Friday, March 11, 2016

हा रेडियो... माझ्याहून १ वर्षाने मोठा...!





























हा रेडियो... माझ्याहून १ वर्षाने मोठा...!

--------------------------------------------
(© दत्ता जोशी)
--------------------------------------------
परवा हा रेडियो मी दादांकडून मागून घेतला आणि औरंगाबादला आणला. या रेडियोकडे पहिले, तरी लक्षावधी आठवणींचा पट सर्रकन डोळ्यांसमोरून तरळून जातो. या रेडियोचा मी ऋणाईत आहे. दादांनी (माझ्या वडिलांनी) साधारण १९६९-७० च्या दरम्यान हा रेडियो खरेदी केला. माझा जन्म १९७१ चा. त्या नात्याने हा रेडियो माझ्याहून साधारण एका वर्षाने मोठा ! हे मोठेपण या रेडियोने नकळतपणे निभावले.
तेव्हा आम्ही देवणीत रहात असू. त्या काळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात असलेले कर्नाटकच्या सीमेलगतचे हे छोटेसे खेडे. (आता देवणी हा लातूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. निजामाच्या काळात सुद्धा तो तालुका होता.) देवणीसारख्या तेव्हाच्या साडेचार-पाच हजार लोकवस्तीच्या अर्ध-कानडी गावात माझ्यावर प्रमाण मराठी भाषेचे जे काही संस्कार झाले, त्यात (या) रेडियोचा वाटा अतिशय मोलाचा असावा, असे मला नेहेमीच वाटते. तेव्हा तर काही कळत नव्हते, पण नकळतपणे कानावर चांगले काही पडत गेले, त्याचा उपयोग नक्कीच झाला असावा.
या रेडियोबद्दलची पहिली आठवण आहे ती क्रिकेटच्या कॉमेंट्रीची...! माझे वडील क्रिकेटचे भलते शौकीन. त्या काळात अनेक सामन्यांच्या नोंदी त्यांच्या डायरीत ते नोंदवत. कुठल्या सामन्यात गावस्करने शतक काढले, त्यात किती चौकार होते, किंवा वेंगसरकर-कपिल यांची कामगिरी काय... सारे काही नोंदविलेले असे. परदेशातील सामन्यांची कॉमेंट्री रात्री-अपरात्री जागून ते ऐकत. एखाद्या दौऱ्यात महाराष्ट्रात मुंबई, पुणे किंवा नागपुरात कसोटी सामने होत. एरव्ही हिंदी आणि इंग्रजीतून असलेली कॉमेंट्री इथे मात्र मराठी आणि इंग्रजीतून ऐकवली जाई. मराठीतून कॉमेंट्री सुरु झाली, की दादा हाक मारत... रेडियो खिडकीत ठेवत, आवाज मोठा करत... बाळ पंडित, वि. वि. करमरकर यांची रसाळ, ओघवती वाणी त्याच काळात कानावर पडली, मनात रुजली.
बालवयातील आकर्षणाचा विषय म्हणजे `बालोद्यान`. दर रविवारी सकाळी ९.३० वाजता `छोट्या मित्रांसाठी कार्यक्रम` असे. काही संस्कारकथा, माहितीपर कार्यक्रम, बालगीते... धमाल असायची. `पुस्तक नंतर वाचा... आता खेळा नाचा...`, `सांग सांग भोलानाथ...`, `पप्पा सांगा कुणाचे... मम्मी सांगा कुणाची`, अशी काही गाणी अजूनही आठवतात. याच गाण्यांना जोडून येऊ लागली - `आपली आवड - श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम...` दर बुधवारी रात्री १० वाजता मुंबई केंद्रावर, रविवारी दुपारी १२ वाजता औरंगाबाद –परभणी (तेव्हा हे एकत्र केंद्र असे) तर साडेबाराला पुणे केंद्राची `आपली आवड` असे. दररोज सकाळी अकरा वाजून ५ मिनिटांनी `कामगार विश्व` असे. त्यातही बहुतेक वेळा गाणी वाजत.
त्या काळात `बिनाका गीत माला` गाजत असे. दर बुधवारी रात्री ८ वाजता आमची दोस्त मंडळी त्यांच्या त्यांच्या सोयीच्या ठिकाणी (तेव्हा घरोघर रेडियो नसत) अमीन सायानी यांचा कार्यक्रम ऐकत आणि `पहले पायदान पे आ रहा है ये गाना...` ची आठवण दुसऱ्या दिवशी सकाळी-दुपारी शाळेत काढत. या बाबतीत मात्र मी कमनशिबी... `हिंदी गाणी कशाला ऐकायची? जुनी मराठी गाणी चांगली. नव्या गाण्यांचा नाद वाईट...` अशी अशी माझ्या वडिलांची प्रामाणिक भावना! त्यामुळे या रेडियोवर कधी बिनाका गीतमाला ऐकल्याचे मला आठवत नाही. पण रात्री ८ च्या मराठी बातम्या आवर्जून ऐकण्याची सवय लागली. कारण त्या वेळी रेडियो लावला जाई. सकाळी सात वाजता `आकाशवाणी पुणे. सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत...` ही उद्घोषणा असो, साडेआठ वाजता किंवा दुपारी दीड अथवा रात्री आठ वाजता `आकाशवाणी... दत्ता कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहेत...` अशी दिल्ली केंद्रावरील उद्घोषणा असो... पुढच्या १० मिनिटात सारे जग आपल्या आवाजातून डोळ्यासमोर उभे करण्याचे कसब त्यांच्यात होते. `ईयम आकाशवाणी... संप्रति वार्ताः श्रुणीयन्ताम... प्रवाचकः बलदेवानंद सागराः...` अशा संस्कृत बातम्याही ऐकायला मिळत. ही नावे आणि त्यांचे आवाज मी आजही ओळखू शकेन..! त्यांच्या स्वरातील चढ-उतार, शब्दांना होणारा भावनांचा स्पर्श... प्रत्येक गोष्ट जिवंत करण्याची त्यांची हातोटी... हे सारे नकळतपणे रुजत गेले. पंडित, करमरकर यांचे धावते समालोचन असो की पुणे-मुंबई-दिल्ली केंद्रावरील मराठी बातम्या, सुयोग्य शब्दांची निवड आणि उच्चारशास्त्राचे संस्कार नकळतपणे मनावर घडत गेले.
