Wednesday, November 13, 2013

सचिनचे मनगट... आणि शारजाची अविस्मरणीय खेळी !

ते १९९८ चे वर्ष. मी तेव्हा पुण्यात `सकाळ`मध्ये नोकरी करीत असे. `त्या` दिवशी रात्र-पाळी नसल्याने संध्याकाळी लवकर घरी परतलो होतो. जेवण झाल्यावर साहजिक टीव्ही लावला. २२ एप्रिलची ती रात्र... शारजातील तिरंगी स्पर्धेतील भारत – ऑस्ट्रेलिया सामना चालू होता. ऑस्ट्रेलिया आधीच फायनलमध्ये पोहचला होता. भारत आणि न्यूझीलंड या पैकी ज्याचा रन-रेट जास्त, तो फायनलला जाणार... दिवसा ऑस्ट्रेलियाची फलंदाजी झाली होती आणि फ्लडलाईट मध्ये भारत खेळणार होता...

भारताची अवस्था वाईट होती. सामना तर हातातून गेल्यात जमा होता, पण फायनलला जाण्या इतकी सरासरी सुद्धा गाठणे अवघड दिसत होते. त्यातच शारजात कुप्रसिद्ध असलेले `डेझर्ट स्टोर्म` स्टेडीयमवर झेपावले. जवळ जवळ अर्धा तास वाया गेला... नव्याने रनरेट ठरविला गेला आणि फायनलमधील पात्रतेची शक्यता आणखीच दूर गेली...
ऑस्ट्रेलियाने २८४ धावा ठोकल्या होत्या. भारताला जिंकण्यासाठी २८५, तर फायनलला जाण्यासाठी किमान २५४ धावा हव्या होत्या. वादळानंतर हे लक्ष्य बदलले. ४ षटके कमी झाली आणि विजयासाठी २७४ धावांचे आव्हान उरले. त्याच वेळी, २३७ धावा केल्या तर भारत फायनलला जाऊ शकत होता. आता हे लक्ष्य अवघड दिसत होते. मी पलंगावर आडवा होऊन सामना पाहू लागलो. पाच-दहा मिनिटे पाहून झोपी जाण्याचा माझा विचार होता. कारणही तसेच होते. गांगुली १७, अझहर १४, नयन मोंगिया ३५ आणि अजय जडेजा १ धावा काढून परतले होते. शेन वार्न फॉर्मात होता.

वादळाच्या काळातही सचिनने आपले हेल्मेट उतरविलेले नव्हते... मैदानावर उतरण्यआधी त्याने नवे लक्ष्य समजावून घेतले आणि लक्ष्मणला जोडीला घेवून सचिनने नव्या धावांचे आव्हान स्वीकारले... एक अलौकिक निर्धार त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता... त्याने एक-दोन चेंडू सीमापार तडकावले आणि मी झोपलेला उठून बसलो. एक वादळ शमले होते, दुसरे साऱ्या स्टेडियमभर घोंघावत होते... त्या दिवशी मी सचिनचा रुद्रावतार पहिला... ९ चौकार आणि ५ षटकारांसह १३१ चेंडूत १४३ धावा काढून आणि भारताचा फायनलचा प्रवेश निश्चित करून तो बाद झाला... बादही झाला तो दुर्दैवी पद्धतीने... ती वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. याच सामन्यानंतर शेन वार्नला स्वप्नातही तेंडूलकर दिसू लागला होता...!


२४ तारीख उजाडली... शारजाच्या पद्धतीप्रमाणे शुक्रवारी फायनल... फायनलचा toss सुद्धा ऑस्ट्रेलियानेच जिंकला. स्टीव्ह वा च्या संघाने भारतासमोर २७२ धावांचे आव्हान ठेवले होते. सचिन फलंदाजीला आला, तो जणू सेमीफायनलचा डाव पुढे चालू ठेवतच...! ४४ चेंडूंतच त्याने ५० चा टप्पा ओलांडला. १२ चौकार आणि ३ षटकारांसह त्याने १३१ चेंडूत १३४ धावा फटकावल्या. तो बाद झाला, तोवर भारताच्या २४८ धावा फलकावर झळकलेल्या होत्या... अखेर भारताने ४९ व्या शतकातच सामना जिंकला आणि कोका-कोला कपही जिंकला...

त्या दिवसापर्यंत टीव्हीवर सामना पाहताना मी अनेकदा पलंगावर आडवा होत असे. मस्त लोळत सामना पाहण्याचे सुख काही औरच असे. पण, सचिनच्या या दोन्ही खेळी पाहताना मात्र मी उठून बसलो...!

या गोष्टीला आता १७ वर्षे उलटून गेली. सचिनच्या त्या दोन खेळी माझ्या हृदयावर कोरून राहिलेल्या आहेत... त्यानंतर त्याने असंख्य विक्रम नोंदविले... माझ्या मनाला खूप आनंद दिला... तो भारतासाठी खेळत होता की स्वतःसाठी...? असे अनेक कद्रू प्रश्न अनेकांना पडले. ते सगळे मी दूर सारतो. मी म्हणतो, `सचिन माझ्यासाठी खेळत होता. जगभरातील माझ्यासारख्या असंख्य क्रिकेटप्रेमींसाठी खेळत होता. त्याने आम्हाला निखळ आनंद दिला.`
त्याच्या या उपकारातून मुक्त होणे अवघड. त्याच्याबद्दलचा स्नेहार्द आदरभाव मनात कायम होता... राहील. 

म्हणूनच शारजातील `त्या` अविस्मरणीय खेळीनंतर मी कधीही सचिनची खेळी झोपून पाहिली नाही. तो फलंदाजीला आला, की मी झोपलेला असलो तरी उठून बसत असे... आजारी असलो तरी...! हीच माझी त्याला मानवंदना...!

१९९२ – ९३ मध्ये सचिन औरंगाबादला आला होता. औरंगाबादच्या `वेदांत` या नव्याने सुरु झालेल्या तारांकित हॉटेलच्या `हेल्थ क्लब`चे उद्घाटन करण्यासाठी तो आलेला. तेव्हा त्याचा आंतरराष्ट्रीय क्षितिजावर नुकताच उदय झालेला पण आपले पाणी त्याने जगाला दाखवून दिलेले. या कार्यक्रमाची प्रवेशिका `गरुड`च्या गोविंद देशपांडे अर्थात काकांनी मला दिलेली. मी कार्यक्रमाला जाऊन बसलो. मुद्दाम, सचिन ज्या मार्गिकेतून जाणार त्या मार्गीकेलगतच्या खुर्चीत. तो आला. पुढे निघाला. मी दुरून त्याचा चेहरा पहिला आणि जवळ आल्यावर माझे लक्ष त्याच्या रुंद – मजबूत – कणखर मनगटावर लागलेले...! पु.ल. म्हणाले तसे लताच्या सुस्वर गळ्याला हात लावून पाहावा, सुनीलचे मनगट चाचपून पाहावे, तसे मी सचिनचे मनगट पाहत होतो...! याच मनगटातील ताकदीने त्याने पुढे सारे क्रिकेटविश्व जिंकले...!

तो आता निवृत्त होतोय. १४ ते १८ नोव्हेंबर २०१३ दरम्यानचा सामना मी काही काळ तरी पाहीन पण सचिनची फलंदाजी मात्र नक्कीच पाहीन. पूर्ण वेळ... बिछान्यावर आडवा न होता...! आणि त्याने या सामन्यात दोन्ही डावांत शतके ठोकावीत, असे मला मनापासून वाटते...! पण असे वाटणे म्हणजे परत अपेक्षा...! या अखेरच्या सामन्यातही अपेक्षांचे ओझे? पण काय करणार? सचिनला जशी क्रिकेटची सवय तशी आम्हाला त्याच्याकडून अपेक्षांची...!



त्यासाठी माझ्या आणि साऱ्या सचिनप्रेमींच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!

Saturday, November 9, 2013

नवी पिढी : नवे निर्माण : नवा भारत...

नवी पिढी कर्तबगार आहे. नव्या काळाची आव्हाने पेलण्याची ताकद त्यांच्या पंखात निश्‍चितपणे आहे. आजच्या ‘दिशाहीन’ नव्या पिढीबद्दल सगळीकडूनच ओरडा चालू असतो. दुढ्ढाचार्यांकडून शेलकी विशेषणे वापरली जातात. नवी पिढी अकर्मण्यतेमध्ये अडकल्याचे सांगितले जाते. पण ही वस्तुस्थिती आहे का? 

असे असते, तर देश कधीच रसातळाला गेला असता. देश ज्यातून उभा राहतो, त्या शेती आणि उद्योगात ही नवी पिढी पाय रोवून उभी आहे... नवे बदल करते आहे... 100 टक्के सेंद्रीय शेतीद्वारे प्रगतीच्या नव्या वाटा शोधता येतात, हे सिद्ध करते आहे. शेतीउत्पादनांवरील प्रक्रियेकडे वळते आहे. स्वतःच्या विकासासोबत परिसराचा विकास करणे, शेतीमालाच्या उत्पादनाबरोबरच प्रक्रिया उद्योगावर भर देणे, तसे उद्योग प्रत्यक्षात उतरवून शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारणे, या गोष्टी तेथे घडत आहेत.

***
रासायनिक खत आणि कीटकनाशकांचे घातक आणि प्रदीर्घ काळचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर मागील शेकडोे वर्षे ज्या पद्धतीची शेती पिकत होती आणि त्या सेंद्रीय पद्धतीच्या आधारावरच भारत जगात अग्रेसर होता, तो प्रवाह परत एकदा शेतीमध्ये दिसतो आहे. फक्त खतेच नव्हे, तर कीटकनाशकांमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन, आंतरपिकांच्या माध्यमातून कीडींचे व्यवस्थापन, या गोष्टींकडे तो लक्ष देतो आहे.

उद्योग उभारणे ही नव्या व्यवस्थेत सोपी गोष्ट ठरली आहे, पण तो यशस्वीपणे चालविणे ही बाब महाकठीण बनते आहे. सरकारची धोरणे आणि सरकारी अधिकार्‍यांची लाचखोरी या मुळे सारे उद्योग क्षेत्रच अडचणीत आलेले आहे. तरीही हे उद्योगक समन्वयाने मार्ग काढत परिस्थितीवर मात करीत आहेत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून फिरताना मला हे आशादायक चित्र दिसले. माझ्या पुस्तकांतून ते मी रंगविले आहेच, पण इथेही ते संक्षेपाने दिले पाहिजे असे मला वाटते...

**
मुक्काम बारीपाडा, जि. धुळे ः नाव - चैतराम पवार, व्यवसाय ः शेती, पर्यावरण रक्षण आणि ग्रामविकास
मुक्काम जामनेर ः नाव - पद्माकर चिंचोले, व्यवसाय ः शंभर टक्के सेंद्रीय शेती
मुक्काम नंदुरबार ः नाव - अनिल पाटील, व्यवसाय ः शेतकर्‍यांना लागणार्‍या सर्व फळपिकांची नर्सरी 
मुक्काम जवळे, ता. पारनेर ः नाव - रामदास घावटे, व्यवसाय - टिश्यूकल्चर केळीची रोपे विकसित करणे
मुक्काम जळगाव ः नाव - उमेश सोनार, व्यवसाय ः इन्डोस्कोपीची ‘इंपोर्ट सबस्टिट्यूट’ यंत्रे तयार करणे. 
मुक्काम सांगली ः नाव - मकरंद काळे, व्यवसाय ः आयुर्वेदिक पद्धतीने बुलेटप्रुफ जाकिटांची निर्मिती करणे.
मुक्काम कवठे महांकाळ ः नाव - देवानंद लोंढे, व्यवसाय ः ‘इंडस्ट्रियल हँडग्लोव्हज’ जपानला निर्यात करणे.
मुक्काम जालना ः नाव - नितीन काबरा, व्यवसाय ः अद्ययावत लोखंड निर्मिती कारखाना उभा करणे 
मुक्काम नगर ः नाव - दिनेश निसंग, व्यवसाय ः वैज्ञानिक पिढीच्या निर्मितीसाठी ‘संडे सायन्स स्कूल’
मुक्काम देगलूर ः नाव - भार्गवी दीक्षित, व्यवसाय ः महिलांसाठी व्यायामशाळा उभी करणे
मुक्काम सातारा ः नाव - सायली मुतालिक, व्यवसाय ः सिक्युरिटी एजन्सी व जॉब कन्सल्टन्सी

**
ही यादी शेकडो नावांची भर पडत वाढू शकते. राज्यात गावोगाव, प्रत्येक जिल्ह्यात उत्तम पद्धतीने काम करणारी माणसे आहेत. वर उल्लेख केलेल्या व्यक्तींचा वयोगट साधारणपणे 35 ते 48 आहे. तशा अर्थाने ही नवी पिढी. उद्योग आणि शेती या व्यवसायांत उल्लेखनीय काम करणार्‍या या सर्वांना मी भेटलो, बोललो; तेव्हा माझ्या असे लक्षात आले, की अभिनव संकल्पनांनी रसरसलेली ही मंडळी आपल्या परिसरात नवे प्रवाह जन्माला घालत आहेत. शून्यातून विश्व निर्माण करण्याची धमक त्यांच्यात आहे. आपल्यातील कौशल्याचा शंभर टक्के वापर करून त्यांनी स्वतःला घडविले. या आणि अशा काही निवडक व्यक्तींशी मला तुमची भेट घालून द्यायची आहे.

