परिसराच्या संस्कृतीचा आढावा घेण्याच्या यादीत ‘उद्यम संस्कृती’ हा विषय परंपरेत न बसणारा, पण तेवढाच महत्त्वाचा. कुठल्याही संस्कृतीच्या विकसनासाठी उद्यम संस्कृतीचा विकास सर्वाधिक महत्त्वाचा. नागर संस्कृती एकेकाळी नद्यांच्या काठी वसायची, त्यामागे महत्त्व होते ते कृषिसंस्कृतीचे... तिचा पाया आर्थिक. आता नागर संस्कृती ‘हायवे’काठी विकसित होतेय. तिचाही पाया आर्थिक. आर्थिक सुबत्तेचा मार्ग उद्यम संस्कृतीतूनच विकसित होतो. या दृष्टीतून हा आढावा...
(दै. सामनाच्या २३ जानेवारी २०१८ च्या विशेषांकात प्रकाशित लेख)
आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणार्या शहराचा मान आैरंगाबादने मिळविला, त्याला आता बराच काळ लोटला आहे. तो वेगही पुढे मंदावला. ते नैसर्गिकही होते. कुठलाही वेग असा शाश्वत टिकत नसतो. पण त्या निमित्ताने या परिसरात विकसित झालेली उद्यमसंस्कृती पुढील काळात या परिसराच्या विकासासाठी कारणीभूत ठरली. या प्रवासात अनेक टप्पे आले. विविध आव्हाने समोर उभी रहिली. पण त्या सर्वांतून मार्ग काढत आजवरची ही वाटचाल सुरू आहे. सुमारे अर्धशतकापूर्वी ‘निर्लेप’च्या स्थापनेतून इथल्या उद्यम संस्कृतीचा पाया घातला गेला. या संस्कृतीच्या विकासाला काही बड्या उद्योगांच्या आगमनाने चालन मिळाली. विविध पूरक उद्योगांच्या उभारणीतून ही संंस्कृती इथे विकसित झाली आणि आता हळू हळू हे शहर आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकतेत अग्रेसर होताना दिसत आहे. उद्यम संस्कृतीच्या विकासाचे हे टप्पे रंजक आहेत, त्याच वेळी भविष्यातील विकसनासाठी दिशादर्शक ठरणारे सुद्धा आहेत.
एकेकाळी, वाळूज आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतील मोठे उद्योग आले आणि त्या पाठोपाठ काही कुप्रवृत्तींचाही शिरकाव झाला. सुदैव असे, की काही मोजक्या हिंसक प्रकारांनंतर इथला कामगार सावध झाला आणि खूप अल्पकाळात ही कुप्रवृत्ती हद्दपार झाली. महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर संभाजीनगरातील उद्योगक्षेत्र हे तुलनेत सर्वाधिक शांत असलेले उद्योगक्षेत्र मानता येते. औद्योगिक विकास साधायचा तर औद्योगिक विश्वातील शांतता सर्वाधिक महत्त्वाची असते, आपले घर उद्योग चालवतात, स्वार्थी नेते नाही, हे भान इथल्या ‘ब्लू कॉलर’ला आधी आले आणि हे वास्तव स्वीकारत त्यांनी आपल्या भूमिका मर्यादित केला. हक्कासाठी लढा देणे आणि सर्वनाशाकडे लोटणे या दोन वेगळ्या संकल्पना आहेत, हे या सर्वांनी ठसठशीतपणे जाणवून दिले. हाती हात घेऊन पुढे जाता येऊ शकते याचा आदर्श वस्तुपाठ याच औद्योगिक वसाहतींनी जगासमोर ठेवला. उद्यम संस्कृतीच्या पायाभरणीत या जाणिवेचा भाग अतिशय महत्त्वाचा.
वेरूळची लेणी असोत, अजिंठ्याची शिल्पकला... नालंदा - तक्षशीलेची बुद्धिप्रधान ग्रंथसंपदा असो की हडप्पा-मोहनजोदारोची संस्कृती, या प्रत्येक ठिकाणच्या आविष्कारामागे भक्कम आर्थिक आधार होता. सैन्य उपाशीपोटी लढू शकत नसतेच. हेे सैन्य रणांगणावरचे असो की कलेच्या क्षेत्रातले... किमान दोन वेळच्या जेवणाची आणि मूलभूत सोयींची पूर्तता करणारा आर्थिक आधार कुणीतरी उपलब्ध करून दिलेला होता, म्हणून कुठल्याही कलाकृती उभ्या राहिल्या. हा आधार हवेतून येत नसतो. तो जमिनीवर साकारला जात असतो. हा आधार देणारे हात आणि त्या मागचा मेंदू जितका सकस, सकारात्मक आणि सशक्त, तितकी अन्य संस्कृतींची जोपासना बलशाली... हेच सूत्र जगभर दिसते. संभाजीनगरही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही.
उद्यमिता ही सुद्धा एक संस्कृती आहे. ‘कामगारांची पिळवणूक करणारा भांडवलदार’ ही संकल्पना कधीच लयाला गेली आहे. कामगार आणि मालक ही दरी बुजविण्यात या उद्यम संस्कतीचा वाटा अतिशय मोलाचा. ही प्रेरणा दिली जपानी आणि जर्मन उद्योगांनी आणि तिथल्या कार्यसंस्कृतीने. नव्या नव्हाळीच्या विवाहितेला किंवा पहिलटकरणीला अनुभवी पिढीने केलेले मार्गदर्शन जितके मोलाचे तेवढेच या जपान-जर्मनीच्या कार्यसंस्कृतीचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. ‘फाईव्ह एस’, ‘कायझेन’, ‘झीरो डिफेक्ट’, ‘पीपीएम’ ... विविध संकल्पना जगभरातील उद्योगक्षेत्रात रुजत गेल्या आणि त्यातून सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेतलेली नवी कार्यसंस्कृती विकसित होत गेली.
या नव्या प्रवाहात आणखी दोन नव्या संकल्पना उद्योग क्षेत्राची परिमाणे बदलत चालल्या आहेत. ‘लीन मॅनेजमेंट’ आणि ‘आयओटी’ अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्ज. लीन मॅनेजमेंट ही मुळात जर्मन संकल्पना. भारतात आता ती येऊ घातली आहे. काही मोजक्या ठिकाणी ती अंमलातही आली आहे. लीन मॅनेजमेंट एखाद्या अँटीव्हायरससारखे काम करते. तुमच्या यंत्रणेतील, व्यवस्थापनातील त्रुटी ते दूर करते आणि तुम्हाला तुमची संस्था नव्या उंचीवर नेण्यास मदत करते. जिथे कुठे व्यवस्थापन आहे त्या प्रत्येक ठिकाणी याचा उपयोग आहे. ‘आयओटी’ने मात्र आता भारतात चांगलेच हातपाय पसरले आहेत. विविध कंपन्यांचा विस्तार वाढतो आहे, प्रत्येक युनिटवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. अशा स्थितीत संचालकांना एकाच वेळी एकाच प्लॅटफॉर्मवर त्यांच्या उद्योगसमूहाचा डेटाबेस उपलब्ध करून देणारे साधन म्हणून ‘इंटिग्रेटेड रिमोट मॅन्यूफॅक्चरिंग मॅनेजमेंट’ आली. त्याचा मुलाधार म्हणजे इंटरनेट.
इंटरनेटचा वापर करून उद्योगातील प्रत्येक पायरीवर लक्ष ठेवणारी, नियंत्रण आणणारी संकल्पना म्हणजे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’. आज झालेल्या चुकांवर उद्या चर्चा करण्याऐवजी मुळात आजच चुका न होऊ देणारी ही पद्धती. यातून उत्पादनक्षमता वाढते, अचूकता निर्माण होते, वेस्टेज नियंत्रणात येते आणि या शिवाय संबंधित संचालकाला जे काही नियंत्रित करायचे आहे, ते इथे करता येते. मोठी क्षमता असणारी ही प्रक्रिया आहे. या प्रत्येक गोष्टींमुळे उद्योग क्षेत्र अधिकाधिक सक्षम होत चालले आहे. नवनव्या संस्कृतींना आत्मसात करून ही नवी आंतरराष्ट्रीय उद्यम संस्कृती बाळसे धरू लागली आहे.
एकेकाळी असलेले ‘सेलर्स मार्केट’ आता ‘बायर्स मार्केट’ झाले आहे. एकेकाळी स्कूटरसाठी सहा-आठ वर्षांची वाट पाहावी लागायची, तिथे ठरवल्यानंतर सहा तासांत स्कूटर घरी येऊ लागली. हा बदल सगळीकडेच झाला. भौतिक सुबत्तेच्या सार्या वस्तू तेवढ्याच वेगाने बाजारपेठेतून घरापर्यंत पोहोचल्या. ही प्रक्रिया फक्त बाजारपेठेत आणि कर्जपुरवठा करणार्या वित्तीय संस्थांपुरती मर्यादित नसते. ती उद्योगक्षेत्रातही झिरपावी लागते. बाजारपेठेत झालेला हा बदल स्वीकारल्याशिवाय उद्योगक्षेत्राला तरणोपाय नव्हता. हा बदल किती सहजतेने स्वीकारला जातो त्यावर त्या त्या उद्योगांचे भविष्य ठरणार होते. संभाजीनगरची उद्यमसंस्कृती या संकटावर मात करण्यात यशस्वी ठरली. उत्पादन यंत्रणेतील आधुनिकीकरण, जागतिक स्तरावरील नव्या ग्राहकांचा शोध, तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कामगारवर्गाचे कौशल्यविकसन... प्रत्येक आघाडीवर एकेक पाऊल पुढे टाकत उद्योजक आणि कामगारांनी हातात हात घेऊन प्रगतीकडे वाटचाल सुरू ठेवली आणि त्यातून इथली उद्यमसंस्कृती बहरली. आज उद्योगांच्या नफ्यामध्ये महत्त्वाचा वाटा गुणवत्ता नियंत्रणाचा आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आणि बड्या उद्योगांकडून अधिक स्पर्धात्मक दरात काम करावे लागले, अशा स्थितीत टिकून राहणे आणि प्रगती करणे यात गुणवत्ता नियंत्रण, उपलब्ध यंत्रणेचा पुरेपूर वापर, उपलब्ध कामगारांचा कौशल्यपूर्ण वापर या बाबी खूप महत्त्वाच्या ठरल्या.
तंत्रज्ञान, भांडवल आणि कुशल मनुष्यबळ या त्रिसुत्रीवर उद्योगाची प्रगती अवलंबून असते. तंत्रज्ञान आणि भांडवल उभे करणे आज तुलनेत सोपे झाले आहे. मुद्दा उरतो तो कुशल मनुष्यबळाचा. औद्योगिक प्रशिक्षण, कामगारांसाठी कल्याणकारी योजना, त्यांच्या आत्मप्रतिष्ठेत वाढ करण्यासाठी उद्योजकांनी उचललेली पावले या आधारावर प्रगतीची पावले या मातीवर उमटली. त्यातून उद्यमसंस्कृती बहरत गेली. बडे उद्योग एकेकाळी आपल्या पुरवठादार कंपन्यांकडून सुटे भाग तयार करून घेत आणि आपल्या उद्योगात त्यांच्या जुळवणीतून अंतिम उत्पादन तयार होत. काळ बदलतोय, तसे या प्रक्रियेतही बदल होताहेत. सुट्या भागांऐवजी ‘असेंब्ली’चीच मागणी मोठ्या उद्योगांकडून होत असताना आपापल्या कौशल्यांत वाढ करण्याचा किंवा तो व्यवसाय सोडण्याचा असे दोनच पर्याय पुरवठादारांसमोर असतात. बहुतेकांनी ‘असेंब्ली’चा पर्याय निवडला, तेथे गरज होती मनुष्यबळाच्या कौशल्यविकासाची.
उद्यमसंस्कृतीचा विकास होताना या घटकावर विविध उद्योगांनी घेतलेली मेहनत विलक्षण आहे. काही उद्योजकांनी ‘राईट पर्सन इन राईट बस, राँग पर्सन आऊट ऑफ बस’ अशी कठोर भूमिका कुणी घेतली तर आपल्याकडील प्रत्येक कामगार-कर्मचार्याला योग्य प्रशिक्षण देत, त्यांना प्रगतीच्या वाटा खुल्या करून दिल्या. प्रगतीचा ब्लू प्रिंट प्रत्येक ठिकाणी एकसारखा नसतो... तो तसा वापरता येत नसतो. प्रत्येक ठिकाणची गरज, उपयुक्तता आणि उपलब्ध कौशल्ये यांच्या आधारावर तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा वापरावा लागतो. यात बहुतेकांनी यश मिळविले. या यशामुळेच जागतिक मंदीच्या या वातावरणातही इथल्या औद्योगिक वसाहतीत समाधानकारक उत्पादन चालू राहिले. बेकारीची कुर्हाड कोसळण्याचे प्रसंग तुलनेत कमी आले.
मुंबई, पुणे किंवा नाशिकच्या तुलनेत संभाजीनगरातील उद्योजकतेला, औद्योगिक वसाहतींना अधिक प्रतिकूलतेचा सामना करावा लागतो. त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग पाण्याचा. पर्जन्यछायेच्या प्रदेशात असलेल्या या शहर-परिसराला पाणीटंचाईचा सामना नेहेमीच करावा लागतो. त्यातही कधी कुणी न्यायालयात जाते आणि न्यायालयाच्या आदेशावरून कंपन्यांना आपल्या शिफ्ट बंद कराव्या लागतात. अशा सर्व प्रतिकूलतांशी झुंजत प्रगतीच्या वाटेवरील घोडदौड सुरू ठेवली आहे. म्हणूनच इथल्या उद्यम-संस्कृतीबद्दल आवर्जून निरीक्षणे नोंदविण्याची गरज भासली.
प्रत्येक भांडवलदार पिळवणूक करणारा नसतो, प्रत्येक कामगार कामचोर नसतो, कृषि आणि उद्योग ही दोन क्षेत्रे जशी विकसित होतील, तशी भारतासारख्या राष्ट्राची प्रगती होत राहील. दुर्दैवाने एकीकडे कृषिसंस्कृतीसंदर्भात अनेक खूप समाधानकारक वातावरण नाही. ते क्षेत्र रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या अतिवापरामुळे पोखरले गेले आहे आणि त्यातून बाहेर पडून सेंद्रीय शेतीकडे वळण्याचे त्राण अजून यायचे आहे. समतोल राखत प्रगतीची वाट चोखाळूनच त्या क्षेत्रातील भवितव्य घडेल. या तुलनेत उद्योगाच्या क्षेत्राने हे बदल जलदगतीने स्वीकारले आणि पचवले.
आैरंगाबादच्या औद्योगिक वसाहतींनी सुद्धा ते आव्हान स्वीकारले आणि पेलले सुद्धा.
अंतिमतः पहिला मुद्दा पुन्हा एकदा. उद्यमसंस्कृती आणि अन्य सर्व संस्कृतींचा परस्परसंबंध खूप महत्त्वाचा आहे. कला, साहित्य, क्रीडा... कुठल्याही संस्कृतीच्या विकासाला सर्वात महत्त्वाचा ठरतो तो आर्थिक आधार. म्हणूनच साहित्य संमेलनासाठी असो, कला महोत्सवासाठी असो की क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांसाठी... प्रत्येक ठिकाणी आवश्यक ठरते तो उद्यम संस्कृतीचा आधार. समाजभान जपणारी उद्यमसंस्कृती अन्य क्षेत्रांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी पूरक ठरते. आैरंगाबादेतील उद्यमसंस्कृती त्याला अपवाद नाही.
- दत्ता जोशी
(मुक्त पत्रकार व उद्योजकतेचे अभ्यासक)
9422 25 25 50
Monday, January 22, 2018
Thursday, January 11, 2018
अंदमान डायरी - 1
अंदमान म्हणजे काळे पाणी. स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्त भारतीयांसाठी जणू एक दुःस्वप्न बनलेली भूमी. स्वातंत्र्योत्तर काळात दुःस्वप्न तर दूर झाले पण स्वर्गीय सौंदर्य असलेली ही लावण्यभूमी सहजप्राप्य राहिली नाही. 2004 मध्ये तमिळनाडूत निवडणूक कव्हर करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा रेल्वेत एका सैनिकाची भेट झाली. अंदमानच्या तळावर नियुक्त असलेल्या त्या सैनिकाकडून तिथले प्रत्यक्ष वर्णन ऐकायला मिळाले. तेथे पोहोचण्याचा एक मार्ग कळला. चेन्नईच्या बंदरातून अंदमानला जाण्यासाठी जहाज निघते. त्या जहाजाद्वारे 3 दिवसांच्या प्रवासानंतर तिथे पोहोचता येते, ही मला मिळालेली पहिली प्रत्यक्ष माहिती. त्या वेळी त्या जहाजाचे ‘जनरल’ तिकीट बहुधा 300 रुपये होते. आता ते 700 ते 1000 असल्याचे वेबसाईटरून कळले. पण त्या वेळी तेवढा वेळ हाताशी नव्हता. नंतरच्या काळात रोजच्या आयुष्यातील व्यापातून वेळ काढणे शक्य होत नव्हते.
मला भटकायला आवडते. विद्यार्थी दशेत चळवळीच्या माध्यमातून देशाच्या अनेक भागांत भ्रमंती झाली. पुढे पत्रकारितेत असताना वार्तांकनासाठी फिरस्ती झाली. लग्नानंतर कौटुंबिक सहल म्हणून काही ठिकाणी फिरून आलो. काश्मीर ते कन्याकुमारी, अनेक ठिकाणी अनेक राज्यांत मी स्वतःच नियोजन करून भटकलो. इंटरनेट वेगवान झाल्यानंतर आणि वाहतुक आणि हॉटेलांच्या सुविधा वेबसाईटवर सोप्या झाल्यानंतर ही भटकंती काहिशी सोपी झाली. योगायोग असा की प्रत्येक ठिकाण कुणीतरी मित्र-सुहृद असायचे, त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरायचे. अंदमानसाठी तसाच प्रयत्न मागची 3-4 वर्षे सुरू होता. पण योग जुळून येत नव्हता.
ही सहल इतर सहलींच्या मानाने अधिक वेळ घेणारी, अधिक खर्चिक... वातावरण वेगळे, स्थानिक पर्यटन वैशिष्ट्यांची पुरेशी माहिती हाती नाही, अंतर्गत वाहतुक सुविधांची स्थिती, हाती असलेले पर्याय, त्यासाठीचे नियोजन या विषयी फारसा तपशील हाताशी नाही, अशा स्थितीत अंदमानचा नंबर थोडासा मागे राहिला होता. अन्य ठिकाणी सारे नियोजन स्वतः करण्याची व स्वैरपणे भटकण्याची सवय लागलेली, त्यामुळे कुठल्या ग्रुपसोबत जाण्याचा विचार मनाला पटत नव्हता.
मुळात अंदमान-निकोबारला भेट देण्याचा मुख्य हेतू अर्थातच सेल्यूलर जेलला भेट आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करण्याचा होता. पर्यटन हा त्यात ओघाने येणारा दुय्यम भाग. साधारण 3 वर्षांपूर्वी थोडीशी जुळवाजुळव करून पाहिली. औरंगाबादेतून चेन्नईपर्यंत रेल्वेचा प्रवास आणि तिथून अंदमानचा जहाजाचा. पण या प्रवासातच एका बाजून साधारण 5 दिवस, असे एकूण 9 ते 10 दिवस मोडणार होते. शिवाय तिथल्या वास्तव्याचा काळ वेगळा. दुसरा पर्याय चेन्नईहून विमानाचा होता पण लोकल कॉन्टॅक्ट हाताशी नव्हते...
दिवस जात होते, उत्कंठा वाढत होती. योग जुळून येत नव्हता. मागच्या वर्षी एक मार्ग समोर आला. ‘सावरकर अभिवादन यात्रे’बद्दल काही ठिकाणी वाचले होते आणि त्याचे आयोजक कॅप्टन निलेश गायकवाड यांच्याशी फेसबुकवरून संपर्क झाला होता. त्यांच्याशी एकदा फोनवर बोललो. त्यांनी छान प्रतिसाद दिला. पण पुन्हा एकदा विविध कारणांमुळे दौरा मागे पडला. यंदा जानेवारीत पुण्यात निलेश यांची प्रत्यक्ष भेट झाली. या यात्रेबद्दल, त्यांच्या उपक्रमाबद्दल, हेतूंबद्दल विस्ताराने बोललो. मग वाटले, अपवाद म्हणून एकदा ग्रुपसोबत जाऊन पाहण्यास हरकत नाही. यंदाच्या वर्षातच जाण्याचा संकल्प केला. मुलाची इंजिनिअरिंगची टर्म एक्झाम साधारण कधी येईल ते पाहिले आणि डिसेंबरमध्ये जाण्याचे निश्चित केले. बुकिंग पुरेसे आधी करणे गरजेचे होते, त्यामुळे जुलै-ऑगस्टमध्येच पैसे भरले आणि आम्हा तिघांचे नाव निश्चित केले. एवढे केले आणि हा विषय मी विसरून गेलो. आठवण झाली ती थेट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात.
अंदमानच्या आमच्या दौऱ्याबद्दल पुढे सांगण्याआधी मला थोडेसे निलेश गायकवाड यांच्याविषयी लिहिले पाहिजे असे वाटते. निलेश आणि प्रमोद गायकवाड हे नाशिक जिल्ह्यातील बंधूद्वय. शिक्षक आईवडिलांची ही मुले बालपणापासूनच सावरकरभक्त. त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेली. सटाणा इथे शालेय शिक्षण पूर्ण करत असतानाच आईवडीलांच्या संस्कारांमुळे त्यांच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांविषयी आत्मीयता निर्माण झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे तर क्रांतीकारकांचे मुकुटमणीच. त्यांच्याविषयीचा अपार आदर, आत्मीयता या दोघांही बंधूंच्या मनात आहे. या आत्मीयतेतूनच सावरकरांची ओळख समाजापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने निलेश गायकवाड यांनी ‘शिवसंघ प्रतिष्ठान’ची स्थापना केली. त्यातूनच संकल्पना पुढे आली ‘सावरकर साहित्य संमेलना’ची.
सन 2005-06 मध्ये त्यांनी सर्वप्रथम ही संकल्पना मांडली. एक देशभक्त, क्रांतीकारक म्हणून सावरकरांचे नाव जगाला माहिती आहेच, पण एक साहित्यिक म्हणूनही हे नाव प्रभावीपणे पोहोचावे, या दृष्टीने त्यांनी सावरकर साहित्य संमेलनाची संकल्पना मांडली. पहिल्या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी भूषविले आणि या संमेलनाचे आयोजन झाले तेे थेट अंदमानमध्ये...! 2009 या वर्षी...!
‘सावरकर’ हे नाव घेतल्यानंतर जे काही नजरेसमोर उभे राहते त्यात अंदमानची ती काळकोठडी सर्वात आधी येते. याच ठिकाणी सावरकरांच्या साहित्यातील ‘कमला’ या महाकाव्याचे लेखनही झालेले आहे. लेखन कसले? ते भिंतीवर लिहायचे... मुखोद्गत करायचे आणि पुसून टाकून परत लिहायचे. सावरकरांचे आयुष्य आणि त्या आयुष्यातील असे असंख्य प्रसंग एक चमत्कारच आहेत...! या चमत्कारांना नमन करण्याची संधी समस्त सावरकर भक्तांना मिळवून देण्याचा निलेश यांचा हेतू होता.
समाजात चांगल्या गोष्टींना नावे ठेवणार्यांतची कमी नाही. कुणी एखादा पुढाकार घेेऊन काही करीत असेल तर त्याला मदत करण्याऐवजी त्याची टर उडविणारे, तो कसा अपयशी ठरेल या विषयी भाकिते करणारेच अधिक असतात. निलेश यांच्या बाबतीतही असेच झाले. ‘पुण्यात सावरकरांचा कार्यक्रम घेतला तर 15-20 च्या वर लोक येत नाहीत, मग अंदमानला किती येतील?’ हा या मंडळींचा आवडता प्रश्न होता. त्याला उत्तर देण्याच्या फंदात न पडता निलेश यांनी प्रयत्न करण्यास प्रारंभ केला. स्वतः अंदमानला जाऊन आले, तेथील व्यावसायिकांशी चर्चा करून ‘पॅकेज’ ठरविले गेले.
प्रवासासाठी एअर इंडियाशी संपर्क झाला आणि किफायतशीर दरामध्ये अंदमान प्रवासाची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संमेलन जाहीर झाल्यानंतर पहिल्या आठच दिवसांत 500 हून अधिक जणांनी अंदमानसाठी नोंदणी केली. हे संमेलन अपेक्षेहून अधिक यशस्वी ठरले.
एकीकडे हा प्रवास चालू असताना अंदमानच्या संमेलनाला येऊ न शकलेल्या काही जणांचा पाठपुरावा सुरू झाला. त्यात अनेक ज्येष्ठांचाही सहभाग होता. आयुष्यात एकदा तरी ‘त्या’ महामानवाच्या वास्तव्याने पूनित झालेल्या कोठडीला भेट देण्याची आणि त्यासाठी अंदमानला जाण्याची त्या सर्वांची इच्छा होती. ‘शिवसंघ प्रतिष्ठान’ने ज्या बजेटमध्ये ज्या प्रकारची व्यवस्था केलेली होती त्याची माहिती मिळाल्याने तशीच व्यवस्था पुन्हा करता येेईल का, अशी विचारणा होऊ लागली. त्यातून निलेश यांच्या मनात नवी कल्पना सुचली.
पर्यटनाच्या क्षेत्रात काम करणार्या. कंपन्यांचा या टूरचा खर्च बराच जास्त. अशा स्थितीत किफायतशीर दरात सेवेची ही संधी निलेश यांनी पाहिली. त्यांनी परत एकदा अंदमानचा प्रवास केला. तेथे यंत्रणा उभारली आणि मग त्यांनी अंदमान सहलीची उद्घोषणा केली. त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. ‘एक लाख सावरकर प्रेमींनी अंदमानमध्ये नेण्याचा संकल्प’ त्यांनी केलेला आहे. मागील 6-7 वर्षांत त्यांनी सुमारे 35 हजार जणांना अंदमान वारी करविली आहे.
निलेश सांगतात, ‘‘हा आमचा व्यवसाय नाही. सामाजिक जाणिवेतून आम्ही अंदमान सहलींचे आयोजन करीत आहोत. सर्व खर्च निघतील इतकेच शुल्क आम्ही घेतो. त्यामुळे इतर कुठल्याही टुरिझम कंपनीच्या तुलनेत ‘शिवसंघ प्रतिष्ठान’ आकारत असलेले शुल्क कमी आहे. इतकेच नव्हे, तर कुणी स्वतः तिकिटे बुक करून ही सहल प्लान करीत असेल तर कदाचित त्या पेक्षाही स्वस्तात आमचे पॅकेज मिळते. कारण आम्ही विमान वाहतुकीसाठी करार केलेला आहे आणि निवास व्यवस्थाही आमची आहे. तेथे थेट खर्च जास्त होऊ शकतात...
‘‘संमेलनाच्या निमित्ताने आम्हाला लोकांच्या अपेक्षा कळल्या. आम्ही केलेल्या व्यवस्था त्यांना आवडलेल्या होत्या. पुण्यातील लोकांना आवडले तर इतरांनाही ते नक्कीच आवडले असते...! आम्ही सहली म्हणून गणित मांडण्यास सुरुवात केली. स्थानिक हॉटेलांशी चर्चा करून ‘रेट बार्गेन’ केले, विमान कंपन्यांशी चर्चा केली. आम्ही ज्या संख्येने अंदमानला पर्यटक नेतो तेवढे कुणीही नेत नाही.’’
हा अनुभव मीही प्रत्यक्षात घेतला आहे. स्वतंत्रपणे बुकिंगचा मी मागच्यावर्षी केलेला प्रयत्नच त्याला साक्ष आहे...! हे सारे अनुभव पदरी घेऊन मी अंदमानच्या दौऱ्यासाठी सिद्ध झालो.
(क्रमशः)
(क्रमशः)
अंदमान डायरी - 2
अंदमान भेट म्हणजे माझ्यासाठी, आमच्यासाठी ‘ड्रीम्स कम ट्रू’...! या दौर्या चा जवळजवळ सर्व टूर ऑपरेटर्सचा मार्ग पुण्यातून जातो, पण औरंगाबादेतून दर सोमवारी चेन्नईला जाणारी नगरसोल-चेन्नई एक्स्प्रेस मला सोयीची वाटली. 26 तासांचा प्रवास करून चेन्नईत उतरलो तेव्हा ‘शिवसंघ प्रतिष्ठान’चे सहकारी चेन्नई सेंट्रलवर घेण्यासाठी आलेले. त्यांनी त्यांच्या वाहनातून जवळच्याच हॉटेलात पोहोचवले तेव्हा आमच्या 33 जणांच्या बॅचमधील आम्ही तिघे पहिले ठरलो. इतरांहून एक दिवस आधी गेल्याने पुढचा दिवस विश्रांती घेतली आणि 14 ला सकाळी चेन्नईच्या मीनाबक्कम एअरपोर्टवरून पोर्टब्लेअरकडे उड्डाण केले.
मध्यंतरी बऱ्याच एअरपोर्टवरील गर्दी अनुभवली पण मेट्रो सिटी असूनही इथल्या एअरपोर्टवर मुंबई, दिल्ली, बंगलोरच्या तुलनेत गर्दी कमी वाटली. टूर ग्रुप असल्यामुळे वेळेचा ‘लसावी’ कमीच ठेवला जातो. त्यामुळे चेक-इन तब्बल दोन तास आधीच केले आणि मग उरलेल्या वेळेत एसीतला टाईमपास झाला.
दुपारी पावणेतीनच्या सुमारास पोर्टब्लेअरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळावर उतरताना साहजिकच मनःस्थिती भारावलेली होती. आगमन दुपारी उशीरा झाल्याने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात हॉटेलमधील चेक इन आणि सेल्यूलर जेल मधील ‘लाईट अँड साऊंड शो’ इतकाच कार्यक्रम होता. अंदमान-निकोबार भारताचाच भाग असले तरी ‘टाईम झोन’चा विचार करता हा भूभाग ब्रह्मदेशच्या - म्यानमारच्या खाली येतो. त्यामुळे आपल्याकडे साडेसहाच्या सुमारास मावळणारा सूर्य इथे साडेचार - पावणेपाचलाच क्षितिजाआड गेलेला असतो. त्यामुळे इथल्या पर्यटनाला वेळेच्या मर्यादा असणार, हे निघण्यापूर्वीच लक्षात आलेले होते...!
सेल्यूलर जेलच्या दरवाजातील वटवृक्षाला साक्षीदार व सूत्रधार कल्पून मांडलेला ‘लाईट अँड साऊंड’ शो पहिल्या दिवसाच्या आकर्षणाचे केंद्र होता खरा, पण ओम पुरीच्या खर्जातील आवाजातून मांडला गेलेला इतिहास मनामनांतील पौरूष, क्षात्रवृत्ती जागृत करण्याऐवजी हतबल वार्धक्याची केविलवाणी अनूभूती देणारा वाटला. शब्दांशब्दांतून स्फुल्लिंग चेतविण्याऐवजी पेटत्या निखार्यां वर पाण्याचा शिडकावा करणारा वाटला. आपल्या जहाल कृत्यांनी ब्रिटिशांना जेरीला आणणार्याव स्वातंत्र्यवीरांच्या पराक्रमांची गाथा सांगण्यापेक्षा भाकड अहिंसेच्या पुजार्यांंचेच गुणगाण करणारा वाटला. या संहितेची प्रेरणा स्फूर्तीतून आली की औपचारिकतेतून, हा मला संशोधनाचा विषय वाटतो. हा खेळ नव्याने मांडायला हवा. ही संहिता बदलायला हवी. इथून जाताना प्रेक्षकांच्या मनातील देशभक्ती उचंबळून यावयास हवी... देशासाठी काही करण्याची प्रेरणा जागवायला हवी. ही निव्वळ भूतकाळाची जंत्री नकोय, त्याला उज्ज्वल भवितव्याचा जोड द्यायला हवा...
000
000
रात्री झोपताना सूचना मिळाली, ‘पहाटे दोनला उठायचे, 3 वाजता चहा मिळेल आणि साडेतीनला बसमध्ये बसायचे.’ स्थानिक वेळेचा पहिला फटका पहिल्याच रात्री! इतक्या पहाटे निघण्याचे कारण? पहिली भेट होती बारतांगला. इथे निसर्गाच्या चमत्कारातून अवतरलेली चुनखडींची लेणी अप्रतिम आहेत. इथे पोहोचायचे तर सुमारे 125 किलोमीटरचा प्रवास बसने करायचा, त्यानंतर 15 मिनिटांचे ट्रोलरचा जलप्रवास आणि त्यानंतर पुढे अर्ध्या तासाचा स्पीडबोटने गाठायचा पल्ला. परतीचा क्रम पुन्हा तसाच...!
शिवाय, हा रस्ता जोरवा या वनवासी भागातून जाणारा. त्यांना त्रास नको म्हणून दिवसातून फक्त 4 वेळा वाहनांना त्या परिसरातून जाण्याची परवानगी. सकाळी 6, 9, दुपारी 12 आणि 3. परतीची परवानगीही तशीच...! हा सगळाच अजब प्रकार. एकीकडे पर्यटनाचा चालना देण्याची भूमिका जाहीर करायची आणि दुसरीकडे हा आडमुठा सरकारी प्रकार. सकाळी 6 च्या बॅचमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी साडेचार-पाचपासून शेकडोच्या संख्येने रांगा लागलेल्या.
पण या गैरसोयीतून गेल्यानंतर पाहता आलेला निसर्गाचा चमत्कार मंत्रमुग्ध करणारा ठरला. काही अतिउत्साही मंडळींनी हात लावून केलेले काही शिल्पांचे नुकसान सोडले तर एका घळीत साकारलेला हा खजिना अप्रतिमच. पण एक गोष्ट जाणवली. या कलाकृतींमागचे विज्ञान समजावून देण्यापेक्षा कुठल्या दगडात हत्ती दिसतोय आणि कुठे गणपती यांचाच तपशील गाईड जास्त सांगत होते! या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे अर्धा तास स्पीडबोडमधून प्रवास केल्यानंतर सुमारे सव्वा किलोमीटर जंगलातून चालावे लागते. हा मार्गही छान विकसित केलेला. या बेटांवरील वनसंपदा किती संपन्न आहे याच्या पुढील तीन-चार दिवसांत येणार्याा प्रत्यंतराचीच जणू ही झलक!
000
000
पुढचा दिवस होता हॅवलॉक बेटांवर जाण्याचा. इथले राधानगर बीच हे देशातील सर्वांगसुंदर समुद्रकिनार्यां पैकी एक. पोर्ट ब्लेअरमधून क्रूझने सुमारे अडीच तासांचा जलप्रवास आणि तेथे उतरून बसने साधारण अर्ध्या तासाची रपेट. हे केले की एका सुंदर समुद्र किनार्या वर आपण पोहोचतो. या दिवशी पहाटे मात्र चार पर्यंत झोपता आले. सव्वा पाचला जेट्टीवर पोहोचून सकाळी साडेआठच्या सुमारास हॅवलॉक बेटांवर पोहोचलो तेव्हा सूर्य चांगलाच वर आलेला होता. आपल्याकडे दहा-साडेदहाला येतो तसा!
बीचवर पोहोचण्याचा रस्ताही डोंगरातून, झाडा-झुडपांतून...
बीचवर पोहोचण्याचा रस्ताही डोंगरातून, झाडा-झुडपांतून...
‘मंझिल’इतकाच ‘रास्ता’ही सुंदर! रस्ते मात्र अरुंद. खड्ड्यांनी भरलेले. समोरून रिक्षाही आला तरी दोन्हीपैकी एका वाहनाला रस्ता सोडून खाली उतरावे लागेल, असा. काही टूर ऑपरेटर या ठिकाणी मुक्कामाचीही सोय करतात. तसे झाले तर बीचसाठी जास्त वेळ देता येणे शक्य असते. पण ती सोय ‘हनिमुन कपल’साठी अधिक उपयोगाची...! फार तर सेकंड हनिमुनच्या लाभार्थ्यांसाठीही ते ठीक...!
छान सोनेरी वाळू, शांत पहुडलेला नीतळ पाणपसारा, अर्धचंद्राकार हिरव्याकंच डोंगरांची लाभलेली झालर आणि वाळू-पाण्यात पहुडलेले सुखलोलुप जीव... राधानगरचा हा किनारा खरेच रमणीय. राधानगरचा हा रस्ता शामनगरातून जातो हे ही गमतीचे! राधा-श्यामाची प्रीत फुलावी, असेच इथले रम्य वातावरण. पाण्यात उतरायचे त्यांनी पाण्यात उतरावे, वाळूत पहुडणार्यांलना त्याचे स्वातंत्र्य, किनार्याावर बसायचे तर बाकांची सोय आणि थोडा उंचीवरून नजारा पाहायचा तर लाकडी मनोरे उभारलेले... जो जे वांच्छिल तो ते लाहो...! दोन-तीन तास पाण्यात खेळून आलेला थकवा घालवायचा तर थोडा पोटोबा करावा लागणार. पण काकडीसारखी फळे बाहेरून आणावी लागत असल्याने विक्रेत्यांना त्याची किंमत 40 रुपये ठेवावी लागते... साहजिकच दोन काकडींची भूक मग एकाच काकडीवर भागते!
000
000
इथे जाता-येतानाचा क्रूझचा प्रवास मात्र रम्य... समुद्राच्या मध्यम लाटा अंगावर खेळवत वेगाने पाणी कापणारी क्रूझ, डेकवर उभे राहून भन्नाट गार वारा अंगावर घेत, अधूनमधून उडणार्यार तुषारांनी किंचित ओलावत... अशा वातावरणात अनुभवण्याची चहा-कॉफीची चव (इच्छुकांसाठी जो जे वांच्छिलची सोय नाही. क्रूझवर मद्यपानास परवानगी नसते!)... सारा माहोल प्रसन्न करणारा. निघताना सूर्योदय बंदरातच होतो पण सूर्यास्त मात्र समुद्रातून पाहता येतो. अंधार पडता पडता आपण पोर्ट ब्लेअरच्या जेट्टीवर पोहोचतो आणि थकले भागले शरीर लवकरात लवकर बिछाना जवळ करू मागते...! (क्रमशः)
अंदमान डायरी - 3
अंदमान -निकोबार आपल्याला नकाशात पाहताना सलग रेषेसारखा वाटत असला तरी प्रत्यक्षात तो सुमारे 700 बेटांचा आणि उत्तर-दक्षिण सुमारे 700 किलोमीटर लांबीचा पट्टा आहे. उत्तरेला म्यानमारमधील रंगून आणि दक्षिणेला इंडेनेशिया-मलेशिया आदी देश या बेटांपासून भारत भूमीच्या तुलनेत खूप जवळ, अगदी काही शे-दीडशे किलोमीटर अंतरावर आहेत. (चेन्नई ते अंदमान हे अंतर सुमारे १७०० किलाेमीटर आहे.)
त्यातील बहुसंख्य बेटे निर्मनुष्य आहेत. काही बेटांवर वनवासींचेच वास्तव्य आहे, तेथे आपल्याला प्रवेश नाही. काही बेटांवर सैन्यदल तैनात आहे. भारतभूमीच्या संरक्षणासाठी अत्यंत मोलाचा असलेला हा टापू या सैनिकांमुळे सुरक्षित आहे. मानवी वस्ती असलेल्या मोजक्या बेटांपैकी काही मोजकीच बेटे या सहलीत आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. त्यातील आम्ही भेट दिलेली दोन महत्त्वाची बेटे - रॉस आयलंड आणि नॉर्थ बे किंवा कोरल आयलंड.
रॉस आयलंड ही जुलमी ब्रिटिशांची अंदमान-निकोबार बेटांची राजधानी. सेल्यूलर जेलच्या गच्चीत उभे राहिलो तर पुढे रॉस आयलंड स्पष्ट दिसते. या जेमतेम एक चौरस किलोमीटरच्या बेटावर ब्रिटिशांनी आपली राजधानी उभारलेली होती. पोर्ट ब्लेअरमध्ये त्यांनी तुरुंग उभारला, पण या बेटांवरील कारभार हाकण्यासाठी लागणार्याल मुख्यालयासाठी त्यांनी हे सुरक्षित बेट निवडले. साऱ्या कैद्यांनी मिळून बंड पुकारले तर धाेका नकाे, इतकाच त्यांचा उद्देश! जेमतेम 500 ब्रिटिशांच्या वसतीसाठी येथे नगरी उभारण्यात आली. क्लब हाऊस, जलशुद्धिकरण केंद्र, भव्य बॅप्टिस्ट चर्च, सारे काही अतीव सुंदर. पण ते भारतीय कैद्यांच्या रक्त आणि घामातून उभारलेले.
सुनामीच्या तडाख्यात 2004 मध्ये या बेटाची बरीच नासधूस झाली. परवा ‘उखी’नेही तडाखा दिला. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा जमिनीत ओल होती आणि तडाख्याच्या काही खुणा ताज्याच होत्या. ग्रुप एकत्र आला आणि गाईड म्हणून सामोर्याज आल्या अनुराधा राव. नाव, चेहरा पाहिल्यासारखा वाटत होता, तेवढ्यात मला नगरच्या विक्रम एडके यांची एक जुनी पोस्ट आठवली. त्यांनी अनुराधाजींचे व्यक्तिचित्र छानसे शब्दबद्ध केलेले होते. ते वाचल्याचे आठवले आणि मी कान आणि डोळे टवकारले.
अनुराधा या बेटावरच्या रहिवाशी. ही त्यांची चौथी पिढी. आधीच्या तीनही पिढ्या याच बेटावर जन्मल्या, वाढल्या. 2004 च्या सुनामीने त्यांच्या परिवारातील सर्व 27 सदस्य देवाघरी गेले, पण त्या एकट्या वाचल्या. त्यांच्या बचावण्याचे श्रेय पक्ष्यांना आणि प्राण्यांना...! त्या मुक्या जिवांना सुनामीचा अंदाज आधीच आला आणि त्यांनीच अनुराधा यांना सुरक्षित ठिकाणपर्यंत नेले...! इथल्या मोर, हरणं, पक्ष्यांशी त्या छान गप्पा मारतात. त्यांना खाऊ देतात. त्यांच्या हाकेसरशी सगळे पक्षी त्यांच्याकडे झेपावतात. हरणे येऊन लगट करतात आणि मोरांचा केका सुरू होतो. ससे पायात रेंगाळू लागतात...! बेटाच्या रचनेची खडान्खडा माहिती देत असतानाच त्यांच्या या मुक्या जिवांशी गप्पाही सुरू असतात.
एकेकाळी ही प्राणी-पक्षी संपदा खूप कमी झालेली होती. बेटावरील सरकारी माणसे त्यांचा फन्ना उडवीत. अशा स्थितीत त्यांच्या रक्षणाची जबाबदारी या किरकोळ देहयष्टीच्या बाईंनी घेतली. त्या आता पोर्ट ब्लेअरमध्ये राहतात, पण सकाळपासून रात्रीपर्यंत रॉसवर थांबतात. प्राण्यांशी गप्पा मारतात, बुलबुलची काळजी घेतात, मोर - सशांमध्ये रमतात, खारुताईला दूध पाजतात आणि आलेल्या पर्यटकांना बेटाबद्दल, ब्रिटिशांच्या कामकाजाबद्दल, त्यांनी केलेल्या अत्याचारांबद्दल आणि सावरकरांच्या त्यागाबद्दल माहिती देतात. बाई बोलायला तडकफडक, स्पष्टवक्त्या. ज्यांनी तिथल्या सशस्त्र सैनिकांची, सरकारी अधिकार्यांोची पत्रास ठेवली नाही त्यांना बेशिस्तपणा करणाऱ्या पर्यटकांचे काय?
पण त्यांच्या सांगण्यातून या बेटाचा इतिहास जिवंत होतो. ब्रिटिशांनी आपल्या उपकारकर्त्यांवरही कसे अत्याचार केले, अंदमानच्या कैद्यांचा कसा छळ झाला, रॉसवरील प्रत्येक विटेवर या कैद्यांच्या घाम आणि रक्ताचे शिंतोडे कसे उडालेले आहेत, याचे शब्दचित्र अनुराधा राव आपल्या ओघवत्या भाषेत उभे करतात तेव्हा या बेटावरील सौदर्य शापित भासू लागले. ब्रिटिशांनी समुद्राचे पाणी गोड करण्याचा पहिला प्रकल्प इथे सुरू केला, वातानुकूलाची व्यवस्था इथे राबवली, भव्य चर्चची निर्मिती केली, पण त्या सर्वांचा हेतू अय्याशीचा, देखाव्यांचा होता आणि त्याचा पाया भारतीय कैद्यांच्या छळवणुकीचा. हे चित्र विसरणे कठीण.
000
000
कोरल बेटे अर्थात नॉर्थ बे आयलंड म्हणजे पारदर्शी, नीतळ, स्वच्छ पाणी असलेला समुद्रकिनारा. इथल्या उथळ समुद्रात असलेले प्रवाळ, रंगीबेरंगी मासे, पाण्याखालील जैवविविधता हे महत्त्वाचे आकर्षण. पण नॅशनल जिऑग्राफिकवरील रंगीत विश्व पाहून त्याची तुलना करत इथे पाहण्याचा प्रयत्न केला तर मात्र निराशाच पदरी पडते. 2004 च्या सुनामीत झालेल्या नुकसानींपैकी हे एक अत्यंत मोठे नुकसान. पाण्याखालचे हे रंगीबेरंगी विश्व त्यात बर्यारपैकी उध्वस्त झाले. आता उरले आहेत ते त्याचे अवशेष. त्यामुळे स्कूबा, सीवॉक सारख्या आकर्षणांपोटी केलेली इथली सहल खिसा रिकामा करते पण मन भरून समाधान देत नाही.
समुद्राखालचे विश्व दाखविणारे वेगवेगळे पर्याय इथे उपलब्ध आहेत. नवलाईपोटी आपण ते पाहतो. दिवसाउजेडी, म्हणजे साधारण साडेतीन-चारच्याच सुमाराला पोर्ट ब्लेअरकडे येण्यासाठी निघतो. या जाण्यायेण्याच्या प्रवासात वाटेत आणखी एक छोटेखानी बेट दिसते. भले मोठे लाकडी ओंडके भरलेली काही जहाजे या बेटाच्या आसपास दिसत असतात. चौकशी करतो तेव्हा कळते, ती भारतातील सर्वात मोठी सॉ मिल आहे. नाव - चॅथम सॉ मिल. पोर्ट ब्लेअरच्या बेटांशी आता हा भूभाग पुलाने जोडलेला आहे. पण एकेकाळी हे स्वतंत्र बेट होते. या बेटावर, मिलला भेट देण्यासाठी आम्हाला वेळेअभावी प्रत्यक्षात जाता आले नाही, पण त्या विषयी स्थानिक लोकांकडून माहिती मिळविली. वाचनातून काही माहिती हाती आली.
ही मिल आणि तेथील लाकडी वस्तूंचे प्रदर्शन पाहून अनेक जण भारावतात खरे, पण माझ्यासारख्या रोखठोक माणसाला हे भारावणे फार काळ टिकवता येत नाही. 1883 मध्ये ब्रिटिशांनी सुरु केलेली ही मिल म्हणजे जणू अंदमान-निकोबार बेटांवरील वनसंपत्तीचा कत्तखानाच! स्थानिक कामांची गरज भागविण्यासाठी ही मिल सुरू करण्यात आली असे सांगितले जात असले तरी स्थानिक गरजांच्या पूर्ततेसाठी आशियातील सर्वात मोठी मिल सुरू करण्याचे कारण काय? ब्रिटिशांनी चोहोबाजूने भारताची लूट केली, त्याचाच हा एक भाग होता. या सर्व बेटांवरील वनसंपदेचा बाजार मांडून ब्रिटिशांनी चांगली धनदौलत कमावली. लंडन, न्यूयॉर्कच्या बाजारपेठांमध्ये इथून लाकूड जात असे. त्या काळात इंग्लंडच्या राजपरिवाराने एकवेळ भारताला भेट दिली नाही, पण ते या बेटावर जाऊन आले, हा इतिहास आहे! त्या काळच्या आर्थिक महासत्तेला त्यांचे महत्त्वाचे आर्थिक कळलेले होते, एवढाच याचा अर्थ.
000
000
अंदमानचा निसर्ग मोठा लहरी. विमानतळावर हजेरी लावणारा पाऊस तुमच्या हॉटेल- रिसोर्ट परिसरात असेलच असे नाही. रॉस बेटांवर झोडपणारा पाऊस कोरल बेटांवर गायब असतो. सूर्य लवकर उगवतो, लवकर मावळतो. रात्री साडेसातनंतर तेथे बऱ्यापैकी सामसूम असते.
आता वाहनांची गर्दी वाढलेली आहे. रस्त्यांची रुंदी मात्र पूर्वीसारखीच कमी राहिलेली आहे. कधी तरी वाहतुक तुंबते. लोक सामोपचाराने मार्ग काढतात. दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करतात, चारचाकी चालक बेल्ट वापरतातच असे नाही. सिगारेट-गुटका-दारुची व्यसने चांगलीच हातपाय पसरून आहेत. पोर्ट ब्लेअरचा बहुतेक भाग स्वच्छ आहे. अजूनही बहुतेक चौकांतील वाहतुक नियोजन पांढरे हातमोजे घातलेला पोलिस करत असतो...!
आता वाहनांची गर्दी वाढलेली आहे. रस्त्यांची रुंदी मात्र पूर्वीसारखीच कमी राहिलेली आहे. कधी तरी वाहतुक तुंबते. लोक सामोपचाराने मार्ग काढतात. दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करतात, चारचाकी चालक बेल्ट वापरतातच असे नाही. सिगारेट-गुटका-दारुची व्यसने चांगलीच हातपाय पसरून आहेत. पोर्ट ब्लेअरचा बहुतेक भाग स्वच्छ आहे. अजूनही बहुतेक चौकांतील वाहतुक नियोजन पांढरे हातमोजे घातलेला पोलिस करत असतो...!
अंदमानच्या दोन - तीन दिवसांच्या मुक्कामात दिसलेले हे चित्र. चार रात्री तेथे काढल्या. पाचव्या दिवशी सकाळी उठून सेल्यूलर जेलला भेट दिली आणि दुपारी तिथून निघून रात्री उशिरा चेन्नई-पुणे मार्गे पुढे टॅक्सीने औरंगाबादेत पोहोचलो. अंदमानला जाण्यापूर्वी आणि तेथून परतल्यानंतर वेगवेगळ्या भावनांचा कल्लोळ मनात दाटलेला होता. त्यातील एका मनस्वी भावनेला मी परवाच वाट काढून दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींनी माझ्यावर झालेला परिणाम शब्दबद्ध केला होता. उद्या अखेरच्या भागात पुन्हा एकदा ‘मन की बात.’
(क्रमशः)
अंदमान डायरी - 4
देखावा करायचा म्हणून सांगत नाही, पण मी कुठेही जातो तेव्हा मी तिथला निखळ आनंद घेऊ शकत नाही. मी वर्तमानात रमतो खरा, पण मनाचा कोपरा कुठेतरी भूतकाळात रेंगाळत असतो. काश्मिरात 2012 मध्ये सहकुटुंब गेलो. तिथल्या बर्फाळ दर्याखोर्यांतून फिरताना, प्राचीन सुरेख मंदिरे पाहताना, अनेक ठिकाणी विखुरलेले अवशेष अनुभवताना मला तिथला प्राचीन भूतकाळ आठवतो, पाकिस्तान्यांनी, इस्लामी अतिरेक्यांनी केलेले काश्मिरी हिंदूंचे शिरकाण अस्वस्थ करते, 1989 मधील काश्मिर आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलो होतो तेव्हा विस्थापितांशी झालेली चर्चा आठवते. डोळे-सुराणा-फडणीस यांच्या समाजवादी विचाराच्या समितीने ‘काश्मिरात आलबेल आहे’चा व्ही. पी. सिंह सरकारला दिलेला अहवाल आठवतो आणि त्यानंतर सहाच महिन्यांत खोर्यात सुरू झालेला पाकिस्तान्यांचा, धर्मांधांचा रक्तपात आजही माझा रक्तदाब वाढवतो. आज एवढ्या वर्षांनंतरही काश्मीरची जखम भळभळती आहे. दोष कुणाकुणाला देणार?
गडकिल्ले भटकताना स्वकीयांनी केलेले विश्वासघात आठवतात, परक्यांचे हल्ले अस्वस्थ करतात, अफजुल्ल्याला जिथे धूळ चारली त्या जागेला विशेष संरक्षणात ठेवणे मला इतिहासाशी प्रतारणा वाटते. राजपुतांचे सुंदर किल्ले पाहताना त्यांनी त्यांच्या सुरक्षित स्वातंत्र्याच्या बदल्यात मुगलांच्या जनानखान्यात भरती केलेल्या आपल्या आयाबहिणींची केविलवाणी अवस्था दुःख देते. त्याच वेळी महाराणा प्रतापांची झुंजार वृत्ती आठवते आणि धर्माभिमान, देशभक्ती आणि ताठ कणा असल्यामुळे या राजावरही गवत खाऊन जगण्याची वेळ आली होती, हे वास्तव हृदयात कळ आणणारे ठरते. (देशभक्तांना प्रतिकूलतेत आणि अनुकुलतेतही जर्जर करणारा भारत हा एकमेव देश असावा!) दक्षिणेतली मंदिरे सुंदर राहिलीत खरी, पण तिथल्या जातीप्रथा बेचैन करतात. महाराष्ट्रात आलेले सुधारणांचे वारे तिथे व्यवस्थितपणे पोहोचले नाही, अगदी आजही जातींचे विटाळ तेथे पाळले जातात... त्रास होतो.
अंदमानला जाताना सुद्धा अशाच विविध संमिश्र भावना मनात होत्या. ब्रिटिशांनी गुलामीत ठेवलेल्या या देशातील जहाल क्रांतकारकांना समाजापासून तोडण्यासाठी त्यांनी स्थापन केलेला हा तळ. या भूमीत माझ्या पराक्रमी पूर्वजांचे रक्त, त्यांचा घाम सांडलेला आहे. दुर्दैव असे, की या कामात माझ्याच देशातील काही विशेष देशभक्तांनी त्यांना सहकार्य केलेले आहे. अंदमानच्या भूमीला पाय लावणेही मनाला अपराधीपणाचे वाटते. त्यामुळेच सेल्यूलर जेलमध्ये प्रवेश करताना पहिल्या पायरीला वाकून नमस्कार करण्यात, सावरकरांच्या कोठडीतील भिंतीला आलिंगन देताना मला तिथल्या रोमरोमांंशी तादात्म्य पावल्याचे समाधान मिळते.
सेल्यूलर जेलचे नाव काढताच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव अग्रक्रमाने ओठांवर येते. पण मागच्या काही वर्षांत आणखी एक नाव सुद्धा ओठांवर येते, पण ते घृणास्पद व्यक्तिमत्त्व म्हणून. मणीशंकर अय्यर हे ते नाव. वाजपेयी सरकारच्या काळात पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या पुढाकारातून येथे क्रांतीज्योत चेतविण्यात आली. तिची उभारणी, देखभाल, सातत्याने होणारा गॅसचा पुरवठा हे सारे पेट्रोलियम मंत्रालय करते. या ज्योतीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चैतन्यमय ओळी अंकित केलेल्या पितळी प्लेट्स लावलेल्या होत्या. 2004 मध्ये मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात पेट्रोलियम मंत्री झालेल्या अय्यर महोदयांनी कारकीर्दीतील पहिला निर्णय घेत सावरकरांच्या त्या ओळी तेथून हटविल्या...! नेहरू परिवाराचा वैयक्तिक दात ज्यांच्यावर होता, स्वातंत्र्यानंतरही ज्यांची ब्रिटिशांनी जप्त केलेली मालमत्ता परत करण्यात आली नाही, जे सदैव उपेक्षेचेच धनी ठरले त्या सावरकरांच्या बद्दल अय्यर यांनी केलेली वर्तणूक अपेक्षितच होती.
सन 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर नवे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निर्णय घेतला आणि आधीच्या सारखीच आणखी एक क्रांतीज्योत आधीच्या शेजारीच, पण क्रांतीस्तंभाच्या चौथर्याच्या दुसर्या बाजूला उभारण्यात आली. पहिल्या ज्योतीवर अन्य प्रेरक व्यक्तिमत्त्वांच्या ओळी कोरण्यात आल्या आणि नव्या ज्योतीवर स्वातंत्र्यवीरांच्या ‘की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने’चे हिंदी भाषांतर कोरण्यात आले. या ज्योतीचे उद्घाटन प्रधान यांच्या उपस्थितीत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते 2016 मध्ये झाले. स्वातंत्र्यासाठी घरदार पणाला लावणार्या, मुलाबाळांना वार्यावर सोडणार्या स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत एका विशिष्ट परिवारातून व विचारधारेतून होणारा सातत्यपूर्ण, पिढीजात अंधविरोध वेदनादायी असतो... राष्ट्रभावनेतही असा भेदभाव करणारा परिवार निर्वंश झाला, तरच तो काळाचा न्याय म्हणता येईल. असे व्हावे, ही माझी परमेश्र्वर चरणी व्यक्तिगत प्रार्थना.
000
अंदमानच्या या दौर्यात खूप काही पाहिले. बरेच काही पाहायचे राहिले सुद्धा. भारताचा अविभाज्य भाग असलेला पण भारतभूमीपासून भर समुद्रात सुमारे 1700 किलोमीटर दूर असलेला हा भूभाग केंद्रशासित प्रदेश आहे. या बेटांवरून एक खासदार लोकसभेत निवडून जातो. सध्या येथून भाजपाचा खासदार निवडून गेलेला आहे. इथे राज्य विधानसभा नाही. केंद्रनियुक्त उपराज्यपाल इथे सर्व कारभार पाहतात. औष्णिक वा आण्विक वीज निर्मिती केंद्रे येथे नाहीत. इथे वीजनिर्मिती डिझेल जनरेटरवर होते आणि ती संपूर्ण बेटाला पुरविली जाते. मागणी वाढलेली आहे पण पुरवठा अपुरा. त्यामुळे लाईट जाण्याचे प्रमाण जास्त. त्यामुळे बहुतेकांनी आपापल्या जनरेटरची सोय केलेली आहे. पेट्रोल-डिझेल मूळ भारतीय भूमीतून समुद्रावाटे जाते. हा वाहतुकीचा खर्च मोठा आहे, तरी इंधनाचे तेथील दरही उर्वरित भारतासारखेच आहेत. भारतीय नागरिक म्हणून इथल्या नागरिकांनाही उर्वरित देशातील नागरिकांच्याच सोयी सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो.
जाण्यापूर्वीच कॅप्टन निलेश यांच्याशी बोलताना त्यांनीच प्रकाशित केलेले एक पुस्तक पाहिले, ती सगळी ठिकाणे पाहता येतील का, असेही विचारले. सारे काही पाहायचे तर कदाचित 8-10 दिवस लागले असते. काही मोजके टूर ऑपरेटर जास्त काळच्या सहलीही नेतात. ‘सावरकर अभिवादन यात्रे’च्या माध्यमातून पाहायला मिळालेल्या अंदमानावर मी समाधानी आहे. तो भाग पाहिला, या निमित्ताने नवे मित्र जोडता आले. यात्रेतील व्यवस्थाही समाधानकारक वाटल्या. बहुतेक टूर ऑपरेटर दुपारचे जेवण ज्याने त्याने आपापल्या खर्चाने करावे, असे सांगतात. कॅप्टन निलेश यांच्या सहलीत, वॉटर स्पोर्टची फी सोडता आम्हाला एकदाही खिशात हात घालण्याची गरज पडली नाही. वेळच्या वेळी मिळालेले रुचकर पदार्थ सहलीची लज्जत वाढविणारे ठरले. चोख आयोजनाबद्दल मला त्या टीमचे अभिनंदन करावेसे वाटते.
या सहलीने देशाचे शेवटचे टोक पाहता आले, अनुभवता आले. माझा हा देश इतका विराट आहे आणि इथे इतके वैविध्य आहे की पर्यटनासाठी परदेशात गेलेच पाहिजे, याची गरज मला वाटतच नाही. आधी आपला देश तर पाहू या. तो पाहून वेळ आणि आयुष्य उरले तर परदेशात जाऊ..! बर्फ, डोंगर, दर्या, अरण्य, नद्या, समुद्र, रम्य किनारे... सारे काही इथे आहे. पाहू या.. काय काय पाहता येते ते...!
पाहीन तेव्हा सांगेनच.
(समाप्त)
(समाप्त)
Subscribe to:
Posts (Atom)