असाच संस्कार `नभोनाट्य` या प्रकाराने दिला. विविध प्रसिद्ध किंवा अप्रसिद्ध नाटके रेडियोवर प्रसारित होत. निव्वळ संवादाच्या फेकीतून ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभे राहत असे. दिवाळीत पहाटे कीर्तन असे. त्याच काळात सकाळच्या वेळी विविध कार्यक्रमांची मेजवानी असे. आकाशवाणी पुणे केंद्रावर `प्रभात किरणे` नावाचा सुंदर कार्यक्रम असे. `माहिती, मनोरंजक घटना आणि संगीत यावर आधारित` या कार्यक्रमात अनेक छान किस्से असत आणि त्याला अनुसरून गाणीही. विषयांचे लिंकिंग कसे करायचे, याचा हा उत्तम धडा असे. `श्रुतीकां`च्या नर्मविनोदी कार्यक्रमातून वर्तमान घडामोडींवर केलेले भाष्य रंजक असे. हा सारा माझ्या मनाच्या जडण घडणीचा काळ होता.
पुढे, थोडा मोठा झाल्यावर थोडे अधिक स्वातंत्र्य मिळाले. वेगवेगळी स्टेशन्स ट्राय करता येऊ लागली. संध्याकाळी `युववाणी` तर ऐकतच असे पण सहा वाजता हुबळी-धारवाड केंद्रावर लागणारी मराठी गाणी, दुपारी जळगाव केंद्रावर दोनच्या सुमाराला लागणारी हिंदी गाणी, औरंगाबाद-परभणी केंद्रावरील `एकही फिल्मके गीत`, `विविध भारती`वरील जयमाला, `फौजी भाईयोंके लिये विशेष जयमाला`... एक ना दोन... अनेक कार्यक्रम सापडले. रात्री कुठल्या तरी स्टेशनवर `लहर लहर संगीत` नावाचा अंताक्षरी प्रकारचा कार्यक्रम तर खूपच आवडायचा. भारतातील प्रसारण रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी संपत असे, पण रात्री २ पर्यंत जगभरातील विविध ठिकाणची स्टेशन शोधून गाणी ऐकण्यातील मजा और होती.
अंतराळातून आपला देश कसा दिसतो, या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रश्नाला पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांनी दिलेले उत्तर - `सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा` याच रेडिओने ऐकवले. साधारण १९८० च्या दरम्यान प्रचंड गाजलेल्या sky lab च्या कोसळण्याचे update याच रेडिओतून ऐकायला मिळाले. कपिलने विश्वचषक जिंकला तेव्हा दादा कॉमेंट्री ऐकत होते, मी मात्र झोपलो होतो. सकाळी उठल्यावर मला ते शुभवर्तमान कळले! ऑपरेशन ब्लू स्टारच्या काळातील अस्वस्थ पंजाबचे दर्शन रेडीयोतूनच होत असे... इंदिरा गांधी यांच्या अन्त्ययात्रेचे प्रत्यक्ष वर्णनही याच रेडियोने ऐकवले. अशा प्रसंगाचीही `कॉमेंट्री` असते, हे त्या निमित्ताने प्रथमच कळले...! अमिताभ चित्रिकरणादरम्यान जखमी झाला, हे मी त्या दिवशी सकाळी ११ च्या बातम्यात ऐकले... अशा असंख्य आठवणी आहेत.
हा रेडीयो `फिलिप्स`चा आहे. अजूनही चालू आहे. त्याला ५ सेल लागतात. किंवा ७.५ व्होल्ट डीसी करंट दिला की तो चालतो. त्यासाठी एलीमिनेटर लागते. ते नसल्याने सध्या तो बंद आहे. मिडीयम वेव्हचा १ आणि short वेव्हचे ३ band आहेत. त्या बटनाच्या वरच्या बाजूला काळ्या रंगाचे एक पुश बटन आहे. ते दाबले की फ्रिक्वेन्सीचे आकडे असलेल्या पट्टीच्या आत लाईट लागतो. रात्रीच्या अंधारातही हवे ते स्टेशन अचूकपणे लावायला हे बटन उपयोगात येत असे. वर स्टीलची चौकट दिसते, ते त्याचे एरियल आहे. ते फोल्ड होऊन पाठीमागे बसते. short वेव्हचे स्टेशन लावायचे तर ते वर करावे लागते...! याला `फाईन ट्यून`ची सुद्धा कळ आहे. ती फिरवून आवाजातील खरखर कमी करता येत असे.
या रेडियोवर मी बरेच प्रयोग केले. वर्ग पाचवी ते आठवी या काळात मी हा रेडियो अनेकदा उकलला. बटणे काढून बघ, बाहेरून स्पीकर लावून बघ, एलीमिनेटर उघडून काहीतरी खटाटोप कर... आणि साहजिकच बिघाड झाला की बेदम मार खा...! पण कितीही मार बसला तरी असले उद्योग काही सुटले नाहीत...!
लातूरहून हा रेडियो आता मी औरंगाबादला आणला आहे. माझ्या बालवयातील असंख्य आठवणी त्याच्याशी जोडलेल्या आहेत. तो एक nostelgiaच आहे. रेडियोवर एखादी खूण दिसते आणि मग त्यामागची गोष्ट आठवू लागते... मन भूतकाळात विहरू लागते... आपोआपच डोळे चमकू लागतात... ओठावर स्मित येते... मनात हसू दाटू लागते... सगळीच गम्मत वाटते...
मग एक प्रश्न पडतो.... असे जुने जुने आठवू लागले याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे आपण आता प्रौढत्वाच्याही बरेच पुढे सरकलो की काय? smile emoticon

Friday, July 10, 2015

होय, पत्रकार संरक्षण कायद्याला माझा विरोध आहे.

