्षाही त्यातील अभिनव संकल्पना, त्यातून होणारी स्वयंपूर्णता, रोजगारनिर्मिती या बाबी अधिक महत्वाच्या असतात. अशा प्रकारे झालेली छोटीशी सुरवात पुढे विराट रूप धारण करू शकते. गरज असते, ती बीज रुजण्याची...!

उद्योग आणि शेती या दोन्ही क्षेत्रांत नवे प्रयोग सुरू आहेत. भारताची भूमी, येथील वातावरण आणि भौगोलिक स्थान हे सारे उद्योगांसाठी अत्यंत अनुकुल असतानाही मध्यंतरीच्या दोन शतकांच्या काळात झालेली पिछेहाट भरून काढण्याची वेळ आलेली आहे. त्यातूनच भारत ‘महासत्ता’ बनण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे. ‘मी एकटा काय करू शकेन’, या वृत्तीपेक्षाही ‘मी पुढाकार घेईन, मी यशस्वी झाल्यानंतर माझे अनुकरण नक्कीच अनेक जण करतील’ ही वृत्ती महत्वाची आहे. या सर्वांच्या मुळाशी राष्ट्रभावना असणे महत्वाचे माझे कर्तृत्व भारतमातेच्या चरणी समर्पित करण्यातच माझा विकास आहे, या भावनेने उभी राहिलेली नवी पिढी नक्कीच या देशाचे भवितव्य घडवेल. या प्रवासात चार पावले टाकून पुढाकार घेणार्‍या वर उल्लेख केलेल्या व्यक्तींची करून दिलेली ओळख याच भावनेतून आहे.

- दत्ता जोशी
9422 25 25 50