**
साधारण 1970 च्या दशकात भारतात ‘हरितक्रांती’ची बिजे पेरली गेली. एकेकाळी अमेरिकेतून सडका मिलो गहू मागविणारा भारत त्यानंतर या आघाडीवर स्वयंपूर्ण ठरला. संकरित बियाण्यांनी जशी ही क्रांती घडवून आणली, तशीच त्यामागे रासायनिक खतांची भूमिकाही अतिशय महत्वाची होती. पारंपरिक शेणखत, कंपोस्टच्या तुलनेत ही खते आणणे, वापरणे आणि भरघोस उत्पन्न मिळविणे शेतकर्‍यांना सोपे वाटले. पण काही दशकांतच हे चित्र पालटले. कृत्रिम उत्तेजके घेऊन आपले स्नायू बलदंड करणार्‍या पहेलवानाप्रमाणे शेतीची स्थिती झाली. धाडसी विधान करायचे झाले, तर रासायनिक खतांनी शेतकर्‍यांना आळशी बनविले आणि त्याच वेगाने शेतीला नापिक. प्रारंभीच्या काळात भरघोस उत्पादने देणारी जमीन कालांतराने अति प्रमाणात खते आणि कीटकनाशके मागू लागली. ती खारपड होत गेली. नापिकीची वेळ आली. जमिनीतील घटकद्रव्ये लयाला गेली. ही सारी निरीक्षणे विविध शास्त्रीय चाचण्यांतून मांडली गेली आणि त्यानंतर शेतीच्या पुनर्मांडणीची सुरवात झाली. जी शेती भारतात गेली अनेक शतके निर्विवादपणे टिकली, ज्या शेतीप्रधान अर्थव्यवस्थेने भारताला वैभवाच्या परमोच्च शिखरापर्यंत पोहोचविले होते, ती शेती कालबाह्य कशी ठरू शकते? या दृष्टीतून विचारमंथनास सुरवात झाली. कृतीला प्रारंभ झाला आणि सेंद्रीय शेतीचा सोनेरी काळ परत अवतरण्याची सुचिन्हे निर्माण झाली.

**
उद्योजकतेची स्थिती सुद्धा अशीच आहे. भारत कधीही एक देश नव्हता, अशी वैचारिक मांडणी करणार्‍यांच्या निष्कर्षांमध्ये राजकीय दृष्टीतून पाहिले तर तथ्य दिसू शकते, पण या देशाची भावनात्मक एकात्मता, राष्ट्रीय दैवतांना सन्मान देण्याची वृत्ती, ग्रामीण व्यवस्थेवर आधारित स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था याकडे लक्ष देणार की नाही? जातीव्यवस्थेच्या उतरंडीकडे वेगळ्या नजरेने पाहणार की नाही?

एकेकाळी रुजलेली बारा बलुतेदारीची पद्धती ही बारा प्रकारचे उद्योग होते आणि हा उद्योगाधिष्ठित समाज हेच भारताचे बलस्थान होते, या कडे आपण का लक्ष देत नाही? गांधीजींनी ग्रामस्वराज्याची, स्वयंपूर्ण खेड्यांची संकल्पना मांडली, ‘खेड्याकडे चला’चा मंत्र दिला. त्यातून त्यांना स्वयंपूर्ण भारत अपेक्षित होता. पण चुकीच्या विकास संकल्पनांनी देश खोट्या स्वप्नांच्या मागे धावला. बरे, या धावपळीत तो स्वत्व विसरला...!

नेतृत्वाच्या कणाहीन आणि दूरदृष्टीचा अभाव असलेल्या वृत्तीमुळे त्यांनी संचालित केलेल्या यंत्रणेत भ्रष्टाचाराचा भस्मासूर वेगाने कार्यरत झाला. सारा देश गिळण्याची क्षमता असलेल्या या भस्मासुराने देशालाच वेठीला धरले. राष्ट्रीय वृत्तीचा अभाव असलेल्या नोकरशाहीने देशाच्या हितापेक्षा स्वहिताला प्राधान्य दिले. यातून त्यांचे बंगले उभे राहिले, संपन्नता आली... पर्यायाने राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीतही अनैसर्गिकपणे वाढ झाली. पण या संपन्नतेचे समाजाला काहीही वाटेनासे झाले! ‘तुला जे घ्यायचे ते घे, पण माझे काम करून दे’, एवढी वस्तुस्थिती समाजाने स्वीकारली. त्याचेच प्रतिबिंब उद्योग क्षेत्रातही उमटले.

भारतात 1991 नंतर मुक्त अर्थव्यवस्था आल्याचे ढोल जोरजोराने पिटले गेले. नव्या व्यवस्थेत उद्योग सुरू करणे सोपे झाले. जुन्या परवानापद्धती, कोटा पद्धती बंद झाल्या. ‘बजाज’ने किती स्कूटर तयार करून विकायच्या हे सरकारच्या नव्हे, तर कंपनी आणि ग्राहकांच्या क्षमतेवर ठरू लागले. हा बदल स्वागतार्ह होता. पण प्रगतीत खोडा घालण्याच्या, वैयक्तिक स्वार्थापुढे देशहित क्षुल्लक समजणार्‍या व्यवस्थेने येथेही हस्तक्षेप केला.

भारतात आजघडीला सर्वसाधारण उद्योग सुरू करणे सोपे आहे, पण ते चालविणे अतिशय अवघड. उद्योगाचे स्वरुप पाहून साधारणपणे 17 ते 22 खात्यांच्या अधिकार्‍यांना हे उद्योजक तोंड देतात. त्या खात्यातील सर्वोच्च अधिकार्‍यापासून चपराशापर्यंत (वास्तविक येथे ‘सेवकवर्ग’ असा शब्द वापरता आला असता, पण वृत्तीनुसार शब्दयोजना म्हणून ‘चपराशी’!)सर्वांना पाकिटे देऊन खुश ठेवल्याशिवाय हे उद्योग व्यवस्थित चालू शकत नाहीत.

अनेक उद्योजकांनी तर मोठा पगार देऊन काही अधिकारी पदरी बाळगले आहेत, ते फक्त या खात्यांच्या तुष्टीकरणासाठी. त्यांना ‘लायझनिंग ऑफिसर’ असे गोंडस नाव आहे! संदिग्ध कायदे करणे, त्या कायद्याचा कीस पाडून उद्योजकांना हैराण करणे आणि त्यातून पळवाटा काढण्यासाठी त्यांची लूट करत स्वतःच्या तुंबड्या भरणे हे रॅकेट वरपासून खालपर्यंत पसरले आहे. ‘एमआयडीसी’त मोठा प्लॉट हवा असेल, तर संबंधित मंत्र्याच्या खजिन्यात काही कोटींची भर घालावी लागते. हे चित्र विषण्ण करणारे आहे.

अशा परिस्थितीत उद्योजक आपापले व्यवसाय करीत आहेत. आपल्यापुरती साधनशुचिता वापरून ते प्रगतीच्या वाटा चोखाळत आहेत.

**
मी मागील दोन-अडिच वर्षे विविध जिल्ह्यांत फिरतो आहे. तिथल्या सर्व स्तरांत संपर्क साधतो आहे. 
वेगळेपणाने काम करणार्‍या उद्योजक-शेतकर्‍यांना शोधून त्यांच्या कामांचा घेतलेला वेध माझ्या विविध जिल्ह्यांच्या ‘आयकॉन्स’ या मालिकेतील पुस्तकांतून मांडतो आहे. ही माणसे, हे खरे धन आहे. ते सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. या लेखामागे हाच हेतू आहे.

**

धुळे जिल्ह्याच्या अगदी पश्‍चिमेच्या कोपर्‍यात गुजरातच्या सीमेलगत साक्री तालुक्यात बारीपाडा नावाचे सातआठशे लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे. गाव कसले, तो एक ‘पाडा’च. या पाड्याने आज राष्ट्रीय पातळीवर कीर्ती प्रस्थापित केली आहे. शेती, पर्यावरण रक्षण, ग्राम स्वावलंबन हे सरकार दरबारी भोंगळपणे वापरले जाणारे शब्द प्रत्यक्षात किती परिणामकारकपणे अंमलात येऊ शकतात, ते या पाड्याने दाखवून दिले आहे. 
सर्व प्रयोगांमागे आहे चैतराम पवार हा त्याच गावातील तरुण. बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण घेतलेला हा तरुण शहरातील स्पर्धेत न अडकता आपल्या गावी परतला. आपल्या गावात सुरू असलेल्या विकास कामांत त्याने सहभागी होण्यास सुरवात केली आणि पाहता पाहता या सार्‍या कामांचे नेतृत्वच त्याच्या हाती एकवटले. दीड हजार हेक्टरचे घनदाट जंगल या गावाने राखले आहे.

एकेकाळी टँकरने पाच किलोमीटरवरून पाणी आणावे लागत असलेल्या या गावात पाणी अडविण्यावर इतक्या प्रामाणिकपणे काम झाले, की आज हे गाव परिसरातील चार गावांची तहान बाराही महिने भागविते. मागील 10 वर्षांत या गावाने टँकर पाहिलेला नाही! भातशेतीमध्ये ‘चार सुत्री’ पद्धतीचा अवलंब करून स्थानिक ‘इंद्रायणी’ या वाणाचे भरघोस उत्पादन हे गाव घेते. 
सरकारी योजना म्हणजे ‘अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही.’ मात्र या वृत्तीला या गावाने पूर्णतः फाटा दिला. प्रत्येक योजना त्यातील अपेक्षित हेतूशी प्रामाणिक राहून अंमलात आणली. कुर्‍हाडबंदी असो की शिक्षणसुविधा... प्रत्येक पैलूवर बारकाईने लक्ष दिले गेले. त्यातून या गावातील स्थलांतर शंभर टक्के थांबले. कामे शोधण्यासाठी गावाबाहेर जाणारी नवी पिढी आपल्या गावी परतली.

**
जळगाव जिल्ह्याच्या जामनेर या तालुक्याच्या ठिकाणी पद्माकर चिंचोले नावाचे गृहस्थ राहतात. यांचा मुख्य व्यवसाय शेती. शंभर टक्के सेंद्रीय शेती, हे त्यांचे वैशिष्ट्य. एकेकाळी हे गृहस्थ सुद्धा रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या प्रवाहात सहभागी झालेले. पण साधारण 1995 च्या मुमारास ते भानावर आले.

समाधानकारक उत्पादन मिळून सुद्धा आपली शेती तोट्यात का जाते आहे, हे त्यांना कळत नव्हते. हिशेब 
घालून पाहण्यास सुरवात केली, तसे कोडे उलगडले. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांची भूक दरवर्षी चढत्या क्रमाने वाढत होती. जमिनीला द्याव्या लागणार्‍या खतांची मात्रा आधीच्या तुलनेत तिपटीपेक्षा जास्त झाली होती. जमिनीतील घटकद्रव्ये आणि पोषणमूल्यांनी न्यूनतम पातळी गाठलेली होती. माती कडक झालेली होती. तिची जलधारणक्षमता क्षीण झाली होती. कीटकनाशकेही अधिक क्षमतेची लागत होती. जुन्या कीटकनाशकांनी कीड मरेनाशी झाली होती.