० मागील बराच काळपासून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा करा, अशी आग्रही मागणी काही गट करताना पाहत होतो. गेल्या महिनाभरात `सरकार अशा कायद्यावर सकारात्मक विचार करीत आहे` अशी विधाने काही जबाबदार मंत्र्यांनी केली. हा प्रकार अनाकलनीय आहे.

० प्रारंभीच स्पष्टपणे सांगतो, की अशा प्रकारच्या कायद्याचा मी स्वतः तीव्र विरोध करतो. १५ वर्षे औरंगाबाद - पुणे येथील दैनिकांत विविध जबाबदाऱ्या सांभाळत आणि मागील १०-११ वर्षांपासून मुक्त पत्रकारिता करणाऱ्या, साधारण २५ वर्षांपासून पत्रकारिता करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला हा कायदा अनाठायी वाटतो.

० दैनिकांत काम करताना मी ही सुरक्षित पत्रकारिता केली नाही. अनेकांना अंगावर घेतले. सत्य कठोरपणे मांडले. त्यासाठी परगावी प्रवास केले. हत्येचा आरोप असलेल्या खासदाराच्या बंगल्यात बेडरपणे घुसून थेट प्रश्नांनी त्यांची झाडाझडती घेतली. काहींनी गुदरलेल्या कथित बदनामीच्या १०-१२ खटल्यांना सामोरा गेलो. कधी नैतिक भूमिका सोडली नाही. काही वेळा धमक्या आल्या, पण भीक घातली नाही.

० स्वतःची नैतिक भूमिका भक्कम असेल तर इतर कवच कुंडलांची आवश्यकता नसते. जे लोक पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांची उदाहरणे देतात, त्यांनी त्या पत्रकारांची समग्र कुंडली सुद्धा समाजासमोर मांडावी. झालेल्या हल्ल्यांपैकी किती हल्ले पत्रकार म्हणून आणि किती हल्ले `इतर अर्थपूर्ण` कारणांसाठी आहेत, ते त्यातून स्पष्ट होईल. दिली जाणारी आकडेवारी किमान महाराष्ट्रात तरी फसवी आहे. बिहार, उत्तर प्रदेश अशा काही राज्यांत ही परिस्थिती काही प्रमाणात चिंताजनक असेलही. पण तेथे सारा समाजच संकटात आहे.

० जेव्हा आपण एखाद्या समूहासाठी स्वतंत्र कायद्याची मागणी करतो, तेव्हा अस्तित्वात असलेला कायदा त्यांचे संरक्षण करण्यास समर्थ नाही, याची ती अप्रत्यक्ष कबुलीच असते. दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी केलेला कायदा हे त्याचेच उदाहरण. या कायद्याचा बराच दुरुपयोग सुद्धा झाला, पण व्यवस्था सुधारण्यासाठी हा कायदा गरजेचाच होता.

० पत्रकारांची बाब तशी नाही. आपापल्या ठिकाणी जबाबदारीने काम करणाऱ्या बहुसंख्य पत्रकारानाही या कायद्याची गरज वाटत नाही. मुळातच `मिडिया ट्रायल`च्या माध्यमातून अनेकांना वेठीला धरणाऱ्याना आणखी काही हाती असण्याची गरज नाहीच.

० सन्माननीय अपवाद सोडू, पण अनेक पत्रकारांच्या संदर्भात शंका घेण्यास खूप वाव आहे. मिळणारा पगार, त्यांचे दृश्य आर्थिक स्त्रोत यांच्या तुलनेत त्यांच्या मालमत्ता जुळत नाहीत. या विषयावर कोण प्रकाश टाकणार? उच्चरवाने अशा कायद्याची मागणी करणारे अशा विषयावर सोयीस्कर मौन का बाळगतात?

० हक्क आणि जबाबदारी यांचे भान एकसमान असायला हवे. स्वतंत्र कायद्याची मागणी करताना त्यांनी पत्रकारांसाठी आचारसंहितेची सुद्धा उद्घोषणा केली असते तर ते विश्वसनीय ठरले असते. कायदा जसा `हल्ला विरोधी` असायला हवा तसा `हप्ता विरोधी` सुद्धा असायला हवा. अशा कायद्याचे संरक्षण हवे तर पत्रकारांना RTI अंतर्गत आणायला हवे. माहितीच्या अधिकाराच्या कायद्यात त्यांचाही समावेश करायला हवा. हक्काची फळे भोगायची आणि जबाबदारीची साले भिरकावून द्यायची, हे अक्षम्य आहे.

० पत्रकारांवरील हल्ल्यांसाठी स्वतंत्र कायदा, अधिक कडक शिक्षा, स्वतंत्र यंत्रणा हवी तर पत्रकारितेतील गुन्हेगारानाही दुप्पट शिक्षेची तरतूद हवी. अशी मागणी कुणी केल्याचे ऐकिवात नाही...!

