Thursday, June 2, 2011

बैठक भाजपाची... चर्चा मनसेची...!

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक दि. 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे पार पडली. 
विविध घोटाळ्यांवरुन अडचणीत आलेल्या केंद्र सरकारचे संभाव्य पतन लक्षात घेऊन मुदतपूर्व निवडणुकींच्या तयारीच्या दृष्टीने व्यूहरचना आखण्यासाठी औरंगाबादेत बोलावण्यात आलेली ही बैठक प्रत्यक्षात मात्र वेगळ्याच मुद्‌द्यावर लक्ष केंद्रित करून समाप्त झाली. विविध नेत्यांकडून बैठकीदरम्यान क्रमाक्रमाने बदललेल्या दिशेमुळेअंतिम टप्प्यात ही बैठक ‘मनसे’शी संभाव्य युतीच्या मुद्‌द्यावर आली. पूर्वनियोजनाच्या दृष्टीतून पाहिल्यास ही बैठक दिशाहीन ठरली, पण संभाव्य राजकीय जुळवाजुळवींची ‘चाचपणी’ करण्याच्या दृष्टीने पाहिल्यास या बैठकीला मिळालेले यश निर्विवाद आहे...!
................................................................................................................
’पीपल्स पॉलिटिक्स’ या मासिकात मार्च २०११ च्या अंकात
प्रकाशित झालेला लेख...
................................................................................................................

भ्रष्टाचार, महागाई या विषयांवर कॉंग्रेसने विरोधकांना मिळवून दिलेल्या संधीचे ‘सोने’ करण्यासाठी सध्या भाजपा नेतृत्व सर्व पातळ्यांवर पुढे सरसावले आहे. पुढील महिनाभरात या विषयावर राज्यभरात रान उठवून 14 मार्च रोजी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंबईत मंत्रालयावर 10 लाखांचा मोर्चा नेण्यासाठीची ठोस पूर्वतयारी, हा मुख्य अजेंडा घेऊन औरंगाबादेतील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. चार फेब्रुवारीच्या संध्याकाळपासूनच औरंगाबाद शहरात ‘भाजपेयीं’ची लगबग सुरू होती. शहरातील एका शिक्षणसंस्थेच्या प्रशस्त प्रांगणात भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजण्यात आलेली होती. या संस्थेचे अध्यक्ष हे मूलतः कॉंग्रेस कार्यकर्ते. मात्र त्यांचे मेव्हणे औरंगाबादचे दोन वेळचे (माजी) महापौर. या मेव्हणे महोदयांनी मागील वेळी विधानसभेची निवडणूकही लढविलेली. गोपीनाथ मुंडे यांचे ते निकटर्तीय. त्यामुळेच येथे पक्षीय तटबंदी विरघळली आणि शैक्षणिक सत्र सुरू असतानाही महाविद्यालयाच्या प्रांगणात कार्यकारिणीची बैठक रंगली.

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक दर तीन महिन्यांनी होत असते. संघटनात्मक कार्याचा आणि गतकाळातील कार्यक्रमांचा आढावा आणि पुढील तीन महिन्यांतील कार्यक्रमांची आखणी अशी या बैठकीची ढोबळ कार्यक्रम पत्रिका असते. मागची कार्यकारिणी बैठक कोल्हापुरात झाली होती. पक्षाचे संघटन सरचिटणीस रघुनाथ कुलकर्णी यांच्या समवेत पक्षाचे इतर पाच सरचिटणीस आपापल्या विभागाचा आढावा बैठकीत सादर करतात. विनोद तावडे (मुंबई व कोकण), चंद्रकांतदादा पाटील (पश्चिम महाराष्ट्र), देवेंद्र फडणवीस (नागपूर), गिरीष महाजन (उत्तर महाराष्ट्र) आणि रावसाहेब दानवे (मराठवाडा) यांनी या बैठकीत आपापले अहवाल सादर केले. अपेक्षित असलेल्या सुमारे 625 प्रतिनिधींपैकी सुमारे 500 प्रतिनिधींची उपस्थिती, ही या बैठकीतील एक ठळक बाब. 4 फेब्रुवारी रोजी पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली आणि 5 व 6 रोजी संपूर्ण कार्यसमितीची बैठक झाली.