डोळे उघडले आणि त्यांना भविष्याचे भयंकर चित्र दिसू लागले. पद्माकर चिंचोले यांनी राज्यभर प्रवास केला. सेंद्रीय शेतीची उदाहरणे पाहिली. त्या विषयावरील वाचन केले आणि त्यांच्या असे लक्षात आले, की हरितक्रांतीच्या निमित्ताने भारतात घुसलेला हा ‘ट्रोजन हॉर्स’ आहे. रासायनिक खतांच्या माध्यमातून देशाला खिळखिळे करणारे, अनुत्पादकतेकडे नेणारे धोरण अंमलात येते आहे. एक सामान्य शेतकरी म्हणून ते फक्त स्वतःच्या शेतात उत्तम प्रयोग करून सर्वांसमोर ठेवू शकत होते.

घरच्या जनावरांच्या आधाराने त्यांनी शेणखत, गांडुळखताची सुरवात केली. शेताची रासायनिक खते पूर्णपणे बंद केली. आजकाल ‘शेततळी’ हा सरकारी तिजोरीवर राजरोस डाका धालून पैसा कमावण्याचा राजमार्ग बनला आहे. कधी तळी खणून तर कधी न खणताच पैसा लाटला जातो. बरे, या शेततळ्यांचा मुख्य हेतू जमिनीतून वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीच्या कुशीत मुरविणे आणि भूजलपातळी वाढवून परिसर संपन्न करणे हा आहे. प्रत्यक्षात घडते असे आहे, की जमिनीचा उतार लक्षात घेऊन सर्वात वरच्या टोकाला शेततळे खणले जाते. जमिनीतील पाणी उपसून ते शेततळ्यात भरले जाते. तेथून ते पाईपद्वारे वीजपंपाशिवाय शेतभर फिरविले जाते. यातून जमिनीतील पाणीपातळी तर खाली जाते आहेच, पण वाया जाणारे पाणी अडवून जिरविण्याच्य मुख्य हेतूलाच तडा जातो आहे. आर्थिक लाभासाठी अधिकारी कानाडोळा करतो आणि चुकीच्या धारणांनी शेतकरी स्वार्थ साधतो.

पद्माकर चिंचोले यांच्या शेतात मात्र शेततळ्याचा आदर्श पाहावयास मिळतो. डोंगरउतारावरून वाहणारे पावसाचे पाणी आपोआप या तळ्यात साचते आणि जमिनीत मुरते. आपल्या खडकाळ माळरान असलेल्या जमिनीत त्यांनी शेजारच्या तळ्यातील गाळ टाकून आपली शेती जिवंत केली आहे. पाट-पाण्याचा विषय तर सोडाच, त्यांनी ठिबकवरही शेती केलेली नाही. त्यांच्याकडे स्प्रिंकलरचा उत्तम उपयोग करून शेती केली जाते. साधारण 10 वर्षांच्या मेहनतीत त्यांनी 100 टक्के सेंद्रीय शेती यशस्वी करण्यात यश मिळविले आहे.

**
नांदेड जिल्ह्याचा मुदखेड तालुका आता राज्याच्या ‘फ्लोरीकल्चर’च्या नकाशावर ठळकपणे पुढे येतो आहे. एकेकाळी सरकारी नोकरी करणारे प्रसाद देव आता या व्यवसायात रममाण झाले आहेत, इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्यासह परिसरातील शेतकर्‍यांचेही हित जोपासण्यासाठी शेतकरी गट बनविले, सरकारी योजनांचा लाभ घेतला आणि शेडनेट, पॉलिहाऊस यांच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशा शोधण्याचा प्रयत्न केला. कोकोपीटचा वापर करून फुले फुलविण्यातही त्यांनी चांगलेच यश मिळविले.

साधारण चार पाच वर्षांच्या मेहनतीतून त्यांच्याकडे जरबेरा या परदेशी फुलाबरोबरच आता अनेक देशी फुलेही फुलतात. या फुलांचे मार्केट त्यांनी देशभर शोधले आहे. मार्केमधून ऍडव्हान्स पैसा घेऊन त्यांना फुले पुरविताना आता त्यांना कसलाच त्रास होत नाही. कारखान्यावर ऊस घालून सरकारच्या दयेवर जगणे आणि हप्त्याहप्त्याने पैसे घेणे, या त्रासातून या शेतकर्‍यांची मुक्तता झाली आहे.

**
नंदुरबार येथे एका तरुणाने एक नर्सरी चालविली आहे. ‘नर्सरी’ म्हटल्यानंतर सर्वसाधारणपणे आपल्या डोळ्यासमोर शोभेची फुले, लॉन, बोन्साय केलेली झाडे, असे प्रकार येतात. अनिल पाटील यांच्या नर्सरीची गोष्ट वेगळी आहे. इथे ढोबळी मिरची, वांगी, टोमटो, मिरची... अशा प्रकारच्या विविध फळझाडांची रोपे मिळतात! शेतीला दिलेली ही पूरक उद्योगाची जोड...!

आपल्या परिसरातील शेतकर्‍यांना उत्तम उत्पादन घेण्यात मदत व्हावी, या हेतूने या तरुणाने अशा प्रकारच्या नर्सरीला प्रारंभ केला. एखाद्या छोट्या शेतकर्‍याला चांगल्या दर्जाच्या बियाण्याचे अख्खे पाकीट गरजेचे नसते आणि परवडणारेही नसते. त्याच्यासाठी रोपेच तयार करून दिली, तर त्याचा फायदा होईल आणि आपल्यालाही चार पैसे मिळतील, या प्रेरणेतून या तरुणाने नर्सरीला प्रारंभ केला. तयार रोपे नेल्याने शेतकर्‍यांना जवळजवळ 100 टक्के उगवणक्षमता मिळते आणि उत्तम दर्जाची रोपे माफक किमतीत मिळाल्याने त्यांचे प्रारंभिक भांडवल वाचते. शिवाय, शेतीत पहिला महिनाभर घ्यावयाची रोपांची काळजीही मिटते. शेतातील रोपे थेट पहिल्या महिन्यानंतरच्या टप्प्यावरच उमलू लागतात. उत्तम फळधारणा होत असल्याने मालाला चांगला भाव मिळतो...!

स्वतःपलिकडे जाऊन समाजाचा व्यापक विचार करण्याच्या वृत्तीतून अशा प्रकारचा व्यवसाय जन्मतो आणि त्यातून सर्वांचेच भले होऊ शकते.

**
नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील जवळा या छोट्याशा गावात रामदास घावटे या तरुणाने टिश्यूकल्चर तंत्राने केळीची रोपे तयार करण्याचा उद्योग सुरू केला आहे. स्वतः एम.एस्सी.पर्यंत शिकलेल्या या तरुणाने आपल्या परिसरातील शेतीची अडचण आणि मर्यादा ओळखून हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. भारतात ‘जैन ग्रुप’ने टिश्यूकल्चर केळीचा प्रारंभ केला. ती परंपरा आता हळू हळू सर्वत्र पसरते आहे.
शेतकर्‍यांना चांगले उत्पादन मिळवून देणारी टिश्यूकल्चरची केळीची जात रामदास यांच्या अद्ययावत प्रयोगशाळेत तयार होते. ग्रामीण भागात एखादा कृषिसेवा आधारित उद्योग सुरू करताना एखाद्या तरुणाला जो त्रास होतो, तोच रामदास यांनाही झाला. जागेपासून विजेपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी झगडावे लागले. पण तीन-चार वर्षे नेटाने प्रयोग लावून धरले आणि त्यांनी त्यात यश मिळविले.

**
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मोलगी या अतिशय छोट्याशा गावात रामसिंग व रुषा वळवी राहतात. खेड्यातील आपल्या शेतात जे पिकेल, ते शहरात आणून विकायचे आणि त्यातून मिळणार्‍या चार पैशांतून आपली वर्षभराची दरिद्री उपजीविका चालवायची, हा या परिसरातील वनवासी बांधवांचा आयुष्यक्रम. त्यात हे दाम्पत्य वेगळा विचार घेऊन उतरले.

आपल्या परिसरातील समाजबांधवांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याशिवाय त्यांच्या जीवनमानात 
सुधारणा शक्य नाही, असे लक्षात घेऊन त्यांनी प्रारंभी स्वखर्चाने शेतीमालावर प्रक्रियेचे काही प्रयोग करून पाहिली. त्यांच्यातील उत्कर्षाची धडपड लक्षात आल्यानंतर नंदुरबारच्या कृषिविज्ञान केंद्राने त्यांना सहकार्य करण्याचे ठरविले.

एक एक करून यंत्रांची खरेदी करीत त्यांनी आपला कुटिरोद्योग सुरू केला. हा खरोखरीचाच ‘कुटिरोद्योग’ आहे! एका झोपडीत हा उद्योग चालतो. परिसरातील शेतकर्‍यांची डाळ, तांदुळ यावर येथे प्रक्रिया होते. त्यातून त्या शेतकर्‍यांना बाजारपेठेत चांगला भाव मिळतो. या दाम्पत्यालाही चार पैसे मिळतात.

परिसरातील शेतकर्‍यांना एकत्र करून त्यांनी विविध उत्पादनांचे सरबत करून विकण्याचाही व्यवसाय सुरू केला आहे. ही सरबते घेऊन ते राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनांतही सहभागी होतात..! ग्रामीण भागात उद्योजकता रुजवून तेथील समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा यशस्वी प्रयत्न नंदूरबार येथे कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून प्रभावीपणे होतो आहे.

**
याच जिल्ह्यात हिरालाल ओंकार पाटील हे नाव प्रसिद्ध आहे. धर्मेंद्र हा त्यांचा मुलगा. हे पिता-पुत्र सतखेडा, ता. शहादा येथे शेती करतात. सेंद्रीय शेतीवर त्यांचा भर आहेच, पण ग्रामीण पर्यटन हा त्यांच्या आवडीचा विषय. आवडीतून उत्पन्नाचे चांगले साधन कसे विकसित होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे या परिवाराचे जय श्रीकृष्ण कृषिपर्यटन केंद्र.

आडवाटेवरी एका छोट्या खेड्यात कृषिपयर्यटन केंद्र विकसित करणे हीच मुळी आश्‍चर्याची बाब. पण या परिवाराने ते प्रत्यक्षात उतरविले. पण हे पारंपरिक पद्धतीचे कृषिपर्यटन केंद्र नाही. इथे शेतीशी निगडित असंख्य प्रात्यक्षिके पाहावयास मिळतात. औषधी वनस्पतींचे असंख्य प्रकार, औधषी उपयोग असलेली झाडे, केक्टसचे 200 हून अधिक प्रकार, गुलाबाचे असंख्य प्रकार... इथल्या विविधतेबद्दल किती सांगावे?
एखाद्या हाडाच्या शेतकर्‍याने विकसित केलेले हे केंद्र शेतीशी संबंध नसलेल्या माणसाच्या माहितीत भर घालणारे आणि शेतीत कष्टणार्‍यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.

**
सांगली जिल्ह्याती विटा येथे अभय भंडारी यांची भेट झाली. हे गृहस्थ व्यवसायाने बांधकाम व्यवसायिक. पण विविध चळवळींत त्यांचा सहभाग इतका, की लोक त्यांना बांधकाम व्यावसायिकापेक्षा कार्यकर्ता म्हणूनच जास्त ओळखतात. असेच कार्यकर्तेपण जगताना ते लिंबाच्या झाडांविषयी जागृती करीत. लिंबाचे असंख्य गुणधर्म आहेत. ते समजावून सांगताना एका ठिकाणी त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला - ‘सांगणे सोपे आहे, करणे अवघड. तुम्ही करून दाखवा आणि मग शिकवा.’ 
त्यातून प्रयोगशीलतेला बळ मिळाले आणि त्यांनी चक्क ओसाड माळरानावर साडेतीन एकरांत नंदनवन फुलविले. हे माळरान म्हणजे एक टेकडीच आहे. गाव ज्या पातळीवर वसले आहे, त्यापेक्षा साधारण 150 फूट उंचीवर या टेकडीचा माथा आहे. तेथे त्यांनी साधारण 4500 हजार झाडे लावली आहेत. त्यात सुमारे 300 प्रकारची झाडे आहेत. विशेष म्हणजे, या परिसरात त्यांनी पाणी अडवून जिरविण्याचा यशस्वी प्रयोगही केला आहे. म्हणून उन्हाळ्यात गावातील लोक पाण्यासाठी वणवण हिंडतात, तेथील बोअर कोरडे पडतात, पण तेथून 150 फुट उंचीवर असलेल्या भंडारी यांच्या बोअरला चांगले पाणी असते...! विशेष म्हणजे, आजकाल सगळीकडे बोअरला खारे पाणी येत असताना या बोअरचे पाणी मात्र गोड आहे!

**
जिद्दीतून एखादा शेतीआधारित व्यवसाय कसा उभा राहू शकतो, हे पाहायचे असेल तर नंदूरबार जिल्ह्याच्या तळोदा येथील भिकाभाऊ चौधरी यांना भेटले पाहिजे. या माणसाने ‘टाकावूतून टिकावू’ तत्वावर उत्तम व्यवसाय उभा केला आहे. एकेकाळी सायकलवर फिरणे कठिण असलेला हा माणूस आज कारमध्ये फिरतो. कारमधून फिरण्याचे कौतुक नाही, पण ज्या स्थितीतून ही व्यक्ती पुढे आली, त्याची दखल घेणे आवश्यक वाटते.

वनखात्यातील नोकरी सांभाळून भिकाभाऊंनी प्रारंभी गांडुळखताचा प्रकल्प उभारला. पुढे त्याला शेणखत व कंपोस्टच्या मिश्रणाची जोड दिली. लिंबोळी पावडर, पेंडेचे खत यांचे उत्पादनही त्यांनी सुरू केले. एवढेच नव्हे, तर तळोदा पालिकेचे कचरा उचलण्याचे टेंडर मिळवून त्या कचर्‍यावर प्रक्रिया करीत त्याचा व्यावसायिक उपयोगही त्यांनी केला. गावात मरून पडलेले जनावर सुद्धा जैविक खतासाठीचे खूप महत्वाचे साधन आहे, हा डोळस विचार करून भिकाभाऊंचा व्यवसाय उभा राहातो आहे. कचरा ही टाकावू बाब आहे, त्याची विल्हेवाट लावणे अवघड असते, हे समज एका सामान्य माणसाने आपल्या कृतीतून दूर केले! एक अर्धशिक्षित सामान्य माणूस ग्रामीण भागातही अभिनव संकल्पनांच्या साह्याने स्वतःची व परिसराची प्रगती करू शकतो, हे सिद्ध करणारे त्यांचे 
उदाहरण!

**
जालना शहर ओलांडून परभणीच्या दिशेने निघालात, तर जेमतेम 7-8 किलोमीटर अंतरावर सिंधी काळेगाव नावाचे गाव आहे. त्या गावाच्या आधीच डाव्या हाताला सीताबाई मोहिते यांचे फळप्रक्रिया युनिट लागते. एकेकाळी शेतमजुरी करणार्‍या या बाईंनी आज स्वतःचे युनिट उभारले आहेच, पण ज्या कृषिविज्ञान केंद्रात त्या सालदार म्हणून काम करीत होत्या, त्याच केंद्राच्या आज त्या एक संचालिका आहेत! स्वकर्तृत्वावर राज्य शासनाचे विविध पुरस्कार जिंकत असतानाच त्यांनी त्याच बळावर परदेश दौराही केला असून, ‘मी थँक्यू आणि सॉरी या दोनच शब्दांवर सारे जग फिरून आले’, असे त्या सांगतात!

सीतमबाई आणि त्यांचे पती रामराव मोहिते यांनी स्वकष्टातून थोडीशी शेती घेतली आणि तेथे आवळा, आंबा, लिंबू आदी फळांची लागवड केली. केवळ त्यांच्या विक्रीवर समाधान न मानता त्यांना त्या फळांवर प्रक्रिया करण्याची तयारी केली. त्या साठी स्वतःची बुद्धी वापरून सीताबाईंनी इचलकरंजीहून खास यंत्रे तयार करून घेतली. उदाहरण म्हणून सांगायचे झाले, तर आवळा प्रक्रियेसाठी वापरले जाणारे त्यांचे यंत्र काही जुजबी फेरफार केले की लिंबासाठी वापरता येते!

प्रारंभी जालना शहरातील एखाद्या कॉलनीपासून सुरू झालेली त्यांच्या विक्रीची वाटचाल आज जिल्हाभर पोहोचली आहेच, पण परगावच्या प्रदर्शनांतूनही त्या आपला स्टॉल लावतात आणि आवळा, लिंबू, चिंच, पेरू, चिकू आदी फळांवर प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ विकतात...

** 
शेती आणि शेतीआधारित उद्योग उभारणार्‍या या व्यक्तींची तोंडओळख करून घेतल्यानंतर मी आपणास घेऊन जाऊ इच्छितो काही उद्योजकांकडे आणि उद्योजक वृत्तीच्या व्यक्तींकडे. यांनी आपली वैयक्तिक कौशल्ये उद्योगात परावर्तित केली. त्यातून नवे काम उभे राहिले. स्वतः घडताना इतरांना घडविणे आणि परिसराचा विकास करणे, हे सूत्र यात एकसमान आहे. ही सगळी माणसे शून्यातून उभी राहिलेली आहेत. त्यांच्या परिवारात कुठेही कोणी उद्योजक नव्हते. त्यांना कसल्याची प्रकारचे ‘बॅकिंग’नव्हते. तरीही ही माणसे उभी राहिली, ती स्वतकर्तृत्वावर...!

परंपरागत शेतीमध्ये मूल्यवर्धनाचे हे प्रयोग निश्‍चितच मार्गदर्शक ठरणारे आहेत. कष्टाला कल्पकतेची दिलेली जोड कशा प्रकारे प्रगतीच्या वाटा खुल्या करते, हेच या उदाहरणांतून दिसते. या कल्पकतेला आर्थिक सामथ्याची सुद्धा फार मोठी जोड लागत नाही. अशा प्रकारच्या कामांसाठी साह्य करणार्‍या सरकारच्या विविध योजनांचा लाभही यासाठी घेता येतो. कृषि विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, डीआरडीए, कृषि विद्यापीठ आदींच्या सहकार्यातून प्रगतीच्या या वाटा खुल्या होऊ शकतात. गरज आहे ती स्वतःहून पुढाकार घेऊन नवे काही उभे करण्याच्या इच्छाशक्तीची.

** ** 

अशीच काही उदाहरणे उद्योगाच्या संदर्भातील... उद्योग उभा करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे उद्योजकाचा ठाम निर्धार आणि विश्वास. मी व्यवसाय उभा करणार आहे आणि मी यशस्वी होणारच आहे, या ठाम विश्वासातून उद्योग उभा राहू शकतो. अनेक उद्योजकांच्या अनुभवाचा परिपाक हा, की भांडवल, बाजारपेठ, विपणन या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण त्यावाचून उद्योगाची उभारणी अडत नाही. ठाम विश्वास आणि निर्धार असेल, तर भांडवल उभे राहते आणि निश्‍चित दिशा ठरली तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या मार्गी लागू शकते.

** **
कवठे महांकाळजवळील हिंगणगाव या तीन-चार हजार लोकवस्तीच्या गावात तयार झालेले हँडग्लोव्हज जपानला निर्यात होतात, ते ही दरमहा एक-दोन कंटेनरच्या हिशेबात असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल? दलित समाजात जन्माला आलेल्या देवानंद लोंढे या तरुणाने ही किमया साधली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ स्वयंसेवी संस्थेत काम करणार्‍या देवानंद यांना त्याच कामांसाठी परदेशातही जाण्याची संधी मिळाली.

अशी कामे करताना आपल्य गावातील गरीब आणि महिलांसाठी काही केले पाहिजे, या भावनेतून त्यांनी या उद्योगाचा पाया रचला. त्यांना अनेकांनी हा उद्योग विकसित करण्यासाठी मदतही केली. पण स्वतःचा उद्योग उभा करणे आणि जपानच्या निकषात बसून त्यांना हवे ते उत्पादन त्या पद्धतीने तयार करून देणे, हे विशेष कौशल्याचे काम होते. ते त्यांनी साध्य केले. परिसरातील 200 हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देतानाच त्यांनी देशाला परकीय चलनही मिळवून दिले.

या उद्योगात जम बसल्यानंतर आता ते त्या परिसरात अमाप पिकणार्‍या चिंचेवर प्रक्रिया करून ती उत्पादने बाजारपेठेत आणण्याच्या तयारीला लागले आहेत.

**
औरंगाबादच्या एका खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअर झालेल्या नितीन काबरा यांची गोष्ट अशीच. प्रारंभी नोकरी करणार्‍या नितीन यांनी पुढे वडिलांना मदत करण्यासाठी त्यांच्या लोखंडी सळया निर्मितीच्या कारखान्यात मदत करण्यास प्रारंभ केला. या उद्योगात काम करताना त्यांनी या उद्योगातील कौशल्ये अशा प्रकारे आत्मसात केली, की ते लोखंड निर्मिती उद्योगातील तज्ज्ञ बनले.

लोखंडी सळया निर्मितीच्या व्यवसायात जगभरात नवे प्रवाह कोणते आहेत, नवी तंत्रज्ञाने कशी विकसित होत आहेत यांचे अद्ययावत ज्ञान असलेल्या नितीन काबरा यांनी आपल्या कौशल्यातून नाशिक येथे एक स्टील प्लांट उभा करून दिला आणि तो व्यवस्थितपणे चालवूनही दाखविला. जालन्यातूनच अशा प्रकारच्या कारखान्याच्या उभारणीसाठी प्रयत्न करणार्‍या तीन युवकांच्या लक्षात त्यांची ही खासियत आली आणि त्या तिघांनी नितीन यांना आपल्या सोबत येण्याचा आग्रह केला.

नितीन यांच्याकडे उद्योग उभारणीत देण्यासाठी भांडवल नव्हते, पण ती जबाबदारी इतर तिघांनी उचलली आणि नितीन यांच्या केवळ बौद्धिक क्षमतेवर त्यांची समसमान भागीदारी आकाराला आली. जालना येथील लोखंड निर्मिती विश्वात ‘भाग्यलक्ष्मी स्टील्स’ हा उद्योग आज आपली वेगळी ओळख घेऊन उभा आहे. उत्तम दर्जाचे सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाने तयार झालेले लोखंड विकत असतानाच सामाजिक बांधिलकी जपणार्‍या या उद्योगाने प्रदूषण नियंत्रणाची यंत्रणा अत्यंत प्रभावीपणे येथे अंमलात आणलेली आहे. आर्थिक क्षमता, बौद्धिक कौशल्य, विपणनातील कौशल्य हे गुण असलेली वेगवेगळी चार माणसे एकत्र येऊन कशा प्रकारे एखादा उद्योग उभा करून शकतात, याचे हे उदाहरण.

**
उत्तम शिक्षण घेतलेल्या चार जणांनी एकत्र येऊन उभारलेले हे उदाहरण पाहात असतानाच एकट्या 
माणसाने कसलीही तांत्र-शैक्षणिक पार्श्‍वभूमी नसताना ‘एन्डोस्कोपी’सारख्या अतिशय संवेदनशील क्षेत्रातील उपकरणे तयार करून आयात-पर्यायी बाजारपेठेत जम बसवावा, हे आगळेच उदाहरण. जळगावच्या उमेश सोनार यांनी ही किमया केली आहे. एन्डोस्कोपी सर्जरीसाठी लागणार्‍या सुमारे 20 प्रकारच्या उपकरणांची साधारण 250 प्रकारची वेगवेगळ्या आकार-कौशल्यांतील ‘व्हरायटी’ ते निर्माण करतात. विशेष म्हणजे हा उद्योग उभा करणारे उमेश हे पदवीधरही नाहीत!

बी.कॉम. शिक्षण घेत असतानाच कॉलेज सोडावे लागलेल्या उमेश यांनी वास्तविक प्रारंभी चक्क गॅरेज थाटले होते. पण यंत्रांशी खेळण्याची बालपणापासूनची सवय आयुष्यात कामाला आली आणि शहरातील एन्डोस्कोपिक सर्जन डॉ. रवींद्र महाजन यांना मदत करण्याच्या हेतूने उमेश यांनी प्रारंभी स्टेनलेस स्टीलचा ऑपरेशन टेबल दुरुस्त करून दिला. त्यातील हायड्रोलिक सिस्टीम बिघडलेली होती आणि उच्चशिक्षित तंत्रज्ञांनी तो टेबल बाद करून नवा विकत घेण्याचे डॉक्टरांना सूचित केले होते...! येथून सुरू झालेली उमेश यांनी ही सुरवात डॉक्टरांकडे असलेल्या एन्डोस्कोपी यंत्रांच्या मायक्रोवेल्डिंगपर्यंत पोहोचली आणि तेथूनच त्यांना स्वतंत्र उपकरणांच्या निर्मितीची प्रेरणा मिळाली.

या क्षेत्रात प्रामुख्याने जर्मन बनावटीची उपकरणे आदर्श मानली जातात. त्या उपकरणांना समकक्ष असलेली उपकरणे उमेश यांनी तयार केलेली आहेत. ती सध्या देशभरात पोहोचतात. परकीय बनावटीच्या उपकरणांच्या तुलनेत ती अधिक टिकाऊ आहेत, हे विशेष!

**
आयुर्वेद केवळ शरीरस्वास्थ्य टिकविण्यात काम करत नाही. आयुर्वेदाच्या आधाराने ‘बुलेटप्रुफ जाकीट’ तयार करता येते...! हे संशोधन आहे सांगलीच्या मकरंद काळे यांचे! हे गृहस्थही या क्षेत्रात शिकलेले नाहीत! हे सुद्धा वाणिज्य पदवीधर. मार्शल आर्टमध्ये उच्चशिक्षित. पण आयुर्वेदाच्या अभ्यासातून त्यांनी काही कॉम्बिनेशन्स अशी बनविली, की त्याची तयार प्लेट ‘बुलेटप्रुफ जाकीटा’चे काम करते!

डाळी, कडधान्ये, पिष्टमय पदार्थ यांच्या प्रक्रियेतून मकरंद काळे काही विशिष्ट प्रकारचा लगदा तयार करतात. त्यातून तयार झालेल्या पदार्थावर प्रक्रिया केल्यानंतर वेगवेगळ्या क्षमतांच्या प्लेटस् तयार होतात. परदेशी बनावटीच्या जाकिटांत जशी वेगवेगळ्या क्षमतेची क्रमवारी आहे, तशीच येथेही आहे. पण सर्वात महत्वाचा फरक हा, की ठरवून दिलेल्या विशिष्ट मुदतीनंतर परदेशी बनावटीची जाकिटे निकामी होतात आणि मुंबईतील हल्ल्यात जसे वरिष्ठ पोलिस अधिकारी मारले गेले, तशी अवस्था होते. मकरंद यांनी तयार केलेली जाकिटे निकामी होत नाहीत!

पण भारतात अशा प्रकारच्या ‘इनोव्हेशन्स’ला राजमान्यता मिळणे अवघड जाते. तशीच त्यांची अवस्था झाली आहे. परदेशातील अशा खरेदीतून होणारे आर्थिक (गैर)व्यवहार आपल्या कानावर येतात...! त्यामुळे अशा ‘स्वदेशी’ उपकणांना चटकन मार्केट मिळत नाही...!

**
छंदाचे रुपांतर व्यवसायात करता येते का? ते तसे झाले तर काय काय घडू शकते? त्यासाठी नगर येथील दिनेश निसंग यांना भेटायला हवे. एक सामान्य विद्यार्थी असलेल्या दिनेश यांनी शिकताशिकताच एका क्लासमध्ये व्यवस्थापनातील नोकरी पत्करली आणि तेथून त्यांना उदरनिर्वाहासाठी पुरेसे उत्पन्नही मिळू लागले. पण त्याच वेळी त्यांच्या असे लक्षात आले, की आजच्या प्रचलित शिक्षण पद्धतीत तयार होणार्‍या विद्यार्थ्यांच्या शास्त्रविषयातील मूलभूत संकल्पनाही स्पष्ट नाहीत.

त्यांना आकाशदर्शन, विज्ञानातील प्रयोग यांचा छंद होता. त्यातूनच त्यांच्या मनात विद्यार्थ्यांच्या मनात प्रयोगांतून विज्ञानाच्या संकल्पना रुजविण्याचा विचार आला. त्यातून शास्त्रविषयात सुसंस्कारित होणारी पिढी पाहून हळूूहळू याच छंदाचे रुपांतर त्यांनी व्यवसायात केले.

ते पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील विज्ञान विषयाची कक्षा लक्षात घेऊन, विज्ञानातील संकल्पना स्पष्ट करणारी काही खेळणी बनवितात. त्या साठी त्यांनी काही अभ्यासक्रमच तयार केले आहेत. हे पॅकेज ते विद्यार्थ्यांना देतात. हे विद्यार्थी वर्षभर उपक्रमाच्या संपर्कात राहतात. दर रविवारी त्यांचा ‘क्लास’ होतो. त्यातूनच ‘संडे सायन्स स्कूल’ची संकल्पना जन्मास आली. आजमितीला ते पुण्यातून हा व्याप सांभाळतात. महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांत ते पोहोचले असून महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू येथेही त्यांच्या उपक्रमाची रुजुवात झाली आहे.
हे व्यावसायिक मोड्यूल तयार करताना ते त्यातून आर्थिक उत्पन्नापेक्षाही नव्या पिढीला घडविण्याकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे, ही संकल्पना उत्तम असल्याचे पाहून त्यात ‘गुंतवणूक’ करू इच्छिणार्‍या काही मोठ्या ‘गुंतवणूकदारां’ना त्यांनी या पासून दूर ठेवले आहे!

**
भार्गवी दीक्षित यांची कथा आणखी वेगळी. नांदेड जिल्ह्यातील देगलूरसारख्या ग्रामीण भागात काम करताना कोणता व्यवसाय केला पाहिजे? त्यांना महिलांचे आरोग्य हा विषय महत्वाचा वाटला. त्यातून त्यांनी प्रारंभी महिलांसाठी योगासनाचे वर्ग सुरू केले आणि त्याला अधिक चांगल्या उपक्रमाची जोड देताना चक्क महिलांसाठीच्या व्यायामशाळेची, ‘जिम’ची जोड दिली.

ग्रामीण भागात जिथे महिलांनी घराबाहेर पडणेच अवघड, तेथे महिलांच्या ‘जिम’ला कसा प्रतिसाद मिळेल, या बद्दल अनेकजण साशंक होते. अगदी, त्यांना मदत करणारे जिल्हा उद्योग केंद्र सुद्धा. पण भार्गवी यांनी जिद्दीनेे हे काम उभे केले. ‘जिम’चे काम पुढे नेत असतानाच महिलांना स्वावलंबी करण्याची गरज त्यांना महत्वाची वाटू लागली. त्यातून त्यांनी महिला बचतगटाची स्थापना केली. त्यांना अवगत असलेली कौशल्ये त्यांनी परिसरातील गरजू महिलांना शिकविली. स्वतःच्या नावावर कामे मिळविण्यास सुरवात केली आणि त्यातून बचतगटाची चळवळ उभी राहिली. ज्या महिला जे कम करतात, त्याचे पूर्ण उत्पन्न त्यांनाच मिळते, हे इथले वैशिष्ट्य.

**
देगलूरमधील भार्गवी दीक्षित यांची वेगळ्या वाटेवरील ही वाटचाल अनुभवताना सातारा येथील सायली मुतालिक यांचेही नाव आठवते. प्रामुख्याने पुरुषांची ‘मक्तेदारी’ असलेल्या ‘सिक्युरिटी एजन्सी’चे काम त्यांनी सातारा येथे उभे केले. मूळच्या पुण्यातील असलेल्या सायली विवाहानंतर सातार्‍यात गेल्या. मुले शाळेत जाऊ लागली, तसे उरलेल्या वेळेत काय करायचे, या विचारातून त्यांनी आधी ‘पार्टनरशिप’मध्ये हे काम सुरू केले. पुढे हाच व्यवसाय त्यांनी स्वतंत्रपणे सुरू केला.

‘एका महिलेला हे काम कसे द्यायचे?’ या विचारापासून ‘एक महिलाच हे काम अधिक सक्षमपणे करू शकते, त्यामुळे एका महिलेलाच हे काम द्यायचे’, इथपर्यंतचा क्लायंटच्या विचारांचा प्रवास त्यांनी सुमारे चार-पाच वर्षांच्या वाटचालीतून कमावला. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्था, उद्योग यांना त्या आपल्या सेवा देतात. त्यांच्या माध्यमातून सध्या साधारण 1000 जणांना रोजगार मिळतो आहे.

या सेवा देतानाच त्यांच्यासमोर ‘कॉम्प्यूटर ऑपरेटर’ सारख्या गरजा मांडल्या जाऊ लागल्या आणि त्यातून त्यांनी या क्षेत्रातील मनुष्यबळ पुरविण्यासही प्रारंभ केला. सध्या विविध ठिकाणी कामांचे खासगीकरण सुरू आहे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने तांत्रिक मनुष्यबळाची मोठी गरज लागते. ती गरज त्या पुरवितात. सातार्‍यात राहून त्या सध्या जवळजवळ संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात आपल्या सेवा देतात. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या अशा प्रकारच्या कामाचे कंत्राटही त्यांनी पारंपरिक कंत्राटदारांच्या स्पर्धेत उतरून मिळविले होते, हे त्यांचे वैशिष्ट्य!

**
सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे, ही चर्चा आपण नेहेमीच ऐकतो. पण या क्षेत्रात भरीव काम उभे करण्याची मोठी गरज आहे. ही गरज ओळखून धुळे येथील प्रा. डॉ. अजय चांडक यांनी सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील संशोधनास प्रारंभ केला. सौर ऊर्जा देशात मुबलक उपलब्ध आहे. पण त्याचा योग्य विनियोग होत नाही, ही ओरड आपण नेहेमीच ऐकतो. या उपयोगातील मोठा अडथळा म्हणजे त्यासाठीच्या साधनांची किंमत. अद्यापही ही साधने खूप कमी प्रमाणात वापरली जात असल्यामुळे या साधनांच्या निर्मितीचा खर्च जास्त आहे.

हा खर्च कमी करणे, सौरऊर्जेला चालना देण्यासाठी त्याची सोपी मॉडेल्स विकसित करणे, या साठी प्रा. चांडक यांनी पुढाकार घेतला. ‘सोलार पॅनल’च्या आकारात त्यांनी अनेक बदल केले. चौकोनी आकाराचे पॅनल्स, घडी करण्याजोगी यंत्रे यांची वेगवेगळी मॉडेल्स त्यांनी तयार केली. त्यांचे एक विद्यार्थी राहूल कुलकर्णी यांच्या वर्कशॉपमध्ये त्यांनी हे तांत्रिक प्रयोग केले आणि त्यांच्याच सहकार्यातून नवे ‘बिझनेस मोड्यूल’ त्यांनी विकसित केले आहे.

स्वतः शास्त्रीय अभ्यासात झोकून देणे, नवे प्रयोग करणे यासाठी डॉ. चांडक आपला वेळ वापरतात आणि राहूल कुलकर्णी आपल्या वर्कशॉपमध्ये ही साधने विकसित करून त्यांचे मार्केटिंग करतात...! संशोधन, विकास आणि व्यवसाय यांची सांगड अशा प्रकारे घालता येऊ शकते, या साठीचे हे उत्तम उदाहरण...!

**
शास्त्रीय क्षेत्रात असे काम उभे करणार्‍या डॉ. चांडक आणि श्री. कुलकर्णी यांच्या तुलनेत हॉटेल चालविणार्‍या हरिभाऊ कुलकर्णी यांचे कुणाला फारसे कौतुक वाटणार नाही. पण हरिभाऊंची आर्थिक पार्श्‍वभूमी ऐकली, तर त्यांच्या या कामाबद्दल अभिमानच वाटेल. हरिभाऊ आणि त्यांचे धाकटे भाऊ यांची वये अनुक्रमे साडेतीन वर्षे आणि सहा महिने असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. ते मजुरी करत. एका मजुराची कमाई काय असणार? एक भाड्याची खोली, दोन-चार अंथरुणे-पांघरुणे आणि दोनचार भांडीकुंडी, हा त्यांचा संसार. हे कुटुंब सांगलीत वास्तव्यास होते.

त्यांच्या निधनानंतर घरमालकाने सहा महिने वाट पाहिली आणि त्यानंतर या विधवेला तिच्या मुलांसह त्याने घराबाहेर काढले. तिने गयावया करून अंथरुण-पांघरुण तेवढे मिळविले. सांगलीतील कृष्णेच्या घाटावर या स्त्रीने आपल्या कच्च्याबच्च्यांसह झाडाखाली आठ वर्षे काढली. त्यानंतर समज आलेल्या मुलांनी हातपाय हलविण्यास सुरवात केली. हरिभाऊने मजुरूपासून चहाच्या गाड्यापर्यंत सगळी कामेे केली. अखेर, एक कॅन्टीन चालविताना एका कॉलेजच्या मेसचे काम त्यांना मिळाले आणि तेथून सारे चित्र पालटले.

फिरत्या गाड्यावर खाद्यपदार्थ विकण्यापासून प्रारंभ केलेल्या साधारण दोन दशकांच्या वाटचालीत या अशिक्षित माणसाने दोन हजार मुलांची मेस आणि दोन हॉटेल असा व्याप उभा केला आहे. या पुढचे त्यांचे लक्ष्य आहे एका चांगल्या मंगल कार्यालयाचे, साधारण तीन एकरांच्या जागेत उत्तम सोयीसुविधा असलेले मंगल कार्यालय पुढील काळात उभारण्याचा त्यांचा मानस आहे...

**
शेती आणि उद्योग ही दोनच क्षेत्रे देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतात. दुर्दैवाने स्वतंत्र भारतात या दोन क्षेत्रांपैकी उद्योगाला प्राधान्याचे स्थान मिळाले. स्वातंत्र्योत्तर वाटचालीत ते स्थानही डळमळीत झाले आणि ‘व्हाईट कॉलर जॉब’च्या प्रेरणा अधिक जोमाने विकसित झाल्या. नोकर्‍या करून देश घडणार नाही. नोकर्‍या देणारे निर्माण झाले, त्यातून निर्यातीला चालना मिळाली, तरच देश उभा राहील.

एकेकाळी जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा 35 टक्क्यांहून अधिक होता, वस्त्र आणि मसाले ही भारतीय उत्पादनांची जागतिक बाजारपेठेतील मक्तेदारी होती. ब्रिटिशांच्या काळात ही घडी विस्कटली आणि ब्रिटिश प्रशासनासाठी कुशल प्रशासक तयार व्हावेत अशी शिक्षणपद्धती भारतात आणण्यात आली. त्यातून मातीशी नाते तुटण्यास प्रारंभ झाला.

स्वातंत्र्याच्या 60 वर्षांनंतर आज नवयुवक शेतीत हात घालण्यास धजावत नाही. इतर सारी क्षेत्रे आर्थिक दृष्ट्या संपन्न होत गेली, पण शेतकरी नागवाच राहिला, हे सत्य त्यांना अस्वस्थ करते. पण मागील दशकभरात या क्षेत्रानेही कात टाकली आहे. नव्या पिढीच्या नव्या संकल्पना समोर येत आहेत. शेतीमालावर प्रक्रिया करून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचल्याने चांगले उत्पन्न मिळविता येते, ते त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. बाजार समित्यांच्या माध्यमातून लुटीला सामोरे जाण्याऐवजी थेट बाजारपेठ मिळवून दलालांच्या घशात जाणारा नफा आपण स्वतःच कमवू शकतो, हे नव्या पिढीच्या लक्षात येऊ लागले आहे. यातून नव्या युगाची रुजुवात होते आहे.

उद्योग सुरू करताना त्याची उलाढाल किती, हा प्रश्‍न काहीसा गैरलागू असतो. उलाढालींच्या आकड्यापेक्षाही त्यातील अभिनव संकल्पना, त्यातून होणारी स्वयंपूर्णता, रोजगारनिर्मिती या बाबी अधिक महत्वाच्या असतात. अशा प्रकारे झालेली छोटीशी सुरवात पुढे विराट रूप धारण करू शकते. गरज असते, ती बीज रुजण्याची...!

उद्योग आणि शेती या दोन्ही क्षेत्रांत नवे प्रयोग सुरू आहेत. भारताची भूमी, येथील वातावरण आणि भौगोलिक स्थान हे सारे उद्योगांसाठी अत्यंत अनुकुल असतानाही मध्यंतरीच्या दोन शतकांच्या काळात झालेली पिछेहाट भरून काढण्याची वेळ आलेली आहे. त्यातूनच भारत ‘महासत्ता’ बनण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे. ‘मी एकटा काय करू शकेन’, या वृत्तीपेक्षाही ‘मी पुढाकार घेईन, मी यशस्वी झाल्यानंतर माझे अनुकरण नक्कीच अनेक जण करतील’ ही वृत्ती महत्वाची आहे. या सर्वांच्या मुळाशी राष्ट्रभावना असणे महत्वाचे माझे कर्तृत्व भारतमातेच्या चरणी समर्पित करण्यातच माझा विकास आहे, या भावनेने उभी राहिलेली नवी पिढी नक्कीच या देशाचे भवितव्य घडवेल. या प्रवासात चार पावले टाकून पुढाकार घेणार्‍या वर उल्लेख केलेल्या व्यक्तींची करून दिलेली ओळख याच भावनेतून आहे.

- दत्ता जोशी
9422 25 25 50 

Saturday, October 26, 2013

एका षंढ नागरिकाचे मनोगत...

नमस्कार
औरंगाबाद या थंड शहराचा एक षंढ नागरिक म्हणून आपणाशी संवाद साधताना मला आनंद होत आहे.

या शहरातील एक जागरूक नागरिक श्री. श्रीकांत उमरीकर यांनी शहरातील खड्डयाविरुद्ध आवाज उठविला आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. सध्या ते हर्सूलच्या तुरुंगात आहेत. वास्तविक, ते माझे मित्र आहेत, पण आज मी `माझे मित्र` अशी त्यांची ओळख सांगणार नाही. मी उगाच काही नेत्यांच्या, अधिकाऱ्यांच्या नजरेत येईन, मग मला त्रास होऊ शकेल. मी बालबच्चेवाला आदमी. उमरीकराना सुद्धा बायका-पोरे आहेत, पण मला काय त्याचे? मी सुरक्षित राहिलो पाहिजे. `मी, माझे कुटुंब, माझा टीव्ही, माझे घर सुरक्षित तर देश सुरक्षित`, असा माझा नारा आहे...!

उमरीकराना काय पडले होते? कशाला त्यांनी आंदोलन केले? आम्ही या शहरात राहत नाही का? आम्ही खड्डे सहन करतोच ना? आमच्यातीलसुद्धा काही जणांना मणक्यांचे त्रास झाले, अपघात झाले, घराबाहेर पडण्याची भीती वाटते, पण आम्ही काही म्हणालो का? रस्त्यात खड्डे पडतच असतात. खड्डे नसतील तर रस्ते कसे? रस्ते नसतील तर कामे कशी? कामे नसतील तर कंत्राटे कशी? कंत्राटे नसतील तर पैसा कसा? पैसे नसतील तर राजकारण काय कामाचे? राजकारण नसेल तर अधिकारी काय कामाचे? काहीच नसेल तर महापालिका काय कामाची? तशी आमची महापालिका जागरूक आहे. त्यांनी शहरात ठिकठिकाणी मोट्ठे बोर्ड लावले आहेत. `अमुक ठिकाणापासून तमुक ठिकाणापर्यंतचा रस्ता अमुक तमुक खात्याच्या आखत्यारीत आहे.` एवढे केले की त्यांची जबाबदारी संपली. इतर रस्ते कसेही असोत, ते तसे असावेत हा त्यांचा हक्कच आहे ना...!
आम्ही प्रातःस्मरणीय महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, सदस्य, नगरसेवक, आयुक्त, उपायुक्त, सर्व अधिकारी यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगून असे सांगू इच्छितो, की आम्ही उमरीकर यांना पाठींबा देत नाही. त्यामुळे, कृपया आमच्याबद्दल आकस ठेवू नये. सध्या असलेले रस्ते अतिशय उत्तम आहेत. त्याबद्दल आमची तक्रार नाही. आमची कशाबद्दलच तक्रार नाही. रस्त्यांवर पथदिवे नाहीत, त्याबद्दल तक्रार नाही. उड्डाणपुल अंधारात आहे, हे आम्हाला मंजूर आहे. सर्व नाल्या बुजलेल्या अवस्थेत आहेत, या कडे आम्ही दुर्लक्ष करतो. कचरा साठलेला असला, तो उचलला गेला नसला, तरी आमचे काही म्हणणे नाही. पाणीपुरवठा अपुरा होतो, तीन ते चार दिवसाआड होतो हे खरेच, पण तो `होतो` हे काय कमी आहे? समांतर जलवाहिनीचा विषय आम्ही मनातही आणत नाही. कारण त्यासाठी आजवर झालेला खर्च नेमका कुठे जिरला? या बद्दल आम्हाला खरेच काहीही माहिती नाही. रस्त्यात थोडेफार खड्डे आहेत, पण अनेक रस्ते सलग १५ फुटापर्यंत उत्तम अवस्थेत असल्याचे आम्ही अनुभवले आहे. कोणत्याही रस्त्यातील एकही खड्डा २ फुटांपेक्षा खोल नाही, हे आम्ही छातीठोकपणे सांगतो. योगायोगाने, तसे असेल तर त्याकडे दुर्लक्ष्य करावे.
आमची षंढपणाची खात्री आम्ही अनेकदा दिली आहे. क्रांतीचौकातील उड्डाणपूल किती वर्षे रखडला... आम्ही काही म्हणालो? सेवन हिल वरील उड्डाणपुलावरील डांबर पहिल्याच पावसात उखडले, आम्ही काही म्हणालो? त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली अनेक महिने पुलाची एक बाजू अडवून धरली, त्याकाळात आम्ही अपरिमित त्रास सहन केला... पण आम्ही काही म्हणालो? सध्या संग्रामनगर उड्डाणपुलाचा मुद्दा रखडला आहे. रेल्वेचे निर्लज्ज कंत्राटदार आणि बेमुर्वतखोर अधिकारी यांच्याबद्दल आम्ही काही भूमिका घेतली का? अजिबात नाही. त्रास नसेल तर जगण्यात रस काय? खरे आहे ना?
श्री. उमरीकर यांनी असे काही करावयास नको होते. एक जागरूक नागरिक या नात्याने त्यांनी खाजगीत चर्चा केली असती, तरी चालले असते. पण त्यांनी चक्क रास्ता-रोको केला, त्यांना ४००-५०० जणांनी साथ दिली. समृद्ध लोकशाहीच्या सबलीकरणासाठी हे घातक आहे. लोक आवाज उठवीत असतील, त्यातून असंतोष व्यक्त होत असेल, त्याचे लोण शहरभर पसरले, त्यातून जनआंदोलन झाले, तर सर्वांच्याच बुडाखाली दिवाळी आधी फटाके फुटतील, अशा भीतीपोटी आदरणीय लोकप्रतिनिधी वर्गाने पोलिस यंत्रणेला हात जोडून विनंती केली असावी. त्यातून २४ तासानंतर ही अटक झाली असावी. शहरातील भावी अशांतता टाळल्याबद्दल खरे तर सर्वांचे अभिनंदन करावयास हवे. त्यासाठी महापालिकेत ठराव आणायला हवा.
मी सर्व नागरिकांना विनंती करतो, की कुणीही या विषयावर प्रतिक्रिया देऊ नये. उगाच असंतोषाचे कारण ठरू नये. कारण, असे झाले तर तुम्हालाही `हर्सूल-दर्शन` होऊ शकेल. ज्या व्यवस्थेने अण्णा हजारे पचवले, त्यासमोर उमरीकर काय चीज? तुम्ही उगाच एखाददिवस उद्रेक कराल... पण त्याचा उपयोग नाही. षंढानी षंढाप्रमाणे राहावे. उगाच मर्दानगी दाखवू नये, असे माझे सर्व औरंगाबादकराना आवाहन आहे. दाखविली तर काय होते, याचे उदाहरण व्यवस्थेने दाखवून दिले आहे.
आपण विचार करावा. आपण समजदार आहात.धन्यवाद.
या शहरातील षंढ नागरिक
-    दत्ता जोशी, औरंगाबाद

-    ९४२२ २५ २५ ५० 

Thursday, October 3, 2013

माझ्या आईची अन्जिओप्लास्टि आणि डॉ. हिरेमठ यांचे कुशल हात...

पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ (http://www.jshiremath.com/index.htm) यांच्याबद्दल बऱ्याच काळपासून ऐकून होतो. पण माझ्या आईवरील अन्जिओप्लास्टि शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्याशी संपर्क आला आणि मी खूप प्रभावित झालो. हाच प्रकार पुण्याच्या `रुबी हॉल क्लिनिक`बद्दलही अनुभवला... (http://www.rubyhall.com/) एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही साधारण दोन दिवस पेशंटबरोबर असता, आणि या काळात एकदाही तुम्हाला आवाज चढवावा लागत नाही, वाद घालावा लागत नाही... प्रत्येक गोष्ट ठरल्याप्रमाणे वेळच्या वेळी घडत असते. अचानक पेच उद्भवला तर तुमच्याही आधी तेथील डॉक्टर आणि कर्मचारी धाव घेतात... हे चित्र मला अनपेक्षित पण अतिशय आनंद देणारे होते.
एखादा डॉक्टर नुसत्या शब्दांनीच तुमचा विश्वास जिंकून घेतो आणि अतिशय गंभीर विषय सुद्धा तुम्हाला खूप सोपा वाटू लागतो. तुम्ही त्यांच्या आश्वासक शब्दांनी भारून जाता आणि हृदयाशी संबंधित खूप नाजूक शस्रक्रिया ते लीलया पार पाडतात... या दरम्यान तुमच्या मनावर एक क्षणभरही ताण येत नाही... डॉ. जगदीश हिरेमठ ही किमया करतात. त्यांच्यातील `जॉली` माणूस आपल्याला प्रभावित करतो...!
माझ्या आईला चालताना खूप दम लागत असे. पाच-सहा वर्षांपूर्वी केलेल्या तपासणीत हृदयाच्या रक्तवाहिनीत २ ब्लॉक दिसले होते, पण ते फार गंभीर नव्हते. मागील महिन्यात झालेल्या एका किरकोळ अपघानंतर तिचे ब्लड-प्रेशर वाढले आणि खूप धाप लागू लागली.
माझा भाऊ कमलाकर पुण्यात राहतो. त्याने आईला `रुबी`त डॉ. हिरेमठ यांना दाखविण्याचे ठरविले. डॉ. हिरेमठ आज घडीला या विषयात देशातील आघाडीचे सर्जन आहेत... त्यांनी `आधी अन्जिओग्राफी करू आणि गरज वाटली तर लगेच प्लास्टि करू`, असे सांगितले. ग्राफीमध्ये दोन रक्तवाहिन्यांत ९० आणि ९५ टक्के ब्लॉक दिसले. याचा अर्थ फक्त तिसऱ्या रक्तवाहिनीच्या बळावर आईचे श्वास चालू होते! ही अतिशय गंभीर बाब होती.
डॉ. हिरेमठ यांनी `ग्राफी`नंतर बाहेर येऊन आम्हाला नेमका प्रोब्लेम समजावून दिला. हृदयाचे एक चित्र समोर ठेवून त्यांनी नेमकी रचना समजावून दिली. आम्ही त्या आधी यु-ट्यूबवर या प्रकारच्या शस्त्रक्रियेचे अनिमेशन पाहिलेले होते. ( http://www.youtube.com/watch?v=e13TGGccvT4 ) त्यांचा अप्रोच इतका आश्वासक होता की आम्हाला या शस्त्रक्रियेचे `टेन्शन` अजिबात आले नाही. यातील एक ब्लॉक सरळ रेषेतील होता आणि दुसरा वळणा-वळणाच्या जागेत. हा दुसरा ब्लॉक दुरुस्त करण्यासाठी स्तेंत बसविणे अधिक अवघड होते. पण त्यांचा अनुभव इतका मोठा, की जेथे आम्ही एक-दीड तासाची तयारी केली होती, तेथे अर्ध्या तासातच ऑपरेशन यशस्वीही झाले...!
या नंतरचा काळ काळजी घेण्याचा होता. आईला `आयसीयू`त ठेवलेले होते. २४ तास निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर ते घरी सोडणार होते. या २४ तासात मला तेथे खूप काही अनुभवता आले. `रुबी`मध्ये गर्दी प्रचंड वाटले, पण कुठे गोंधळ दिसला नाही. स्वच्छता अतिशय उत्तम होतीच आणि तेथे काम करणाऱ्या वार्डबॉय पासून डॉक्टरपर्यंत सर्वचजण विलक्षण सौजन्याने वागताना दिसले. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. या आधी वेगवेगळ्या कारणांसाठी मी अनेक हॉस्पिटलमध्ये गेलेलो आहे. प्रत्येक ठिकाणी वाद झडले आहेत. रुबी मात्र अपवाद ठरला...!
एका जीवघेण्या स्थितीतून आई बाहेर आली हे जितके महत्वाचे, तितकेच डॉ. हिरेमठ यांचे `safe hand` महत्वाचे...! डॉ. हिरेमठ आणि `रुबी` या दोघांनाही शुभेच्छा.

Wednesday, September 18, 2013

पाणीटंचाई मुक्तीचा ‘जालना पॅटर्न’

जालन्याचा पाणीप्रश्‍न सन 2013 च्या उन्हाळ्यात जगभरात गाजला. सार्‍या जगाच्या सहानुभूतीच्या नजरा या जिल्ह्याकडे वळल्या. कुचेष्टेच्या स्वरात बोलायचे तर हा ‘दुष्काळी पर्यटनाचा सोहळा’च झाला. पण कधी कधी मोठी आपत्ती इष्टापत्ती ठरते. जालन्याच्या बाबतीच असेच काहीसे घडते आहे. ‘गाव करील ते राव काय करील’ या उक्तीला साजेशी चळवळ जालन्यात उभी राहिली आणि जालन्याकडे सहानुभूतीने वळणार्‍या नजरा कौतुकाने वळविण्याचे बिजारोपण याच उन्हाळ्यातील चार महिन्यांत झाले. हे होत असतानाच विक्रमी कालावधीत, अत्यंत कमी खर्चात सार्वजनिक कामे कशी उभी राहू शकतात, याचा वस्तुपाठही या शहराने घालून दिला... ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’च्या पुढाकाराने हाती घेण्यात आलेले हे काम श्री. रमेशजी पटेल, श्री. सुनीलजी रायठठ्ठा आणि सौ. सपनाजी सुनील गोयल यांच्या नेतृत्वाखाली आकार घेते आहे.

जालन्याचा पाणीप्रश्‍न नेतृत्वाच्या अकर्मण्यतेचा परिपाक आहे, ही बाब असंख्य वेळा अधोरेखित झाली आहे. निजामाच्या काळात 1935 मध्ये खोदण्यात आलेल्या घाणेवाडीच्या तलावाने जालन्याची तहान सातत्याने भागविली. पण 78 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात या तलावात खूप मोठ्या प्रमाणात गाळ साचला आणि साहजिकच तलावाची साठवणक्षमता जेमतेम 25 टक्क्यांवर आली. कुंडलिका नदीवर निधोना गावाच्या उत्तरेकडे बांधण्यात आलेल्या या तलावाच्या बंधार्‍याची रुंदी 836 मीटर तर उंची 15 मीटर आहे. साचलेल्या गाळामुळे ही उंची जेमतेम पाच मीटरपर्यंत राहिली. उंची एक तृतियांश उरली तरी क्षमता त्याच्या अनेक पटीत कमी झाली, कारण पाण्याची खोली कमी झाल्याने बाष्पिभवनाचे प्रमाण वाढले. या तलावातील गाळ उपसला आणि पाण्याची साठवणक्षमता वाढविली, तर आजही हा तलाव जालनेकरांची वर्षभराची तहान भागवेल, हे स्पष्ट दिसत असताना प्रशासन ढिम्म होते आणि लोकप्रतिनिधी उदासीन.

घाणेवाडी तलावातील गाळ
या पार्श्‍वभूमीवर ‘घाणेवाडी जलसंरक्षण मंचा’ची स्थापना ‘विक्रम चहा’चे श्री. रमेशजी पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांना श्री. सुनीलजी रायठठ्ठा यांची साथ मिळाली. जालन्याच्या नागरिकांतून काही प्रमाणात निधी उभा राहण्यास प्रारंभ झाला आणि सन 2010 च्या उन्हाळ्यात घाणेवाडी तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ करण्यात आला. तेव्हापासून सलग चार वर्षे, दर वर्षी नित्यनेमाने हे काम सुरू आहे. दर वर्षी तलाव कोरडा पडल्यानंतर साधारणपणे तीन ते चार महिने मर्यादित साधनांद्वारे हे काम केले जाते. साधारणपणे 45 हजार ट्रॅक्टर गाळ दरवर्षी बाहेर काढला जातो. जालन्यातून दरवर्षी साधारण 20 लाख रुपये उभे राहतात आणि त्या द्वारे यंत्रणा वापरात आणून हे काम करण्यात येते. तलावात साचलेल्या गाळाच्या उंचीचा अंदाज या वर्षीच्या उन्हाळ्यात प्रशासनाने पाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांतून घेता येतो. ‘घाणेवाडी जलसंरक्षण मंचा’ने खोदलेल्या साधारण 10 फुट खोल पातळीच्याही खाली साधारण 10 फुटांचा खड्डा प्रशासनाने घेतला. त्यातही गाळाची पातळी साधारणपणे 2 फुटांची दिसते. याचाच अर्थ, तलावातील सर्वसाधारणपणे गाळाची पातळी 12 फुटांची आहे. मागील चार वर्षांत झालेले काम जेमतेम एक ते दोन टक्क्यांचेच आहे. 670 एकरांच्या तलावातील साधारणपणे 20 ते 25 एकरांच्या क्षेत्रातील सरासरी 8 फुटांचा गाळ काढण्यात आजवर यश आले आहे. याच गतीने हे काम चालू राहिले, तर हे काम साधारण 100 ते 125 वर्षे पुरेल ! प्रशासनाने या कामात पुढाकार घेत किमान 50 ‘पोकलेन’ व ‘जेसीबी’ची यंत्रणा उपलब्ध करून दिली आणि त्याला 250 हून अधिक टिप्परची जोड दिली, तर कदाचित हे काम साधारणपणे पाच उन्हाळ्यांत मिळून पूर्ण हेऊ शकेल आणि जालनेकरांची तहान पूर्णपणे भागवता येईल.

कुंडलिका नदीवरील बंधारे
घाणेवाडी तलावापासून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर निधोना गाव आहे. कुंडलिका नदी या गावाला वळसा घालून पुढे वाहते. साधारण 8 किलोमीटरचा प्रवास करीत ही नदी जालना येथे पोहोचते. धरणातील गाळाप्रमाणेच या नदीचीही स्थिती झालेली असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘घाणेवाडी जलसंरक्षण मंचा’ने या नदीवर शिरपूर पद्धतीचे बंधारे बांधण्याचे ठरविले.

राज्यभरात गाजलेल्या ‘शिरपूर पॅटर्न’चे प्रणेते श्री. सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जालन्यात हे काम सुरू करण्याचे ठरविण्यात आले. मात्र, या कामाचे सार्वत्रिक स्वागत होऊन मदतीचे हात पुढे येण्या ऐवजी अनेकांनी त्यात चक्क अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यातून खचून न जाता मंचाने ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’च्या पुढाकारातून हे काम प्रत्यक्षात उतरविण्याचा निर्धार केला. याचा शुभारंभ झाला 21 एप्रिल 2013 रोजी. 
निधोना गावानजिक या नदीत ‘शिरपूर पॅटर्न’द्वारे सुमारे 500 मीटर पात्र खोल करून त्यावर बांध घालण्याचे ठरवून  ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ने प्रत्यक्ष कामास प्रारंभ केला. ‘शिरपूर पॅटर्न’चे प्रणेते श्री. सुरेश खानापूरकर यांच्या शुभहस्तेच हा उपक्रमाचा नारळ वाढविण्यात आला. प्रारंभी वाटले तेवढे हे काम सोपे नाही, याची जाणीव हे नदीपात्र खोदताना सर्वांना झाली.




साधारणपणे दोन-तीन फूट खोल गेल्यानंतरच कठिण खडकास सुरवात झाली आणि कामाचा वेग मंदावला. साधारणपणे 30 दिवसांत हे काम पूर्ण व्हावे असे अपेक्षित होते, पण त्याला जास्त वेळ लागणार हे स्पष्ट होऊ लागले. ही सारी कामे पोकलेन आणि जेसीबीद्वारेच चालू होती, हे विशेष.

घाणेवाडी तलावाजवळ असलेल्या या बंधार्‍याला ‘बंधारा क्र. 1’ असे नाव देण्यात आले. या बंधार्‍यानंतर प्रत्येक किलोमीटरवर सुमारे 500 मीटर लांबीचा एक अशा प्रकारे आठ साखळी बंधारे घालण्याची संकल्पना  ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’तर्फे मांडण्यात आली. त्यामुळे या संपूर्ण परिसरात प्रत्येक किलोमीटरवर पाणी साठून ते जमिनीत झिरपेल आणि परिसरातील भूजलपातळी उंचावेल, असे अपेक्षित आहे. पण इथे प्रश्‍न आला आर्थिक क्षमतेचा. त्यामुळे दोन ते सात क्रमांकाचे बंधारे घालण्याचे काम तात्पुरते पुढे ढकलून मंडळाने थेट आठव्या बंधार्‍याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबादहून जालना शहरात जाताना कुंडलिका नदी ओलांडावी लागते. या नदीवरून जाताना डाव्या हाताला ‘रामतीर्थ बंधार्‍या’चे नाव नदीपात्रात स्पष्टपणे दिसू लागते. हाच तो आठवा बंधारा. या बंधार्‍याने अनेक विक्रम केले. बंधार्‍याचे भूमीपूजन 11 मे2013 रोजी झाले आणि 11 जून 2013 रोजी हा बंधारा संपूर्ण काम संपवून कार्यान्वित झाला होता! नदीपात्रात 500 मीटर लांबपर्यंत साधारणपणे 6 मीटर खोल खोदकाम करून पात्रातील गाळ, माती, वाळू आणि खडक बाहेर काढण्यात आला आणि तो पात्राच्या कडेने सुरक्षित अंतरावर टाकण्यात आला. नदीपात्र तब्बल 50 मीटरपर्यंत रुंद करण्यात आले. आठव्या क्रमांकाच्या या बंधार्‍याची लांबी 50 मीटर आहे. बंधार्‍यालगत नदीची खोली तब्बल 15 फूट आहे. सिमेंट कॉंक्रिटमध्ये बांधण्यात आलेल्या या बंधार्‍यात ‘ओव्हरफ्लो’ होणारे पाणी सांडव्यावरूनच वाहून जाण्याची सोय करण्यात आली आहे. पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे बंधार्‍याच्या मुख्या भिंतीला धक्का पोहोचू नये, म्हणून दगडाचे ‘पिचिंग’ करण्यात आले. 

बंधार्‍याच्या कामातील ‘विक्रमांचा विक्रम’
या बंधार्‍याने अशा प्रकारच्या कामांमध्ये विक्रमांवर विक्रम नोंदविले. वर उल्लेख केल्याप्रमाणे मोठे आकारमान असलेला हा बंधारा ‘सरकारी’ पद्धतीने तयार करायचा, तर नेमका किती काळ लागला असता, याचे उत्तर देणे फारसे अवघड नाही. या साठी किती निधी लागू शकला असता, यावर वेगवेगळी उत्तरे येऊ शकतात, पण कंत्राटदारांच्या खाजगीतील अंदाजानुसार हे काम पूर्ण होण्यासाठी साधारण 6 कोटी रुपयांचे बजेट नक्की लागले असते. हेच काम  ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ने केवळ 1 कोटी 25 लाखांत पूर्ण केले! भ्रष्टाचार होणार नाही, याची काळजी घेतली आणि कामावर निष्ठा ठेवली, तर काय घडू शकते, याचे उदाहरण म्हणून ‘रामतीर्थ बंधार्‍या’चे नाव सांगता येईल. 4 पोकलेन, 1 जेसीबी आणि 12 टिप्पर यांच्या सहाय्याने मोजून एका महिन्यात 500 मीटर लांब आणि 50 मीटर रुंदीचे नदीपात्र खोदून हा बंधारा पूर्ण करण्यात आला. या साठी 1000 ट्रक रेडीमिक्स कॉंक्रिट वापरण्यात आले. या बंधार्‍यात या वर्षी 16 कोटी लिटर पाणी थांबेल आणि जमिनीत पाझरेल.

संपूर्ण लोकसहभागातून, एका रुपयाचीही सरकारी मदत नसताना हे काम विक्रमी वेळात आणि अत्यंत उच्च गुणवत्ता राखत पूर्ण करण्यात आले. हे काम वेळेत पूर्ण व्हावे, या साठी प्रारंभिक काळात जालना शहरातील काही समाजाभिमुख उद्योजकांनी पुढाकार घेऊन हा खर्च भागविला.

काम पूर्ण झाल्यानंतर आता  ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ने 1000/-, 500/- आणि 100/- रुपयांच्या पावत्या छापून त्या द्वारे जालना शहरवासीयांकडून निधीसंकलन करण्याते ठरविले आहे. या बंधार्‍यासाठी लागलेले सव्वा कोटी रुपये, निधोना गावाजवळील एक कोटी रुपये आणि घाणेवाडीसाठी दरवर्षी लागणारा सुमारे 25 लाखाचा खर्च लोकसहभागातून उभा राहावा, अशी  ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ची अपेक्षा आहे. ही अपेक्षा रास्तच म्हणावी लागेल, कारण जालनावासी दरवर्षी पाण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करतात.

किती होतो जालनावासियांचा खर्च?
जालना शहराची लोकवस्ती चार लाखांची आहे. येथील नळाला वर्षातील साधारण सहा महिन्यांच्या काळात महिन्यातून एकदा पाणी येते. काही ठिकाणी बोअर आणि विहिरी आहेत, पण तेथील स्थितीही समाधानकारक नाही, कारण भूजलपातळी खूप खोल गेली आहे. जालन्यात 1 हजार लिटर पाण्याचा टँकर या उन्हाळ्यात साधारणपणे 350 रुपयांप्रमाणे विकला गेला. या हिशेबाने विचार केला, तर प्रत्येकाला पुरेसे ठरेल एवढे पाणी दररोज हवे असेल, तर त्याचा सरासरी खर्च 20 रुपये होतो. म्हणजे एका व्यक्तीमागे दरमहा साधारण 500 रुपयांचा खर्च केवळ पाण्याच्या खरेदीचा असतो. 4 लाख लोकांनी दरमहा प्रत्येकी 500 रुपयांचे पाणी विकत घेणे म्हणजे 20 कोटी रुपये एवढा मोठा, अविश्वसनीय आकडा समोर येतो! चार महिने हा खर्च केला, तर तो आकडा 80 कोटींपर्यंत पोहोचतो! या वर्षीप्रमाणे उन्हाळा लांबला, तर पाच महिने केलेला खर्च 100 कोटींपर्यंत पोहोचतो! ‘टँकर लॉबी’ किती प्रभावी आहे, याचा अंदाज यावरून येतो...!

या हिशेबाने बंधार्‍यांचा खर्च काढला, तर तो सरासरी 2 ते 2.5 कोटींपर्यंत जातो. ‘रामतीर्थ बंधार्‍या’ला लागलेला 1.25 कोटीचा खर्च हा ना नफा ना तोटा तत्वावर केलेल्या कामामुळे कमी राखता आला. त्या साठी लागणारे लोखंड ‘पोलाद’ने मोफत उपलब्ध करून दिले, पिचिंगला लागणारा शेकडो ट्रक दगड विविध शेतकर्‍यांनी मोफत दिला, नदीपात्रातील वाळू-गाळाचा उपसा करताना कमी कष्ट लागले, कमी यंत्रणा लागली, त्यामुळे हा खर्च कमी झाला. प्रत्येक ठिकाणी परिस्थितीनुसार खर्च कमी-अधिक होऊ शकतो. त्यामुळे सरासरी 2 ते 3 कोटी रुपयांचा खर्च गृहित धरला, तरी 24 कोटी रुपयांत हे सर्व 8 बंधारे पूर्ण होऊ शकतात. त्याद्वारे 650 कोटी लिटर पाणि जमिनीत मुरू शकेल. या साठी जालनावासियांनी पुढे येऊन आर्थि मदत उभी करण्याचा निर्धार करणे आवश्यक आहे. शासकीय स्तरावर या विषयात आजवर कोणीही कोणताच पुढाकार घेतलेला नसल्याने, आता शहरवासीयांनीच पाण्याची लढाई पुढे येऊन लढायची आहे, हेच खरे.

अशीच लढाई घाणेवाणी तलावासाठी आहे. सुमारे 650 एकर क्षेत्रातील सरासरी 10 फूटांपर्यंतचा गाळ काढण्याचे काम ‘घाणेवाडी जलसंरक्षण मंचा’च्या वतीने मागील चार वर्षांपासून सुरू आहे. तलाव पूर्णपणे वाळल्यानंतरच गाळ काढण्याचे काम सुरू करावे लागते, त्यामुळे सध्या वर्षातील साधारण आठ ते नऊ महिने हे काम चालते. मागील चार वर्षांपासून 3 पोकलेन, एक जेसीबी आणि 16 टिप्परच्या साह्याने गाळ काढण्याचे काम चालू आहे. दरवर्षी सरासरी 40 हजार टिप्पर गाळ काढला जातो. या कामासाठी जालन्यात वर्षभरात मिळून साधारणपणे 20 ते 25 लाख रुपये उभे करण्यात येतात आणि त्याद्वारे जेमतेम 4 महिने हे काम चालू शकते, या कामाचा खर्च भागविण्यासाठी अधिक रक्कम उभी राहात नाही.
ही लढाई जनतेची, जनतेसाठी
अनेक आर्थिक अडचणी असल्या तरी ही लढाई जनतेचीच आहे आणि ती जनतेनेच लढावयाची आहे, हे निश्‍चित आहे. कोरड्या आश्‍वासनांतून हाती काहीच लागत नाही, हे सर्वांनाच उमगले आहे आणि स्वतःहून उभ्या करीत असलेल्या कामांचे परिणाम जनतेला दिसू लागले आहेत. 2013 च्या भीषण दुष्काळाच्या झळा प्रत्येक व्यक्तीलाच बसल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्‍न आपल्याच पुढाकाराने सुटू शकेल, याची खात्री समाजाला झाली आहे. आता गरज आहे, ती भरभरून योगदान देत अत्यल्प काळात हे सारे प्रकल्प मार्गी लावण्याची. 

जलतज्ज्ञ श्री. सुरेश खानापूरकर यांच्या मते पाण्याच्या स्थितीवरून समृद्धीचे आडाखे बांधायचे, तर ‘‘दररोज नळाला पाणी येते अशी स्थिती असेल, तर बँकेत आपले ‘फिक्स डिपॉझिट’ आहे, असे गृहित धरावे. बोअरचे पाणी काढावे लागत असेल, तर बँकेचे कर्ज काढावे लागल्याचे लक्षात घ्यावे आणि टँकरने पाणी आणावे लागले, तर तुमची दिवाळखोरी जाहिर झाली आहे, असे गृहित धरावे...’’ या दृष्टीने विचार केला, तर जालन्याने आपली दिवाळखोरी कधीच जाहिर केली आहे. यातून उभा राहायचे असेल, तर लोकसहभागाला पर्याय उरलेला नाही.

जलसंधारणाचे परिणाम...
या पार्श्‍वभूमीवर, जालना जिल्ह्यात झालेल्या या पथदर्शी उपक्रमांचे परिणाम काय झाले? या वर्षी, सन 2013 मध्ये जून महिन्यात अगदी वेळेवर आलेल्या पावसामुळे हे दोन्ही बंधारे पहिल्या पावसात भरले आणि त्या नंतरच्या पावसात भरतच राहिले. पहिल्या बंधार्‍यातून वाहून गेलेले पाणी दुसर्‍या बंधार्‍यात अडकले आणि पाणी जमिनीत मुरण्यास प्रारंभ झाला. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी परिसरातील बोअरला पाणी येण्यास लवकर प्रारंभ झाला आणि विहिरींतील पाण्याची पातळीही अल्पावधीतच वाढलेली दिसली...! नदीपात्रातील बंधारे आणि विस्तारलेले पात्र या मुळे झालेली क्रांती जनतेने प्रत्यक्षात अनुभवली. हे उदाहरण लोकसहभागातूनच आकारास आले!

हा लोकसहभाग कसा मिळतो आहे? एक उदाहरण सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारे ठरावे. रामतीर्थ बंधार्‍याशेजारी एक दानपेटी ठेवण्यात आलेली आहे. त्यात समाजाने आपले योगदान द्यावे, असे अपेक्षित आहे. हे काम सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी एक भिकारी तेथे आला. त्याने तिथले काम पाहिले आणि स्वतःकडे असलेले 21 रुपये त्याने दानपेटीत टाकले...! एका सामान्य भिकारी या भावनेने भारलेला असेल, तर समृद्ध समाजाकडून अपेक्षा ठेवण्यात गैर ते काय?

-दत्ता जोशी
औरंगाबाद