० ज्यांनी नैतिकतेचे आदर्शपाठ घालून द्यायचे त्यांनी अशा बेजबाबदार, अनैतिक, भ्रष्टाचारावर पांघरून घालणाऱ्या, blackmail ला प्रोत्साहन आणि त्याला सुरक्षा कवच देणाऱ्या कायद्याची भलावण करणे अयोग्य वाटते.

० असा कायदा झाला तर त्याला न्यायालयात आव्हान देणारा पहिला `पत्रकार` मी असेन.

Tuesday, May 12, 2015

माझी भूमिका संप्रेरकाची... Catalyst ची...!

आधी `आयकॉन्स` आणि आता `पोलादी माणसे` या पुस्तक मालिकेतून काय साध्य करायचे आहे, याचा उल्लेख मे फेसबुकवर अनेकदा केला आहे. पुस्तकात तर विस्ताराने भूमिका मांडली आहे. समाजातील कार्यशील, सकारात्मक, उद्यमी व्यक्तींचा समुच्चय आम्ही या पुस्तकातून मांडत आहोत. जिल्ह्या-जिल्ह्यातील ही `पोलादी माणसे` एकत्र यावीत, त्यातून समाजात काही नवे घडावे, नव्या पिढीला मार्गदर्शन मिळावे, हेच यातून अपेक्षित आहे.



या पोलादी माणसांनी पुढाकार घेवून काही उपक्रम हाती घ्यावेत, असेही यातून अपेक्षित आहे. मागील चार वर्षांत १५ जिल्ह्यांतून हा प्रवास पार पडला... १५ पुस्तके प्रकाशित झाली. या टप्प्यावर रविवारी, १० मे २०१५ रोजी औरंगाबादेत एक आशादायी आयोजन करण्यात आले.

औरंगाबादच्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात मागील अनेक दशकांपासून कार्यरत असलेल्या `एमआयटी` या शिक्षण संस्थेचे अध्वर्यू श्री. यज्ञवीर कवडे यांनी पुढाकार घेत मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यातील `पोलादी माणसा`ना साद घातली. विशेषतः सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असलेल्या उद्योजक-शेती उद्योजकांना त्यांनी हे आवाहन केले होते. अशा व्यक्तींचा परस्पर संवाद रविवारी दिवसभर रंगला. अशा एकत्रीकरणाचे हे पहिले पाउल ठरले.

श्री. कवडे सर एमआयटीचे संस्थापक. मराठवाड्यातील एका उत्तम संस्थेची उभारणी केल्यानंतर दैनंदिन व्यापाची सूत्रे प्रो, मुनीश शर्मा यांच्या हाती देऊन त्यांनी स्वतःला शेती आणि सामाजिक कार्यात गुंतविले आहे. कवडे सरांची संघर्षमय वाटचाल मी `उस्मानाबाद आयकॉन्स` या पुस्तकात मांडली आहे. त्यांनीच या उपक्रमाचे यजमानपद स्वीकारल्यामुळे मला आनंद झाला. एमआयटीचे महासंचालक प्रो. मुनीश शर्मा हे सध्या सी. एम. आय. ए. या उद्योजक संघटनेचे अध्यक्षही आहेत. त्यांचाही या आयोजनात पुढाकार होता.
एकेकाळी जालना येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रकल्पात सालदार असलेल्या आणि आता फळ प्रक्रिया उद्योगात अमीट छाप पडणाऱ्या उद्योजिका सीताबाई मोहिते, हिंगोली येथे संगणक प्रशिक्षण संस्था आणि मुक्त विद्यापीठाचे केंद्र चालविणारे विजयकुमार कांबळे, तेथीलच दाल मिल व्यावसायिक रमेश पंडित, किनवट येथे साने गुरुजी आरोग्य केंद्र चालविणारे नामांकित सर्जन डॉ. अशोक बेलखोडे, इंटरनेट च्या अभिनव उपयोगातून कोट्यवधींची उलाढाल करणारे `क्लियर कार रेंटल`चे सचिन काटे, जालना येथील प्रयोगशाळा सहायक आणि विज्ञान वस्तू निर्मिती उद्योग करणारे संजय टीकारिया, नांदेडच्या रयत रुग्णालयाचे डॉ. सुरेश खुरसाळे, परभणीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे डॉ. नितीन मार्कंडेय, समुद्र्वाणीसारख्या आडवळणी गावात उत्तम प्रतीच्या शेतीसाहीत्याची निर्मिती करणारे कुमार स्वामी, उमरगा येथील डॉ. दामोदर पतंगे, साऱ्या मराठवाड्याच्या जिभेला चव देणारे `रवी मसाले`चे फुलचंसेठ जैन, लातूरच्या चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयाचे संस्थापक प्रा. संजीव सोनवणे, परभणी जिल्ह्यातील खंडेगावचे सरपंच आणि गावाच्या विकासाचे शिल्पकार सुरेश शृंगारपुतळे, यमगरवाडीच्या भटके विमुक्त केंद्राचे प्रमुख कार्यकर्ते उमाकांत मिटकर... अशी आपापल्या क्षेत्रात उत्तम योगदान देणारी मंडळी एकत्र आली. त्यांनी आपापल्या कामांच्या माहितीची देवाण घेवाण केली... हा या आयोजनाचा पूर्वार्ध होता...

खरी महत्वाची चर्चा होती ती विकासाच्या वाटांची. आपापल्या ठिकाणी राहून समाजासाठी आणखी काय करता येईल, यावर चर्चा झाली. अडचणी कशा सोडवता येतील यावर विचार झाला. सर्वात महत्वाचा ठरला तो क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा. एका प्रकारच्या १० उद्योजकांना एकत्र आणून त्यांना केंद्राच्या योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल, हे याचे सूत्र होते आणि याच दृष्टीने कवडे सरांनी चक्क त्या क्षेत्रातील दोन सल्लागारांना या बैठकीस निमंत्रित केले होते...! शिरीष लोया आणि विवेकानंद कोरांगलेकर यांची उपस्थिती इथे खूप महत्वाची ठरली. त्याच प्रमाणे महत्वाचे होते ते सी. एम. आय. ए.चे दोन माजी अध्यक्ष सुनिलभाई रायठठ्ठा आणि मुकुंद कुलकर्णी. `

पोलादी माणसांच्या` अनुभव कथानानंतर या दोघांनी त्या विषयाचे विश्लेषण केले आणि क्लस्टर डेव्हलपमेंट अथवा इतर कोणत्या मार्गाने ही वाटचाल अधिक समृद्ध करता येईल यावर प्रकाश टाकला...! क्लस्टर डेव्हलपमेंट शेतीतही करता येते, ती केवळ उद्योगापुरती बाब नाही... गटशेती हे सुद्धा एक प्रकारे क्लस्टर डेव्हलपमेंटच!

एका वेगळ्या दिशेचा शोध घेण्याचा हा प्रयत्न... स्वतःपलीकडचे जग पाहणारी ही माणसे... यांच्या सहकार्याने पर्यावरण, पाणी, शिक्षण या क्षेत्रात सुद्धा पुढील काळात काही पावले उचलायचे ठरत आहे. ४ जुलै रोजी पुन्हा एकदा भेटायचे ठरवून रविवारची बैठक विसर्जित झाली. अनेक जण इच्छा असूनही काही अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. पुढच्या वेळी असे अनेक जण उपस्थित राहतील अशी आशा आहे.

कवडे पती-पत्नी एखाद्या घरगुती समारंभाच्या अविर्भावात सर्वांचे आदरातिथ्य करीत होते. या बैठकीचे खऱ्या अर्थाने यजमानपद भूषविताना त्यांनी सर्वांना केलेले विकासाचे आवाहन भावणारे ठरले. अशाच पद्धतीने एक एक टप्पा गाठत भविष्यात राज्यभरातील `पोलादी माणसां`ची बैठक आयोजण्यात पुढाकार घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

एमआयटीचा कर्मचारीवृंदसुद्धा अत्यंत आपुलकीने यात सहभागी झाला. एका चांगल्या उपक्रमाची पायाभरणी या निमित्ताने झाली.

या सर्वांना जोडणारा धागा एवढेच माझे अस्तित्व...! माझ्या संस्थेला मी `the Catalyst` असे नाव दिलेले आहे. माझी भूमिका संप्रेरकाची...! ठिणगी टाकणे, दोन घटकांना एकत्र आणून त्यांना संयोगाची प्रेरणा देणे हे माझे काम... हे करण्यात मला आनंद आहे. `पोलाद`च्या सहकार्याने चालू असलेली वाटचाल अशा प्रकारे फुलत राहील, हीच अपेक्षा...!

- दत्ता जोशी, औरंगाबाद 

Saturday, February 28, 2015

`झेप` ते `पोलादी माणसे` : एक सकारात्मक शोध-पत्रकारिता...

आज २८ फेब्रुवारी २०१५... संसदेत अर्थसंकल्प सादर होतोय...
बरोबर ४ वर्षांपूर्वी, २०११ मध्ये आजच्याच दिवशी, आजच्याच वेळी, तिकडे अर्थसंकल्पाचे वाचन सुरु झाले त्याच वेळी मी `जालना आयकॉन्स`ची पहिली मुलाखत घेत होतो. त्या नंतर एक एक करीत जिल्हे फिरत गेलो... उद्या १ मार्च २०१५ ला याच जिल्हावार प्रेरक पुस्तक मालिकेतील १५वे पुस्तक परभणी येथे प्रकाशित होतेय. ४ वर्षांतील ही वाटचाल. एकंदर १५ जिल्ह्यांतून झालेला सगळा मिळून सुमारे ७५ हजार किलोमीटरचा `सेल्फ-ड्रिव्हन` प्रवास...!

या १५ पैकी ५ पुस्तके मागच्या दोन महिन्यात आली! १४ डिसेंबर २०१४ ला बीड, १८ जानेवारी २०१५ ला सोलापूर, १ फेब्रुवारीला कोल्हापूर, ८ फेब्रुवारीला हिंगोली आणि आता १ मार्च २०१५ ला परभणीचे पुस्तक येत आहे. ही प्रकाशने जरी एकापाठोपाठ एक झाली असली तरी या जिल्ह्यातील शोधयात्रा २०१३ च्या उत्तरार्धात सुरु झाली होती. साधारण सप्टेंबर २०१३ मध्ये मी परभणीतील कामाला प्रारंभ केला होता. त्यानंतर क्रमाक्रमाने हा प्रवास झाला. त्याची पहिल्या टप्प्याची पूर्तता १ मार्च रोजी होत आहे...!

खरे तर, प्रेरक लेखनाचा हा प्रवास २००३ मध्येच सुरु झाला होता. तेव्हा मी `सकाळ`मध्ये नोकरीत होतो. तरुण भारत आणि सकाळ या वृत्तपत्रात काम करताना सकारात्मकतेचा संस्कार माझ्यावर होत गेला. त्यातूनच मी विकासात्मक पत्रकारिता स्वीकारली. त्यातूनच औद्योगिक यशकथांकडे मी वळलो. `झेप` या शीर्षकाने औरंगाबाद सकाळ मध्ये सदर चालले. पुढे त्याचे पुस्तक झाले. आधी लिहिलेली `आयकॉन्स` मालिकेतील पुस्तके आणि त्याचे आता बदललेले `पोलादी माणसे` हे शीर्षक हा सारा प्रेरक प्रवास आहे. आज तो आपल्यासमोर ठेवण्याची इच्छा आहे.

मी कधीही विघातक पत्रकारिता केली नाही. सनसनाटी लेखनाच्या मागे लागलो नाही. १९९० च्या सुमारास पत्रकारितेत आलो. २००५ मध्ये नोकरीतून बाहेर पडलो. त्यानंतर मागची १० वर्षे मुक्त-पत्रकारिता करतो आहे. या शिवाय मी `branding & image building`च्या सेवा देतो. जनसंपर्क आणि जनसंवादाचा माझा २५ वर्षांचा समृद्ध अनुभव मी माझ्या क्लायंटला देतो.

सन २००३-०४ दरम्यान मी औरंगाबाद सकाळ मध्ये `झेप` शीर्षकाखाली उद्योजकीय यशकथांची मालिका लिहिली. औरंगाबादेतील पहिल्या पिढीतील उद्योजकांचा परिचय नव्या पिढीला करून देण्याचा उद्देश या मागे होता. त्याचीही सुरुवात योगायोगानेच झाली. `करियरनामा` नावाने करियर मार्गदर्शनाचे एक पान दर बुधवारी देण्याचे ठरले. साखळी वृत्तपत्र असल्याने इतर सर्व आवृत्तींचे लेख तेथे उपलब्ध असत. ते लावून पहिल्या आठवड्यातील हे पान तयार झाले. मात्र त्यात मराठवाडा दिसेना... उद्योजकता दिसेना. मी ही भूमिका संपादकांसमोर मांडली. साहजिकच `तुम्ही करून दाखवा`चे आवाहन झाले. माहितीत असलेल्या, शून्यातून उभ्या असलेल्या एका उद्योजकाची, श्री. मिलिंद सेवलीकर यांची मुलाखत घेवून ती वाटचाल मी लिहून काढली. संपादकांनी या कल्पनेला मान्यता दिली. २००३ मध्ये दि. २६ नोव्हेंबर रोजी या मालिकेचा पहिला लेख प्रकाशित झाला. त्यानंतर साधारण ३५-३६ आठवडे मालिका चालली. निकषात बसणारी माणसे मिळणे कमी झाले तेव्हा आठवड्याआड लिहू लागलो आणि `आमचेही छापा... देणे-घेणे पाहून घेवू`ची प्रलोभने सुरु झाली तेव्हा सदर बंद करण्याचा कठोर निर्णय मी घेतला. ज्यांच्याबद्दल लिहिले, त्यापैकी ४-५ जणांशी माझा पूर्वपरिचय होता. बाकी अनोळखी होते. मी अभिमानाने सांगेन, की या पैकी एकाही व्यक्तीकडून साध्या चहाच्या कपाचीही अपेक्षा नव्हती. कुणाकडून काहीही घेतले नाही. लेखनातील तटस्थता पाळण्यासाठी मी माझ्यावर ते बंधन घालून घेतलेले होते. (अर्थात, सक्रीय पत्रकारितेच्या १५ वर्षांत कधी कुणाचे रुपयाचेही मिंधेपण स्वीकारले नाही आणि एकही डाग अंगावर पडू दिला नाही...! असो.)११ जानेवारी २००५ रोजी नोकरी सोडली. त्यानंतर याच सर्वांनी माझ्या मागे लागून पुस्तक तयार करण्यास भाग पाडले. दैनिकात छापताना काही चांगली नावे सुटली होती... संदर्भ मिळाले नव्हते... वेळ जुळली नव्हती... अशी काही नवी माणसे या पुस्तकात आली. हे पुस्तक सप्टेंबर २००६ मध्ये प्रकाशित झाले.

सांगण्यास खूप आनंद होतो, की या पुस्तकाचे प्रकाशन `सकाळ`चे व्यस्थापकीय संचालक मा. प्रतापराव पवार यांच्या हस्ते झाले. केवळ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते औरंगाबादेत आले होते. माझ्यासारख्या एकेकाळच्या सामान्य कर्मचाऱ्यासाठी एवढा वेळ देणे, हा त्यांचा मोठेपणा. पण हे ही तितकेच खरे, की औरंगाबादेत मी लिहित असलेल्या मालिकेचे ते चाहते आणि पाठीराखे होते. अशी मालिका सर्व आवृत्त्यांमध्ये असावी, असे त्यांना वाटत असे. मी नागपूर आवृत्तीत मोठी जबाबदारी सांभाळावी या दृष्टीने त्यांच्याशी बैठकाही झालेली होती. तो विषय नंतर मागे पडला. `सकाळ` सोडला, तरी स्नेहबंध कायम राहिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी `निर्लेप`चे प्रमुख श्री. राम भोगले होते.

हे पुस्तक चांगले झाले. या नंतर मी `झेप – २`ची तयारी करावी असा अनेकांचा आग्रह होता. मराठवाड्यातून बाहेर पडून इतर शहरांत उद्योग उभा करणारे उद्योजक, असा त्याचा विषय होता. अनेकांची नावे पुढे आली होती. नगरच्या श्री. अरुण कुलकर्णी यांची मुलाखतही २००७ च्या पूर्वार्धात घेवून झाली होती. पण काही कारणांनी तो विषय मागे पडला.माझा व्यवसाय सुरु होता. नवी कामे मिळवणे आणि पूर्ण करणे सुरु होते. मी ज्यांच्याबद्दल लिहिले, त्यांच्या प्रमाणेच मीही शून्यातून सुरुवात केलेली होती. डिझाईन, पीआर ही कामे मी करतो. वाटचाल सुरु झाली तेव्हा गाठीशी फक्त एका महिन्याचा पगार (सारी कपात होऊन हाती येणारे साडेनऊ हजार रुपये!) होता...! त्याच वेळी पाठीशी होते परिवार आणि मित्रांचे मदतीचे हात. आई-वडील, धाकटा भाऊ कमलाकर, पत्नी पद्मजा यांचा भक्कम पाठिंबा होताच, पण शाळेपासून मित्र असलेले डॉ. प्रकाश गुडसूरकर, शशांक जेवळीकर, श्रीकांत उमरीकर आणि औरंगाबादेत स्नेह लाभलेले डॉ. सुभाष देवढे पाटील, आशीष गर्दे... या सर्वांचा आधार होता... हात हाती होते... निभावून गेले...!दिवस जात होते... सन २०११ च्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मी माझ्या कार्यालयात बसलो होतो, तेवढ्यात जालना येथील श्री. सुनिलभाई रायठठ्ठा यांचा फोन आला. नमस्कार-चमत्कार झाल्यावर त्यांनी विषय मांडला - `दत्ताजी, हमको जालना का `झेप` लिखना है...` आणि ही पुढील प्रवासाची सुरुवात ठरली.

प्रेरक लेखन हा माझा आवडीचा प्रांत. सुनिलभाई यांनी स्वतःचा उद्योग प्रचंड संघर्षातून उभा केला. आज ते ५० देशांत निर्यात करतात. त्यांनी जालना येथे `यंग इनोव्हेटर्स` अशी एक चळवळ सुरु केली होती. या पुस्तकातून नव्या पिढीसमोर आपल्या जिल्ह्यातील आदर्श ठेवण्याची ही कल्पना.

या कल्पनेमागेही आणखी एक कहाणी होती. सुनिलभाई रायठठ्ठा, सुनीलजी बनारसीदास आणि आणखीही काही मंडळी या उपक्रमांत सहभागी असे. हे पुस्तक ही या ग्रुपची इच्छा. सुनिलभाई रायठठ्ठा यांच्यामुळे मी तिथवर पोचलो. साधारण मार्च अखेरपर्यंत जालना येथील मुलाखती संपल्या. `महिको`चे बद्रीनारायण बारवाले हे `जालना आयकॉन्स`पैकी एक व्यक्तिमत्व...!
त्याच दरम्यान सुनीलजी बनारसीदास यांच्याशी चर्चा करताना आपण अन्य जिल्ह्यात हा प्रयोग करता येईल का, असा विषय निघाला. सुनीलजी म्हणजे खूप वेगळेच प्रकरण. हा माणूस स्वतःपेक्षा इतरांसाठीच अधिक जगतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. `पोलाद` या ब्रांडनेम ने बाजारपेठेत विक्री होणाऱ्या सळईचे ते निर्माते. जालना येथील `भाग्यलक्ष्मी स्टील`च्या संचालकांपैकी ते अग्रणी. समाजात उद्योजकता वाढावी, भारत बलशाली व्हावा, ही त्यांची भावना. समाजात असलेली विशेषतः पहिल्या पिढीतील उद्योजकता संकलित करून पुस्तकाच्या रूपाने मांडावी, ही त्यांची इच्छा. मीही प्रारंभापासून त्याच वाटेवरील प्रवासी.


माणसे जोडण्यात आनंद असलेला आणि उद्योजकतेला सकारात्मकतेने पाहणारा मी पत्रकार असल्याने हे केले पाहिजे, असे मला वाटले. असे काही करायचे तर प्रचंड भटकंती करावी लागेल, खूप दिवस परिवारापासून दूर राहायला लागेल हे नक्की होते. पण माझ्याही मनात एक `जिप्सी` दडलेलाच आहे. त्याने साद घातली आणि `लक्ष्मी` व `सरस्वती`ची हातात हात घालून वाटचाल सुरु झाली. १-२ जिल्हे म्हणता म्हणता जालन्यापाठोपाठ क्रमाक्रमाने नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, बीड, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली आणि आता परभणी अशी १५ जिल्ह्यांची भटकंती झाली. दरम्यान ११व्या  पुस्तकापासून या पुस्तक मालिकेचे नामकरण `पोलादी माणसे` असे झाले...


ही झाली संक्षिप्त वाटचाल...
या प्रवासात मी खूप `श्रीमंत` झालो...! ही श्रीमंती शाश्वत टिकणारी आहे. आपण ज्या माणसांत राहतो, त्यांचे गुण आपल्याला चिकटत असतात. माझेही असेच होते आहे. माझ्याकडे साठलेली ही श्रीमंती याच गुणांची आहे...! `झेप`पासूनचा विचार केला तर आजवर साधारण पावणे पाचशे उद्यमशील व्यक्तींच्या मुलाखती घेण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक जिल्ह्यात १०० ते २०० जणांची पहिली यादी होत असते. आम्ही ठरवलेले निकष लावत ती संख्या तेथील क्षमतेनुसार खाली येत असते. एखाद्या जिल्ह्यात १७-१८ जण पुस्तकात येतात तर एखाद्या जिल्ह्यात ३८ जण...! पण हे प्रत्येक जण पारखून घेतलेला असतो. वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक चारित्र्य स्वच्छ हवे, सामाजिक उत्तरदायीत्व मानायला हवे... हे आमचे मुलभूत निकष. कुणाकडूनही कुठल्याच रूपाने आर्थिक अपेक्षा न ठेवता मेरिटवर निवड करायची, हे आम्ही मुळात ठरवलेले... सुनीलजी यांनी यात कुठेही हस्तक्षेप केला नाही... निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य मला दिले... त्यातून ही पुस्तके आकाराला आली.

राज्याच्या विविध भागांतून ही माणसे कार्यरत आहेत. ग्रामीण भागात आपापल्या क्षमता आणि इच्छाशक्तीवर ती आपापले उद्योग सांभाळत आहेत. कामांवर निष्ठा, सचोटीपूर्ण व्यवहार, संपूर्ण पारदर्शिता... प्रत्येकाची गुणवैशिष्ट्ये वेगवेगळी. कुणाच्या अंगावर घालायला एकेकाळी फाटके कपडे असत तर कुणी उपाशीपोटी झोपत. आज ते शेकडो कोटींच्या व्यवहाराचे धनी आहेत. असे असले तरी त्यांचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले...! हे खूप अवघड असते...! अशी माणसे भेटली की अल्प-स्वल्प यशाने आपल्या डोक्यात शिरलेली हवा आपोआप निघून जाते.

हा प्रत्येक माणूस म्हणजे स्वतंत्र विद्यापीठ. केवळ जिद्दीपोटी उद्योग-व्यवसायात शिरून यशाचे शिखर गाठणारी अनेक माणसे साधे दहावी पास नाहीत...! काही इंजिनियर झाली आणि वेगळ्याच उद्योगात शिरली. काही बी कॉम झाली आणि आज पाच-सातशे कोटींची उलाढाल करणारी कंपनी चालवितात...! सर्वात महत्वाचे म्हणजे या पैकी कुणीही लाखोपतीची मुले नाहीत...! ही सारी साम्राज्ये कष्टाने उभी राहिलेली आहेत.

ही पुस्तके जिल्हावार आहेत. याचा अर्थ ही माणसे जिल्ह्याच्या मर्यादेत आहेत असा नाही. आपल्या जिल्ह्यातून बाहेर पडून कुणी पुण्या मुंबईत गेला तर कुणी परदेशात आपली चमक दाखवीत आहे. इंटेलचे उपाध्यक्ष उपेंद्र कुलकर्णी हे सांगलीतून तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरणात काम करणारे राजेंद्र शेंडे सातारा जिल्ह्यातून बाहेर गेले. भारतातील पहिली खाजगी अणुभट्टी उभारणारे दत्तप्रसाद दाभोलकर साताऱ्याचे...!  सोलापुरातील यतिन शहा यांचे कॅमशाफ्ट जगभरातील बलाढ्य वाहन कंपन्या वापरतात. त्यांनी इंग्लंडमधील मोठी कंपनी टेकओव्हर केली आणि चीनमध्ये स्वताची नवी कंपनी उभारली. उस्मानाबाद्च्ये डॉ. नितीन ढेपे यांनी त्वचारोगशास्त्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान सिद्ध केले. लातूर जिल्ह्यातून बाहेर पडून उद्योग उभारणाऱ्या उदय चेरेकर यांच्या कंपनीत तयार झालेली यंत्रे `आयएसओ` प्रमाणपत्रे देणाऱ्या कंपन्या त्यांच्या कामासाठी वापरतात...! जळगाव तर असंख्य अभिनव उद्योगांचे आगार. रंग निर्मितीत लागणारे पिग्मेंट, औषधात लागणारे पेक्टिन, रेल्वेत लागणाऱ्या अवजड स्प्रिंग, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पाईप... हे सारे जळगाव जिल्ह्यात तयार होते. नंदुरबार जिल्ह्यातून जपानला लिम्बोली तेल निर्यात होते. धुळ्यातील तरुण शास्त्रज्ञ `शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराचा` मानकरी ठरला आहे. हा वैज्ञानिक क्षेत्रातील `भारत रत्न` समजला जातो...! आज भारतात प्रसिद्ध झालेला डिझायनर पेंट प्रथम नांदेडमध्ये बनला. जालन्यातील महिको सर्वांना ठावूक आहे. नगर येथे साऱ्या देशाला लागणारे कॅरामल तयार होते आणि शिवाय ३५ देशांत पोहचते. हिंगोलीतील तरुण आंतरराष्ट्रीय पातळीवरील HR ट्रेनर आहे. परभणीतील व्यक्ती भोपाळच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेची प्रमुख आहे. बीडमधील मकरंद अनासपुरे आज साऱ्या महाराष्ट्राला हसवतो.... एक ना दोन... जवळ जवळ ५०० संपन्न व्यक्तिमत्वे अनुभवताना मी ही संपन्न होत गेलो...!

मी स्वतःला भाग्यवान समजतो... मी सध्या जे काम करीत आहे ते सोपे नाही. हे काम करण्याची माझी क्षमता नाही. डॉ. हेडगेवार यांचे एक वचन आहे - `काम अवघड आहे, म्हणूनच ते करण्यालायक आहे. सोपी कामे तर कुणीही करतात...` हे वचन माझ्या डोळ्यासमोर सदैव असते. पण त्याच बरोबर मला हे सुद्धा भान असते, की हे काम मी करीत आहे, पण ती शक्ती माझी नाही. माझ्याकडून कुणी तरी अज्ञात शक्ती... हवे तर आपण नियती म्हणू... हे काम करवून घेत आहे. मी निव्वळ एक साधन आहे... हीच शक्ती मला मार्ग दाखविते. चुकीचा माणूस या पुस्तकात येऊ नये या साठी बुद्धी देते...
मी कृतज्ञ आहे. हाती घेतलेले काम अजून निम्मेही झालेले नाही. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. `पोलाद` आणि सुनीलजी बनारसीदास यांच्या भक्कम पाठबळाने ही वाटचाल सुरु आहे. आता `पोलाद उद्यमिता प्रतिष्ठान` स्थापन होत आहे. हे पुस्तक निव्वळ पुस्तक न राहता ही उद्यमिता चळवळ बनावी, अशी आमची अपेक्षा आहे...


`जाण्या`आधी काही तरी चांगले करायचे आहे...

- दत्ता जोशी 
9422 25 25 50