कॉंग्रेसने नजराण्यादाखल दिलेल्या ‘आदर्श’, ‘राष्ट्रकुल’, ‘टू जी’, त्यावरील ‘जेपीसी’, ‘स्विस बँकेतील काळा पैसा’ या मुद्‌द्यांच्या भोवतीच ही बैठक फिरणार हे बैठकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले होते. ‘आदर्श’प्रकरणी आरोपपत्रातून 18 पैकी 5 नावे केंद्राच्या आदेशावरून वगळण्यात आल्याचा आरोप विनोद तावडे यांनी या पत्रकार परिषदेत केला. बैठकीला जोडून शहरात जाहिर सभेचेही आयोजन करण्यात आलेले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, माजी अध्यक्ष व्यंकय्या नायडू, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, प्रदेश प्रभारी उमापती त्रिपाठी, खासदार गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे आदी नेत्यांच्या प्रस्तावित उपस्थितीने ही सभा
गाजणार याचे संकेत आधीपासूनच मिळत होते. सभेला प्रतिसादही मोठा मिळाला. ज्या मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली होती, ते मैदान ओसंडून वाहात होते. ही बाब पक्षाला नक्कीच सुखावणारी होती. विशेषतः, सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेली लालकृष्ण अडवानी यांची सभा अक्षरशः ‘फ्लॉप’झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सभेला मिळालेला प्रतिसाद नक्कीच सुखावणारा होता. विविध घोटाळ्यांमुळे अस्वस्थ असणारे आणि महागाईमुळे त्रस्त झालेले समाजमन या सभेकडे आकर्षित झालेले दिसले. ‘संवेदनशून्य, निर्दयी, अहंकारी, भ्रष्टाचारी, माफिया राज...’अशा शेलक्या आणि थेट शब्दांमध्ये भाजप नेत्यांकडून कॉंग्रेस सरकारचे वाभाडे काढण्यात आले.
सरकारांतील घोटाळ्यांमागील गॉडफादर कोण, असा सवाल करीत असतानाच ‘गॉड मदर’कोण अशी सूचक विचारणाही या नेतेमंडळींनी केली, त्याला अर्थातच टाळ्यांच्या कडकडाटाचा प्रतिसाद मिळाला. येत्या महिनाभरात राज्यात विभागीत पातळीवर कोठेकोठे सभा होणार, याचे वेळापत्रकही सांगण्यात आले आणि सारे राज्य पिंजून काढण्याचा संदेशही देण्यात आला. नक्षलवाद आणि माओवाद हे दोन विषय नितीन गडकरी यांनी सभेच्या व्यासपीठावरून मांडले आणि याच मुद्‌द्यांची मांडणी त्यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या व्यासपीठावरही केली. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून असलेला या विघटनकारी शक्तींचा प्रभाव भविष्यात इतरत्र वाढू शकतो असा इशारा देत असतानाच या प्रश्नांना विकास हेच एकमेव उत्तर असल्याचे त्यांनी आवर्जुन मांडले.

युतीतील बिघाडीच्या पाऊलखुणा
भ्रष्टाचार, गैरव्यवहार, निष्क्रीय पंतप्रधान, प्रभावहीन गृहमंत्री, काळा पैसा, दहशतवाद, नक्षलवाद, माओवाद... विषयांचा हाच ओघ या बैठकीच्या केंद्रस्थानी राहील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात घडले वेगळेच. जळगावात एकनाथ खडसे पुत्राचा झालेला पराभव आणि त्यात शिवसेनेचे सुरेशदादा जैन यांची भूमिका, हा जुनाच विषय पुन्हा एकदा या व्यासपीठावर चर्चेला आला. वास्तविक औरंगाबाद ही युतीच्या दृष्टीने मागील काही वर्षांपासून नाजूक जागा झाली आहे. सुमारे चार वर्षांपुर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर प्रतिनिधी निवडून द्यावयाच्या वेळी भाजपाने घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेला या जागेवर पाणी सोडावे लागले. त्याची प्रतिक्रिया म्हणून दोन वर्षांपूर्वी पदवीधर मतदारसंघात शिवसेनेने आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला आणि भाजपाला
आपली मागील तीन टर्मपासूनची हक्काची जागा गमवावी लागली. मागील लोकसभा आणि विधानसभेत युती कायम राहिली पण अंतर्गत धुसफुस कायम होती. गतवर्षी झालेल्या निवडणुकीत महापालिकेत युतीला अनपेक्षितपणे सर्वाधिक जागा मिळाल्या आणि महापौरपद शिवसेनेने पटकावले. त्यावर कुरघोडी करीत भाजपाने कॉंग्रेसच्या मदतीने स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळविले. शिवसेनेच्या तीव्र आक्षेपानंतर हे पद सोडण्याचे भाजपाने जाहिर केले पण सभापती राजीनामा देण्यास तयार होईनात! त्यांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली, पण असे झाले तरी पदावर तेच कायम आहेत. त्याची प्रतिक्रिया म्हणून शहर भाजप कार्यालय व भाजप
नेते हरिभाऊ बागडे यांच्या घरावर ‘अज्ञात’ हल्लेखोरांनी हल्ला केलेला होता. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या औरंगाबादेतील प्रदेश कार्यकारिणी बैठकीत युतीच्या विषयावर लक्ष केंद्रित होणे अधिक उल्लेखनीय ठरले.
‘राज करिष्मा’भाजपाच्या मंचावर भ्रष्टाचार, महागाईवरून सरकारविरुद्ध रणशिंग फुंकण्याचा प्रारंभिक आवेश हळुहळू राज्यातील राजकीय पर्यायांच्या फेरजुळणीपर्यंत पोहोचला, हा योगायोग नक्कीच नसावा. युतीतील ताणतणाव, रुसवे फुगवे, स्थानिक पातळीवरील नेत्यांची परस्परांवरील कुरघोडी आणि शिवसेनेतील फाटाफुटींमुळे मागील विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, हा क्रम लक्षात घेता या बैठकीत युतीवर ‘चिंतन’अपेक्षितच होते. त्यातच, पुढील वर्षी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई, पुणे मनपा आणि राज्यातील काही नगर पालिकांच्या निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत. शिवसेनेशी युतीमुळे भाजपाच्या मतांवर आणि निवडणुकीतील कामगिरीवर परिणाम होत आहे, हा मतप्रवाह विधानसभा निवडणुकीनंतर जोर धरत आहेच.

राज ठाकरे यांच्या करिष्म्यामुळे हे सारे घडते आहे, हे ही आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. त्यातच शिवसेनेच्या नाकाला झोंबणारे मुंबईतील ‘राज - मुनगंटीवार चहा नाट्य’घडले होते. तेव्हाची शिवसेनेची तीव्र प्रतिक्रिया आणि भाजपमधील या विषयावरील वेगवेगळे मतप्रवाह स्पष्टपणे समोर आले होते. मागील महिन्यात मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांकडून झालेल्या निर्घृण मारहाणीनंतर राज ठाकरे यांनी औरंगाबादेत सभा घेतली. ‘अति विराट’म्हणता येईल अशा या सभेने अनेकांना 1988 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या झालेल्या सभेची आठवण करून दिली. किंबहुना त्या सभेपेक्षाही राज ठाकरे यांची सभा उपस्थितांच्या संख्येसह अनेक बाबतीत सरस राहिली. एका आमदाराला मारहाण हा मुद्दा तशा अर्थाने गर्दी गोळा करण्यासाठी फारसा महत्वाचा
नव्हता. मनसेचा या भागातील पाया अजूनही कच्चाच आहे. गावोगावहून येणार्‍यांसाठी पक्षातर्फे कसलीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. उलट, सभेसाठी पोलिसांनी कठोरपणे सुरक्षा व्यवस्था आवळलेली होती. औरंगाबादच्या दिशेने येत असलेल्या प्रत्येक वाहनाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येत होते. सभेदरम्यान गडबड झालीच, तर कलर गॅस सोडणार असल्याचे पोलिसांनी जाहिर केले होते. सभेला उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या शरीराच्या उघड्या भागांवर या गॅसमुळे पक्क्या रंगीत खुणा उमटणार आणि अशा ‘दंगेखोरांफना पुढील आठवडाभरात पकडणे पोलिसांना सोपे जाणार...! पांढरपेशा वर्ग यामुळे गर्दीपासून दूर राहणेच अपेक्षित होते.
मात्र झाले उलटेच. अशा प्रकारच्या अनेक अडथळ्यांना पार करीत ही सभा अपेक्षेपेक्षा अनेक पटीने यशस्वी ठरली, तेव्हा राजकीय निरीक्षकही चक्रावून गेले. शिवसेनेचा मराठवाड्यातील प्रभावी कामगिरीचा प्रवास असाच सुरू झालेला होता. मात्र त्या प्रवासाला औरंगाबादेतील धार्मिक दंगलीची पार्श्वभूमी होती. भावनेला आवाहन करणार्‍या त्या सभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची ही सभा तशी ‘मुद्दाहीन’होती. हे चित्र लक्षात घेतल्यानंतर भाजपाच्या दृष्टीतून या सभेला आणि ‘मनसे’ला असलेले महत्व लक्षात येऊ शकेल.

ही सारी समीकरणे नजरेसमोर आल्यानंतर काही बाबी ठळकपणे अधोरखित होतात. मागील लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला स्पष्टपणे नाकारले होते. मनमोहनसिंहांवर अडवाणी यांनी केलेला निष्क्रियतेचा आरोप त्यांच्यावरच बुमरँग झाला होता. या वेळी परिस्थिती वेगळी आहे. कॉंग्रेसला जनतेने नाकारावे, हे पटवून देण्यासाठी विरोधकांकडे भरपूर मुद्दे आहेत. मनमोहनसिंहांची निष्क्रियता, किंबहुना हतबलता देशाने पाहिली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधार्‍यांच्या विरोधातील मुद्दे भाजपची बाजू बळकट करणारे ठरणार आहेतच. पण आपण एकटे हा असंतोष ‘इन्कॅश’ करु शकणार नाही, याची जाणीवही त्यांना आहे. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत हाता-तोंडाचा गेलेला घास त्यांना अस्वस्थ करतो आहे. शिवसेनेची खच्ची झालेली ताकद आणि मनसेचा वाढत चाललेला
प्रभाव, त्यातही राज ठाकरे यांची कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत सहभागी न होता कल्याण डोंबिवलीवर लक्ष केंद्रित करण्यासारखी खेळी, या बाबी भाजपाला मनसेकडे आकर्षित करणार्‍या ठरत आहेत.
असे असले तरी मुंडे यांच्या या विधानानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया उल्लेखनीय ठराव्यात.
‘चहाच्या पेल्याफतील वादळानंतर जी तीव्र प्रतिक्रिया शिवसेनेतून उमटली होती, त्याची पुनरावृत्ती या वेळी झाली नाही. उद्धव ठाकरे यांनी या विषयावर फार टोकाची भूमिका घेत वक्तव्ये केली नाहीत. दुसरीकडे राज ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकीपर्यंत कसलाही विचार करण्यास नकार देत असताना अप्रत्यक्षपणे विधानसभेसाठी ही विषय खुला असल्याचे मान्य केले! एका परीने भाजपने या संभाव्य युतीच्या विषयाची चाचपणी या निमित्ताने करून पाहिली. वास्तविक भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान कधीही पत्रकारांना प्रवेश दिला जात नाही. स्वतंत्र पत्रकार परिषदेत त्यांच्याशी चर्चा होते. बैठकीतील सर्व सत्रांपासून पत्रकारांना दूर ठेवण्यात येते. ही परंपरा औरंगाबादेत मोडली. समारोपाच्या सत्रात पत्रकारांना निमंत्रित करण्याचा निर्णय पदाधिकार्‍यांनी चर्चा करून, विचारपूर्वक घेतला. विषयपत्रिकेवरील रुटीन विषयांबरोबर मनसेचा मुद्दा पुढे आणला. प्रसारमाध्यमांनी अपेक्षेप्रमाणे तोच उचलला. 14 मार्चसाठीच्या रणनीतीसाठी एक महिना हाताशी आहे, पण ‘मनसेफच्या ‘ऍसिड टेस्टफसाठीचा हा मुहुर्त साधण्यात आला.

आता पुढे या मुद्‌द्यावर औरंगाबादेत झालेले विचारमंथन आणि प्रयोग राज्याच्या राजकारणाला कोणती दिशा देतील, हे कळण्यासाठी काही कालावधी जाऊ द्यावा लागणार, असे दिसते.

मुंडे यांचे गणित
नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार यांचे ‘मनसेफप्रेम सर्वश्रुत आहे. मुंडे यांच्या बाजूने या प्रेमाचे दर्शन कधी स्पष्टपणे झालेले नव्हते. ही कसर भरून काढण्याचे मुंडे यांनी या वेळी ठरविले असावे. असे चमत्कार घडवून आणणे, हीच आपली खासियत आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात अगदी जोरकसपणे सांगितले. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणाने होतो. या वेळीही समारोपाचे भाषण मुंडे यांनीच केले. स्वतःला सचिन तेंडुलकरची उपमा देत, ‘कॅप्टन करू नका पण खेळू तर द्या... फलंदाजीचा क्रमही हवा तर तुम्हीच ठरवा, पण मला खेळू द्याफ... अशी गमतीशीर विनवणी करीत असतानाच त्यांनी युतीमध्ये ‘मनसेफच्या संभाव्य सहभागाचा मारलेला ‘सिक्सर’ अक्षरशः स्टेडियमबाहेर गेला! मनसेबाबतच्या पक्षांतर्गत पातळीवरील श्रेयाच्या मुद्‌द्याबरोबरच राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचा मुंडे यांचा हा प्रयत्न राजकीय पातळीवर सर्वाधिक चर्चेचा ठरला.
बैठकीच्या काळात भाजपचे सर्व प्रमुख नेते शहरात होते. पहिला दिवस भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी गाजविला. दुसर्‍या दिवशी विनोद तावडे आणि तिसर्‍या दिवशी एकनाथ खडसे भाव खाऊन गेले. मराठवाड्याचे भूमीपुत्र गोपीनाथ मुंडे या काळात कुठेही फारसे प्रकाशात नव्हते. अखेरच्या दिवशीची त्यांची ‘खेळू’ देण्याची विनंती आणि त्यापाठोपाठ मारलेला मनसेचा ‘सिक्सर’ ही सारी गणिते मुंडे यांची भविष्यातील रणनीती कळण्यासाठी पुरेशी ठरावीत.

तावडे यांचे ‘मराठा कार्ड'
विनोद तावडे यांची भाजपमधील वाटचाल हळूहळू वरच्या दिशेने सुरू असल्याचे त्यांच्या हालचालींवरून स्पष्ट होत असते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या चळवळीतून पुढे आलेले हे ‘डॅशिंग’ व्यक्तिमत्व. नव्वदच्या दशकात झालेले काश्मिरी विस्थापितांचे आंदोलन असो, की त्या आधी राजीव गांधींना पराभूत करण्यासाठीची वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढल्याची घटना असो, प्रत्येक चळवळीत त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला होता. त्याकाळातील विद्यार्थी परिषदेतील त्यांचे सहकारी आजही तावडेंच्या पाठीशी असतात. अर्थात यामध्ये मुंबई - ठाणे पट्‌ट्यातील प्रमाण खूप जास्त आहे. मराठवाड्यात हे प्रमाण अगदीच कमी आहे. एक निश्चित दिशा घेऊन तावडे यांची सुनियोजित वाटचाल सुरू असते.
आमदारकी मिळविल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग्ज औरंगाबादच्या विविध भागांत लागले होते. औरंगाबादेतून त्यांचे अभिनंदन व्हावे, असे कार्यकर्त्यांचे पाठबळ तेव्हाही या शहरात नव्हते. आजही ते फारसे नाही. या बैठकीच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने शहराच्या विविध भागांत आपल्या नेत्यांचा स्वागताचे होर्डिंग लागले होते. मात्र त्यात उठून दिसले, ते विनोद तावडे यांचे स्वागत करणार खास होर्डिंग. ‘अ. भा. मराठा महासंघाफच्या वतीने विनोद तावडे यांचे स्वागत करणारे हे फलक सर्वार्थाने वेगळे ठरले. ‘मराठा महासंघ’ आणि ‘भाजप’ यांच्यात तशा अर्थाने कसलेही ‘पारिवारिक’ कनेक्शन नसताना हे असे कसे घडले? एक चर्चा अशीही आहे,
की गोपीनाथ मुंडे यांच्या ‘ओबीसी’ कार्डला उत्तर म्हणून तावडे यांच्याकडून ‘मराठा’ कार्डची जुळवाजुळव सुरू आहे. त्यातूनच या ‘पक्षनिरपेक्ष’ स्वागताची एक झलक औरंगाबादकरांना अनुभवण्यास मिळाली. यात तथ्य असेल, तर राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल!

गडकरी यांचे कार्यकर्ता प्रेम...
भाजपाध्यक्ष नितीन गडकरी आजही स्वतःला सामान्य कार्यकर्ता म्हणवतात. दोन महिन्यांपूर्वी पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनासाठी ते औरंगाबादेत आले होते. त्या कार्यक्रमाला जोडून प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेतील एक पुष्प त्यांनी गुंफले. रात्रीच्या भोजनासाठी शहरातील एक नामवंत बांधकाम व्यावसायिक किरण वाढी यांच्या प्रशस्त निवासस्थानी ते गेले होते. या वेळी त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्याचे घर निवडले. चंद्रकांत हिवराळे या भाजपाच्या दलित कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्यांनी गप्पा मारल्या. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहिली. पंचतारांकित हॉटेलातील बैठकीनंतर
सामान्य दलित कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्याच्याशी नाळ जोडण्याचा गडकरींचा हा प्रयत्न वेगळेपणा मांडणारा ठरला.

No comments: