Thursday, June 2, 2011

काळ्याकुट्ट इतिहासाची ‘आयपीएल’



भारत हा क्रिकेटप्रधान देश आहे. या देशाचे क्रिकेटमंत्री त्यांना वेळ मिळेल तेव्हा कृषि खात्याकडे लक्ष देतात. क्रिकेटच्या व्यापातून वेळ काढणे कठिण आहे, म्हणून आपल्यावरील ‘वर्क लोड’ कमी करावा अशी कोडगेपणाची मागणीही त्यांनी पंतप्रधानांकडे केली होती. ‘वर्ल्ड कप’, ‘आयपीएल’ यांच्या माध्यमातून देशात उन्मादाच्या लाटा आणून मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याची ‘अफूची गोळी’ क्रिकेट धर्माच्या माध्यमातून दिली जात आहे. हे नशापाणी किती काळ चालणार?
...........................................................................................................
पाक्षिक `शेतकरी संघटक`च्या 21 एप्रिल 2011 च्या अंकात
प्रकाशित झालेला लेख...
...........................................................................................................

झहीर खान कोणत्या संघाकडून खेळतो? गौतम गंभीर कोणत्या संघात आहे? लसिथ मलिंगा कोणाकडून आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मागील वर्षी वेगळी होती. मागच्या 2 एप्रिलपर्यंत ती आणखीच वेगळी होती आणि 8 एप्रिलपासून ही उत्तरे पुन्हा बदलली. ‘आयपीएल’ नावाच्या गारुडाचा हा परिणाम होता. या गारुड्याच्या पुंगीची लय क्रिकेट खेळणार्‍या सर्व देशांच्या क्रिकेटवीरांना मोहिनी घालणारी ठरली, ती इतकी की आपल्या देशाच्या एकाही खेळाडूची या संघांमध्ये निवड न झाल्याबद्दल पाकिस्तानीक्रिकेटपटूंनी जाहीर निषेध व्यक्त केला ! काय आहे हा प्रकार? चार वर्षांपूर्वी या प्रकाराची ‘क्रेझ’ किती होती आणि आज परिस्थिती काय आहे? या प्रकाराला सामान्य भारतीयाने कशा प्रकारे प्रतिसाद दिला आहे? सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व प्रकाराला पार्श्वभूमी कोणती आहे? एखाद्या व्यक्तीचा पराकोटीचा अट्टाहास कसा असू शकतो... एखाद्या महाशक्तीमान व्यक्तीने ठरविले तर एखादी चळवळ उध्वस्त कशी करता येते आणि तशीच चळवळ आपल्या नेतृत्वाखाली सुरू करण्याचा अट्टाहास ही व्यक्ती कशी प्रत्यक्षात उतरवू शकते... हा सारा इतिहास रंजक आणि काळाकुट्ट आहे.
साधारण 2006 मध्ये झी टीव्हीचे सर्वेसर्वा सुभाषकुमार गोयल यांच्या कल्पनेतून ‘इंडियन क्रिकेट लीग’ची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर नुकताच झालेला ‘ट्वेंटी ट्वेंटी’ क्रिकेटचा उदय या लीगच्या पथ्यावर पडला. गोयल हे भारतातील ‘मिडिया टायकून’ आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपर्ट मर्डोक यांचे जे स्थान तेच भारतात गोयल यांचे. झी टीव्ही या पहिल्या भारतीय हिंदी चॅनेलचे ते निर्माते आणि त्यानंतर त्यांनी ‘झी टीव्ही’चा विस्तार अनेक भाषांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये केला. ‘झी स्पोर्टस्‌’ ही त्यांची क्रीडा वाहिनी भारतातील पहिली भारतीय क्रीडा वाहिनी ठरली. आपल्या कारभाराचा विस्तार करण्यासाठी त्यांनी देशातील नामवंत क्रीडापटूंच्या सहकार्याने ‘आयसीएल’ला (इंडियन क्रिकेट लीग) जन्म दिला. 

वास्तविक देशातील तरुण रक्ताला वाव देणारा हा एक उत्तम पर्याय होता. ‘बीसीसीआय’च्या आंतरराष्ट्रीय संघात संधी न मिळालेल्या क्रिकेटपटूंना आपले क्रिकेट नैपुण्य दाखविण्यासाठी आणि त्याच वेळी चांगला पैसा कमावण्यासाठी आयसीएल हा चांगला पर्याय सापडला. देशातील उदयोन्मुखक्रिकेटपटूंबरोबरच गोयल यांनी काही परदेशी खेळाडूंनाही करारबद्ध केले. या कामी 1983च्या विश्वचषक विजेत्या संघाचा कप्तान कपिलदेव यांनी पुढाकार घेतला होता.

पण प्रत्येक क्षेत्रात आपल्या पुढे कोणीही गेलेले न खपण्याची प्रवृत्ती असलेले क्रिकेटमंत्री शरद पवार यांना गोयल यांची कृती रुचली नाही. त्यांनी हा विरोध इतक्या वैयक्तिक पातळीवर नेला, की ‘आयसीएल’च्या सामन्यांना देशभरातील एकही प्रमुख मैदान उपलब्ध होऊ शकले नाही. पवार गटाच्या हातात असलेल्या सर्व मैदानांवर ‘आयसीएल’ला बंदी होती. पवारांच्या ताब्यात असलेल्या आणि प्रभावाखाली असलेल्या वृत्तपत्रांनी या स्पर्धेच्या बातम्या छापणेही टाळले. त्या काळात लालूप्रसाद यादव यांनी मात्र बिहारमध्ये ‘आयसीएल’ला स्टेडियम उपलब्ध करून दिले. पर्यायी स्टेडियमचा वापर करीत आणि आपल्या ताब्यात असलेल्या ‘झी स्पोर्टस्‌’वर सामने दाखवीत गोयल यांनी पहिली क्रीडा स्पर्धा साजरी केली. या वाहिनीला ‘बीसीसीआय’च्या सामन्यांच्या प्रसारणांचे हक्क मिळू नयेत, म्हणून शरद पवार यांनी जंग जंग पछाडले. त्यासाठी नियम वाकविण्यात आले, बदलण्यात आले.


पण त्यानंतर मात्र शरद पवारांच्या कुटील कारवायांना वेग आला. ‘आयसीएल’मध्ये सहभागी झालेल्या भारतीय क्रिकेटपटूंना ‘बीसीसीआय’ची दारे बंद झाली, एवढेच नव्हे तर त्या स्पर्धेत खेळणार्‍या परदेशातील खेळाडूंना त्या त्या देशांच्या संघातही स्थान मिळू नये, आणि ते मिळाले तर भारतीय संघ त्या संघाविरुद्ध खेळणार नाही, अशा धमक्या देण्यापर्यंत हे प्रकार वाढले. एकदा ‘बीसीसीआय’ची दारे बंद झाली की त्या खेळाडूंची क्रिकेट कारकीर्दच संपुष्टात आली, कारण परदेशात संघ पाठवायचे, तर ‘आयसीसी’ची (इंटरनशनलक्रिकेट काउन्सिल) मान्यता असणे आवश्यक आणि भारतात अशा मान्यता फक्त ‘बीसीसीआय’लाच होती. अशी मान्यता मिळविण्याचा प्रयत्न ‘आयसीएल’कडूनही झाला पण तो उधळून लावण्यात आला. गोयल यांच्यासमोरील सर्व मार्ग खुंटलेले होते. प्रसारणाचे हक्क नाहीत, करारबद्ध झालेल्या खेळाडूंचे भविष्य अंधःकारमय झालेले आणि मूळ कल्पना पवारांच्या ‘बीसीसीआय’ने चोरलेली... या पार्श्वभूमीवर गोयल यांनी ‘आयसीएल’चा पसारा गुंडाळला आणि सर्व खेळाडूंना त्यांचे ठरलेले मानधन चुकते करून करारातून मुक्त केले. पण या धुमश्चक्रीत अनेक खेळाडूंची कारकीर्द अंधःकारमय झाली. अनेकांची संधी हुकली. दस्तुरखुद्द कपिल देवलाही बराच काळ बहिष्काराचा सामना करावा लागला.

याच दरम्यान ‘आयसीएल’च्या पर्यायी ‘आयपीएल’ची घोषणा करण्यात आली होती. ‘बीसीसीआय’चेच (बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया)अपत्य असल्याने या स्पर्धेचा ‘तामझाम’ काय पाहायचा? राजस्थानातील ललित मोदी नावाचे एक ‘कर्तबगार’ सहकारी शरद पवारांना मिळाले आणि या मोदींनी ‘आयपीएल’ची जबाबदारी स्वीकारली. संघांच्या मालकांकडून मिळालेला प्रचंड पैसा, ताब्यात असलेली यंत्रणा आणि शरद पवार यांचा वरदहस्त यामुळे मोदी निरंकुश झाले. 2008 मध्ये मोठा गाजावाजा करीत ‘आयपीएल’च्या पहिल्या सत्राचे उद्घाटन झाले आणि या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ‘बीसीसीआय’शी करारबद्ध असलेले खेळाडू ‘आयसीएल’मध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. पर्यायाने त्यांच्याकडे स्टार क्रिकेटपटू उपलब्ध नव्हते. परदेशातील ब्रायन लारा सारखे काही क्रिकेटपटू त्यांच्याकडे होते पण तेवढी संख्या पुरेशी ठरली नाही. शिवाय ‘झी परिवार’ वगळता इतर सर्व न्यूज चॅनेलनीही त्यांच्यावर अघोषित बहिष्कार टाकलेला. त्यामुळे ते आयेजन काळवंडले होते. त्या पार्श्वभूमीवर ‘आयपीएल’ची चमक उठावदार ठरली.

पहिल्या वर्षीचा प्रतिसाद ‘बीसीसीआय’च्या तोंडाला पाणी आणणारा होता. देशभरातून दूरचित्रवाणीवर मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि स्टेडियमवरही झालेली प्रचंड गर्दी यामुळे आयोजकांचा आत्मविश्वास वाढला. दुसर्‍या सत्राच्या वेळी मात्र कसोटीची घडी आली. 2009 मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या होत्या. निवडणुकांचे वेळापत्रक आणि सामन्यांचे दिवस साधारणपणे एकाच कालावधीत येत होते. तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या सामन्यांदरम्यान सुरक्षा व्यवस्था पुरविण्यास नकार दिला, तेव्हा पर्यायी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची तयारी आयोजकांनी दाखविली आणि जेव्हा सामनेच घेण्यास परवानगी नाकारण्यात आली आणि वेळापत्रक पुढे ढकलण्यास सुचविण्यात आले तेव्हा आयोजकांनी आपल्या मुजोरीचा कळस गाठला. ‘आम्ही ठरविलेल्या वेळीच हे सामने होतील’, असे सरकारलाही ठणकावून सांगत ही स्पर्धा थेट दक्षिण अफ्रिकेत भरविण्यात आली. सामन्यांच्या वेळा भारतीय प्रेक्षकांना सोयीच्या होतील अशा ठरविण्यात आल्या आणि क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका देशातील अंतर्गत स्पर्धा दुसर्‍या देशात स्थलांतरीत करण्यात आली.


ही मुजोरी कुठून आली? देशातील सार्वत्रिक निवडणुका आणि अंतर्गत सुरक्षाव्यवस्था या पेक्षा ही स्पर्धा महत्वाची होती का? ‘बीसीसीआय’ आणि साहजिकच शरद पवार यांच्या दृष्टीकोनातून याचे उत्तर ‘ठाम होय’ असेच आहे. भलेही या स्थलांतराचे श्रेय आणि जबाबदारी ललित मोदी यांच्याकडे ढकलण्यात येते तरीही त्यांच्या मागे कोण होते? शरद पवार आणि पी. चिदंबरम यांच्यातील कुरघोडीचे राजकारण देशाने पाहिलेले होते. या पार्श्वभूमीवर थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना, पर्यायाने देशालाच आव्हान देण्याची ही प्रवृत्ती शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय जन्मणे शक्य तरी आहे काय?

तुलनेत कमी प्रेक्षक असलेल्या, बांधकामे चालू असलेल्या द. अफ्रिकेतील मैदानांवर या स्पर्धा रंगल्या आणि क्रिकेटप्रेमी भारतीयांनी या स्पर्धांचाही आनंद घेतला. निवडणुकीच्या धामधुमीत सर्वांचीच घटकाभर करमणूक झाली. पण पहिल्या ‘आयपीएल’च्या तुलनेत या वेळी देशभरातील क्रीडाप्रेमी या वेळी कमी प्रमाणात सहभागी झाले. 2010 मधील तिसरी ‘आयपीएल’ परत भारतात आली. पण एव्हाना अति क्रिकेटचा परिणाम जाणवू लागला होता. मैदानावर क्रीडाप्रेमींनी जोरदार प्रतिसाद दिला पण टीव्हीवरील टीआरपी मात्र कमी झाल्याचे लक्षात येऊ लागले. याच काळात ललित मोदी यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा समोर येऊ लागल्या होत्या. ‘आयपीएल -3’ संपल्याबरोबर त्यांची हकालपट्टी होणार हे निश्चित होते. तरीही मोदींनी आपली बाजू भक्कमपणे लावून धरली. अंतिम सामन्यासाठी तर ते स्वतःच्या परिवारासोबत हेलिकॉप्टरने आले ! त्याच रात्री त्यांची उचलबांगडी झाली आणि चिरायू अमीन ‘आयपीएल’चे गव्हर्नर झाले.

हा साराच घटनाक्रम काळाकुट्ट आणि क्रिकेटच्या आत्म्याला काळीमा फासणारा आहे. या देशातील क्रिकेटरसिक क्रिकेटपटूंवर जिवापाड प्रेम करतो. त्याच्यासाठी नवस बोलतो. सचिनसारख्या खेळाडूंना तर देव मानतो. त्यांच्या भावना इथे मातीमोल ठरल्या. ‘आयपीएल’ने क्रिकेट जगतात पैशाचा माज आणला. आंतरराष्ट्रीय सामन्यात देशाचे प्रतिनिधीत्व करण्यापेक्षा ‘आयपीएल’च्या बोलीत जास्तीत जास्त पैसा मिळविण्यावर खेळाडूंनी लक्ष केंद्रित केले. तिसर्‍या सत्रानंतर दोन संघ वाढविण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ने घेतला आणि या संघांच्या विक्रीतून त्यांना झालेली कमाई पाहून सर्वांचेच डोळे पांढरे झाले. हा सारा काय प्रकार आहे? हा पैसा येतो कुठून? जातो कुठे? तिसर्‍या सत्रापर्यंत ‘चेन्नई सुपर किंग्ज’, ‘डेक्कन चार्जर्स’, ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’, ‘किग्ज इलेव्हन पंजाब’, ‘कोलकोता नाईट रायडर्स’, ‘मुंबई इंडियन्स’, ‘राजस्थान रॉयल्स’ आणि ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर’ हे आठ संघ ‘आयपीएल’च्या मैदानात होते. या वर्षीच्या चौथ्या सत्रासाठी ‘कोची टस्कर्स केरला’ आणि ‘पुणे वॉरियर्स इंडिया’ या दोन संघांची त्यात भर पडली. या दोन संघांच्या मालकांनी ‘बीसीसीआय’ला मालामाल केले. हा फायदा मिळवून देणार्‍या ललित मोदींना मात्र खड्यासारखे दूर करण्यात आले. अशा प्रकरणांची आपल्या देशातील पार्श्वभूमी पाहता त्यांच्या जिवाला धोका असू शकतो. त्यामुळेच त्यांनी परदेशात आश्रय घेणे सोयीस्कर मानले. पवारांच्या राजकारणाचे एक खास वैशिष्ट्य आहे. राजकारण असो की आयपीएल - कोणाला केव्हा बरोबर ठेवायचे आणि केव्हा दूर करायचे हे बरोबर कळते. मग ते मोदी असोत, कलमाडी असोत, दालमिया असोत की पद्मसिंह पाटील. केव्हा काय बोलायचे हे ही त्यांना बरोबर कळते. ‘लवासा सिटी’च्या वादात ते योग्य वेळी तोंड उघडतात आणि परस्पर ‘क्लीन चीट’ही देऊन टाकतात. स्वतः केंद्र सरकारचा एक अविभाज्य भाग असतात आणि सरकारमधील भ्रष्टाचारावर बिनधास्त टीकास्त्र सोडतात... पण ते सरकार सोडत नाहीत !
मोदी असोत की शशांक मनोहर की चिरायू अमीन... या पैकी एकाला तरी स्वतःचे मत असू शकते? ‘आयपील’च्या चार वर्षांच्या वाटचालीत असंख्य वेळा अतिशय धाडसी निर्णय घेतले गेले. हे निर्णय घेण्याची आणि त्यांच्या अंमलबजावणीची कुवत या तिघांत किंवा त्यांच्या सहकार्‍यांत खरेच आहे? शरद पवार नावाची व्यक्ती पाठीशी नसेल, तर त्यांची ही हिम्मत झाली असती का? या प्रश्नाचे उत्तर नक्कीच नकारार्थी आहे. ‘आयपीएल’च्या चौथ्या सत्रात 51 दिवसांत 74 सामने होत आहेत. देशभर जागोजागी होर्डिंग्ज झळकलेली आहेत... ‘आयपीएल सुरू - देश बंद’ ! खरेच ही स्थिती आहे? काही प्रमाणात आयपीएलच्या पहिल्या सत्रात ही स्थिती होती. मैदानाबाहेरच्या कारणांमुळे कुप्रसिद्ध झालेल्या क्रिकेटला भारतात विश्वचषक जिंकण्याच्या चमत्कारामुळे काहीशी संजीवनी मिळाली, पण या सामन्यांकडे पाहण्याची समाजाची नजर आता स्वच्छ राहिली नाही. आर्थिक मुजोरीतून प्रीती झिंटा युवराज सिंगला खडे बोल सुनावू शकते, विजय मल्ल्या अनिल कुंबळेला दूर सारू शकतो, शाहरुख खान सारखा ‘विदूषक’ सुनील गावस्कर यांना ‘अक्कल’ शिकवू शकतो... क्रिकेटच्या सभ्यतेत अशा गोष्टींना जागा मिळते? थोडक्यात, ‘आयपीएल’ ही त्यात सहभागी झालेल्या सर्वांची सोय आहे.‘बीसीसीआय’ला बक्कळ पैसा मिळतो, क्रिकेटपटूंना ग्लॅमर मिळते, संघमालकांना चिक्कार प्रसिद्धी मिळते... पण क्रिकेट रसिकांना निखळ आनंद मिळतो का? हा संशोधनाचा विषय आहे.
................................................................................................................


'चीअर गर्ल्स'... हा काय प्रकार आहे?
क्रिकेट संस्कृतीला ‘आयपीएल’ने कोणते योगदान दिले? प्रचंड पैसा ओतण्यात आला आणि अर्धनागड्या बायका नाचविण्यात आल्या...! ‘चीअर गर्ल्स’ हा काय प्रकार आहे? हे प्रोत्साहन कुणासाठी? या बायकांचा नाच पाहून क्रिकेटपटूंना अधिक फटकेबाजीचे प्रोत्साहन मिळते की टीव्हीवर सामने पाहणार्‍या आंबटशौकीनांना? याला ‘बीसीसीआय’, ललित मोदी, शशांक मनोहर आणि अगदी शरद पवार यांनीही विरोध का केला नाही? 

इथे दोन उदाहरणे मला आवर्जुन मांडावीशी वाटतात. भारताने दोन वर्षांपूर्वी श्रीलंकेत आपल्या दौर्‍यादरम्यान एकमेव ‘टी ट्वेंटी’ सामना खेळला होता. या सामन्यात श्रीलंकेनेही ‘चीअर लिडर्स’ वापरले. पण हा प्रकार खूपच अभिनव वाटला. श्रीलंकेतील लोकपरंपरा सादर करणार्‍या ग्रुपना त्यांनी निमंत्रित केले होते आणि त्या वेषभूषेत त्यांनी आपली नृत्ये व वादन सादर केले. चौथ्या ‘आयपीएल’मध्ये सहभागी झालेल्या ‘पुणे वॉरियर्स इंडिया’चे मालक ‘सहारा ग्रुप’ने साधारण मार्च अखेरीस सर्व दैनिकांत अर्धे पान जाहिरात दिली होती. दुर्दैवाने विश्वचषकाच्या धामधुमीत त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. 
त्यांनी या जाहिरातीत केलेले आवाहन हृद्य होते. आपल्या देशातील लोककला आणि लोककलावंतांना ‘चीअर लीडर्स’ म्हणून आपल्या सामन्यांमध्ये सहभागी करीत असल्याची माहिती त्यांनी यात दिली होती आणि इतरही सर्व संघांनी याच प्रकारे अर्धनागड्या बायका न नाचवता लोककलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले होते. त्याला कोणीही प्रतिसाद दिल्याचे दिसत नाही. पुण्याचा संघ खेळत असलेले सामने चालू असताना ही नृत्ये आवर्जुन पाहा... आपल्या मनातील सहारा ग्रुपबद्दलची आत्मीयता नक्कीच वाढेल. या ग्रुपने नेहेमीच देशभावनेला प्रोत्साहन दिले आहे. महिला क्रिकेटला, हॉकीला प्रायोजक मिळत नसताना याच ग्रुपने ऐनवेळी पुढाकार घेत मदत केली. ‘आयपीएल’च्या मैदानातही त्यांनी आपले वेगळे अस्तित्व दाखविले आहे...

- दत्ता जोशी (
मो. 9225309010)

000

No comments: