Thursday, January 11, 2018

अंदमान डायरी - 2

अंदमान भेट म्हणजे माझ्यासाठी, आमच्यासाठी ‘ड्रीम्स कम ट्रू’...! या दौर्या चा जवळजवळ सर्व टूर ऑपरेटर्सचा मार्ग पुण्यातून जातो, पण औरंगाबादेतून दर सोमवारी चेन्नईला जाणारी नगरसोल-चेन्नई एक्स्प्रेस मला सोयीची वाटली. 26 तासांचा प्रवास करून चेन्नईत उतरलो तेव्हा ‘शिवसंघ प्रतिष्ठान’चे सहकारी चेन्नई सेंट्रलवर घेण्यासाठी आलेले. त्यांनी त्यांच्या वाहनातून जवळच्याच हॉटेलात पोहोचवले तेव्हा आमच्या 33 जणांच्या बॅचमधील आम्ही तिघे पहिले ठरलो. इतरांहून एक दिवस आधी गेल्याने पुढचा दिवस विश्रांती घेतली आणि 14 ला सकाळी चेन्नईच्या मीनाबक्कम एअरपोर्टवरून पोर्टब्लेअरकडे उड्डाण केले.
मध्यंतरी बऱ्याच एअरपोर्टवरील गर्दी अनुभवली पण मेट्रो सिटी असूनही इथल्या एअरपोर्टवर मुंबई, दिल्ली, बंगलोरच्या तुलनेत गर्दी कमी वाटली. टूर ग्रुप असल्यामुळे वेळेचा ‘लसावी’ कमीच ठेवला जातो. त्यामुळे चेक-इन तब्बल दोन तास आधीच केले आणि मग उरलेल्या वेळेत एसीतला टाईमपास झाला.
दुपारी पावणेतीनच्या सुमारास पोर्टब्लेअरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळावर उतरताना साहजिकच मनःस्थिती भारावलेली होती. आगमन दुपारी उशीरा झाल्याने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात हॉटेलमधील चेक इन आणि सेल्यूलर जेल मधील ‘लाईट अँड साऊंड शो’ इतकाच कार्यक्रम होता. अंदमान-निकोबार भारताचाच भाग असले तरी ‘टाईम झोन’चा विचार करता हा भूभाग ब्रह्मदेशच्या - म्यानमारच्या खाली येतो. त्यामुळे आपल्याकडे साडेसहाच्या सुमारास मावळणारा सूर्य इथे साडेचार - पावणेपाचलाच क्षितिजाआड गेलेला असतो. त्यामुळे इथल्या पर्यटनाला वेळेच्या मर्यादा असणार, हे निघण्यापूर्वीच लक्षात आलेले होते...!
सेल्यूलर जेलच्या दरवाजातील वटवृक्षाला साक्षीदार व सूत्रधार कल्पून मांडलेला ‘लाईट अँड साऊंड’ शो पहिल्या दिवसाच्या आकर्षणाचे केंद्र होता खरा, पण ओम पुरीच्या खर्जातील आवाजातून मांडला गेलेला इतिहास मनामनांतील पौरूष, क्षात्रवृत्ती जागृत करण्याऐवजी हतबल वार्धक्याची केविलवाणी अनूभूती देणारा वाटला. शब्दांशब्दांतून स्फुल्लिंग चेतविण्याऐवजी पेटत्या निखार्यां वर पाण्याचा शिडकावा करणारा वाटला. आपल्या जहाल कृत्यांनी ब्रिटिशांना जेरीला आणणार्याव स्वातंत्र्यवीरांच्या पराक्रमांची गाथा सांगण्यापेक्षा भाकड अहिंसेच्या पुजार्यांंचेच गुणगाण करणारा वाटला. या संहितेची प्रेरणा स्फूर्तीतून आली की औपचारिकतेतून, हा मला संशोधनाचा विषय वाटतो. हा खेळ नव्याने मांडायला हवा. ही संहिता बदलायला हवी. इथून जाताना प्रेक्षकांच्या मनातील देशभक्ती उचंबळून यावयास हवी... देशासाठी काही करण्याची प्रेरणा जागवायला हवी. ही निव्वळ भूतकाळाची जंत्री नकोय, त्याला उज्ज्वल भवितव्याचा जोड द्यायला हवा...
000
रात्री झोपताना सूचना मिळाली, ‘पहाटे दोनला उठायचे, 3 वाजता चहा मिळेल आणि साडेतीनला बसमध्ये बसायचे.’ स्थानिक वेळेचा पहिला फटका पहिल्याच रात्री! इतक्या पहाटे निघण्याचे कारण? पहिली भेट होती बारतांगला. इथे निसर्गाच्या चमत्कारातून अवतरलेली चुनखडींची लेणी अप्रतिम आहेत. इथे पोहोचायचे तर सुमारे 125 किलोमीटरचा प्रवास बसने करायचा, त्यानंतर 15 मिनिटांचे ट्रोलरचा जलप्रवास आणि त्यानंतर पुढे अर्ध्या तासाचा स्पीडबोटने गाठायचा पल्ला. परतीचा क्रम पुन्हा तसाच...!
शिवाय, हा रस्ता जोरवा या वनवासी भागातून जाणारा. त्यांना त्रास नको म्हणून दिवसातून फक्त 4 वेळा वाहनांना त्या परिसरातून जाण्याची परवानगी. सकाळी 6, 9, दुपारी 12 आणि 3. परतीची परवानगीही तशीच...! हा सगळाच अजब प्रकार. एकीकडे पर्यटनाचा चालना देण्याची भूमिका जाहीर करायची आणि दुसरीकडे हा आडमुठा सरकारी प्रकार. सकाळी 6 च्या बॅचमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी साडेचार-पाचपासून शेकडोच्या संख्येने रांगा लागलेल्या.
पण या गैरसोयीतून गेल्यानंतर पाहता आलेला निसर्गाचा चमत्कार मंत्रमुग्ध करणारा ठरला. काही अतिउत्साही मंडळींनी हात लावून केलेले काही शिल्पांचे नुकसान सोडले तर एका घळीत साकारलेला हा खजिना अप्रतिमच. पण एक गोष्ट जाणवली. या कलाकृतींमागचे विज्ञान समजावून देण्यापेक्षा कुठल्या दगडात हत्ती दिसतोय आणि कुठे गणपती यांचाच तपशील गाईड जास्त सांगत होते! या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे अर्धा तास स्पीडबोडमधून प्रवास केल्यानंतर सुमारे सव्वा किलोमीटर जंगलातून चालावे लागते. हा मार्गही छान विकसित केलेला. या बेटांवरील वनसंपदा किती संपन्न आहे याच्या पुढील तीन-चार दिवसांत येणार्याा प्रत्यंतराचीच जणू ही झलक!
000
पुढचा दिवस होता हॅवलॉक बेटांवर जाण्याचा. इथले राधानगर बीच हे देशातील सर्वांगसुंदर समुद्रकिनार्यां पैकी एक. पोर्ट ब्लेअरमधून क्रूझने सुमारे अडीच तासांचा जलप्रवास आणि तेथे उतरून बसने साधारण अर्ध्या तासाची रपेट. हे केले की एका सुंदर समुद्र किनार्या वर आपण पोहोचतो. या दिवशी पहाटे मात्र चार पर्यंत झोपता आले. सव्वा पाचला जेट्टीवर पोहोचून सकाळी साडेआठच्या सुमारास हॅवलॉक बेटांवर पोहोचलो तेव्हा सूर्य चांगलाच वर आलेला होता. आपल्याकडे दहा-साडेदहाला येतो तसा!
बीचवर पोहोचण्याचा रस्ताही डोंगरातून, झाडा-झुडपांतून...
‘मंझिल’इतकाच ‘रास्ता’ही सुंदर! रस्ते मात्र अरुंद. खड्ड्यांनी भरलेले. समोरून रिक्षाही आला तरी दोन्हीपैकी एका वाहनाला रस्ता सोडून खाली उतरावे लागेल, असा. काही टूर ऑपरेटर या ठिकाणी मुक्कामाचीही सोय करतात. तसे झाले तर बीचसाठी जास्त वेळ देता येणे शक्य असते. पण ती सोय ‘हनिमुन कपल’साठी अधिक उपयोगाची...! फार तर सेकंड हनिमुनच्या लाभार्थ्यांसाठीही ते ठीक...!
छान सोनेरी वाळू, शांत पहुडलेला नीतळ पाणपसारा, अर्धचंद्राकार हिरव्याकंच डोंगरांची लाभलेली झालर आणि वाळू-पाण्यात पहुडलेले सुखलोलुप जीव... राधानगरचा हा किनारा खरेच रमणीय. राधानगरचा हा रस्ता शामनगरातून जातो हे ही गमतीचे! राधा-श्यामाची प्रीत फुलावी, असेच इथले रम्य वातावरण. पाण्यात उतरायचे त्यांनी पाण्यात उतरावे, वाळूत पहुडणार्यांलना त्याचे स्वातंत्र्य, किनार्याावर बसायचे तर बाकांची सोय आणि थोडा उंचीवरून नजारा पाहायचा तर लाकडी मनोरे उभारलेले... जो जे वांच्छिल तो ते लाहो...! दोन-तीन तास पाण्यात खेळून आलेला थकवा घालवायचा तर थोडा पोटोबा करावा लागणार. पण काकडीसारखी फळे बाहेरून आणावी लागत असल्याने विक्रेत्यांना त्याची किंमत 40 रुपये ठेवावी लागते... साहजिकच दोन काकडींची भूक मग एकाच काकडीवर भागते!
000
इथे जाता-येतानाचा क्रूझचा प्रवास मात्र रम्य... समुद्राच्या मध्यम लाटा अंगावर खेळवत वेगाने पाणी कापणारी क्रूझ, डेकवर उभे राहून भन्नाट गार वारा अंगावर घेत, अधूनमधून उडणार्यार तुषारांनी किंचित ओलावत... अशा वातावरणात अनुभवण्याची चहा-कॉफीची चव (इच्छुकांसाठी जो जे वांच्छिलची सोय नाही. क्रूझवर मद्यपानास परवानगी नसते!)... सारा माहोल प्रसन्न करणारा. निघताना सूर्योदय बंदरातच होतो पण सूर्यास्त मात्र समुद्रातून पाहता येतो. अंधार पडता पडता आपण पोर्ट ब्लेअरच्या जेट्टीवर पोहोचतो आणि थकले भागले शरीर लवकरात लवकर बिछाना जवळ करू मागते...! (क्रमशः)

अंदमान डायरी - 3

अंदमान -निकोबार आपल्याला नकाशात पाहताना सलग रेषेसारखा वाटत असला तरी प्रत्यक्षात तो सुमारे 700 बेटांचा आणि उत्तर-दक्षिण सुमारे 700 किलोमीटर लांबीचा पट्टा आहे. उत्तरेला म्यानमारमधील रंगून आणि दक्षिणेला इंडेनेशिया-मलेशिया आदी देश या बेटांपासून भारत भूमीच्या तुलनेत खूप जवळ, अगदी काही शे-दीडशे किलोमीटर अंतरावर आहेत. (चेन्नई ते अंदमान हे अंतर सुमारे १७०० किलाेमीटर आहे.)
त्यातील बहुसंख्य बेटे निर्मनुष्य आहेत. काही बेटांवर वनवासींचेच वास्तव्य आहे, तेथे आपल्याला प्रवेश नाही. काही बेटांवर सैन्यदल तैनात आहे. भारतभूमीच्या संरक्षणासाठी अत्यंत मोलाचा असलेला हा टापू या सैनिकांमुळे सुरक्षित आहे. मानवी वस्ती असलेल्या मोजक्या बेटांपैकी काही मोजकीच बेटे या सहलीत आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. त्यातील आम्ही भेट दिलेली दोन महत्त्वाची बेटे - रॉस आयलंड आणि नॉर्थ बे किंवा कोरल आयलंड.
रॉस आयलंड ही जुलमी ब्रिटिशांची अंदमान-निकोबार बेटांची राजधानी. सेल्यूलर जेलच्या गच्चीत उभे राहिलो तर पुढे रॉस आयलंड स्पष्ट दिसते. या जेमतेम एक चौरस किलोमीटरच्या बेटावर ब्रिटिशांनी आपली राजधानी उभारलेली होती. पोर्ट ब्लेअरमध्ये त्यांनी तुरुंग उभारला, पण या बेटांवरील कारभार हाकण्यासाठी लागणार्याल मुख्यालयासाठी त्यांनी हे सुरक्षित बेट निवडले. साऱ्या कैद्यांनी मिळून बंड पुकारले तर धाेका नकाे, इतकाच त्यांचा उद्देश! जेमतेम 500 ब्रिटिशांच्या वसतीसाठी येथे नगरी उभारण्यात आली. क्लब हाऊस, जलशुद्धिकरण केंद्र, भव्य बॅप्टिस्ट चर्च, सारे काही अतीव सुंदर. पण ते भारतीय कैद्यांच्या रक्त आणि घामातून उभारलेले.
सुनामीच्या तडाख्यात 2004 मध्ये या बेटाची बरीच नासधूस झाली. परवा ‘उखी’नेही तडाखा दिला. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा जमिनीत ओल होती आणि तडाख्याच्या काही खुणा ताज्याच होत्या. ग्रुप एकत्र आला आणि गाईड म्हणून सामोर्याज आल्या अनुराधा राव. नाव, चेहरा पाहिल्यासारखा वाटत होता, तेवढ्यात मला नगरच्या विक्रम एडके यांची एक जुनी पोस्ट आठवली. त्यांनी अनुराधाजींचे व्यक्तिचित्र छानसे शब्दबद्ध केलेले होते. ते वाचल्याचे आठवले आणि मी कान आणि डोळे टवकारले.
अनुराधा या बेटावरच्या रहिवाशी. ही त्यांची चौथी पिढी. आधीच्या तीनही पिढ्या याच बेटावर जन्मल्या, वाढल्या. 2004 च्या सुनामीने त्यांच्या परिवारातील सर्व 27 सदस्य देवाघरी गेले, पण त्या एकट्या वाचल्या. त्यांच्या बचावण्याचे श्रेय पक्ष्यांना आणि प्राण्यांना...! त्या मुक्या जिवांना सुनामीचा अंदाज आधीच आला आणि त्यांनीच अनुराधा यांना सुरक्षित ठिकाणपर्यंत नेले...! इथल्या मोर, हरणं, पक्ष्यांशी त्या छान गप्पा मारतात. त्यांना खाऊ देतात. त्यांच्या हाकेसरशी सगळे पक्षी त्यांच्याकडे झेपावतात. हरणे येऊन लगट करतात आणि मोरांचा केका सुरू होतो. ससे पायात रेंगाळू लागतात...! बेटाच्या रचनेची खडान्खडा माहिती देत असतानाच त्यांच्या या मुक्या जिवांशी गप्पाही सुरू असतात.
एकेकाळी ही प्राणी-पक्षी संपदा खूप कमी झालेली होती. बेटावरील सरकारी माणसे त्यांचा फन्ना उडवीत. अशा स्थितीत त्यांच्या रक्षणाची जबाबदारी या किरकोळ देहयष्टीच्या बाईंनी घेतली. त्या आता पोर्ट ब्लेअरमध्ये राहतात, पण सकाळपासून रात्रीपर्यंत रॉसवर थांबतात. प्राण्यांशी गप्पा मारतात, बुलबुलची काळजी घेतात, मोर - सशांमध्ये रमतात, खारुताईला दूध पाजतात आणि आलेल्या पर्यटकांना बेटाबद्दल, ब्रिटिशांच्या कामकाजाबद्दल, त्यांनी केलेल्या अत्याचारांबद्दल आणि सावरकरांच्या त्यागाबद्दल माहिती देतात. बाई बोलायला तडकफडक, स्पष्टवक्त्या. ज्यांनी तिथल्या सशस्त्र सैनिकांची, सरकारी अधिकार्यांोची पत्रास ठेवली नाही त्यांना बेशिस्तपणा करणाऱ्या पर्यटकांचे काय?
पण त्यांच्या सांगण्यातून या बेटाचा इतिहास जिवंत होतो. ब्रिटिशांनी आपल्या उपकारकर्त्यांवरही कसे अत्याचार केले, अंदमानच्या कैद्यांचा कसा छळ झाला, रॉसवरील प्रत्येक विटेवर या कैद्यांच्या घाम आणि रक्ताचे शिंतोडे कसे उडालेले आहेत, याचे शब्दचित्र अनुराधा राव आपल्या ओघवत्या भाषेत उभे करतात तेव्हा या बेटावरील सौदर्य शापित भासू लागले. ब्रिटिशांनी समुद्राचे पाणी गोड करण्याचा पहिला प्रकल्प इथे सुरू केला, वातानुकूलाची व्यवस्था इथे राबवली, भव्य चर्चची निर्मिती केली, पण त्या सर्वांचा हेतू अय्याशीचा, देखाव्यांचा होता आणि त्याचा पाया भारतीय कैद्यांच्या छळवणुकीचा. हे चित्र विसरणे कठीण.
000
कोरल बेटे अर्थात नॉर्थ बे आयलंड म्हणजे पारदर्शी, नीतळ, स्वच्छ पाणी असलेला समुद्रकिनारा. इथल्या उथळ समुद्रात असलेले प्रवाळ, रंगीबेरंगी मासे, पाण्याखालील जैवविविधता हे महत्त्वाचे आकर्षण. पण नॅशनल जिऑग्राफिकवरील रंगीत विश्व पाहून त्याची तुलना करत इथे पाहण्याचा प्रयत्न केला तर मात्र निराशाच पदरी पडते. 2004 च्या सुनामीत झालेल्या नुकसानींपैकी हे एक अत्यंत मोठे नुकसान. पाण्याखालचे हे रंगीबेरंगी विश्व त्यात बर्यारपैकी उध्वस्त झाले. आता उरले आहेत ते त्याचे अवशेष. त्यामुळे स्कूबा, सीवॉक सारख्या आकर्षणांपोटी केलेली इथली सहल खिसा रिकामा करते पण मन भरून समाधान देत नाही.
समुद्राखालचे विश्व दाखविणारे वेगवेगळे पर्याय इथे उपलब्ध आहेत. नवलाईपोटी आपण ते पाहतो. दिवसाउजेडी, म्हणजे साधारण साडेतीन-चारच्याच सुमाराला पोर्ट ब्लेअरकडे येण्यासाठी निघतो. या जाण्यायेण्याच्या प्रवासात वाटेत आणखी एक छोटेखानी बेट दिसते. भले मोठे लाकडी ओंडके भरलेली काही जहाजे या बेटाच्या आसपास दिसत असतात. चौकशी करतो तेव्हा कळते, ती भारतातील सर्वात मोठी सॉ मिल आहे. नाव - चॅथम सॉ मिल. पोर्ट ब्लेअरच्या बेटांशी आता हा भूभाग पुलाने जोडलेला आहे. पण एकेकाळी हे स्वतंत्र बेट होते. या बेटावर, मिलला भेट देण्यासाठी आम्हाला वेळेअभावी प्रत्यक्षात जाता आले नाही, पण त्या विषयी स्थानिक लोकांकडून माहिती मिळविली. वाचनातून काही माहिती हाती आली.
ही मिल आणि तेथील लाकडी वस्तूंचे प्रदर्शन पाहून अनेक जण भारावतात खरे, पण माझ्यासारख्या रोखठोक माणसाला हे भारावणे फार काळ टिकवता येत नाही. 1883 मध्ये ब्रिटिशांनी सुरु केलेली ही मिल म्हणजे जणू अंदमान-निकोबार बेटांवरील वनसंपत्तीचा कत्तखानाच! स्थानिक कामांची गरज भागविण्यासाठी ही मिल सुरू करण्यात आली असे सांगितले जात असले तरी स्थानिक गरजांच्या पूर्ततेसाठी आशियातील सर्वात मोठी मिल सुरू करण्याचे कारण काय? ब्रिटिशांनी चोहोबाजूने भारताची लूट केली, त्याचाच हा एक भाग होता. या सर्व बेटांवरील वनसंपदेचा बाजार मांडून ब्रिटिशांनी चांगली धनदौलत कमावली. लंडन, न्यूयॉर्कच्या बाजारपेठांमध्ये इथून लाकूड जात असे. त्या काळात इंग्लंडच्या राजपरिवाराने एकवेळ भारताला भेट दिली नाही, पण ते या बेटावर जाऊन आले, हा इतिहास आहे! त्या काळच्या आर्थिक महासत्तेला त्यांचे महत्त्वाचे आर्थिक कळलेले होते, एवढाच याचा अर्थ.
000
अंदमानचा निसर्ग मोठा लहरी. विमानतळावर हजेरी लावणारा पाऊस तुमच्या हॉटेल- रिसोर्ट परिसरात असेलच असे नाही. रॉस बेटांवर झोडपणारा पाऊस कोरल बेटांवर गायब असतो. सूर्य लवकर उगवतो, लवकर मावळतो. रात्री साडेसातनंतर तेथे बऱ्यापैकी सामसूम असते.
आता वाहनांची गर्दी वाढलेली आहे. रस्त्यांची रुंदी मात्र पूर्वीसारखीच कमी राहिलेली आहे. कधी तरी वाहतुक तुंबते. लोक सामोपचाराने मार्ग काढतात. दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करतात, चारचाकी चालक बेल्ट वापरतातच असे नाही. सिगारेट-गुटका-दारुची व्यसने चांगलीच हातपाय पसरून आहेत. पोर्ट ब्लेअरचा बहुतेक भाग स्वच्छ आहे. अजूनही बहुतेक चौकांतील वाहतुक नियोजन पांढरे हातमोजे घातलेला पोलिस करत असतो...!
अंदमानच्या दोन - तीन दिवसांच्या मुक्कामात दिसलेले हे चित्र. चार रात्री तेथे काढल्या. पाचव्या दिवशी सकाळी उठून सेल्यूलर जेलला भेट दिली आणि दुपारी तिथून निघून रात्री उशिरा चेन्नई-पुणे मार्गे पुढे टॅक्सीने औरंगाबादेत पोहोचलो. अंदमानला जाण्यापूर्वी आणि तेथून परतल्यानंतर वेगवेगळ्या भावनांचा कल्लोळ मनात दाटलेला होता. त्यातील एका मनस्वी भावनेला मी परवाच वाट काढून दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींनी माझ्यावर झालेला परिणाम शब्दबद्ध केला होता. उद्या अखेरच्या भागात पुन्हा एकदा ‘मन की बात.’
(क्रमशः)

अंदमान डायरी - 4

देखावा करायचा म्हणून सांगत नाही, पण मी कुठेही जातो तेव्हा मी तिथला निखळ आनंद घेऊ शकत नाही. मी वर्तमानात रमतो खरा, पण मनाचा कोपरा कुठेतरी भूतकाळात रेंगाळत असतो. काश्मिरात 2012 मध्ये सहकुटुंब गेलो. तिथल्या बर्फाळ दर्‍याखोर्‍यांतून फिरताना, प्राचीन सुरेख मंदिरे पाहताना, अनेक ठिकाणी विखुरलेले अवशेष अनुभवताना मला तिथला प्राचीन भूतकाळ आठवतो, पाकिस्तान्यांनी, इस्लामी अतिरेक्यांनी केलेले काश्मिरी हिंदूंचे शिरकाण अस्वस्थ करते, 1989 मधील काश्मिर आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलो होतो तेव्हा विस्थापितांशी झालेली चर्चा आठवते. डोळे-सुराणा-फडणीस यांच्या समाजवादी विचाराच्या समितीने ‘काश्मिरात आलबेल आहे’चा व्ही. पी. सिंह सरकारला दिलेला अहवाल आठवतो आणि त्यानंतर सहाच महिन्यांत खोर्‍यात सुरू झालेला पाकिस्तान्यांचा, धर्मांधांचा रक्तपात आजही माझा रक्तदाब वाढवतो. आज एवढ्या वर्षांनंतरही काश्मीरची जखम भळभळती आहे. दोष कुणाकुणाला देणार?
गडकिल्ले भटकताना स्वकीयांनी केलेले विश्वासघात आठवतात, परक्यांचे हल्ले अस्वस्थ करतात, अफजुल्ल्याला जिथे धूळ चारली त्या जागेला विशेष संरक्षणात ठेवणे मला इतिहासाशी प्रतारणा वाटते. राजपुतांचे सुंदर किल्ले पाहताना त्यांनी त्यांच्या सुरक्षित स्वातंत्र्याच्या बदल्यात मुगलांच्या जनानखान्यात भरती केलेल्या आपल्या आयाबहिणींची केविलवाणी अवस्था दुःख देते. त्याच वेळी महाराणा प्रतापांची झुंजार वृत्ती आठवते आणि धर्माभिमान, देशभक्ती आणि ताठ कणा असल्यामुळे या राजावरही गवत खाऊन जगण्याची वेळ आली होती, हे वास्तव हृदयात कळ आणणारे ठरते. (देशभक्तांना प्रतिकूलतेत आणि अनुकुलतेतही जर्जर करणारा भारत हा एकमेव देश असावा!) दक्षिणेतली मंदिरे सुंदर राहिलीत खरी, पण तिथल्या जातीप्रथा बेचैन करतात. महाराष्ट्रात आलेले सुधारणांचे वारे तिथे व्यवस्थितपणे पोहोचले नाही, अगदी आजही जातींचे विटाळ तेथे पाळले जातात... त्रास होतो.
अंदमानला जाताना सुद्धा अशाच विविध संमिश्र भावना मनात होत्या. ब्रिटिशांनी गुलामीत ठेवलेल्या या देशातील जहाल क्रांतकारकांना समाजापासून तोडण्यासाठी त्यांनी स्थापन केलेला हा तळ. या भूमीत माझ्या पराक्रमी पूर्वजांचे रक्त, त्यांचा घाम सांडलेला आहे. दुर्दैव असे, की या कामात माझ्याच देशातील काही विशेष देशभक्तांनी त्यांना सहकार्य केलेले आहे. अंदमानच्या भूमीला पाय लावणेही मनाला अपराधीपणाचे वाटते. त्यामुळेच सेल्यूलर जेलमध्ये प्रवेश करताना पहिल्या पायरीला वाकून नमस्कार करण्यात, सावरकरांच्या कोठडीतील भिंतीला आलिंगन देताना मला तिथल्या रोमरोमांंशी तादात्म्य पावल्याचे समाधान मिळते.
सेल्यूलर जेलचे नाव काढताच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव अग्रक्रमाने ओठांवर येते. पण मागच्या काही वर्षांत आणखी एक नाव सुद्धा ओठांवर येते, पण ते घृणास्पद व्यक्तिमत्त्व म्हणून. मणीशंकर अय्यर हे ते नाव. वाजपेयी सरकारच्या काळात पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या पुढाकारातून येथे क्रांतीज्योत चेतविण्यात आली. तिची उभारणी, देखभाल, सातत्याने होणारा गॅसचा पुरवठा हे सारे पेट्रोलियम मंत्रालय करते. या ज्योतीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चैतन्यमय ओळी अंकित केलेल्या पितळी प्लेट्स लावलेल्या होत्या. 2004 मध्ये मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात पेट्रोलियम मंत्री झालेल्या अय्यर महोदयांनी कारकीर्दीतील पहिला निर्णय घेत सावरकरांच्या त्या ओळी तेथून हटविल्या...! नेहरू परिवाराचा वैयक्तिक दात ज्यांच्यावर होता, स्वातंत्र्यानंतरही ज्यांची ब्रिटिशांनी जप्त केलेली मालमत्ता परत करण्यात आली नाही, जे सदैव उपेक्षेचेच धनी ठरले त्या सावरकरांच्या बद्दल अय्यर यांनी केलेली वर्तणूक अपेक्षितच होती.
सन 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर नवे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निर्णय घेतला आणि आधीच्या सारखीच आणखी एक क्रांतीज्योत आधीच्या शेजारीच, पण क्रांतीस्तंभाच्या चौथर्‍याच्या दुसर्‍या बाजूला उभारण्यात आली. पहिल्या ज्योतीवर अन्य प्रेरक व्यक्तिमत्त्वांच्या ओळी कोरण्यात आल्या आणि नव्या ज्योतीवर स्वातंत्र्यवीरांच्या ‘की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने’चे हिंदी भाषांतर कोरण्यात आले. या ज्योतीचे उद्घाटन प्रधान यांच्या उपस्थितीत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते 2016 मध्ये झाले. स्वातंत्र्यासाठी घरदार पणाला लावणार्‍या, मुलाबाळांना वार्‍यावर सोडणार्‍या स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत एका विशिष्ट परिवारातून व विचारधारेतून होणारा सातत्यपूर्ण, पिढीजात अंधविरोध वेदनादायी असतो... राष्ट्रभावनेतही असा भेदभाव करणारा परिवार निर्वंश झाला, तरच तो काळाचा न्याय म्हणता येईल. असे व्हावे, ही माझी परमेश्र्वर चरणी व्यक्तिगत प्रार्थना.
000
अंदमानच्या या दौर्‍यात खूप काही पाहिले. बरेच काही पाहायचे राहिले सुद्धा. भारताचा अविभाज्य भाग असलेला पण भारतभूमीपासून भर समुद्रात सुमारे 1700 किलोमीटर दूर असलेला हा भूभाग केंद्रशासित प्रदेश आहे. या बेटांवरून एक खासदार लोकसभेत निवडून जातो. सध्या येथून भाजपाचा खासदार निवडून गेलेला आहे. इथे राज्य विधानसभा नाही. केंद्रनियुक्त उपराज्यपाल इथे सर्व कारभार पाहतात. औष्णिक वा आण्विक वीज निर्मिती केंद्रे येथे नाहीत. इथे वीजनिर्मिती डिझेल जनरेटरवर होते आणि ती संपूर्ण बेटाला पुरविली जाते. मागणी वाढलेली आहे पण पुरवठा अपुरा. त्यामुळे लाईट जाण्याचे प्रमाण जास्त. त्यामुळे बहुतेकांनी आपापल्या जनरेटरची सोय केलेली आहे. पेट्रोल-डिझेल मूळ भारतीय भूमीतून समुद्रावाटे जाते. हा वाहतुकीचा खर्च मोठा आहे, तरी इंधनाचे तेथील दरही उर्वरित भारतासारखेच आहेत. भारतीय नागरिक म्हणून इथल्या नागरिकांनाही उर्वरित देशातील नागरिकांच्याच सोयी सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो.
जाण्यापूर्वीच कॅप्टन निलेश यांच्याशी बोलताना त्यांनीच प्रकाशित केलेले एक पुस्तक पाहिले, ती सगळी ठिकाणे पाहता येतील का, असेही विचारले. सारे काही पाहायचे तर कदाचित 8-10 दिवस लागले असते. काही मोजके टूर ऑपरेटर जास्त काळच्या सहलीही नेतात. ‘सावरकर अभिवादन यात्रे’च्या माध्यमातून पाहायला मिळालेल्या अंदमानावर मी समाधानी आहे. तो भाग पाहिला, या निमित्ताने नवे मित्र जोडता आले. यात्रेतील व्यवस्थाही समाधानकारक वाटल्या. बहुतेक टूर ऑपरेटर दुपारचे जेवण ज्याने त्याने आपापल्या खर्चाने करावे, असे सांगतात. कॅप्टन निलेश यांच्या सहलीत, वॉटर स्पोर्टची फी सोडता आम्हाला एकदाही खिशात हात घालण्याची गरज पडली नाही. वेळच्या वेळी मिळालेले रुचकर पदार्थ सहलीची लज्जत वाढविणारे ठरले. चोख आयोजनाबद्दल मला त्या टीमचे अभिनंदन करावेसे वाटते.
या सहलीने देशाचे शेवटचे टोक पाहता आले, अनुभवता आले. माझा हा देश इतका विराट आहे आणि इथे इतके वैविध्य आहे की पर्यटनासाठी परदेशात गेलेच पाहिजे, याची गरज मला वाटतच नाही. आधी आपला देश तर पाहू या. तो पाहून वेळ आणि आयुष्य उरले तर परदेशात जाऊ..! बर्फ, डोंगर, दर्‍या, अरण्य, नद्या, समुद्र, रम्य किनारे... सारे काही इथे आहे. पाहू या.. काय काय पाहता येते ते...!
पाहीन तेव्हा सांगेनच.
(समाप्त)

Tuesday, December 19, 2017

हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते... श्री स्वतंत्रते...



(© दत्ता जोशी, औरंगाबाद)
सेल्यूलर जेलच्या पहिल्या पायरीला वाकून नमस्कार करीत स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या त्या तीर्थस्थळी अत्यंत विनम्रतेने प्रवेश करताना मनात असंख्य भावनांचे काहूर माजलेले होते. शालेय वयात कधीतरी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या नावाचा पहिला परिचय झाला तेव्हापासून भगूर, अंदमान आणि रत्नागिरी या तीन स्थानांची नोंद मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी ‘तीर्थस्थळ’ म्हणून झालेली होती. त्यातील अंदमान सहजसाध्य नव्हते. अनेक वर्षांपासून मनस्वी इच्छा होती. या वर्षी 18 डिसेंबर रोजी ती पूर्ण झाली.

जेलच्या पहिल्या बराकीच्या बाजूने पुढे चालताना उजवीकडे सातव्या बराकीच्या तिसर्‍या मजल्यावरची कोपर्‍यातील कोठडी दिसली आणि मनात अस्वस्थता दाटण्याला सुरुवात झाली. एक एक पाऊल पुढे टाकत होतो तसे मन भूतकाळात जात होते. सूर्यकिरणांप्रमाणे सात दिशांना पसरलेल्या मूळ सात बराकी, त्यांना मध्यभागी जोडणारा उंच टॉवर, त्या बाजूने वरती गेलेला जिना... प्रत्येक पाऊल पुढे टाकताना, एक एक पायरी चढताना शरीराला जडत्व येत होते.

तिसरा मजला चढलो, डावीकडे वळलो, बराकीचा मुख्य लोखंडी दरवाजा पार केला आणि एक एक पाऊल टाकत टोकाकडे निघालो, तशी हृदयाची धडधड वाढली... डावीकडे एक एक कोठडी... तिला असलेला भक्कम दरवाजा... भास होऊ लागला, की आत अंदमानातले ते सारे स्वातंत्र्यवीर आहेत.. ते सारे उच्चरवाने घोषणा देताहेत... ‘भारत माता की जय’... ‘वंदे मातरम्’... ‘इन्कलाब जिंदाबाद’... आणि शरीराच्या रोमरोमी रोमांच फुललेल्या अवस्थेत मी शेवटच्या कोठडीपर्यंत पोहोचतो... या कोठडीला बाहेरून आणखी एक दरवाजा... इथेच तर ब्रिटिशांचा ‘मोस्ट डेंजरस’ कैदी बंद होता ना... एवढी कडेकोट सुरक्षा इथे हवीच...!

माझी पत्नी पद्मजा माझ्या पुढेच चालत होती. तिचीही अवस्था माझ्यासारखीच झाली असावी. तिने पायातले बूट बाहेर काढून ठेवले... मीही बूट-सॉक्स काढले... अनवाणी पायाने, भरलेल्या डोळ्यांनी स्वातंत्र्याच्या त्या गाभार्‍याच्या चौकटीला आम्ही प्रणाम केला आणि आत पाऊल ठेवले... ती काळकोठडी चोहोबाजूने अंगावर धावून आली. याच कोठडीत 10 वर्षांहून अधिक काळ राहून माझ्या देशाच्या स्वातंत्र्यवीराने ब्रिटिशांना घाम फोडला होता. विलक्षण आत्मबळ असलेल्या विनायक दामोदर सावरकर नावाच्या एका बॅरिस्टराने संपन्न वैयक्तिक करिअर बाजूला ठेवून भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यागाचे परमोच्च उदाहरण घालून दिलेले होते.


इथे उभा होतो तेव्हा शंभर वर्षांपूर्वीचा काळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून धावत होता. जुलमी जेलर विल्यम बॅरी, त्याचे तेवढेच क्रूरकर्मा साथीदार, न्यायाच्या नावाने जगभर भलावण करणारे आणि प्रत्यक्षात रक्तपिपासू असलेले ब्रिटिश राजघराणे, त्यांचे सरकार... या सर्वांना उच्चरवाने आव्हान देणारा स्वातंत्र्यवीर... आपल्या विलक्षण आत्मबळाने आपले अस्तित्त्व सार्थकी लावणारा आणि अंदमानातील इतर राजबंद्यांनाही विजिगिषु प्रेरणा देणारा नरवीर...

कोठडीत लावलेल्या प्रतिमेला नमस्कार केला. लाकडी फळीवर अंथरलेले ब्लँकेट... त्यावर असलेली प्रतिमा आणि समोर ठेवलेले दोन लोखंडी वाडगे... ऊर भरून आला. त्या फळीवर मस्तक टेकवले... दोन्ही वाडगी कवेत घेतली... यातील कणाकणांना सावरकरांचा परीसस्पर्श झालेला... तो स्पर्श मी अधाशासारखा शोषून घेत होतो... तिथून उठलो... भिंतीला अलिंगन दिले... त्यावर कानशिल टेकवताना जणू सावरकरांच्या छातीवरच टेकल्याचा भास झाला... त्यांच्या दमदार श्वासाची धीरोदात्त लय जाणवू लागली... जणू ती सांगत होती, ‘‘अरे, नुसत्या आठवणींनी केविलवाणा झालास? मी 11 वर्षे इथे काढली आहेत. जिथून माझे प्रेतच बाहेर जावे अशी ब्रिटिशांची इच्छा होती तिथून मी जिवंतपणी बाहेर पडलोच, पण त्यांना या देशाबाहेर काढण्याचा सुवर्णक्षणही अनुभवता आला. तुमची पिढी सुदैवी आहे. तुम्ही स्वतंत्र भारतात जन्मलात, आपल्या विचारांचा ब्रिटिशांइतकाच द्वेष करणारी मंडळी शेजारी आहे पण राष्ट्रीय विचारांची ताकदही नक्कीच वाढली आहे. अजून बलशाली व्हा. राष्ट्र बलशाली करा...’’

याच भिंतीवर सावरकरांनी ‘कमला’ उतरवले होते. याच कोठडीत त्यांचे स्वातंत्र्यचिंतन चालू होते. जेलर बॅरीच्या रूपाने ब्रिटिश राजसत्तेचे आघात सोसत असतानाच ते अधिकाधिक दृढनिश्चयी बनत होते.

हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते
तुजसाठि मरण तें जनन... तुजवीण जनन तें मरण
तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण

अशी स्वातंत्र्यदेवतेची कठोर आळवणी करतानाच

गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतन्त्रते भगवती तूच जी विलसतसे लाली
तु सूर्याचें तेज उदधिचे गांभीर्यहिं तूचि
स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची...

असे आलंकारिक वर्णनही करत स्वातंत्र्यदेवतेची उच्चरवानेे आळवणी करणारा हा स्वातंत्र्यवीर क्रांतीकारकांचा मेरूमणी ठरला.

साडेसात गुणिले बारा फुटांच्या त्या कोठडीत आयुष्याची सुमारे 11 वर्षे विलक्षण मनोधैर्याने काढत असताना ते खच्ची करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होताच. त्याच कोठडीच्या बरोबर खाली कैद्यांचे फाशीघर आहे. त्या फाशीघरासमोरच फाशीच्या कैद्यांच्या अखेरच्या अंघोळीची व्यवस्था... दोन बराकींच्या मध्यभागी ब्रिटिशांची छळछावणी... जिथे अर्धपोटी राजबंद्यांकडून कोलू ओढवला जायचा, काथ्या कुटून दोर वळवून घेतले जायचे आणि रोजची मागणी पूर्ण न करणार्‍यांवर अक्षरशः अमानवी अत्याचार केले जायचे. इथून खूप कमी कैदी जिवंत परतले. जे परतले त्यांच्या शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक शक्ती अधिक भक्कम... तात्याराव आणि बाबाराव हे दोन सख्खे बंधू त्यांच्यापैकीच... त्यांनी सारे आयुष्य देशासाठी, देशहितासाठी खर्चले... ते अमर ठरले...

पण या अमरत्वाला आपल्या माकडचेष्टांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न करणारी मंडळी आजही आहेत. त्या कोठडीतून बाहेर पडताना समोरच्या मैदानात पाहात होतो तेव्हा तेथे तळपणार्‍या दोन ज्योती दिसल्या. पहिली ज्योती मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ. अटलजींच्या कार्यकाळात तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या पुढाकारातून उभारली गेलेली. त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओळी कोरलेल्या.


पण एका परिवारापलिकडे ज्यांची र्‍हस्वदृष्टी गेली नाही अशा मर्कटवृत्तीच्या नेत्यांनी ती निशाणीही तिथून पुसली. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर या सरकारमधील पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दुसरी एक ज्योती उभारली. पहिल्या ज्योतीवर अन्य क्रांतीकारकांच्या ओळी कोरल्या गेल्या आणि नव्या ज्योतीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या... द्वेषाचे एक चक्र सर्वादराच्या प्रक्रियेने नव्या सरकारने पूर्ण केले...

त्या पुण्यभूमीतून बाहेर पडताना पुन्हा एकदा अनेक विचारांचे काहूर माजले. त्या स्मृतींना वंदन केले आणि माझे काम संपले का? त्यांनी मांडलेला विचार प्रत्यक्षात कुणी उतरवायचा? ज्या प्रबळ राष्ट्रनिर्मितीसाठी सावरकरांनी प्रयत्न केले ते प्रयत्न पुढे कसे जाणार? ज्या जातीभेद निर्मुलनासाठी त्यांनी रत्नागिरीतून प्रारंभ केला त्या मोहिमेचे काय?

जातीभेद विसरून एकत्वाने पुढे जाण्याचा प्रयत्न राष्ट्रीय शक्ती करताना पुन्हा पुन्हा त्यांना अपशकून करण्याचा प्रयत्न तीच जुनी मंडळी करताहेत, ज्यांनी शिवरायांना ‘वाट चुकलेला देशभक्त’ म्हटले होते... ‘मी अपघाताने हिंदू आहे’, अशी दर्पोक्ती केलेली होती. सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार्‍या भारतीय तरुणांना दरवाजातून हकालले होते... भगतसिंगांच्या सुटकेच्या मोहिमेला अपशकून करत ‘हिंसक विचाराच्या’ तरुणांना मुक्त करता कामा नये, अशी भूमिका मांडली होती, त्याच विचाराची मंडळी पुन्हा आपले उपद्व्याप सुरू करीत आहे... जातींचे कंगोरे पुन्हा टोकदार बनवले जात आहेत...

मी यात काय करू शकतो? आपण यात काय करू शकतो? हा विराट हिंदू समाज जातीभेदविरहित होऊन बलशालीपणे उभा राहिला तरच हा देश खंबीरपणे उभा राहू शकेल. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काय करू शकेन? हा समाज, त्यातील द्रष्टे लोक काय करू शकतील?

मी काहीतरी करेन... माझ्या क्षमतेनुसार काही करेन, एवढा निश्चय मी, आपण केला तरी खूप काही होईल...

आज इतकेच...